गांडूळ : हा ॲनेलिडा (वलयी) संघाच्या कीटोपोडा वर्गातील ऑलिगोकीटा गणातील प्राणी आहे. गांडुळाच्या अनेक जाती आहेत. यांपैकी फेरेटिमा पोस्थ्यूमा  ही जाती भारतभर मुबलक आढळते, म्हणून हिचा उपयोग प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी केला जातो. पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी सु. १५ सेंमी. असते. ऑस्ट्रेलियात सापडणाऱ्या मेगॅस्कोलेक्स गांडुळाची लांबी जवळजवळ ३ मी. असते. जैव (सेंद्रिय) पदार्थ व आर्द्रता असलेल्या मातीत हे आढळतात.

आ. १. सबंध गांडुळाचे अधर दृश्य : (१) शूक, (२) पर्याणिका, (३) स्त्रीजनन-रंध्र, (४) जनन-पिंडिका, (५) पुंजनन-रंध्र, (६) गुदद्वार. )

हे दंडगोलाकार असून दोन्ही टोकांकडे, विशेषतः अग्र टोकाकडे, निमुळते होत जातात. शरीराचे खंडीभवन (खंड किंवा भाग पडणे) झालेले असून १००–१२० समखंड (सारखे दिसणारे खंड) असतात. १४, १५ व १६ या खंडांभोवती ग्रंथिमय ऊतकाची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाची) झालेली पर्याणिका (त्वचेचा फुगलेला ग्रंथिमय भाग) असते.

मुख व गुदद्वार यांशिवाय शरीरावर एक स्त्रीजनन-रंध्र, दोन पुंजनन-रंध्रे व शुक्र-ग्राहिका-रंध्रांच्या (शुक्राणू साठविण्याकरिता असलेल्या पिशवीच्या बाहेरच्या छिद्रांच्या) चार जोड्या असतात. प्रत्येक खंडाभोवती मध्यावर कायटिनी (कायटीन नावाच्या पदार्थाच्या बनलेल्या) शूकांचे (लहान, राठ व ताठ केसांसारख्या रचनांचे) एक वलय असते. पहिले १२ खंड सोडून सर्व खंडांच्या मध्यपृष्ठभागावर देहगुहेला (शरीराच्या पोकळीला) जोडलेली सूक्ष्म छिद्रे असतात. देहगुहेचे पटांमुळे (पडद्यांमुळे) खंडीभवन होते. आंतरिक व बाह्य खंडीभवन हे एकमेकांशी जुळणारे असते.

मुख, मुखगुहिका (तोंडाची पोकळी), ग्रसनी (मुखगुहेच्या लगेच मागे असणारा अन्ननलिकेचा स्‍नायुमय भाग), ग्रसिका (ग्रसनीपासून आंत्रापर्यंतचा आहारनालाचा भाग), पेषणी (अन्न बारीक करणारे साधन), आंत्र (आतडे), मलाशय (आहारनालाचा अखेरचा भाग) व गुदद्वार हे पचन तंत्राचे (पचन संस्थेचे) प्रमुख भाग होत. सव्विसाव्या खंडापासून गुदद्वाराच्या अलीकडील तेवीस ते पंचविसाव्या खंडांपर्यंत आंत्रवलन (आंत्राच्या गुहिकेत गेलेली आंत्रभित्तीची पृष्ठीय, मध्य व अनुदैर्घ्य दुमड) असते.

श्वसन त्वचेमार्फत होते त्यासाठी त्वचा ओलसर असावी लागते. रक्ताचा रंग लाल असतो. परिवहन तंत्रात (रुधिराभिसरण संस्थेत) पृष्ठीय रुधिरवाहिनी, अधर रुधिरवाहिनी व अधस्तंत्रिका वाहिनी

आ. २. गांडुळाच्या हृदयांचे आरेख : (अ) पार्श्व हृदय (आ) पार्श्वांत्रीय हृदय (१) पृष्ठीय रुधिरवाहिनी, (२) आंत्रोपरिवाहिनी, (३) झडपा, (४) हृदय.

  (तंत्रिकारज्‍जूच्या म्हणजे मज्‍जारज्‍जूच्या खाली असणारी वाहिनी) या प्रमुख वाहिन्या आणि पार्श्व व पार्श्वांत्रीय (आतड्याच्या बाजूला असलेली) हृदये हे मुख्य भाग आहेत.

उत्सर्जन तंत्र हे पटीय (देहगुहेतील पटांशी निकट संबंध असलेल्या), अध्यावरणी (देहभित्तीच्या आतील पृष्ठाला चिकटलेल्या) व ग्रसनीय (ग्रसनीभोवती असणाऱ्या) वृक्ककांचे (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या नळीसारख्या इंद्रियांचे) झालेले असते. वृक्कक कुंडलित (वेटोळी पडलेले) असून प्रारूपिक (नमुनेदार) वृक्ककाचे एक टोक देहगुहेत व दुसरे त्वचेवर उघडते (आ. ३).

आ. ३. पटीय वृक्कक : सबंध वृक्कक नलिका आणि तिच्या आतील पक्ष्माभिकायुत मार्ग दाखविलेले आहेत. (१) नसराळे, (२) पक्ष्माभिकायुत मार्ग (पक्ष्माभिका म्हणजे केसासारख्या वाढी. आ. ४. जनन तंत्र आणि तंत्रिका तंत्र दाखविण्याकरिता केलेले गांडुळाचे विच्छेदन : (१) शुक्रग्राहिका, (२) वृषण, (३) शुक्राशय, (४) अंडाशय, (५) अंडवाहिनी, (६) शुक्रवाहक, (७) अष्ठीला, (८) समाईक अष्ठीला-वाहिनी आणि शुक्रवाहक, (९) तंत्रिका-रज्जूवरील गुच्छिका, (१०) साहाय्यक ग्रंथी, (११) सायुज्यित अधर तंत्रिकारज्जू, (१२) अधोग्रसनी गुच्छिका, (१३) प्रमस्तिष्क गुच्छिका.

तंत्रिका तंत्राचे (मज्‍जासंस्थेचे) केंद्रीय (मध्यभागी असलेले) तंत्रिका तंत्र व परिघीय (मध्यापासून दूर असलेले) तंत्रिका तंत्र असे दोन भाग पडतात. केंद्रीय तंत्रिका तंत्र ग्रसनीच्या वर असलेली गुच्छिकांची (तंत्रिका कोशिकांच्या समूहांची) एक जोडी, परिग्रसनी (ग्रसनीच्या भोवती असलेल्या) संयोजकांची (जोडणाऱ्या तंत्रिकांची) एक जोडी, अधोग्रसनी (ग्रसनीच्या खाली  असणाऱ्या) गुच्छिकांची एक जोडी व अधर तंत्रिकारज्‍जू यांचे झालेले असते. गुच्छिका व संयोजकांपासून सर्व शरीरभर जाणाऱ्या तंत्रिका निघतात. या तंत्रिकांचे परिधीय तंत्रिका तंत्र झालेले असते.

हा प्राणी उभयलिंगी (द्विलिंगी) आहे पण तरीही स्वनिषेचन (एकाच व्यक्तीच्या शरीरातील शुक्राणू व अंडी यांचा संयोग) आढळत नाही. वृषणांच्या (शुक्राणू उत्पन्न करणाऱ्या इंद्रियांच्या) दोन जोड्या असतात. अंडाशयांची (अंडी उत्पन्न करणाऱ्या इंद्रियांची) एक जोडी असते. अंड्यांचे निषेचन (फलन) कोकूनमध्ये (अंडी व शुक्राणू आत बंद करून ठेवणाऱ्या कोशामध्ये) होते. कोकूनमध्ये एका वेळी एकाच अंड्याचे परिवर्धन (विकास) होते. गांडूळ पावसाळ्यात अंडी घालते आणि कोकून जमिनीवर टाकते. एका कोकूनमध्ये कित्येक अंडी असतात. पिले जमिनीत जातात. गांडूळाची विष्ठा सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त असून ते अमोनियम सल्फेटाच्या तोडीचे आहे. ईजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यातील जमीन अशा खताने सुपीक करण्यात आली आहे.

गांडूळात पुनर्जननाची (शरीराचा नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची) क्षमता असते.

पहा : ॲनेलिडा ऑलिगोकीटा कीटोपोडा.

जोशी, मीनाक्षी