क्रोमियम : धातुरूप मूलद्रव्य चिन्ह Cr अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटानांची संख्या) २४ अणुभार ५१·९९६ आवर्त सारणीतील (मूलद्रव्यांची विशिष्ट कोष्टकरूपाने केलेल्या मांडतील) गट ६ विद्युत् विन्यास (इलेक्टॉनांची अणूतील मांडणी) २, ८, १३, १ पृथ्वीच्या कवचातील प्रमाण ०·०२% वितळबिंदू १,९०३ ± ० से. उकळबिंदू २,४८० से. वि. गु. ७·१९ (२० से. तापमानास) नैसर्गिक समस्थानिक (एकाच अणुक्रमांकाचे पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) ५०, ५२, ५३ व ५४ आणि किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असलेले) समस्थानिक ४९, ५१ व ५५ कठिनता-ओतीव धातूची ४-५ (मोस) व विद्युत् विच्छेदनाने (लवणाच्या विद्रावातून विद्युत् प्रवाह नेऊन घटक द्रव्ये अलग करण्याच्या क्रियेने) दिलेल्या मुलाम्याची ९ (मोस) [→ कठिणता] ही धातू चांदीसारखी चकचकीत पांढरी व वर्धनशील (ठोकून पत्रे करता येणारी) असून तिला उत्तम झिलई देता येते. क्रोमियम समचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता जास्त असलेले) आहे.
इतिहास : एन्. एल्. व्होल्कँ यांनी सायबीरियात सापडणाऱ्या व सध्या क्रोकोआइट वा क्रोकॉइसाइट (PbCrO4) नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका तांबड्या खनिजापासून या नव्या धातूचा (क्रोमियमाचा) शोध १७९७ साली लावला. या धातूचे क्रोमियम हे नाव क्रोम म्हणजे रंग या ग्रीक शब्दावरून आले आहे. कारण हिची अनेक संयुगे रंगीत असतात. त्यानंतर एक वर्षाने याच संशोधकांनी क्रोमियम सेस्क्वि-ऑक्साइड (Cr2O3) व लोणारी कोळसा एकत्र तापवून ही धातू मिळविली. १८५४ साली बन्सन यांनी क्रोमस क्लोराइडाच्या विद्रावाचे विद्युत् विच्छेदन करून शुद्ध क्रोमियम धातू प्रथम मिळविली. विजेच्या भट्टीत दगडी कोळशाने कोळशाने क्रोमिक ऑक्साइडाचे ⇨ क्षपण करून म्वासां यांनी १८९३ साली क्रोमियम धातू मिळविली. १८९८ साली गोल्डश्मिट यांनी क्रोमिक ऑक्साइडाचे ॲल्युमिनियम धातूने क्षपण करून कार्बनविरहित अशी क्रोमियम धातू बऱ्याच प्रमाणात मिळविली. १८००–१६ या दरम्यान क्रोमाइटाचा उपयोग क्रोमियम संयुगे बनविण्यासाठी करण्यात आला. उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) पदार्थात त्याचा उपयोग १८७९ मध्ये प्रथम करण्यात आला.
उपस्थिती : क्रोमियम हे ⇨क्रोमाइट ह्या खनिजाच्या स्परूपात आढळतो. क्रोमाइट (FeO.Cr2O3) हे खनिज अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, क्यूबा, ग्वातेमाला, ब्राझील, अल्बेनिया, बल्गेरिया, पोर्तुगाल, ग्रीस, यूगोस्लाव्हिया, भारत, जपान, रशिया, पाकिस्तान, ऱ्होडेशि, द. आफ्रिका इ. देशांत सापडते.
प्राप्ती : क्रोमियम धातू मिळविण्यासाठी धातुक (धातू असलेले नैसर्गिक खनिज) चुनखडीबरोबर दळून व हवेत भाजून प्रथम कॅल्शियम क्रोमेट बनवितात. ते गरम पाण्याने विद्रावरूपाने काढून घेतात व त्यात पोटॅशियम कार्बोनेट घालतात. त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण (न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपाने तळाशी बसणे) होते व पोटॅशियम क्रोमेट बनते. नंतर पोटॅशियम क्रोमेटाच्या विद्रावाची विरल सल्फ्यूरिक अम्लाशी विक्रिया करून पोटॅशियम डायक्रोमेट (k2Cr2O7) तयार करतात. ते स्फटिकीकरणाने शुद्ध करून घेतात व मग कार्बन किंवा गंधक याच्याबरोबर तापवून त्यापासून क्रोमिक ऑक्साइड बनवितात. क्रोमिक ऑक्साइडाचे ॲल्युमिनियम धातूने क्षपण केले म्हणजे क्रोमियम धातू मिळते. या पद्धतीला थर्माइट पद्धती म्हणतात.
पोलादापासून क्रोमियम-मिश्रित मिश्रधातुरूप पोलाद बनविण्यासाठी क्रोमियम व लोह असलेल्या फेरोक्रोम या मिश्रधातूची फार गरज असते. फेरोक्रोम बनविण्यासाठी विद्युत् ज्योत भट्टीत क्रोमाइटाचे कार्बनाबरोबर संगलन (एकत्र वितळविण्याची क्रिया) करतात.
फेरोक्रोमापासून क्रोम ॲलम (तुरटी) बनवून त्याच्या विद्रवाचे किंवा क्रोमिक अम्लाच्या विद्रावाचे विद्युत् विच्छेदन करूनही क्रोमियम धातू मिळवितात.
रासायनिक गुणधर्म : क्रोमियम मुख्यतः द्विसंयुजी [इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याच्या शक्तीचे मूल्य दोन असलेली हायड्रोजनाचे मूल्य एक आहे → संयुजा], त्रिसंयुजी आणि षट्संयुजी आहे. काही थोड्या संयुगांत ती चतुःसंयुजी व पंचसंयुजी असल्याचे आढळते.
सामान्य तापमानाला क्रोमियम धातू हवेत गंजत नाही, परंतु उच्च तापमानास क्रोमिक ऑक्साइड तयार होते.
सर्वसामान्य परिस्थितीत क्रोमियमावर पाण्याची विक्रिया होत नाही, परंतु ती रक्तोष्म (तापवून लाल केलेली) असताना वाफेवर अल्प विक्रिया होते व क्रोमिक ऑक्साइड आणि हायड्रोजन ही मिळतात.
विरल हायड्रोक्लोरिक व सल्फूरिक अम्लांत क्रोमियम धातू हळूहळू विरघळते आणि क्रोमस लवणे व हायड्रोजन मिळतात. विरल (विद्रावात प्रमाण कमी असलेल्या) नायट्रिक अम्लाची तिच्यावर अगदी अल्प विक्रिया होते. संहत (विद्रावात प्रमाण जास्त असलेल्या) हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया विरल अम्लापेक्षा जोरदार असते. उष्ण संहत सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया होऊन सल्फर डाय-ऑक्साइड व क्रोमिक सल्फेट [Cr2(SO4)3] मिळतात. संहत नायट्रिक अम्लामुळे क्रोमियम अक्रिय (रासायनिक विक्रियेत सहज भाग न घेणारे) बनते. ऑक्सिडीकारक [→ ऑक्सिडीभवन] उपस्थित नसेल, तर वितळलेल्या क्षारांचासुद्धा (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणाऱ्या पदार्थांचासुद्धा, अल्कलींचासुद्धा) तिच्यावर अगदी थोडा परिणाम होतो (त्यामुळे थोडेसे क्रोमेट मिळते). उष्ण असताना क्रोमियम धातूचा अनेक मूलद्रव्यांशी संयोग होतो. विद्युत् विच्छेदी क्रोमियम तिच्या घनफळाच्या २५० पट हायड्रोजन शोषून घेते. क्रोमियम आणि हायड्रोजन, नायट्रोजन व कार्बन ह्यांच्या विक्रिया होऊन अनुक्रमे हायड्राइडे, नायट्राइडे आणि कार्बाइडे तयार होतात. क्रोमियम कार्बाइड (Cr3C2) हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. [→ कार्बाइडे].
अणुकेंद्रीय गुणधर्म : क्रोमियम हे आवर्त सारणीतील सहाव्या गटातील इतर धातुरूप मूलद्रव्यांपेक्षा न्यूट्रॉनांच्या मितव्ययाच्या दृष्टीने श्रेष्ठ असून व्हॅनेडियम व निओबियम यांपेक्षा जास्त उपयुक्त असल्याने शीघ्र गतीच्या अणुकेंद्रीय विक्रियकांत (ज्यांत अणुकेंद्रीय विक्रिया करण्यात येतात अशा उपकरणांत) क्रोमियम वापरतात. निओबियम, मॉलिब्डेनम व टंगस्टन यांपेक्षा ते उच्च स्त्रोत ऊर्जांच्या बाबतीत श्रेष्ठ असून सर्व ऊर्जांसाठी टँटॅलमापेक्षा सरस आहे. ऊष्मीय न्यूट्रॉनाच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व जाणण्यासाठी) क्रोमियमाचा चांगला उपयोग होतो, असे आढळून आले आहे.
विद्युत् गुणधर्म : शुद्ध स्थितीतील व तापानुशीतित (तापवून सावकाश थंड केलेल्या) स्थितीतील क्रोमियम धातूची विद्युत् संवाहकता (विद्युत् प्रवाह वाहून नेण्याची क्षमता) तांब्याच्या २२·२% इतकी असते. २० से. ला तापानुशीतित आणि विद्युत् विलेपित (विजेच्या साहाय्याने मुलामा दिलेल्या) क्रोमियमाचा विशिष्ट रोध १३·३ मायक्रोओहम प्रतिओहम प्रतिसेंमी. असतो.
यांत्रिक गुणधर्म : लाटणे, घडविणे व तारा काढणे ह्यांबाबतीत क्रोमियमाची कार्यक्षमता कमी आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन व नायट्रोजन विरहित असलेले क्रोमियम वरील बाबतीत चांगले कार्यक्षम ठरते. पण मूलद्रव्ये क्रोमियमामधून काढून टाकणे अवघड आहे. इतर धातूंच्या मानाने क्रोमियमाचा घर्षणांक (इतर पृष्ठभागांवरून सरकविण्यास लागणारी प्रेरणा) कमी आहे.
संयुगे : ऑक्सिडीकारक अवस्था [→ ऑक्सिडीभवन] २, ३ व ४ असताना क्रोमियम व इतर मूलद्रव्ये यांची संयुगे बनतात. पेरॉक्साइडे, परक्रोमिक अम्ल व परक्रोमेट ही संयुगे महत्त्वाची आहेत. त्यांपैकी फेरस क्रोमाइट (FeO.Cr2O3), लेड क्रोमेट (PbCrO4), बेरियम क्रोमेट (BaCrO4), सोडियम क्रोमेट (Na2CrO4), पोटॅशियम क्रोमेट (K2CrO4) व डायक्रोमेट (K2Cr2O7), परक्रोमिक अम्ल (H2CrO4) व झिंक क्रोमेट (ZnCrO4) ही महत्त्वाची आहेत. क्रोमियमाबरोबर सर्व धातूंची विक्रिया होऊन त्यांची क्रोमेट बनतात. ती क्रोमियम धातु-उत्पादनात तसेच रंगद्रव्ये म्हणून, कातडी कमावण्यासाठी, कापडासाठी रंगबंधक (धाग्याला रंग पक्का बसविण्याचा गुण असलेला पदार्थ) म्हणून आणि क्रोमियम-विलेपनात (क्रोमियमाचा मुलामा देण्याच्या क्रियेत) वापरतात. क्रोमियम सल्फेट [Cr2(SO4)3] हे लवण कातडी कमावण्यासाठी वापरतात. क्रोमियमाची नायट्रोजनयुक्त व कार्बनयुक्त संयुगे बनतात, पण ती औद्योगिक दृष्ट्या कमी महत्त्वाची आहेत. ॲसिटिक अम्ल, फॉर्मिक अम्ल, ऑक्झॅलिक अम्ल व टार्टारिक अम्ल ह्यांबरोबर होणारी त्याची कार्बनी संयुगे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत.
उपयोग : शुद्ध क्रोमियमाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे क्रोमियम विलेपन हा होय. क्रोमियमाचा मुलामा दिसावयास आकर्षक असून परावर्तन गुणांत श्रेष्ठ असतो व आवश्यक असेल तर कठीण करता येतो. तो ज्यावर दिलेला असेल त्या धातूला घट्ट चिकटून राहतो आणि तिचे गंजण्यापासून संरक्षण करतो. या विविध गुणधर्मामुळे क्रोमियम-विलेपन महत्त्वाचे बनले आहे. बरीच गृहोपयोगी उपकरणे क्रोमियम-विलेपित असतात. मोटारगाडीचे काही भाग, हत्यारे, रूळ, सायकलचे भाग रासायनिक उपकरणे, दंतचक्रे (गिअर), विद्युत् उपकरणे, मुद्रा (डाय), खाद्यपदार्थ उद्योगातील उपकरणे, कटलरी इ. वस्तू क्रोमियम-विलेपित असतात [→ विद्युत् विलेपन].
एनॅमल किंवा क्रोमियमाचे व इतर धातूंचे मुलामे उच्च तापमानात आधार धातूचे सर्वत्र सारख्या प्रमाणात रक्षण करू शकत नाहीत. पण क्रोमियमीकरण पद्धतीने हे साध्य होते. ह्या पद्धतीत अंतर्विसरण (रेणूंचे परस्परांत मिसळणे) होईल अशा तापमानावर क्रोमियमाचा थर देतात. गंधकयुक्त वातावरणात निकेलाचे रक्षण करण्यासाठी क्रोमियमीकरण वापरतात [→ धातूंचे मुलामे].
क्रोमियम (५१) ह्या गॅमा किरण उत्सर्जित करणाऱ्या किरणोत्सर्गी समस्थानिकाचा उपयोग प्लीहेच्या (पानथरीच्या) विविध अभ्यासात करतात. आतड्यातील रक्तस्त्रावाच्या अभ्यासासाठीही त्याचा उपयोग करतात. काही प्रकारच्या कर्करोगांच्या चिकित्सेत त्याचा उपयोग करतात.
क्रोमाइटाचा उपयोग उच्चतापसह पदार्थांत मोठ्या प्रमाणात करतात. अशा क्रोमाइटामध्ये ३८–४८% क्रोमिक ऑक्साइड, १२– २४% अँल्युमिनियम ऑक्साइड, १४–२४% फेरिक ऑक्साइड. १४–१८% मॅग्नेशियम ऑक्साइड व १०% पेक्षा कमी सिलिकॉन डाय-ऑक्साइड (सिलिका) असणे जरूर असते. क्रोमाइटाचा उच्च वितळबिंदू, साधारण ऊष्मीय प्रसरण, उच्च तापमानात स्फटिक स्वरूपाची स्थिरता व रासायनिक दृष्ट्या उदासीनता ह्यांवर त्याचा उच्चतापसह पदार्थ म्हणून वापर अवलंबून असतो. उच्च तापमानाच्या भट्ट्यांसाठी क्रोमाइटाच्या विटा वापरतात.
क्रोम रसायने तयार करण्यासाठी क्रोमाइटात कमीत कमी ४५% इतके क्रोमिक ऑक्साइड असणे आवश्यक असते. ह्यापासून प्रथम सोडियम डायक्रोमेट व नंतर इतर क्रोम रसायने बनविली जातात. ह्याचा प्रमुख उपयोग रंगद्रव्यनिर्मितीसाठी केला जातो. ह्या रंगद्रव्यांचा विविध ठिकाणी वापर केला जातो. क्रोम रसायनांच्या एकूण उत्पादनापैकी सु. ३३% रंगद्रव्य निर्मितीसाठी, १०% कापड उद्योगात रंगबंधक व इतर संस्करणासाठी, २५% कातड्यांच्या क्रोम टॅनिंनसाठी व २५% धातूंच्या पृष्ठभागावर मुलामे देण्यासाठी वापरली जातात. मुद्रणाच्या फोटो एन्प्रेव्हिंग पद्धतीमध्ये (अक्षर मुद्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या एका छायाचित्रण पद्धतीमध्ये) व छायाचित्रण फिल्ममध्येही ती वापरली जातात. कापूर, सॅकॅरीन, कृत्रिम तंतू इत्यादींच्या निर्मितीतील कार्बनी ऑक्सिडीकरणात तसेच उत्प्रेरक (व्रिक्रियेत भाग न घेता विक्रियेचा वेग वाढविणारा पदार्थ) व विक्रियाकारक म्हणूनही त्यांचा उपयोग केला जातो.
मिश्रधातू : ॲल्युमिनियम, अँटिमनी, बिस्मथ, लोह, कोबाल्ट, तांबे, सोने, शिसे, निकेल, प्लॅटिनम, सिलिकॉन, चांदी, कथिल, टंगस्टन, जस्त, झिर्कोनियम इ. धातूंबरोबर क्रोमियमाच्या मिश्रधातू होतात. लोखंड, निकेल व इतर धातूंची क्षरणरोधकता (रासायनिक क्रियेने नाश पावण्यास प्रतिकार करण्याची क्षमता) व ऑक्सिडीभवन रोधकता वाढविण्यासाठी व त्यांचे बल वाढविण्यासाठी त्यांमध्ये क्रोमियम हे फेरोक्रोमियम (७०% क्रोमियमयुक्त) ह्या स्वरूपात मिसळतात. उच्च कार्बन फेरोक्रोमियमाचा (४–६% कार्बन) उपयोग ज्या पोलादात क्रोमियम व कार्बन असणे आवश्यक आहे, अशा पोलादाच्या उत्पादनात केला जातो. नीच कार्बन फेरोक्रोमियम (०·०३–०·१५% कार्बन) सिलिकॉनाने होणाऱ्या क्षपणाने दोन टप्प्यांत किंवा उच्च कार्बन फेरोक्रोमियम क्वार्ट्झाइटाच्या सान्निध्यात निर्वातात तापवून तयार करतात.
क्रोमियमाचे प्रमाण ३% असलेल्या पोलादाच्या भौतिकी गुणधर्मांत सुधारणा होते व ते उष्णता संस्करणास योग्य असते. क्रोमियम आणि मॉलिब्डेनम, निकेल, मँगॅनीज, व्हॅनेडियम यांसारख्या धातूंनी युक्त असलेल्या पोलादाचा उपयोग स्प्रिंगा, लाटणी (रोलर) व गोलक धारव्यांच्या (बेअरिंगांच्या) मुद्रा, रूळ, उच्च बलाची संरचना ह्यांसाठी करतात. ५-६ क्रोमियम असलेले पोलाद क्षरणरोधी व ऑक्सिडीभवनरोधी असते, त्याचा उपयोग खनिज तेल उद्योगात करतात. क्रोमियम असलेल्या काही पोलादाच्या प्रकारांस ‘स्टेनलेस स्टील’ म्हणतात. साधे पोलाद हवा व पाणी यांच्या संपर्काने गंजते, तसे हे गंजत नाही. १०–१८% क्रोमियम असलेल्या पोलादास स्टेनलेस पोलाद व १३% क्रोमियम आणि ०·३% कार्बनयुक्त पोलाद उष्णता संस्कारक्षम असून ते चाकू, कात्र्या, सुऱ्या इत्यादींच्या निर्मितीत वापरतात. कार्बन प्रमाण १–२% असल्यास तेच पोलाद विशिष्ट हत्यारासाठी वापरतात. २५–३०% क्रोमियम असलेले पोलाद भट्ट्यांच्या भागांसाठी उष्णता विनिमयकासाठी (एका पदार्थातील उष्णता दुसऱ्या पदार्थास देण्यास साहाय्य करणाऱ्या प्रयुक्तीसाठी), भट्टीच्या अस्तरासाठी, तसेच ज्वालकाची (ज्यातून ज्वाला बाहेर पडतात अशा प्रयुक्तीची, बर्नरची) तोंडे इत्यादींसाठी वापरतात. क्रोमियमाबरोबर निकेल, मँगॅनीज, मॉलिब्डेनम, टंगस्टन इ. धातू मिसळून तयार झालेले पोलाद उच्च तापमानात वापरतात [→ पोलाद].
स्टिलाइट, विद्युत् रोधक मिश्रधातू आणि टरबाइन मिश्रधातू यांत क्रोमियम असते. क्रोमियम, सोने आणि जर्मेनियम यांची मिश्रधातू सूर्याच्या वर्णपटाच्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारी पारदर्शक काच बनविण्याकरिता वापरतात.
निकेल-क्रोमियम-लोहयुक्त मिश्रधातूंत १५–२८% क्रोमियम आणि ५–७८% निकेल असते अशा मिश्रधातू उष्णता रोधक असतात. नायक्रोम ही त्यांपैकी एक असून पाणी तापविण्याच्या, इस्त्री करण्याच्या इ. गृहोपयोगी उपकरणांत वापरतात [→ नायक्रोम]. क्रोमियम कोबाल्ट मिश्रधातू वस्तू कापण्याच्या हत्यारांसाठी वापरतात.
विषारीपणा : शुद्ध क्रोमियम धातू, क्रोमाइट व त्रिसंयुजी क्रोमियम संयुगांमुळे शरीरीच्या ऊतकांवर (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांवर) गंभीर परिणाम होत नाही. तिची षट्संयुजी संयुगे तेवढी विषारी आहेत. त्यांच्यामुळे मानवी शरीरावर शोथकारी (दाहयुक्त सूज आणणारे) क्षरण व काही वेळा विषारी क्रिया होते. विशिष्ट परिस्थितीत त्यांच्यामुळे ऊतक-प्रथिनांचे विकृतीकरण (मूलरूप बदलणे) व अवक्षेपण होते. जास्त संपर्काने प्रथमतः त्वचा व श्वसनमार्ग यांवर परिणाम होतो. त्वचेच्या संपर्कामुळे क्रोमवण व त्वक्शोथ होतो. क्रोमेचटाची धूळ हुंगण्याने किंवा क्रोमिक अम्लाच्या धुरामुळे नासा पटलाला (नाकपुड्या विभागणाऱ्या नाकातील मधल्या पडद्याला) व्रण व भोके पडतात, श्वसनमार्गाचा कर्करोग होतो व चिरकारी (दीर्घकालीन) शोथ किंवा चोंदणे इ. विकार होतात.
अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). बेरियम क्रोमेट किंवा लेड क्रोमेट यांच्या स्वरूपात अवक्षेपण करून क्रोमेट आयनाच्या (विद्युत् भारित अणुगटाच्या) साहाय्याने, तसेच एखाद्या क्रोमेटाच्या विद्रावात फेरस अमोनियम सल्फेटाचा विद्राव मिसळला म्हणजे क्रोमेटाचा मूळचा नारिंगी रंग जातो व त्याजागी निळसर हिरवा रंग येतो. या फेरबदलावरूनही क्रोमियमाचे अभिज्ञान केले जाते. वर्णपटलेखन, क्ष-किरण विश्लेषण, ⇨ ध्रुवणमिती विश्लेषण, ⇨ ज्योत प्रकाशमापन इ. पद्धतींनीही त्याचे अभिज्ञान केले जाते. अल्प प्रमाणातील क्रोमियमासाठी वर्णमापन (विशिष्ट वक्रियेत संयुगाच्या प्राप्त विद्रावास येणारा व त्याच्याच ज्ञातमूल्य विद्रावास येणारा रंग यांची तुलना करून संयुगाचे प्रमाण ठरविणे) पद्धत वापरतात [→ वैश्लेषिक रसायनशास्त्र].
क्रोमिक लवणांच्या विद्रावांची अमोनियम हायड्रॉक्साइडाच्या विद्रावाशी विक्रिया केल्यास क्रोमिक हायड्रॉक्साइडचा हिरवट निळा अवक्षेप (साका) मिळतो.
Cr2 (SO4)3 + 6NH4OH → 2Cr (OH) 3 + 3(NH4)2SO4
क्रोमिक अमोनियम क्रोमिक अमोनियम
सल्फेट हायड्रॉक्साइड हायड्रॉक्साइड सल्फेट
हा अवक्षेप दाहक सोड्याच्या विद्रावात विद्राव्य (विरघळणारा) असून सोडियम पेरॉक्साइडाने त्याचे पिवळ्या क्रोमेटात रूपांतर होते. बोरॅक्स मणी परीक्षेत क्रोमिक लवणामुळे मण्याला हिरवा रंग येतो. क्रोमेटे व डायक्रोमेटे सामान्यतः त्यांच्या रंगावरून ओळखतात.
संदर्भ : 1. Abbott, D. Inorganic Chemistry, London, 1965.
2. American Society of Metals, Ductile Chromium and Its Alloys, 1957.
3. Hicks, J. Comprehensive Chemistry, London, 1963.
4. Sully, A. H. Brandes, E. A. Chromium, 1967.
जमदाडे, ज. वि.
“