क्वाक : ढोक, मिल्हा या पक्ष्याप्रमाणेच हा बक (बगळ्याच्या) समूहातील असल्यामुळे आर्डीइडी पक्षिकुलातच त्याचा समावेश केलेला आहे. याच्या आवाजावरून त्याला क्वाक हे नाव मिळाले आहे. त्याचप्रमाणे हा रात्रिंचर असल्यामुळे त्याला नक्तबक किंवा रातबगळा असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव निक्टिकोरॅक्स असे आहे.

क्वाक

दक्षिण व मध्य यूरोप, जवळजवळ सर्व आफ्रिका आणि आशियाच्या बहुतेक भागात क्वाक आढळतो भारतातील सपाट प्रदेशात आणि डोंगराळ भागात तो सगळीकडे सापडतो, परंतु हिमालयाच्या वायव्य भागात १,८३० मी. पेक्षा जास्त उंचीवर तो दिसून येत नाही.

साधारणपणे हा पक्षी घारीएवढा आहे. याची वरची बाजू राखी करड्या रंगाची पण डोक्याचा वरचा भाग, मानेचा काटा आणि पाठ तकतकीत काळी असते. डोक्यावर मागे वळलेला काळा तुरा असतो तुऱ्यामधून थोडीशी बारीक पण पुष्कळ लांब पांढरी पिसे निघालेली असतात गाल आणि शरीराची खालची बाजू पांढरी मान आखूड, जाड डोळे लालभडकचोच जाड,काळी आणि पाय पिवळसर हिरवे नर व मादी दिसायला सारखीच असतात.

हे पक्षी संघचारी आहेत. दिवसा यांचे थवे एखाद्या दाट झाडीमध्ये विश्रांती घेत असतात. वर्षानुवर्षे एकच झाडी आणि तिच्यातील ठराविक झाडे ते उपयोगात आणतात. तिन्हीसांजेच्या सुमारास ते झाडांवरून एकामागून एक बाहेर पडून निरनिराळ्या ठिकाणी भक्ष्य मिळविण्यासाठी जातात. नद्या, ओढे, ओहोळ, तलाव, खाड्या वगैरे ठिकाणी हे आपले भक्ष्य पकडतात. इतर बकांप्रमाणेच लहान मासे, बेडूक, खेकडे, झिंगे आणि पाणकिडे यांवर त्यांची उपजिवीका होते. भक्ष्य मिळविण्याकरिता हा मिल्ह्याप्रमाणे बराच वेळ एके जागी उभा राहत नाही.

याची उडण्याची पद्धती मिल्ह्यासारखीच असते. उडत असताना मधून मधून हे क्वाक क्वाक असा आवाज काढीत असतात.

याचा विणीचा हंगाम उत्तर भारतात एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत आणि दक्षिण भारतात डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत असतो. यांचे घरटे इतर बकांप्रमाणेच काटक्यांचे व झाडांवर उंच ठिकाणी असते. घरट्यांच्या वसाहती असतात. मादी समुद्री हिरव्या रंगाची ४-५ अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना वाढविणेही ही सर्व कामे नर व मादी दोघेही करतात.

पहा ढोक मिल्हा.

कर्वे, ज. नी.