चित्रपटसंगीत : संगीत हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा घटक आहे मग ते गीतांच्या रूपाने असो किंवा पार्श्वसंगीताच्या रूपाने असो. आधुनिक समाजात जो एकंदर संगीतव्यवहार असतो, त्यात चित्रपटसंगीताचे प्रमाण मोठे असते.
मूक चित्रपटांच्या जमान्यातच संगीताची सांगड चित्रपटाबरोबर घालण्याचे प्रयत्न होत असत. त्या काळी चित्रपट दाखविला जात असता, वाद्यवादक वा वाद्यवृंद पडद्यासमोर बसत आणि आपापल्या कुवतीनुसार व मर्जीप्रमाणे चित्रपटास संगीताची साथ देत. पाश्चात्त्य परंपरेत ल्युमेअर बंधूंनी १८९५ मध्ये दाखविलेल्या प्रख्यात मूक चित्रपटाच्या वेळी पडद्यासमोर पियानोवादक बसविल्याची नोंद आहे. मुंबईतील जुन्या वेस्ट एंड, ऑपेरा हाउस, कॅपिटॉल इ. चित्रपटगृहांत उच्च दर्जाचे मूकपट १९१९ ते १९३० पर्यंत दाखविले जात असत, तेव्हाही वाद्यवृंद पडद्यासमोर बसून प्रसंगानुरूप संगीत देत असे, अशी माहिती मिळते. प्रसंगानुरूप संगीत कोणते हे पहिल्यापहिल्याने वाद्यवादक स्वतः ठरवीत परंतु पुढेपुढे निरनिराळ्या प्रसंगांना अनुरूप अशा संगीताचे स्वरलेखन मुद्रित करून त्याच्या प्रती वाटल्या जाऊ लागल्या. प्रत्येक चित्रपटासाठी म्हणून खास शोधून काढलेल्या रचनांचे संगीतलेखन चित्रपटाबरोबर वितरकांना देण्याची प्रथा अमेरिकेत सुरू झाली. १९०९ च्या सुमारास विविध प्रसंगांसाठी योग्य असे तयार संगीत ‘सजेशन्स फॉर म्युझिक’ म्हणून एडिसन कंपनी मुद्रित करीत असे. बोलक्या चित्रपटांच्या जमान्यात संगीताचा उपयोग अधिक व्यपक, सहेतुक व कौशल्यपूर्ण होऊ लागला. पर्यायाने संगीत व संगीत दिग्दर्शक यांचे स्थान चित्रपटात पक्के झाले. भारतात हा कालखंड १९३१ नंतर सुरू झाला. इंद्रसभा या बंगाली चित्रपटात तर पन्नासहून अधिक गाणी होती आणि तो चित्रपट यशस्वीही झाला. यावरून संगीतही चित्रपटाचे आकर्षण वाढविणारा एक घटक आहे, हे निश्चित झाले.
चित्रपटाला संगीत आवश्यक का भासले, याविषयी निरनिराळ्या उपपत्ती आहेत. चित्रपट दाखविताना अपरिहार्यपणे होणाऱ्या यांत्रिक आवाजाला झाकण्यासाठी संगीत वापरले गेले, ही उपपत्ती जरी सुरुवातीच्या काळापुरती खरी असली, तरी नंतरच्या कालखंडात असले कारण उरले नव्हते. उलट चित्रपटातील घटनांमधील मोकळ्या जागा भरून काढण्यासाठी वा घटनांना उठाव आणण्यासाठी संगीत आवश्यक असते, अशी मते पुढे आली. यांशिवाय काहींच्या मते चित्रपटातील घटनांशी मिसळून जाणारे किंवा त्यांना विरोधाने उठाव देणारे, असे दोन्ही प्रकारचे संगीत श्रेष्ठ तर इतरांच्या मते घटनांशी समांतर राहून त्यांची परिणामकारकता वाढविणारे संगीत श्रेष्ठ असते अशा वेगवेगळ्या उपपत्ती मांडण्यात आल्या आहेत.
संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांनी लिहिलेले माझे संगीत : रचना आणि दिग्दर्शन (१९६४) या पुस्तकात चित्रपटसंगीताच्या तात्त्विक बाजूची चर्चा आढळते. या तात्त्विक वादात फारसे खोल न जाता असे म्हणता येईल, की वेगवेगळ्या चित्रपटांत संगीताचे वेगवेगळे कार्य असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या संदर्भात येणारे संगीतही वेगवेगळ्या जातींचे असते. संगीताच्या कार्यक्रमावर वाढलेल्या अनुबोधपटातील संगीत, चित्रपटातील संगीत, पार्श्वसंगीत, व्यंगपटातील संगीत हे सर्व संगीतप्रकार वेगवेगळे राखावे लागतात.
चित्रपटसंगीतात खूपच विविधता आढळते. शास्त्रीय व सुगम संगीत , लोकसंगीत, कंठसंगीत, वाद्यसंगीत, व्यक्तिगत आणि सामूहिक वादन-गायन या सर्वांचा समावेश त्यात होतो. यांशिवाय चित्रपटातील पात्रप्रसंगांशी व दृश्यांशी ते बांधले गेल्याने चित्रपटसंगीताचे आकलन अधिक सहजपणे होते.
पार्श्वसंगीताचा पहिला परिणामकारक वापर १९३२ साली चंडीदास या न्यू थिएटर्सच्या चित्रपटात प्रथम करण्यात आला. हे पार्श्वसंगीत विचारपूर्वक दिलेले असल्याने प्रसंगाला पोषकच ठरते. प्रभात फिल्म कंपनीच्या प्रारंभीच्या बोलपटांत प्रसंगानुरूप नाटकातील गाणीच वाजवीत. केशवराव भोळे यांनी अमृतमंथन (१९३४) पासून अभ्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पार्श्वसंगीत द्यायला प्रारंभ केला. पार्श्वसंगीताबाबतचा प्रभातच्याच कुंकू (१९३५) या चित्रपटात केलेला प्रयोग अभिनव होता. त्यामध्ये नेहमीचे वाद्यवृंदाचे पार्श्वसंगीत न घालता दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले ध्वनी व स्वर यांचा उपयोग केला आहे. हे ध्वनी व स्वर ठरविताना कथानकातील प्रत्येक दृश्याचे स्थल, काल व त्यातील सर्वसाधारण वातावरण लक्षात घेतले होते. हे ध्वनी-स्वर सूचक तर होतेच शिवाय त्यात वास्तवता आणि कलात्मकता यांचा सुंदर मेळ घातलेला होता. निव्वळ पार्श्वध्वनीचा उपयोग करून चित्रपट परिणामकारक करण्याचा हा प्रयोग चित्रपटसृष्टीत पहिला व अजोड मानला जातो.
एकंदरीत चित्रपटाच्या तांत्रिक बाजू जसजशा विकसित होत गेल्या, तसतसे चित्रपटाचे संगीतही बदलत गेले. ध्वनिमुद्रण आणि चित्रण निरनिराळ्या वेळी करूनही नंतर त्यांना एकत्र करण्याच्या सोयीमुळे पार्श्वगायनाचा उपयोग शक्य झाला आहे. त्याचप्रमाणे भव्य दृश्यांची मांडणी शक्य झाल्यानंतर संगीताचे स्वरूपही बदलते. वाद्यवृंदांच्या योजनेतही फरक होत गेला. त्रिमिती चित्रपटाची निर्मिती होऊ लागल्यावर पुन्हा संगीताला आपले स्वरूप बदलावे लागले. चित्रपटसंगीत एकंदर चित्रपटकलेच्या तांत्रिक विकासाबरोबर बदलत जाऊ शकते, हेही त्याच्या लवचिकपणाचे व आकर्षकतेचे एक महत्त्वाचे कारण होय. आज विद्युत् उपकरणांच्या साहाय्यानेच निर्माण होऊ शकणाऱ्या पार्श्वध्वनींचा उपयोग करून चित्रपटसंगीताने आणखी एक पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे रूढ संगीत व मानवनिर्मित ध्वनी यांची कक्षा रुंदावत चालली आहे.
ध्वनिमुद्रणकक्षा व ध्वनिमुद्रणाची तंत्रे यांत झालेल्या विलक्षण तांत्रिक सुधारणा हा चित्रपटसंगीताच्या कक्षा रुंदावणारा आणखी एक घटक होय. मानवी कंठ किंवा मानवनिर्मित वाद्ये यांतून जे ध्वनी निघणे अशक्य असे ध्वनी निर्माण करणे, उपलब्ध ध्वनींच्या मुद्रणवेगात बदल करणे, त्याचे थर एकमेकांवर ध्वनिमुद्रित करणे, निरनिराळे ध्वनी एकमेकांत मिसळून एखादा वेगळाच ध्वनी निर्माण करणे इत्यादींचा या संदर्भात निर्देश करता येईल. आजचे चित्रपटसंगीत संगीतकक्षांपेक्षा ध्वनिमुद्रणकक्षांतच तयार होते, असे म्हणण्याइतके ते यंत्रनिर्मित बनले आहे.
भारतीय चित्रपटसंगीतामध्ये ध्वनिमुद्रण व इतर तांत्रिक कौशल्ये यांबरोबरच पाश्चात्त्य वाद्ये आणि पाश्चात्त्य संगीतपद्धतीतील स्वरसंवादतत्त्व यांचाही आढळ होतो. पाश्चात्त्य चित्रपटांतील चाली व कृती यांचे काहीसे अंधानुकरण करण्याकडे आपल्या संगीतदिग्दर्शकांचा हल्ली कल असतो, या टीकेतही अगदीच तथ्थ नाही, असे नाही. परंतु भारतीय चित्रपटकलेवरच पाश्चात्य चित्रपटांची गडद छाया पडली असल्याने हे अनुकरण काहीसे अपरिहार्य म्हटले पाहिजे.
नाट्यपूर्ण संगीतरचनेबद्दल पाश्चात्त्य चित्रपटसंगीताच्या परंपरेत ॲलन ग्रे (द अफ्रिकन क्वीन), डेव्हीड रॅक्सिन (द बॅड अँड द ब्युटिफुल), लेनर्ड रोझेनमान (ईस्ट ऑफ ईडन, १९५५), सर आर्नल्ड बॅक्स (ऑलिव्हर टि्वस्ट, १९४८), यांचा निर्देश करण्यात येतो. ज्याला भव्य देखाव्यांचा पण संगीतविशिष्ट चित्रपट म्हणता येईल, त्यांत आर्थर ब्लिस (क्रिस्तोफर कोलंबस, १९४८), मिक्लोश रोझसा (कोवादी, १९५१ आयव्हानो, १९५२), सर विल्यम वॉल्टन (ॲज यू लाइक इट, १९३६ हॅम्लेट, १९४८), एल्मर बेर्नश्टाइन (द टेन कमांडमेंट्स, १९५६) इत्यादींचा निर्देश होतो.
भारतीय चित्रपटसंगीताच्या परंपरेत पुढील संगीतदिग्दर्शकांचा उल्लेख करण्यात येतो. केशवराव भोळे (संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कुंकू, संत सखू), मास्तर कृष्णराव (धर्मात्मा, अमरज्योती, माणूस, गोपाळकृष्ण, शेजारी), बोराल रायचंद (पूरणभक्त), विद्यापती (धूपछाँव स्ट्रीट सिंगर, हमराही), पंकज मलिक (मुक्ति, मेरी बहेन, दुष्मन, यात्रिक, डॉक्टर), खेमचंद प्रकाश (महल, अनारकली, तानसेन ), शंकर विष्णू ऊर्फ दादा चांदेकर (कालियामर्दन, ब्रह्मचारी, लपंडाव, अर्धांगी, पहिली मंगळागौर, मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा व जयमल्हार).
या कालच्या दिग्दर्शकांची कामगिरी महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही. आजच्या दिग्दर्शकांतही पुढील संगीतदिग्दर्शकांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. मदनमोहन (वह कौन थी, दस्तक, अनपढ, देख कबीरा रोया, मदहोश, हकिकत) रोशन (चित्रलेखा, ताजमहल, ममता, अजी बस शुक्रिया) ओ. पी. नय्यर (नया दौर, तुमसा नहीं देखा, फागुन) हेमंतकुमार (अनुपमा, साहीब बिबी और गुलाम, बीस साल बाद, खामोशी, नागिन) नौशाद (अंदाज, बैजुबावरा, मेरे मेहबूब, गंगाजमना, मुगले आझम, कोहिनूर) एस्. डी. बर्मन (अभिमान, आराधना, गाईड, चलती का नाम गाडी, ज्युवेल थीफ, प्यासा, शर्मिली) शंकर-जयकिशन (बरसात, चोरी चोरी, आवारा, संगम, अनाडी, आम्रपाली, मेरा नाम जोकर, श्री चारसो बीस) सी. रामचंद्र (अनारकली, नवरंग, शारदा, अमरदीप, शहनाई, खिडकी, सरगम) वसंत देसाई (आशीर्वाद, गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे, गुड्डी ) सुधीर फडके (सीतास्वंयवर, जगाच्या पाठीवर).
आजचे चित्रपटसंगीत मुख्यतः पार्श्वगायनावर अवलंबून आहे. न्यू थिएटर्सच्या धूपछाँव या चित्रपटात १९३५ साली हे पार्श्वगायन म्हणजे उसना आवाज देण्याची कल्पना प्रथम अस्तित्वात आली. नजीकच्या भूतकाळात उमादेवी, जोहराबाई, शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी, पारुलघोष या स्त्रीगायिका व अरूणकुमार, जी. एम्. दुराणी इ. पुरुषगायकांची नावे गाजलेली आहेत. आज लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, महंमद रफी, तलत महमूद, महेंद्रकपूर, हेमंतकुमार, मुकेश, किशोरकुमार, मन्ना डे, गीता दत्त, सुधीर फडके यांसारख्या गायक-गायिकांची कामगिरी चांगलीच भरीव आहे. आज तर संगीतामधील गीतांचा भाग पार्श्वगायनावर अवलंबून असण्याचा दूरगामी परिणाम चित्रपटकलेवर बराच झाला आहे. हे खरे असले, तरी सर्व प्रकारच्या व वेगवेगळ्या चेहऱ्या-मोहऱ्यांच्या अभिनयकर्त्यांचे चेहेरे वेगळे, पण आवाज मात्र तोच तोच असा प्रकार होऊन बसतो. त्यामुळे संगीतात येणारा एकसुरीपणा चित्रपटासही उणेपणा आणतो. तसेच गायन व तत्संबंधित अभिनय निरनिराळ्या वेळेस होत असल्याने गीतगायनाचा अभिनय कृत्रिमपणाला वाव देतो. ⇨कुंदनलाल सैगल, सुरैया, नूरजहाँ,काननदेवी, उमाशशी, खुर्शिद, इ. गायक नटनट्यांच्या जमान्यात असे होत नव्हते. तथापि पार्श्वगायनामुळे मात्र गायक नसलेल्या पण रूप व अभिनयगुण यांनी संपन्न असलेल्या व्यक्तींना चित्रपटक्षेत्रात नाव मिळविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी वाद्ये व वादक मोजकेच असत. पुढे मात्र त्यांची संख्या वाढत गेली. काही संगीतदिग्दर्शकांचा तर पाउणशे ते ऐंशी वादकांचा ताफा असल्याचे आढळून येते. त्यामुळे संगीतदिग्दर्शक, वाद्यवृंद रचनाकार, पार्श्वगायक आणि अभिनेता या सर्वांच्या भूमिका आता अधिकाधिक वैशिष्ट्यप्रधान झाल्या असून चित्रपटसंगीताची निर्मिती, त्याचे प्रत्यक्षीकरण व त्याचा प्रसार या सर्वांना एका मोठ्या उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
एवढे मात्र खरे, की काही बोलपटांतील संगीत लोकप्रिय झाल्याने ते आर्थिक दृष्ट्या यशस्वी ठरले आहेत. आजच्या काळात एखाद्या चित्रपटात मोठमोठ्या कलावंतांप्रमाणे चित्रपटाचा संगीतदिग्दर्शक कोण आहे, हेही प्रेक्षक पाहतात व त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या चित्रपट फायदेशीर होण्यासाठी संगीतदिग्दर्शकाच्या नावाचा उपयोग होतो.
रानडे, अशोक
“