एलियट, सरजॉन: (२५ मे १८३९ — १८ मार्च १९०८). भारतातील कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश वातावरणविज्ञ. इ. स. १८८७ पासून १९०३ पर्यंत भारत सरकारच्या वातावरणवैज्ञानिक खात्याचे ते प्रमुख होते व या खात्याच्या विकासासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले.
इंग्लंडमध्ये डरॅममधील लेम्सबी येथे त्यांचा जन्म झाला. १८६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. १८६९ मध्ये रूडकीच्या एंजिनियरिंग कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून ते भारतात आले. १८७२ मध्ये अलाहाबादच्या म्यूर सेंट्रल कॉलेजचे गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची भारतीय शिक्षणसेवेत नेमणूक झाली. दोनच वर्षांनंतर ते कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकीचे प्राध्यापक झाले. ह्या जागेवर असतानाच १८७६ मध्ये त्यांच्याकडे वातावरणवैज्ञानिक वृत्तनिवेदक म्हणून अधिक कामगिरी सोपविली. त्यांच्या वातावरणीय अभ्यासाला येथूनच रीतसर प्रारंभ झाला. १८८७ मध्ये भारत सरकारने त्यांची वातावरणवैज्ञानिक वृत्तनिवेदक आणि भारतीय वेधशाळांचे महासंचालक म्हणून नेमणूक केली. १९०३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले, नंतरही अखेरपर्यंत त्यांनी संशोधन केले.
एलियट यांनी वातावरणविज्ञानातील संशोधनाची अनेक नवी दालने उघडून दिली. त्यांनी भारतात विविध ठिकाणी नवीन वेधशाळा व निरीक्षण केंद्रे स्थापन केली. तारायंत्रांच्या साहाय्याने सकाळी ८ वाजताची वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे सिमला, मुंबई आणि कलकत्ता येथे शक्य तितक्या लवकर उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. त्या निरीक्षणांवर आधारित भारत व निकटवर्ती प्रदेशांचे दैनिक हवामान निदर्शक नकाशे, हवामानचे वृत्तांत आणि दैनिक हवामानाचे अंदाज प्रकाशित करण्यास सुरुवात केली. मुंबई व मद्रास येथून स्थानिक स्वरूपाचे हवामानाचे वृत्तांत देणे सुरू केले. बंगालच्या उपसागरात नेहमी होणार्या उष्णकटिबंधीय चक्री वादळांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. ऑक्टोबर १८७६ मध्ये बाकरगंजच्या लगतच्या क्षेत्रात आणि विशाखापट्टनम् येथे झालेल्या चक्री वादळांचा एलियट यांनी अभ्यास करून त्यावर एक चांगला संशोधनात्मक प्रबंध लिहिला. किनारी प्रदेशांना व बंदरांना वादळी धोक्याच्या सूचना देण्याची तसेच खंडांतर्गत विभागांना महापुराचा आगाऊ इशारा देण्याची यंत्रणा त्यांनी अंमलात आणली. भ्रमण करणार्या जहाजांनी केलेली हवामानविषयक निरीक्षणे मिळविण्याची त्यांनी व्यवस्था केली. ह्या नौका-नोंदवह्यांचा त्यांना चक्री वादळांच्या अभ्यासात अतिशय फायदा झाला. त्यांनी हिंदी महासागरातील अनेक बेटांवर वातावरणवैज्ञानिक वेधशाळा स्थापिल्या. सर्वत्र पर्जन्यमापन पद्धतीत अचूकता आणि एकसूत्रता आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले व ही सर्व निरीक्षणे वार्षिक खंडांत प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. दक्षिण भारतात कोडाईकनाल येथे सौर भौतिकीय वेधशाळा स्थापून त्यांनी भौतिकीय ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला चालना दिली. आसाममध्ये १८९७ मध्ये झालेल्या भूकंपानंतर मिल्न भूकंपमापकाच्या (जॉन मिल्न या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या भूकंपमापकाच्या) साहाय्याने भारताच्या अनेक प्रमुख वेधशाळांत नियमितपणे भूकंपविषयक निरीक्षणे करण्याचे कार्य एलियट यांच्याच कारकीर्दीत १८९८ मध्ये सुरू झाले. आगामी हिवाळ्यात साधारणपणे किती पाऊस पडेल याचे प्राक्कथन (पूर्वसूचना) करण्याचे प्राथमिक तंत्र एलियट यांनीच प्रथम शोधून काढले. काही प्रदेशांवरील वायुभारात आढळलेली असंगती, हिमवर्षाव, वायुभारातील दैनंदिन बदल आणि काही वातावरणीय मूलघटकांत घडून येणारे फेरफार यांत आढळलेल्या सहसंबंधांकाचा (परस्परसंबंध दर्शविणार्या मूल्यांकाचा) उपयोग करून एलियट यांनी आगामी शीतऋतूत पडणार्या वृष्टीचा अंदाज देणारी समीकरणे शोधून काढली. आज ह्या तंत्रात आमूलाग्र बदल झाले असले, तरी ऋतुकालिक पर्जन्याच्या अंदाजाचे जनक म्हणून एलियट यांच्याकडेच ती पद्धत शोधून काढण्याचे श्रेय जाते.
एलियट यांनी ५० पेक्षा अधिक संशोधनात्मक प्रबंध लिहिले. बहुतेक संशोधन इंडियन मिटिऑरॉलॉजिकल मेम्वार्स आणि जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या नियतकालिकांत प्रकाशित झाले आहे. भारतात पश्चिमेकडून येणार्या व मुख्यत्वेकरून उत्तर भारतात अंमल गाजविणार्या शीतकालीन अभिसारी चक्रवातांवर [→ चक्रवात] लिहिलेल्या त्यांच्या संशोधनात्मक लेखाचा लंडनच्या नेचर या पाक्षिकाने गौरवपूर्ण उल्लेख केला होता. भारतीय सागरात निर्माण होणारे अभिसारी चक्रवात आणि उग्र चक्री वादळे यांच्यावरील त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाला खूपच प्रसिद्धी मिळाली. या विषयावरील त्यांच्या निर्देशग्रंथाच्या दोन आवृत्त्या निघाल्या. नाविक व्यावसायिकांना त्या पुस्तकाचा अतिशय फायदा झाला. वादळांमुळे जहाजांना होणार्या अपघातांचे प्रमाण बरेच कमी झाले. दी क्लायमेटॉलॉजिकल ॲटलास ऑफ इंडिया हे त्यांचे शेवटचे बहुमोल प्रसिद्धीकरण होय. ह्याच ग्रंथाला पूरक म्हणून ए हँडबुक ऑफ इंडियन मिटिऑरॉलॉजी हा ग्रंथ एलियट यांनी लिहावयास घेतला होता, पण त्यांच्या अचानक मृत्यूमुळे ते कार्य अपुरेच राहिले.
एलियट हे १८९४ पासून इंटरनॅशनल मिटिऑरॉलॉजिकल कमिटीचे सदस्य होते. ते इंटरनॅशनल सोलर कमिशनचे कार्यवाह होते. १८९७ मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. ह्याच वर्षी त्यांना सी. आय. ई. पदवी मिळाली आणि सेवानिवृत्तीनंतर ते के. सी. आय. ई. झाले. १८७८ मध्ये ते रॉयल मिटिऑरॉलॉजिकल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले. १९०४ मध्ये ते ह्याच सोसायटीच्या परिषदेचे सभासद होते. ते काव्हालेअर-स्यूर-मेअर (फ्रान्स) येथे मृत्यू पावले.
चोरघडे, शं. ल.