गार्दा सरोवर : इटलीतील सर्वांत मोठे आणि नयनरम्य सरोवर. क्षेत्रफळ ३७० चौ. किमी. हे आल्प्सच्या पायथ्याशी मिलानच्या पूर्वेस १०४ किमी. आहे. हे ५२ किमी. लांब, ३–१८ किमी. रुंद पसरले असून याची जास्तीत जास्त खोली ३४६ मी. आहे. गार्दाच्या उत्तर टोकाजवळ सार्का नदीचा प्रवाह सरोवरात शिरतो. सरोवराच्या दक्षिण टोकापासून बाहेर पडणारी नदी मींचो नावाने ओळखली जाते व ती पुढे पो नदीस मिळते. गार्दामध्ये मासे भरपूर असून परिसरात द्राक्षे, तुती, ऑलिव्ह, लिंबे, अंजीर इत्यादींच्या समृद्ध बागा आहेत. येथील हवामान आल्हाददायक आहे. साहजिकच गार्दाभोवतालच्या अनेक आरोग्यधामांत व विलासधामांत प्रवाशांची सतत गर्दी असते.
ओक, द. ह.