कॅरिओफायलेसी : (पाटलपुष्प कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एक कुल. कॅरिओफायलेलीझ (सेंट्रोस्पर्मी) नावाच्या गणात ह्याचा समावेश असून त्यातील सर्व कुलांत हे अधिक प्रगत समजतात. पोर्चुलॅकेसी कुलाशी ह्याचे बरेच साम्य असून एकूण सु. ८० वंश आणि २,००० जाती (विलीस यांच्या मते १,३००) ह्यात समाविष्ट आहेत. त्यांचा प्रसार आर्क्टिक प्रदेशापासून समशीतोष्ण कटिबंधापर्यंत व उष्णकटिबंधात (फक्त थंडीच्या दिवसात व उंच प्रदेशात) इतका मोठा आहे. भूमध्यसामुद्रिक प्रदेशात काही वंश प्रदेशनिष्ठ आहेत. बहुतेक वनस्पती ⇨ओषधी व काही लहान क्षुपे (झुडपे) आहेत. पाने साधी, बहुधा बिनदेठाची, समोरासमोर, कधी सोपपर्ण (उपपर्णयुक्त) पुष्पबंध कुंठित, बहुधा द्विशाखवल्लरी [→ पुष्पबंध] क्वचित फुले एकाकी फुले द्विलिंगी, क्वचित एक-लिंगी, अरसमात्र, मंडलित, अवकिंज किंवा परिकिंज, पंचभागी, क्वचित चतुर्भागी काहींत केसर किंजधर असतो. ऊर्ध्वस्थ किंजपुटात बीजकविन्यास [→ फूल], मुक्त मध्यवर्ती (मूळचा अक्षलग्नद्ध) व एक किंवा अनेक अपूर्ण कप्पे. बीजके बहूधा अनेक बोंड किंवा कपालीसारखे (कठीण, शुष्क आणि आपोआप न फुटणाऱ्या फळासारखद्धे) फळ गर्भ वाकडा किंवा क्वचित सरळ (उदा, डायांथस) परिपुष्क (बीजकात असणारा पोषकद्रव्ययुक्त पेशीसमूहद्ध) पिठूळ असते.
ह्या कुलात उपयुक्त वनस्पती फारशा नाहीत. डायांथस, सिलेन लिक्निस या वंशांतील जातीच्या बागेत शोभेकरिता लावतात. सॅपो-नॅरिया (साबणी) वंशातील जातींच्या मुळात फेस अाणणारे सॅपाेनीन हे द्रव्य असते तसेच त्या जाती औषधीही आहेत.
पहा : कार्नेशन.
परांडेकर, शं. आ.