कुलंब, शार्ल ऑग्युस्तीन द : (१४ जून १७३६–२३ ऑगस्ट १८०६). फ्रेंच भौतिकीविज्ञ. विद्युत् शास्त्रात विशेष कार्य. त्यांचा जन्म आंगूलेम येथे झाला. सैन्यात अभियंता म्हणून त्यांनी सुरुवातीस काम केले. वेस्ट इंडिजमध्ये नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्त होऊन ते फ्रान्सला परत आले. १७८९ साली त्यांनी ब्लावा येथे शास्त्रीय संशोधन सुरू केले. फ्रेंच सरकारने वजने व मापे यांच्या नवीन (मेट्रिक) परिमाणांसंबंधी सल्ला देण्यासाठी त्यांना परत बोलावले. १७८१ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमीच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. १८०२ साली सार्वजनिक शिक्षण तपासनीस म्हणून त्यांची नेमणूक झाली.
घर्षणाच्या नियमांचा प्रायोगिक रीत्या अभ्यास करून १७७९ साली त्यांनी यंत्रांतील घर्षणाविषयी एक प्रबंध प्रसिद्ध केला. विद्युत् आणि चुंबकीय आकर्षणाच्या प्रेरणांविषयी त्यांनी मांडलेल्या व्यस्त वर्म नियमांकरिता (कुलंब नियम) कुलंब हे विशेष प्रसिद्ध आहेत. दोन विद्युत् भारांमधील प्रेरणा (आकर्षणाची वा प्रतिसारणाची) ही त्या भारांच्या गुणाकाराच्या सम प्रमाणात व त्यांतील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, हा नियम त्यांनी प्रथम मांडला व नंतर हा व्यस्त वर्ग नियम चुंबकीय प्रेरणांच्या बाबतीतही पडताळून पाहिला. विद्युत् भार हा संवाहकाच्या पृष्ठभागावरच असतो, असे दाखवून त्यांनी निरनिराळ्या संवाहकांच्या पृष्ठभागांवरील विद्युत् भाराच्या वितरणांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांचे विद्युत् शास्त्रविषयक निबंध फ्रेंच ॲकॅडेमीतर्फे १७८५–८९ या काळात प्रसिद्ध झाले. त्यांच्या बहुमानार्थ विद्युत् भाराच्या व्यावहारिक एककाला ‘कुलंब’ हे नाव देण्यात आलेले आहे. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
“