कुवेत : दौलत अल् कुवेत. इराण आखाताच्या वायव्येस असलेले राज्य. क्षेत्रफळ २४,२८० चौ. किमी. लोकसंख्या ७,३३,००० (१९६९). याच्या उत्तरेकडे व पश्चिमेकडे इराक आणि पश्चिमेकडे व दक्षिणेकडे स्थित सौदी अरेबिया आणि व या देशामधील सु. ५,७०० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या तटस्थ प्रदेशाची १९६६ साली विभागणी झाली. तथापि नैसर्गिक संपत्तीवर दोघांचाही हक्क राहणार आहे. मसकत, औहा, अल् वर्बा, अल् केलबर, अम्म अल् मरादिम, अम्म अल् नामी कारू, बुबियान, फायलाका इ. बेटांचा कुवेतमध्ये समावेश होतो परंतु फायलाका या एकाच बेटावर वस्ती आहे. कुवेत हे राजधानीचे शहर आहे.
भूवर्णन : वाळू व पंकनिर्मित कुवेतचे उंच-सखल भूपृष्ठ एक मरुभूमी असून, एकच एक लांब टेकडी अल् अहमदीपासून (उंची ११२ मी.) नैर्ऋत्य भागापर्यंत (उंची २७४ मी.) पसरली आहे. उन्हाळ्यात उष्णतामानाची सरासरी ४२० से. असते. यावेळेस वायव्येकडून वाहणारे ‘शमल’ वारे वातावरणात थंडपणा आणतात. उन्हाळे कोरडे असले, तरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण ९०% असते.हिवाळ्यात हवामान उत्तम असते व कधीकधी उष्णतामान हिमांकापर्यंत पोहोचते. २·५ सेंमी. ते १७ सेंमी. सर्वत्र पडणारा पाऊस हिवाळ्यात वादळामुळे पडतो. तो पुरेसा नसल्यामुळे नद्या, प्राणी आणि वनस्पत्ती इत्यादींचा अभाव जाणवतो.
इतिहास : इ. स. पू. ५२५ मध्ये कुवेतचा भारताशी व्यापारसंबंध होता असे फायलाका बेटावरील पुरावस्तुसंशोधनावरून दिसते. नंतरच्या इतिहासात सातव्या शतकात पैगंबराच्या हयातीतच इस्लामचा स्वीकार, १७१६ मध्ये अरबी अनीज लोकांची समुद्रतटावर वस्ती आणि १७५६ साली अल् सबाह घराण्यातील व्यक्तीची सुलतानपदी मंजुरी या महत्त्वाच्या घटना होत. हे घराणे आजतागायत राज्य करीत आहे. शेख अब्दुल्ला अल् सबाह (१८६६–९२) याच्या कारकीर्दीत अल् रशीद व अल् सोद यांमध्ये तंटेबखेडे माजले. तुर्कस्तानने अल् रशीदला पाठिंबा देऊन कुवेत घेण्याचा प्रयत्न चालविला. १८९९ साली तुर्कस्तानच्या भीतीने ब्रिटनशी तह करण्यात आला. त्यामुळे शत्रूंची आक्रमणे थांबली. १९१४ साली ब्रिटिश संरक्षणाखाली कुवेत एक स्वतंत्र राज्य घोषित झाले व १९६१ साली १८९९ चा करार संपुष्टात येऊन स्वतंत्रतेचा पुनरुच्चार करण्यात आला. या घटनेबरोबरच इराकने कुवेतवर अयशस्वी चढाई केली. ब्रिटिशांच्या व नंतर अरब लीगच्या सेनेने कुवेतला मदत केली. १९६३ मध्ये इराकनेही कुवेतला मान्यता दिली. कुवेत बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद आहे.
राजकीय स्थिती: १९६३ सालच्या संविधानानुसार हे स्वतंत्र सार्वभौम अरबी राज्य असून येथील लोक अरब राज्याचा एक भाग आहे. अमीर सबाह घराण्याचा असावा लागतो. अमीर पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या साहाय्याने राज्यकारभार चालवितो. कुवेतमध्ये जन्मलेल्या, शिक्षित प्रौढ पुरुषांनी दर चार वर्षांनी निवडून दिलेल्या ५० सदस्यांची राष्ट्रीय सभा असून हे सदस्य कुवेतमध्ये जन्मलेले व ३० वर्षांवरील असावे लागतात. अमीराने मंजूर न केलेले विधेयक २/३ पेक्षा जास्त मताधिक्याने या सभेने पुन्हा मंजूर केल्यास ते विधेयक वैध होते. १९६२ पूर्वी येथे राजकीय पक्ष नव्हते. त्यानंतर ‘बाथ’ पक्षाशी संबंधित पक्ष आणि साम्यवादी पक्ष स्थापण्यात आले. १९५९ साली मुस्लिम कायद्याऐवजी आधुनिक न्यायसंहिता वापरात आली. कुवेतमध्ये ३,००० सैनिकांची सेना व छोटेसे विमानदल आहे.
आर्थिक स्थिती: समुद्रातून मोती काढणे व उंट पाळणे या जागी आता तेल व गॅस उत्पादनाला खूप महत्त्व आले आहे. जगातील एकूण तेलसाठ्यापैकी १६·५ टक्के तेलसाठा येथे आहे. तो प्रामुख्याने २४१ किमी. लांब पट्ट्यात साठविला असून मीना अल् अहमदी येथे सर्वांत मोठा तेलशुद्धी कारखाना आहे. फ्रेंच, ब्रिटिश, अमेरिकन, जपानी व अलीकडे डच कंपनीला तेलाचे अधिकार मिळाले असून १९६९ साली १२·७५ कोटी लाँग टन अशुद्ध तेलाचे व १४,५१७ अब्ज घ. ली. नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. यापासून मिळणारे उत्पन्न शेतीविकास, अन्नधान्य व शुद्ध पाणीपुरवठा, शिक्षण, समाजकल्याण, दळणवळण, शहर व बंदर-सुधारणा आणि प्रशीतक उपलब्धीवर खर्च करण्यात येते. तेलामुळे १९६२ साली दरडोई उत्पन्न जगात सर्वांत अधिक होते व म्हणून हे अरबांचे आकर्षणक्षेत्र बनले. कुवेत अनेक अरब राष्ट्रांना अर्थसाहाय्य करीत असते. तेलाच्या उत्पन्नामुळे मोटारी, सुतीवस्त्रे, तंबाखू, सिमेंट, लोखंडी सामान व अन्न पदार्थांची आयात सुलभ झाली आहे. कुवेत शहरात प्रभावी नभोवाणी व दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. वायू व मोटारमार्ग उत्तम असून देशात १९ माणसांमागे एक दूरध्वनी हे समृद्धीचे निदर्शक आहे. १९६१ नंतर भारतीय रुपयाची जागा कुवेत दिनारने घेतली असून तो १,००० फिलमध्ये विभागलेला आहे. १९७० मध्ये ८५७ फिल = १ स्टर्लिंग पौंड असा दर होता.
लोक व समाजजीवन : कुवेतच्या लोकसंख्येपैकी सु. ४३ टक्के स्त्रिया असून सु. ५३ टक्के परकीय आहेत. यांत शेजारील राष्ट्रातील लोकांबरोबर भारतीय, पाकिस्तानी, यूरोपीय व अमेरिकन लोक आहेत. अरबी ही अधिकृत भाषा असली, तरी इंग्रजी सर्रास वापरात आहे. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले असून सुन्नी बहुसंख्य आहेत. येथील १५० व्यक्तींमागे एक खाट व ८५० मागे एक वैद्य हे प्रमाण बऱ्याच विकसित देशांप्रमाणे आहे. कुवेत नागरिकाला सर्व वैद्यकीय सेवा विनाशुल्क मिळते बालोद्यानापासून महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण, पुस्तके, कपडे इ. निःशुल्क असून परदेश शिक्षणालाही सरकार हातभार लावते. १९६९-७० साली १९५ सरकारी व खाजगी शाळांतून ९,३२८ शिक्षक १,५४,३०५ विद्यार्थ्यांना शिकवीत होते. कुवेत विद्यापीठात १९६८ साली १,३२० विद्यार्थी होते. कुवेतच्या मुख्य ग्रंथालयात १२,००० ग्रंथ असून त्याच्या ३ शाखा आहेत. कुवेत वस्तुसंग्रहालयात इ. स. पू. १००० पासूनचे प्राचीन संग्रह आहेत. येथे १९७० साली ५ दैनिके व १४ नियतकालिके प्रचारात होती. बसराच्या दक्षिणेला १२९ किमी. अंतरावरील कुवेत शहर पूर्वी इराक आखाताद्वारे अंतर्गत भागांशी चालणाऱ्या देवाणघेवाणीचे एक मुख्य केंद्र होते. बोटी बांधणे हा येथील महत्त्वाचा उद्योग. मोती, हाडे, कातडी, खजूर यांची येथून निर्यात होई. १९३४ च्या सुमारास राज्यात तेलखाणी मिळाल्यापासून कुवेत शहराला भरभराटी लाभली. १९६५ साली येथे २,९५,२७३ लोकसंख्या होती. अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेले हे शहर आज व्यापार, दळणवळण इ. क्षेत्रांत मध्यपूर्वेत अग्रेसर मानले जाते. मीना अल् अहमदी हे कुवेतच्या ३५ किमी. दक्षिणेकडील बंदर असून येथे तेलशुद्धीकरण कारखाना आहे. (चित्रपत्रे ७, ८).
खांडवे, म. अ.