क्लॉयझने : मीनाकारीचा एक विशेष प्रकार. धातुपात्रांच्या पृष्ठावर अन्य धातूंच्या बारीक पट्ट्यांनी किंवा तारांनी आकृतिबंध साधून त्यात विविधरंगी एनॅमलने आकर्षक मीनाकाम केलेले असते. तार अथवा पट्ट्या वस्तूच्या पृष्ठभागावर डिंकासारख्या चिकट पदार्थाच्या साह्याने चिकटविण्यात येतात किंवा डाग देऊन त्या सांधण्यात येतात. तसेच त्या पट्ट्यांच्या अथवा तारांच्या कडा धातुपात्रावरील खाचांत घट्ट करण्यात येतात. नंतर धातुपात्राचा पृष्ठभाग व तार अथवा पट्टया यांमधील नक्षीयोग्य भाग रंगीबेरंगी एनॅमलच्या कोरडया किंवा योग्य प्रमाणात पाणी घालून केलेल्या ओलसर भुकटीने भरून काढतात. नंतर धातुपात्रे एनॅमल वितळेपर्यंत, म्हणजे साधारणपणे ७०० ते ८५० से. तापमानापर्यंत, तापवितात. ही तापण्याची क्रिया चालू असताना धातुपात्रावरील रंग परस्परांत मिसळत नाहीत किंवा काळपटतही नाहीत. क्लॉयझने याचा शब्दशः अर्थच विभागणे किंवा कप्पेवारी करणे असा आहे. धातुपात्रावरील नक्षीकामासाठी त्याच्या पृष्ठभागाची विभागणी आणि कप्पेवारी करण्याचे काम तांब्याच्या पट्ट्या किंवा तारा करतात.
क्लॉयझनेची कारागिरी प्राचीन ईजिप्तमधील लोकांना अवगत होती. इ. स. पू. तेराव्या शतकातील हे काम असलेल्या सोन्याच्या सहा अंगठ्या सायप्रसमधील एका मायसेनियन थडग्यात आढळल्या आहेत. अशाच प्रकारचा एक इ. स. पू. पाचव्या शतकातील अंलकाराचा ग्रीक नमुना बर्मिंगहॅम वस्तुसंग्रहालयातही आहे. परंतु या कलेचा खराखुरा विकास बायझंटिन काळात झाला. सहाव्या ते बाराव्या शतकांच्या दरम्यान क्लॉयझनेकाम रत्नजडित दागदागिने व इतर भूषणे, अश्मपेटिका, ग्रंथवेष्टने, लघुवेदिका, क्रूसावरील ख्रिस्तमूर्ती व नाना तऱ्हेचे क्रॉस इत्यादींवर केले जाई. प्राचीन काळी पश्चिम यूरोपातही क्लॉयझनेचा प्रसार बराच झाला होता. जर्मनी, इटली, फ्रान्स व स्पेन या देशांत अनेक कारागिरांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
बाराव्या शतकानंतर तांब्यावर करण्यात येणाऱ्या शांलव्हे (champleve) या तंत्राचा प्रसार रोममध्ये झाला. या पद्धतीचा वापर तेथील कारागिरांनी आलंकारिक पिना, बकल व तत्सम लहानलहान वस्तूंच्या सुशोभनासाठी सुरू केला होता. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे धातुकामाच्या पृष्ठभागावर उत्कीर्णन करून त्यावर रंगीबेरंगी मीनाकाम करणे, हे होय. सोन्याऐवजी तांब्याचा मुबलक प्रमाणात वापर करणे व त्यावर अधिक प्रमाणात नक्षी उठविणे, हेही या तंत्राचे वैशिष्ट आहे. यासाठी ते कारागीर नक्षीकाम केलेले धातुपात्र भट्टीत तापविण्यापूर्वी त्यावरील उत्कीर्णित भागांवर सिलिका भुकटी टाकीत असत.
चौदाव्या शतकाच्या प्रारंभी बायझंटिनांच्या क्लॉयझने या कलेचा प्रसार चीनमध्ये अरबी व्यापाऱ्यांच्या द्वारे झाला. शिवाय याच सुमारास काराकोरमच्या मंगोल राज्यकर्त्यांच्या दरबारी असलेल्या एका फ्रेंच सुवर्णकारामार्फतही चीनमध्ये क्लॉयझने पद्धतीला चालना मिळाली, असे समजण्यात येते. चीन-जपानमध्ये उत्तरोत्तर क्लॉयझने पद्धत रूढ झाली व या पद्धतीने उत्तमोत्तम नक्षीकाम केलेल्या वस्तूंची निर्मिती होऊ लागली. कधीकधी क्लॉयझने व शांलव्हे या दोन्ही पद्धतींचा संयुक्तपणे वापर करण्यात येतो. शांलव्हेमुळे सोन्यासारख्या महाग धातूचा मर्यादित वापर करण्याऐवजी तांब्यासारख्या कमी मूल्यवान धातूचा विपुल प्रमाणात वापर करण्यास वाव मिळाला. १६६२ ते १७२२ या काळातील भांड्यांवर विपुल कलाकुसर केलेली असून ती भांडी खूपच अलंकृत करण्यात आलेली आहेत. तसेच त्यांतील रंगांतही विविधता आणण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकात क्लॉयझनेचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात होऊ लागला, तरी सौंदर्यदृष्टीने ती प्राचीन कारागिरीच्या तुलनेने कमी प्रतीची ठरली. चीनप्रमाणेच जपानमध्येही एकोणिसाव्या शतकात क्लॉयझनेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. भारतात मीनाकारीचे शांलव्हेतंत्र प्रचलित असून काश्मीर, दिल्ली, लखनौ, बनारस व विशेषतः जयपूर ही स्थळे या कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत.
पहा : मीनाकारी.
संदर्भ : Maryon, Herbert, Metalwork and Enamelling, London, 1954.
जोशी, चंद्रहास
“