कोशिंब : (कोसम, कुसुंब, कोहण, पेदुमण हिं. कोसम गु.कोस्सम क. रुगदे सं. कोशाम्र इं. सीलोन-ओक, गम-लॅक ट्री, हनी ट्री लॅ. स्क्लेचेरो ओलिओसा कुल-सॅपिंडेसी). ह्या मोठ्या सुंदर व पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात सर्वत्र पानझडी व घनदाट जंगलात असून शिवाय श्रीलंका, ब्रह्मदेश, जावा, टिमोर येथेही आहे.

कोशिंब : पान, फुलोरा व फळे यांसह फांदी

 

विशेषतः मध्‍य भारतात रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. उंची १५–२० मी. व घेर २·५–३·५ मी. खोडावर खोल पन्हळीसारख्या खोबणी व साल करडी असून तिच्या साधारण वर्तुळाकृती ढलप्या निघून पडतात कोवळे भाग लोमश (लवदार) पाने संयुक्त, समदली पिच्छाकृती (पिसासारखी), मोठी व फांद्यांच्या टोकास येतात. ती डिसेंबरात गळतात आणि प्रथम लाल अशी नवीन पालवी फेब्रुवारी-मार्चमध्ये येते. दले ४ ते ८. सर्वात खालची दलांची जोडी सर्वात लहान, चिवट व बिनदेठाची असते. फुले प्रदलहीन, लहान, हिरवट किंवा पिवळट पांढरी, पानांच्या बगलेतल्या शाखित मंजऱ्यांवर फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. [→ फूल].  फळ मांसल, जायफळाएवढे, करडे, टोकदार, बोथट काट्याचे, क्वचित गुळगुळीत बिया १-२, तपकिरी आणि गुळगुळीत असून मऊ, आंबूस व पांढऱ्या खाद्य गराने (अध्यावरणाने) वेढलेल्या असतात. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ सॅपिंडेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. ह्याचे लाकूड भारतातील अतिकठीण व अतिजड लाकडांपैकी असून फिकट, लालसर तपकिरी आणि टिकाऊ असते. कापण्यास व रंधण्यास कठीण असले तरीही त्यास उत्तम झिलई करता येते. तुळ्या, बडोदे, गाड्या, चाकांचे भाग, हत्यारांचे दांडे, तेलाचे घाणे व उसाचे चरक, मुसळे, शेतीची अवजारे, खाणीत लागणारे लहानमोठे आधार इत्यादींस उपयुक्त असते. लाखेचे किडे पोसण्यास ह्या झाडाचा अधिक उपयोग होतो ही लाख उत्तम प्रतीची ठरली आहे. सालीत ९ टक्के टॅनीन असते. कोवळ्या फांद्या आणि पाने गुरांना चारा म्हणून खाऊ घालतात. मलबारमध्ये बियांचे तेल (मकासर तेल) स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात. ते केस स्वच्छ करण्यास व त्यांची वाढ करण्यास उपयुक्त असते. साबण व सुगंधी तेले यांकरिताही तेल वापरतात. ते शक्तिवर्धक, दीपक (भूक वाढविणारे), कृमिनाशक, रेचक व चर्मरोगांवर गुणकारी आहे. साल स्तंभक (आकुंचन करणारी) असून ती खाजेवर तेलातून चोळतात कंबर दुखत असल्यास तिचा लेप लावतात. बियांची पूड जनावरांच्या जखमांवर व अळ्या काढून टाकण्यास वापरतात. कोवळ्या फळांचे लोणचे घालतात.

जमदाडे, ज. वि.