क्रिकेट : एक लोकप्रिय सांघिक खेळ. हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असून तो इंग्लंडप्रमाणेच भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान व न्यूझीलंड ह्या राष्ट्रकुलातील देशांतही लोकप्रिय आहे. ह्या सात देशांमध्ये क्रिकेटचे अधिकृत कसोटी सामने होतात.
खेळाचे मैदान : ह्या खेळासाठी मोठ्या गोलाकार मैदानात मधोमध २०·११ मी. (६६ फूट) लांब व ३·०४ मी. (१० फूट) रुंद अशी खेळपट्टी तयार करण्यात येते. खेळपट्टी दोन प्रकारची असते : एकात खेळपट्टीवर हिरवळ असते, तर दुसऱ्या प्रकारात खेळपट्टीवर चटई (मॅटिंग) अंथरली जाते. खेळपट्टीच्या मध्यबिंदूपासून मैदानावर ६८·५८ मी. (७५ यार्ड) अंतरावर गोलाकार सीमारेषा आखली जाते. सीमारेषेचे अंतर जास्तीत जास्त ६८·५८ मी. असावे, असा प्रायोगिक नियम आहे. ह्या सीमारेषेच्या कक्षेतील भाग म्हणजे क्रिकेटचे एकूण क्षेत्र (फील्ड) होय. सीमारेषा लांबून दिसावी, म्हणून तिच्यावर पांढरी फक्की टाकली जाते किंवा दोर बांधण्यात येतो. तसेच ठराविक अंतरावर निशाणे ठोकली जातात.
खेळाचे साहित्य:यष्ट्या, चेंडू, बॅट व संरक्षक साधने मिळून क्रिकेटचे साहित्य बनते.
यष्ट्या : खेळपट्टीच्या लांबीकडच्या दोन्ही टोकांना मधोमध, एकमेकांसमोर व समांतर अशा तीन तीन यष्ट्या ठोकलेल्या असतात. त्यांच्यामध्ये २०·११ मी. अंतर असते. ह्या यष्ट्या लाकडी, उभट व गोलाकार असतात. त्यांच्यामधून चेंडू जाऊ नये, अशा रीतीने त्या ठोकल्या जातात. यष्ट्यांची जमिनीपासूनची उंची ०·७१ मी. (२८ इंच) असते व तीन यष्ट्यांची एकूण रुंदी ०·२२ मी. (९ इंच) असते. ह्या तीन यष्ट्यांना ‘विकेट्स’ अशी संज्ञा आहे. यष्ट्यांवर जी खोबण असते, तीत दोन विट्या (बेल्स) ठेवतात. खेळपट्टीवरच दोन्ही बाजूंच्या यष्ट्यांसमोर १·२२ मी. (४ फूट) अंतरावर ३·६५ मी. (१२ फूट) लांबीची एक समांतर रेषा आखलेली असते तिला ‘फलंदाजी पाटी’ (पॉपिंग क्रीज) म्हणतात. सध्याच्या नियमांनुसार ह्या रेषेला फार महत्व असून ती फलंदाज आणि गोलंदाज ह्यांना लक्ष्मणरेषेसारखी असते. तिच्यापुढे मागचा पाय नेऊन गोलंदाजाने चेंडू टाकावयाचा नाही, असा नियम आहे. फलंदाजालाही त्या पाटीच्या आत एक पाय ठेवून खेळावे लागते. यष्ट्यांच्या दोन्ही बाजूंना एक २·६४ मी. (८ फूट ८ इंच) लांबीची रेषा काढली जाते तिला ‘गोलंदाजी पाटी’ (बोलिंग क्रीज) अशी संज्ञा आहे.
चेंडू : हा चिवट कातड्याचा व रक्तवर्णी असतो. तो आतून बूच, रबर, लोकर व दोऱ्याने घट्ट बांधलेला असतो. त्याचे वजन ५१/२ ते ५ ३/४ औंस असावे लागते. चेंडूचा परीघ साधारणतः ०·२२ मी. (९ इंच) असतो. चेंडू गोलाकार असून त्याच्या मधोमध दुहेरी शिवण असते.
बॅट : ही विलो नावाच्या हलक्या, चिवट व सरळ तंतुरेषा असलेल्या लाकडापासून बनवितात. बॅटची एकूण लांबी ०·९६ मी. (३८ इंच) व रुंदी जास्तीत जास्त १०·७८ सेंमी. (४१/४ इंच) असते. तिचा दांडा वेताच्या व रबराच्या चपट्या पट्ट्यांनी बनवलेला आणि दंडगोलाकार असतो. तो चिवट काळ्या दोऱ्यांनी पक्का बांधलेला असून त्याला वरून चिवट रबराचे पकडवेष्टण (ग्रिप) असते. फलंदाजाच्या आवडीनुसार बॅट हलकी किंवा जड असते. ती टोला मारण्याच्या बाजूला सपाट आणि पाठीमागे फुगीर असते. तिची खालील बाजू वक्रगोलाकार असते.
संरक्षक साधने : चेंडूचा मार लागून हाताच्या बोटांना व पायांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून फलंदाज दोन्ही पायांवर संरक्षणार्थ रक्षकसाधने (लेग गार्ड्स) बांधतात व हातांमध्ये विशिष्ट प्रकाराचे हातमोजे वापरतात. तसेच जननेंद्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘‘ॲब्डोमेन गार्ड’ नावाचे रक्षकसाधन वापरले जाते. फलंदाजांप्रमाणेच यष्टिरक्षकही ही साधने वापरतात.
खेळाचे स्वरूप : क्रिकेटचा सामना हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांत होतो. अनुभवी, अष्टपैलू व अचूक निर्णयशक्ती असलेला खेडाळू संघाचे नेतृत्व करतो त्याला कप्तान म्हणतात. सामन्याचे नियंत्रण नियमांप्रमाणे दोन पंच करतात. सामना १, २, ३, ४ किंवा ५ दिवसांचा व क्वचित ६ दिवसांचाही असू शकतो. प्रथम दोन कप्तान नाणेफेक करतात. ती जिंकणारा कप्तान फलंदाजी वा क्षेत्ररक्षण ह्यांपैकी काय घ्यावयाचे ते ठरवितो. प्रत्यक्ष खेळपट्टीची परिस्थिती पाहून– म्हणजे ती चांगली असल्यास फलंदाजी व पावसाने खराब झाली असल्यास क्षेत्ररक्षण– निर्णय घेतला जातो. सामन्याच्या सुरुवातीस क्षेत्ररक्षण घेतलेल्या संघाचे अकरा खेळाडू कप्तानाच्या सूचनेनुसार क्षेत्ररचना करून चेंडू अडविण्याच्या तयारीने उभे असतात. फलंदाजी घेतलेल्या संघाचे आघाडीचे दोन फलंदाज खेळावयास येतात. त्यांपैकी एक फलंदाज फलंदाजी पाटीमध्ये, तर दुसरा गोलंदाजी पाटीमध्ये उभा असतो. दोन पंचांपैकी एक गोलंदाजीच्या बाजूला, तर दुसरा फलंदाजीच्या लेगच्या बाजूला उभा असतो. खेळास प्रत्यक्ष सुरुवात होते, तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा गोलंदाज समोर विशिष्ट पवित्र्यात उभ्या असलेल्या फलंदाजास चेंडू टाकतो. फलंदाज तो चेंडू बॅटने अडवितो किंवा फटकावतो. चेंडूला फटका बसून तो दूर जात असता दोन्ही फलंदाज एकमेकांच्या यष्ट्यांकडे धावतात. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून तो यष्टिरक्षकाकडे वा गोलंदाजाकडे टाकण्यापूर्वी त्यांच्या जितक्या फेऱ्या पूर्ण होतात, तितक्या धावा तो चेंडू फटकारणाऱ्या फलंदाजाच्या आणि पर्यायाने त्याच्या संघाच्या नावावर जमा होतात. अशा रीतीने जास्तीत जास्त धावा जमविणे हे फलंदाजी करणाऱ्या संघाचे, तर कमीत कमी धावांमध्ये प्रतिपक्षास बाद करण्याचे गोलंदाजी करणाऱ्या संघाचे उद्दिष्ट असते. एका बाजूने गोलंदाजीचे षट्क म्हणजे सहा चेंडू टाकून झाले, की बाजू बदलण्यात येते (ऑस्ट्रेलिया येथे षट्काऐवजी अष्टक म्हणजे एका वेळी आठ चेंडू टाकले जातात). फलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व म्हणजे दहा खेळाडू बाद झाले, की त्या संघाचा पहिला डाव (इनिंग्ज) संपतो. संघातील सर्व फलंदाजांनी जमविलेल्या एकूण धावा व अन्य नियमबाह्य गोलंदाजीच्या तसेच ‘बाईज’ प्रकारातील धावा ह्या सर्व मिळून संघाची एकूण धावसंख्या होते. त्यानंतर दुसऱ्या संघाची फंलदाची सुरू होते. अशा रीतीने आळीपाळीने प्रत्येक संघास दोन डाव खेळावे लागतात. ज्या संघाची धावसंख्या जास्त होते, तो संघ विजयी ठरतो. काही गडी राखूनही एखाद्या संघास विजय मिळतो, म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही डावांत मिळून जेवढ्या धावा झाल्या असतील, त्यांपेक्षा एक धाव अधिक करून दुसरा संघ खेळ संपवितो व बाद झालेले खेळाडू दहांमधून वजा करून उरलेले गडी राखून हा संघ विजयी होतो. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची पहिल्या डावाची धावसंख्या दुसऱ्या संघाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपेक्षा ७५ धावांनी (एक दिवसाचा सामना), १०० धावांनी (दोन दिवसांचा सामना), १५० धावांनी (तीन वा चार दिवसांचा सामना) किंवा २०० धावांनी (पाच किंवा सहा दिवसांचा सामना) जास्त असल्यास त्या संघाचा कप्तान प्रतिपक्षीय संघास पुढे-चाल (फॉलो ऑन) देतो, म्हणजे लागोपाठ फलंदाजीचा दुसरा डाव सुरू करण्यास सांगतो. सामन्याच्या ठरलेल्या कालावधीत कोणताच संघ निर्णायकपणे विजय मिळवू न शकल्यास तो सामना अनिर्णित (ड्रॉ) गणला जातो.
फलंदाज बाद होण्याचे प्रकार : फलंदाज एकूण नऊ प्रकारांनी बाद होतो. ते प्रकार पुढे क्रमवार दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार प्रत्येक बादप्रकाराचा नियमक्रमांक त्या प्रकारापुढे कंसात दर्शविला आहे. (१) गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला चुकवून वा बॅटला लागून यष्ट्यांवर आपटला व यष्ट्यांवरील विट्या पडल्या, म्हणजे फलंदाज त्रिफळाबाद होतो (नियम ३४). (२) फलंदाजाने उचलून मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने वा यष्टिरक्षकाने, सीमारेषेच्या आत, वरच्या वर झेलल्यास फलंदाज झेलबाद होतो (नियम ३५). (३) प्रतिपक्षाच्या विनंतीशिवाय, दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही खेळ चालू असताना चेंडू हाताळल्यास तो हाताळणी-बाद होतो. (नियम ३६). (४) बॅटला लागलेला किंवा शरीराने थांबवलेला चेंडू यष्ट्यांकडे जात नसतानाही बॅटने पुन्हा मारला तर फलंदाज, पंचाकडे निर्णय विचारल्यानंतर, द्विटोला-बाद होतो (नियम ३७). (५) चेंडू मारत असताना बॅटचा किंवा शरीराच्या कुठल्याही भागाचा यष्ट्यांना स्पर्श होऊन विट्या पडल्या, तर फलंदाज यष्टिमार-बाद होतो (नियम ३८). (६) तीन यष्ट्यांच्या समोर पडलेला चेंडू फलंदाजाने, हात सोडून, शरीराच्या कुठल्याही भागाने (मुख्यतः पायाने) अडवल्यास व तो चेंडू अडवला नसता तर यष्ट्यांना लागला असता असे पंचाला वाटल्यास त्याच्याकडे निर्णय विचारल्यानंतर फलंदाज पायचीतबाद दिला जातो. उजव्या फिरकीच्या चेंडूवरही फलंदाज पायचीत होऊ शकतो (नियम ३९). (७) दोहोंपैकी कोणत्याही फलंदाजाने प्रतिपक्षाला मुद्दाम अडथळा केला झेल घेण्याच्या कामात व्यत्यय आणला, तर प्रत्यक्ष फलंदाजी करणारा खेळाडू अडथळा-बाद दिला जातो (नियम ४०). (८) फलंदाज धावा काढत असता, तो फलंदाजी पाटीत पोहोचण्याच्या आत त्या बाजूच्या यष्ट्यांवरील विट्या चेंडूच्या साहाय्याने प्रतिपक्षाने उडवल्या, तर तो धावबाद होतो. धावा काढत असताना किंवा एरवीही खेळ चालू असताना दोहोंपैकी कोणताही फलंदाज त्याच्या पाटीच्या बाहेर असल्यास, प्रतिपक्षाने विट्या पाडल्या तर तो फलंदाज धावबाद होतो. अशा वेळी पंचाकडे निर्णय विचारावा लागतो (नियम ४१). (९) फलंदाज टोला मारण्यासाठी फलंदाजी पाटीच्या बाहेर गेला असताना यष्टीरक्षकाने चेंडू पकडून, त्याच्या साहाय्याने यष्ट्यांवरील विट्या पाडल्यास तो यष्टिबाद होतो (नियम ४२).
धावा नोंदण्याचे तंत्र : फलंदाज खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या यष्ट्यांमधील अंतर धावून धावा काढतात तसेच फलंदाजाने मारलेला फटका सीमारेषेपार गेल्यास त्याला त्याबद्दल ‘चौकार’ म्हणजे चार धावा
मिळतात. त्याने टोलविलेल्या चेंडूचा पहिला टप्पा सीमारेषेपार गेला, तर त्याला ‘षट्कार’ म्हणजे सहा धावा मिळतात. ह्या धावांचा निर्देश पंच विशिष्ट खुणांच्या साहाय्याने करतात. अशा वेळी पळून धावा काढण्याची आवश्यकता नसते. फलंदाजांनी काढलेल्या धावांखेरीज संघाला काही जादा (एक्स्ट्रॉ) धावा मिळू शकतात त्या अशा : गोलंदाजाने नियमबाह्य गोलंदाजी केल्यास– (नो बॉल)– चेंडू टाकताना उजव्या हाती गोलंदाजाच्या डाव्या पायाचा कुठलाही भाग फलंदाजी पाटीच्या आत नसेल, तर तो ‘नो बॉल’ देण्यात येतो. तसेच फलंदाजाच्या डाव्या बाजूला, फलंदाजी पाटीच्या मागे जर दोनपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक असतील, तर टाकलेला चेंडू ‘नो बॉल’ म्हणून घोषित करण्यात येतो व अशा प्रत्येक ‘नो बॉल’साठी फलंदाजी करणाऱ्या संघास एक धाव जादा मिळते. त्याचप्रमाणे गोलंदाजी करण्याऐवजी चेंडू फेकल्यास (थ्रो बॉल) प्रतिपक्षास एक जादा धाव मिळते. तसेच फलंदाजाच्या खेळण्याच्या कक्षेत गोलंदाजी न केल्यासही (वाइड बॉल) जादा धाव मिळते. ‘बाईज’ ह्या प्रकारात गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला स्पर्श न होता यष्टिरक्षकाच्या हातून सुटून यष्ट्यांच्या मागे गेल्यास फलंदाज धावा काढू शकतात अथवा चेंडू बॅटला न लागता फलंदाजाच्या शरीराच्या हातांखेरीज अन्य भागास मुद्दाम धक्का न लावता आपोआप चाटून गेल्यासही फलंदाजांना धावा घेता येतात (लेग बाईज). मात्र अशा ‘बाईज’ धावा फलंदाजाच्या नावावर जमा होत नाहीत.
धावा नोंदण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नोंदणीपुस्तक (स्कोअर बुक) वापरले जाते. ह्यात फलंदाजी करणाऱ्या संघातील अकरा खेळाडूंची क्रमवार नावे लिहून त्यांपुढे त्यांनी काढलेल्या धावा नोंदल्या जातात. खेळाडू बाद कसा झाला त्याविषयीचे, तसेच त्याला बाद करणाऱ्या गोलंदाज-क्षेत्ररक्षकांचे निर्देश असतात. गोलंदाजाच्या प्रत्येक षट्काचा तपशील आणि त्याच्या गोलंदाजीचे एकूण पृथक्करण ह्यांचीही माहिती नोंदणीपुस्तकात मिळू शकते. तसेच प्रत्यक्ष सामना चालू असताना त्या ठिकाणी सहजपणे लक्ष वेधून घेईल, असा मोठ्या आकाराचा एक धावफलकही असतो. त्यावरून खेळ चालू असतानाच्या कोणत्याही क्षणी एकूण धावसंख्या, बाद खेळाडूंची संख्या, गोलंदाजांनी टाकलेली एकूण षट्के, शेवटच्या बाद खेळाडूंची व्यक्तिगत धावसंख्या वगैरेंची तात्काळ कल्पना येऊ शकते.
क्रिकेटची विविध अंगे : फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण व कप्तानपद ही क्रिकेटची महत्त्वाची अंगे आहेत.
फलंदाजी : हे ह्या खेळातील एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. फलंदाजाला बॅट कशी धरावी, फलंदाजीसाठी पवित्रा (स्टान्स) कसा घ्यावा, गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूस सरळ बॅटने फटका कसा मारावा इ. गोष्टी चांगल्या अवगत असाव्या लागतात. टोला मारण्यास कोणता चेंडू निवडावा, कोणता चेंडू नुसताच तटवावा व कोणता चेंडू सोडून द्यावा, हे त्याला निमिषार्धात ठरविता आले पाहिजे. फलंदाजीतील पहिले दोन फलंदाज आघाडीची जोडी म्हणून खेळतात. त्यांना द्रुतगती गोलंदाजीला तोंड द्यावे लागते व म्हणून फार सावधगिरीने खेळावे लागते. ते अत्यंत चिवटपणाने व धीमेपणाने खेळणारे असावे लागतात. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकांवर खेळणाऱ्या फलंदाजांना ‘मधली फळी’ म्हणून संबोधतात. संघासाठी मोठी धावसंख्या रचण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. आघाडीच्या जोडीने चिवटपणे खेळून धावरचनेची चांगली पायाभरणी केली, तरच मधल्या फळीतील फलंदाज धावांचा डोंगर रचू शकतात. अन्यथा ते सावधगिरीने खेळतात व त्यामुळे डाव घसरण्याची शक्यता असते. सातव्या व आठव्या क्रमांकांचे फलंदाज हे साधारणतः अष्टपैलू खेळाडू असतात. या क्रमांवर पुष्कळ वेळा यष्टिरक्षकही खेळतो. नवव्या, दहाव्या व अकराव्या क्रमांकांचे खेळाडू हे विशेषेकरून गोलंदाज असतात. तथापि वेळप्रसंगी डाव घसरल्यास तो सावरण्याचे कसब ते दाखवू शकतात. फलंदाजाला विकेटच्या चौफेर फटके मारण्याची कला अवगत असावी लागते. त्याला ‘ऑफ ड्राइव्ह’, ‘ऑन ड्राइव्ह’, ‘कव्हर ड्राइव्ह’, ‘लेट कट’, ‘स्क्वेअर कट’, ‘लेग ग्लान्स’, ‘हूक’, ‘पुल’, इ. फटक्यांचा सराव असावा लागतो. त्याचप्रमाणे वेळप्रसंगी संरक्षक खेळाचे तंत्रही वापरावे लागते. उत्कृष्ट फलंदाजीसाठी विवक्षित स्वरूपाचे समयोचित पदलालित्य (फूटवर्क) आत्मसात करणे आवश्यक असते. शतक काढणे हा फलंदाजीतील एक बहुमान समजला जातो.
गोलंदाजी : हे क्रिकेटमधील दुसरे महत्त्वाचे अंग. गोलंदाजाला बोटांनी चेंडू कसा धरावा, त्याला फिरकी (स्पिन), वेग, उंची व योग्य टप्पा कसा द्यावा त्याचप्रमाणे किती पावले धावत येऊन तो टाकावा व फलंदाजाला फसवून यष्ट्या कशा पाडाव्यात, ह्यांचे तंत्र अवगत करून घ्यावे लागते. गोलंदाजीचे द्रुतगती (फास्ट), मध्यमगती (मेडियम पेस) व मंदगती (स्लो) असे सर्वसामान्य प्रकार असतात. द्रुतगती गोलंदाजीचे यष्टीच्याकडे वा आत घुसणारा चेंडू (इनस्विंगर) व यष्टीबाहेर जाणारा चेंडू (आउटस्विंगर) असे प्रकार असून, ते बोटांची विशिष्ट पकड व चेंडू सोडताना त्याला दिलेली विशिष्ट दिशा ह्यांवर अवलंबून असतात. हे स्विंग नव्या चेंडूवरच होतात. उजव्या हाती गोलंदाजाच्या मंदगती गोलंदाजीत आंतरफिरकी किंवा उजवी फिरकी (ऑफ स्पिन) व बाह्यफिरकी किंवा डावी फिरकी (लेग स्पिन) असे दोन प्रकार असतात. ते चेंडूची शिवण (सीम) अनुक्रमे उभी वा आडवी धरून तसेच चेंडूस उजवीकडे फिरत देऊन (ऑफ स्पिन ब्रेक) वा डावीकडे फिरत देऊन (लेग स्पिन ब्रेक) व चेंडूला हवेत विशिष्ट उंची देऊन टाकतात. यातील डावी फिरकी टाकताना मनगट पिळवटून पंजाच्या मागील बाजूने चेंडू टाकल्यास ती उजवी फिरकी होते, त्यास ‘गुगली’ चेंडू म्हणतात. हा फसवा असतो, त्यामुळे खेळण्यास विशेष अवघड असतो. डावखोरा गोलंदाज मंदगती गोलंदाजी करताना काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांचा अवलंब करतो : ‘नॅचरल स्पिन’ हा चेंडू उजव्या हाती फलंदाजाला लेग ब्रेक होतो. ‘चायनामन’ हा चेंडू उजव्या हाती फलंदाजाला ऑफ ब्रेक होतो. ‘गुगली’ हा चेंडू उजव्या हाती फलंदाजासमोर पडून वळून बाहेर जात असतो. ‘आर्मर’ हा चेंडू जोरात आत म्हणजे उजव्या हाती फलंदाजाकडे घुसत असतो. हे त्यांपैकी काही प्रकार होत. गोलंदाजास चेंडूला चांगला टप्पा (गुड लेंग्थ) व विशिष्ट उंची (फ्लाइट) देणे, वेग वा फिरकी ह्यांवर चांगली हुकमत ठेवणे आवश्यक असते. फलंदाजाला फसवून त्याची यष्टी टिपणे किंवा त्याला झेलबाद करणे, हे गोलंदाजाचे प्रमुख उद्दिष्ट असले, तरी वेळप्रसंगी संघाच्या गरजेनुसार प्रतिपक्षाच्या धावा रोखणे, हे त्याचे दुय्यम उद्दिष्ट असते. एखाद्या षट्कात (किंवा अष्टकात) एकही धाव झाली नाही, तर त्याला निर्धाव षट्क (अष्टक) म्हणतात. गोलंदाजाचे यश चपळ व जागरूक क्षेत्ररक्षणावर अवलंबून असते. तसेच विशिष्ट प्रकारच्या गोलंदाजीसाठी विशिष्ट क्षेत्ररचना आवश्यक असते व त्यासाठी गोलंदाज कप्तानाच्या मदतीने यथायोग्य क्षेत्ररचना करवून घेतो.
क्षेत्ररक्षण : फलंदाजांनी मारलेले चेंडू अडवून शक्य तो त्यांना धाव घेऊ न देणे, अडविलेला चेंडू योग्य त्या यष्ट्यांकडे अचूकपणे फेकून फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याने टोलविलेला चेंडू वरचेवर झेलून त्याला झेलबाद करणे, चेंडू अडविण्यासाठी जलद धावणे, एकाच हालचालीत चेंडू अडवून व उचलून तो झटकन योग्य विकेटकडे फेकणे इ. गोष्टी प्रत्येक खेळाडूने आत्मसात कराव्या लागतात. चेंडूचा झेल डाव्या वा उजव्या बाजूस झुकून, पुढे वा मागे झेप टाकून, उंच उडी मारून वा जमिनीसरपट सूर मारून तसेच झेलाच्या दिशेने धावत जाऊन घेता आला पाहिजे व त्यासाठी क्षेत्ररक्षक चपळ व जागरूक असला पाहिजे. त्यासाठी गोलंदाजाने चेंडू टाकण्यास सुरुवात केल्यापासूनच दूरच्या क्षेत्ररक्षकांस सावधपणे पुढे चालत जावे लागते व जवळच्या क्षेत्ररक्षकांनी झेल घेण्याच्या तयारीत वाकून उभे राहावे लागते.
यष्टिरक्षण : प्रत्येक संघात एक खेळाडू खास यष्टिरक्षक म्हणूनच निवडलेला असतो. तो यष्ट्यांमागे काही अंतरावर उभे राहून यष्ट्यांमागे येणारे चेंडू अडवितो वा झेल घेतो. तो सर्व क्षेत्ररक्षणाच्या केंद्रस्थानी असतो. त्याची नजर तीक्ष्ण आणि हालचाल सहजसुलभ व चपळ असावी लागते. द्रुतगती गोलंदाजीच्या वेळी साधारणतः आठ ते दहा पावले अंतरावर उभे राहून तो यष्टिरक्षण करतो कारण त्याच्याकडे चेंडू वा झेल अत्यंत जलदपणे येत असतात. मंदगती गोलंदाजीच्या वेळी यष्ट्यांलगत उभे राहून व चपळतेने चेंडू पकडून फलंदाजास शक्य तो यष्टिबाद करण्याकडे त्यास अवधान पुरवावे लागते. यष्टिरक्षक व मंदगती गोलंदाज ह्यांच्यातील परस्परसमज व युती संघास फायदेशीर ठरते.
कप्तानपद : संघाचा कप्तान हा अनुभवी, खेळातील डावपेच जाणणारा, खेळाची सर्व अंगे अवगत असलेला असा उत्कृष्ट खेळाडू असावा लागतो. तसेच समयोचित व त्वरित निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी लागते. नाणेफेक जिंकल्यास फलंदाजी वा गोलंदाजी ह्यासंबंधीचा अचूक निर्णय घेणे, क्षेत्ररक्षकांची गोलंदाजीच्या प्रकारानुसार योजना करणे, गोलंदाजीत योग्य वेळी योग्य तो बदल करणे, योग्य वेळी डाव घोषित करणे, कुशल डावपेज योजून प्रतिपक्षावर मात करणे, संघातील खेळाडूंमध्ये संघवृत्ती निर्माण करून त्यांच्या व्यक्तिगत कौशल्यांचा व सांघिक शक्तीचा फायदा करून घेणे, तसेच संघातील खेळाडूंना उत्तेजन आणि मार्गदर्शन देणे इ. बाबींमध्ये तो जाणकार आणि पारंगत असावा लागतो.
क्रिकेटचा इतिहास :पूर्वेतिहास : क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. इंग्लिश लोकांनी हा खेळ सुरू केला व त्याचा विकासही घडवून आणला. क्रिकेट हा शब्द ‘cryce’ अथवा ‘creag’ (बाकदार काठी ही प्रारंभी बॅटऐवजी वापरीत) ह्या सॅक्सन शब्दापासून तयार झाला, असे प्रख्यात शब्दाकोशकार डॉ. जॉन्सन म्हणतो. तसेच ‘criquet’ ह्या फ्रेंच शब्दावरून किंवा ‘croquet’ ह्या क्रीडासंज्ञेवरून ‘cricket’ हा शब्द फळी ह्या अर्थी पूर्वीच्या चेंडूफळीच्या खेळात रूढ असावा. तेराव्या शतकाच्या मध्यकाळात चेंडूफळीचा खेळ प्राथमिक स्वरूपात अस्तित्वात असल्याचे उल्लेख आढळतात. ह्या काळातील Chroniqued’ Angleterre depuis Ethelberd jusqu’ a Hen. III ह्या पुस्तकात चेंडूफळी खेळणाऱ्या दोन व्यक्तींचे चित्र आढळते. पहिल्या एडवर्डच्या कारकीर्दीत १३०० च्या सुमारास ‘creag’ अशा संज्ञेने क्रिकेटचा संदिग्ध उल्लेख आढळतो. १५५० च्या सुमारास गिल्डफर्डच्या विद्यालयातील मुले क्रिकेट खेळत असल्याचे संदर्भ सापडतात. जॉन फ्लॉरिओच्या १५९५ मधील A Worlde of Wordes ह्या इटालियन-इंग्रजी शब्दकोशात क्रिकेटच्या निर्देश आढळतो. १६४६ साली केंटमधील कॉक्सहीथ येथे क्रिकेट सामना झाल्याचा पहिला उल्लेख सापडतो. १७०६ साली केंब्रिजच्या विल्यम गोल्डविनने एक लॅटिन कविता लिहिली, तीत क्रिकेट सामन्याचे संपूर्ण वर्णन दिले आहे. चेंडूफळीच्या अपरिपक्क खेळास क्रिकेटचे सुविहित स्वरूप देण्याचे प्रयत्न अठराव्या शतकात पहिल्यांदाच झाले. १७१० पासून केंब्रिज विद्यापीठात क्रिकेट खेळले जाऊ लागले. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम प्रथम तयार केले गेले. १८ जून १७४४ रोजी केंट व ऑल इंग्लंड असा सामना झाला. त्याचे संपूर्ण धावपत्रक उपलब्ध आहे. १७८७ मध्ये ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’ची (एम्.सी.सी.) स्थापना झाली. या संस्थेने क्रिकेटच्या नियमावलीत सुधारणा घडवून आणल्या. तेव्हापासून हीच संस्था क्रिकेटचे नियमन व नियंत्रण करते.
क्रिकेटच्या खेळात अनेक स्थित्यंतरे व बदल होत जाऊन त्यास सध्याचे आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. फळा-फळकुटांच्या खेळातूनच आजच्या क्रिकेटचे स्वरूप सिद्ध झाले. प्रारंभी एक साधी काठी बॅट म्हणून वापरीत. नंतर ती करेलाजोडीच्या आकाराची बनली. पुढे जरा वाकडी, नंतर जाड दांडा असलेल्या फळीची, त्यानंतर वेताची पाचरी मूठ असलेली विलो लाकडाची बॅट अशा प्रकारचे बदल होत सध्याची बॅट अस्तित्त्वात आली. पूर्वी एखाद्या झाडाचा बुंधा यष्टी म्हणून वापरीत. पुढे दोन काठ्यांच्या, नंतर तीन काठ्यांच्या व त्यातून सध्याच्या यष्ट्या अस्तित्त्वात आल्या. चेंडूही प्रारंभी लाकडी ठोकळ्याचा असे. पुढे त्याचा आकार वाटोळा झाला. नंतर त्याच बूच, रबर, कातडे ह्यांचा वापर करण्यात येऊन त्यास प्रचलित स्वरूप प्राप्त झाले.
क्रिकेटच्या प्रगतीस ‘हँबल्डन क्लब’, ‘व्हाइट काँड्यूट क्लब’, ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’ ह्या संस्थांचा तसेच टॉमस लॉर्ड, विंचेल्सीचा आठवा अर्ल, रिचमंडचा चौथा ड्यूक, विल्यम निकल्सन आदी प्रमुख व्यक्तींचा हातभार लागून त्यास आजचे नियमबद्ध व सुसूत्र स्वरूप प्राप्त झाले.
क्रिकेटचा प्रसार : ब्रिटिश सैनिक व अधिकारी ह्यांच्या द्वारे क्रिकेटचा खेळ ब्रिटिश वसाहतींत पसरला व लोकप्रिय झाला. अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटीश लोक ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले व अल्पावधीतच तेथे क्रिकेट खेळले जाऊ लागले. १८३२ सालापासूनच तेथे क्रिकेटचे क्लब स्थापन होऊ लागले, त्या वर्षी ‘होबार्ट टाउन क्लब’ हा ऑस्ट्रेलियातील पहिला क्लब अस्तित्त्वात आला आणि १८३८ साली ‘मेलबर्न क्रिकेट क्लब’ ची स्थापना झाली. १८५६ साली मेलबर्न येथे व्हिक्टोरिया व न्यू साउथ वेल्स ह्या संघांत पहिला अधिकृत सामना खेळला गेला. १८०८ साली केपटाउन (द. आफ्रिका) येथे क्रिकेटचा सामना झाल्याचा उल्लेख आढळतो. १८४० नंतर इंग्रज लोक दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले व १८४३ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे व १८५५ मध्ये ब्लूमफाँटेन येथे क्रिकेट क्लब स्थापन झाले. ब्रिटिश फौजांबरोबर वेस्ट इंडीज बेटांतही हा खेळ गेला. १८४२ च्या सुमारास त्रिनिदाद बेटात पहिला क्रिकेट क्लब स्थापन झाला आणि इतर बेटांतही क्रिकेटचा भराभर प्रसार होत गेला. १८६५ च्या फेब्रुवारीत बार्बेडोस व ब्रिटिश गियाना ह्या संघांत पहिला प्रातिनिधिक सामना खेळला गेला. १८४० पासून न्यूझीलंडमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. डनीडन व वेलिंग्टन येथे १८४८ मध्ये पहिल्या क्रिकेट संस्था स्थापन झाल्या आणि १८६० साली वेलिंग्टन व ऑक्लंड ह्या दोन संघांत न्यूझीलंडमधील पहिला प्रतिनिधिक सामना खेळला गेला. भारताची १९४७ साली फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये स्वतंत्रपणे क्रिकेट खेळण्यास येऊ लागले. पाकने कराची येथे स्थापन केलेल्या मध्यवर्ती क्रिकेट नियामक मंडळाला १९५२ साली अधिकृत मान्यता लाभली. पाकचा पहिला अधिकृत दौरा १९५२ साली भारतात झाला. श्रीलंका, फिजी बेटे, अमेरिका, बर्म्यूडा, हॉलंड, डेन्मार्क, पूर्व आफ्रिका, ऱ्होडेशिया, मलेशिया, कॅनडा, जिब्राल्टर, हाँगकाँग इ. ठिकाणी हल्ली क्रिकेटची आवड वाढत आहे.
भारतीय क्रिकेट : ब्रिटिश लोक व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले व येताना त्यांनी क्रिकेटचा खेळही बरोबर आणला. त्यांच्या फौजेतील सैनिक करमणूक म्हणून क्रिकेट खेळत. खंबायत येथे १७२१ साली ईस्ट इंडिया कंपनीचे खलाशी क्रिकेट खेळत असल्याचा उल्लेख सापडतो. कलकत्ता क्रिकेट क्लबचा बरॅकपूर व डमडम बरोबर १७९२ मध्ये सामना झाला. ह्या सामन्याच्या पूर्वीपासूनच कलकत्ता क्रिकेट क्लब अस्तित्वात होता. जगातील सर्वांत जुना असा हा दुसरा क्रिकेट क्लब. मुंबईत १७९७ सालापासून क्रिकेट चालू झाले. भारतीय लोक साधारण १८४० पासून क्रिकेटमध्ये रस घेऊ लागले व खेळात भागही घेऊ लागले. मद्रास क्रिकेट क्लबची स्थापना १८४६ मध्ये झाली. मुंबईमध्ये १८४८ साली प्रथम पारशांनी, नंतर १८६६ साली हिंदूंनी व १८८३ साली मुस्लिमांनी आपापले क्रिकेट क्लब स्थापन केले. पारशांनी १८८६ व १८८८ साली आपले संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर धाडले. भारताबाहेर जाणारे हे पहिलेच संघ होत. भारताच्या दौऱ्यावर १८८९ आणि १८९२ मध्ये दोन इंग्लिश संघ येऊन गेले. खास भारतीय खेळाडूंचा पहिला प्रातिनिधिक संघ पतियाळाच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली १९११ मध्ये इंग्लंडला गेला. भारतात १८९२ पासून क्रिकेटची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा पहिल्यांदा सुरू झाली. तीत पारशी व यूरोपीय संघांत प्रतिवर्षी सामने होत. ह्या सामन्यांना ‘दुरंगी’ अथवा ‘प्रेसिडेन्सी’ सामने म्हणत. हे सामने १९०६ सालापर्यंत चालू होते. पुढे १९०७ साली त्यात हिदूंचा संघ येऊन सामील झाल्याने त्या वार्षिक लढतीला ‘तिरंगी’ सामने हे नाव पडले आणि १९१२ मध्ये मुस्लिम संघ या लढतीत उतरल्याने त्याला ‘चौरंगी’ सामन्यांचे स्वरूप प्राप्त झाले. चौरंगी सामने १९३६ पर्यंत चालू होते. त्यात १९३७ मध्ये ख्रिश्चन संघाची भर पडून ‘पंचरंगी’ सामने सुरू झाले. तथापि अशा सामन्यामुळे जातीय वृत्ती वाढण्याची शक्यता वाटल्याने १९४७ पासून हे पंचरंगी सामने बंद पडले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना १९२८ मध्ये झाली. राष्ट्रीय विजेतेपदासाठी १९३४ पासून सुरू झालेल्या ‘रणजी ट्रॉफी’ सामन्यांमुळे भारतीय क्रिकेटला सुसंघटित स्वरूप प्राप्त झाले.
महाराष्ट्रातील क्रिकेटचा प्रसार मुंबईत ह्या खेळाची सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने होऊ लागला. पुण्यात यूरोपीय क्लबची स्थापना इंग्रज सेनाधिकाऱ्यांनी केली होती. तथापि ह्या खेळापासून स्थानिक लोक दूरच असत. न्यू इंग्लिश स्कूलच्या कबुतरखान्यात १८९० च्या सुमारास स्थानिक क्रीडाप्रेमी लोकांनी ‘यंग मेन्स क्रिकेट क्लब’ची स्थापना केली व त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र क्रिकेट फैलावले. यंग मेन्स क्रिकेट क्लबचे यूरोपीय क्लबशी दरवर्षी सामने होत. त्यावेळी शाळा व महाविद्यालये सकाळची भरविण्यात येत. त्यामुळे तरुण मंडळीत क्रिकेटची आवड वाढण्यास मदत झाली. काही विद्यार्थ्यांनी १८९८ साली ‘’तपस्वी क्लब’ नावाचा क्रिकेट संघ काढला. तपस्वी क्लबचे १९०० साली ‘द पूना यंग क्रिकेट क्लब’ मध्ये रूपांतर झाले व पुढे सहा-सात वर्षांनी त्याच क्लबचे रूपांतर ‘पी. वाय्. सी. हिंदू जिमखाना’ यात झाले. पूना यंग क्रिकेट क्लबचे खेळाडू १९०४ पासून बाहेरगावी जाऊन सामने खेळत. त्यानंतर पुण्यात डेक्कन जिमखान्याची स्थापना झाली. महाविद्यालयांतूनही ‘नॉर्थ कोट चॅलेंज शील्ड’ चे सामने होत असल्याने महाराष्ट्रातील क्रिकेट झपाट्याने वाढीस लागले. ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ ची स्थापना १९३४ साली करण्यात आली व त्यामुळे महाराष्ट्रीय क्रिकेटला सुविहित स्वरूप प्राप्त झाले. या संस्थेचे संस्थापक श्री. तालीम, मकरंद भावे आणि प्रा. देवधर हे होते. महाराष्ट्र संघाने १९३९-४० व १९४०-४१ ह्या दोन्ही वर्षी रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळविले.
कसोटी सामन्यांची परंपरा : प्रारंभीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्येच होत असत. या दोन राष्ट्रांच्या प्रातिनिधिक संघांतील पहिला सामना १८७७ साली ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर झाला. हीच कसोटी सामन्यांची सुरुवात. नंतर १९०९ मध्ये ‘शाही क्रिकेट मंडळ’ (इंपीरियल क्रिकेट कॉन्फरन्स सध्याची इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स) स्थापन झाले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका ही राष्ट्रे त्याची सदस्य होती व त्यांच्या प्रातिनिधिक संघांत कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली. पुढे १९२६ मध्ये वेस्ट इंडीज, न्यूझीलंड व भारत ह्या मंडळाचे सभासद झाले व १९५२ मध्ये पाकिस्तानही त्याचे सदस्य बनले. ह्याच सात राष्ट्रांतील प्रातिनिधिक संघांत आळीपाळीने कसोटी सामने खेळले जातात. १९६१ मध्ये दक्षिण आफ्रिका राष्ट्रकुलातून फुटून निघाल्यामुळे व त्या देशात वर्णभेदाचे धोरण असल्याने त्या संघावर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांनी सध्या बहिष्कार टाकला आहे. भारताचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध १९३२ साली लंडन येथे लॉर्ड्स मैदानावर झाला. गेल्या. पाउणशे वर्षांतील कसोटी सामन्यांच्या इतिहासात सुरुवातीला इंग्लंड व ऑस्ट्रेलिया ही राष्ट्रे भारी गणली जात. पुढे वेस्ट इंडीजचा संघ त्यांना तुल्यबळ असा झाला. तसेच द. आफ्रिका संघही त्यांच्या बरोबरीचा ठरला. १९७१ च्या वेस्ट इंडीजच्या व इंग्लंडच्या दौऱ्यांतील भारतीय संघाची विजयी कामगिरी पाहता, भारतही ह्या खेळात आघाडीवर असल्याचे चित्र काही काळ दिसले. तथापि १९७४ साली इंग्लंडने व १९७५ साली वेस्ट इंडीजने भारतावर मात करून क्रिकेट-क्षेत्रात आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. क्रिकेटमध्ये असे चढउतार नेहमीच होत असतात.
क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय दौऱ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. अशा दौऱ्यांमध्ये तीन ते पाच (कधी सहाही) कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाते. प्रत्येक कसोटी सामना पाच दिवसांचा असतो व प्रत्येक दिवशी साडेपाच किंवा सहा तास खेळ चालतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर एक दिवस विश्रांतीचा असतो. अशा कसोटी सामन्यांत दोन राष्ट्रांमध्ये चुरशीची लढत होते. सामन्याचा निर्णय बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असल्याने त्यामध्ये बरीच रंगत असते.
कसोटी सामन्यांच्या इतिहासात आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण जागतिक विक्रम नोंदले गेले आहेत. कसोटी सामान्यात एका संघाने एका डावात केलेल्या जास्तीत जास्त धावा ७ बाद ९०३ असून त्या इंग्लंडने केल्या आहेत. एका डावाची सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या (नाबाद ३६५) वेस्ट इंडीजच्या गारफिल्ड सोबर्सच्या नावावर आहे. सर्वाधिक शतके (२९) ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनने केली आहेत. जास्तीत जास्त फलंदाज बाद करण्याचा विक्रम इंग्लंडच्या ट्रूमनच्या नावावर असून त्याने एकूण ३०७ बळी घेतले आहेत. एका डावातील दहा फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी इंग्लंडच्या जिम लेकरने केली आहे. इंग्लंडच्या कॉलीन कौड्रीने आपल्या कारकीर्दीत एकूण ११७ झेल घेऊन विक्रम केला आहे. यष्टिरक्षणाच्या बाबतीत इंग्लंडच्या इव्हान्सने २१९ खेळाडूंना यष्टीमागून बाद करून उच्चांक गाठला आहे.
कसोटी सामन्यांखेरीज निरनिराळ्या देशांत राष्ट्रीय पातळीवर प्रथम दर्जाचे सामने खेळले जातात. त्यांत इंग्लंडमधील निरनिराळ्या परगण्यांमध्ये खेळले जाणारे ‘कौंटी लीग’ सामने, ऑस्ट्रेलियातील ‘शेफील्ड शील्ड’ सामने, द. आफ्रिकेतील ‘करी कप’ स्पर्धा, वेस्ट इंडीजमधील ‘शेल शील्ड’ स्पर्धा, न्यूझीलंडमधील ‘प्लंकेट शील्ड’ सामने तसेच पाकिस्तानमधील ‘काइद-इ-अझम’ स्पर्धा ह्या उल्लेखनीय आहेत.
भारतातील रणजी करंडक, दुलीप करंडक आणि इराणी चषक ह्या पहिल्या दर्जाच्या प्रमुख स्पर्धा होत. रणजी करंडक सामन्यांत भारताच्या निरनिराळ्या भागांतील प्रमुख संघ भाग घेतात. पंचरंगी सामन्यांची जागा घेण्यासाठी मध्यंतरी विभागीय स्पर्धा सुरू केल्या होत्या. त्यांचेच रूपांतर पुढे दुलीप करंडक स्पर्धांत झाले. हे सामने भारताच्या पश्चिम, पूर्व, मध्य, उत्तर व दक्षिण ह्या पाच विभागांत दरवर्षी होत असतात. त्यांत देशातील उत्तमोत्तम खेळाडू एकत्र येऊन खेळतात. याखेरीज रणजी करंडक विजेता संघ व शेष भारत संघ यांच्यात प्रतिवर्षी इराणी चषकासाठी एक सामना आयोजित केला जातो. तसेच आतंरविद्यापीठीय पातळीवर रोहिंग्टन बारिआ आणि विझी करंडक व शालेय पातळीवर कुचबिहार करंडक व सी. के. नायडू करंडक ह्या स्पर्धा घेतल्या जातात.
जागतिक अजिंक्यपदाचे सामने : फूटबॉल आणि हॉकी या खेळाचे जागतिक अजिंक्यपदाचे सामने लोकप्रिय ठरले आहेत. तथापि १९७४ पर्यंत क्रिकेटमध्ये अशा तऱ्हेची स्वतंत्र स्पर्धा नव्हती. इंग्लंडमध्ये १९७५ च्या जून महिन्यात जागतिक अजिंक्यपदासाठी प्रथमच स्पर्धा भरविण्यात आली. ही स्पर्धा प्रुडेन्शियल ट्रॉफीसाठी झाली. तीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका व पूर्व आफ्रिका ह्या आठ देशांच्या संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील सामने एकेक दिवसांचे व ६०-६० षट्कांचे होते. या स्पर्धेमध्ये वेस्ट इंडीजचा संघ विजेता ठरला. या सामन्यांना अद्याप कसोटी सामन्याचा दर्जा लाभलेला नाही.
काही प्रख्यात खेळाडू : ह्या खेळात फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण, क्षेत्ररक्षण, नेतृत्व आदी अंगांचा समावेश होत असल्याने उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज, कुशल यष्टिरक्षक, चतुरस्र कप्तान, उत्तम क्षेत्ररक्षक व अष्टपैलू खेळाडू अशा विविध प्रकारांत प्रवीण असलेले क्रिकेटपटू निरनिराळ्या राष्ट्रांमधून निर्माण झाले आहेत. इंग्लंडचे डॉ. डब्ल्यू. जी. ग्रेस, टॉम हेवर्ड, मॅक्लॅरन, जॉर्ज जेसप, विल्फ्रेड ऱ्होडस, जे. टिल्डस्ले, फ्रँक वुली, पॅटसी हेंड्रेन, सर जॅक हॉब्ज, हर्बर्ट सटक्लिफ, हॅमंड, लेलँड, वॉशब्रुक, हटन, कॉम्पटन, हार्डस्टाफ, मे, कौड्री, डेक्स्टर, बॅरिंग्टन, ग्रेव्हनी, बायकॉट, एड्रिच, कीथ फ्लेचर, डेनिस एमिस इ. उत्कृष्ट फलंदाज लोहमान, सिडनी बार्न्स, टॉम रिचर्ड्सन, ब्लाइद, हेडली व्हेरिटी, लारवूड, एम्. डब्ल्यू. टेट, राइट, बेडसर, लॉक, लेकर, ट्रूमन, स्टॅथॅम, टायसन, स्नो, अर्नोल्ड, अंडरवूड इ. उत्तम गोलंदाज व विल्फ्रेड ऱ्होडस, फ्रँक वुली, टेट, हॅमंड, ट्रेव्हर बेली, डॉलिव्हिएरा, इलिंगवर्थ, टोनी ग्रेग इ. श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होत. ऑस्ट्रेलियात एस्. ई. ग्रेगोरी, चार्ली मॅकार्टनी, व्हिक्टर ट्रंपर, हिल, बार्डस्ले, डॉन ब्रॅडमन, पॉन्सफोर्ड, मॅकॅब, वुडफुल, हॅसेट, मॉरिस, बार्न्स, मिलर, हार्वे, ओनील, बॉबी सिंप्सन, लॉरी, स्टॅकपोल, वॉल्टर्स, चॅपेल बंधू इ. फलंदाज स्पॉफोर्थ, नोबेल, जे. एम्. ग्रेगोरी, एच्. ट्रंबल, आर्थर मेली, ओरेली, ग्रिमेट, लिंडवॉल, जॉन्सन, डेव्हिडसन, ग्लीसन, मॅकेंझी, लिली, थॉमसन इ. गोलंदाज व आर्मस्ट्राँग, कीथ मिलर, डेव्हिडसन, रिची बेनॉ इ. अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. वेस्ट इंडीजचे कॉन्स्टंटाइन, हेडली, स्टॉलमेयर, वॉरेल, वीक्स, वॉलकॉट, सोबर्स, कन्हाय, बूचर, हंट, नर्स, लॉईड, लॉरेन्स रो, कालीचरण इ. फलंदाज गोमेझ, रामाधीन, व्हॅलेंटाइन, गिल्खिस्ट, हॉल, ग्रिफिथ, सोबर्स, गिब्ज, हॉल्फोर्ड, रॉबर्ट्स इ. गोलंदाज आणि कॉन्स्टंटाइन, वॉरेल, सोबर्स इ. अष्टपैलू खेळाडू प्रसिद्ध होत. दक्षिण आफ्रिकेमध्ये ए. डी. नोर्स, फॉक्नर, एच्. टेलर, कॅटरॉल, धाकटा डडले नोर्स, एरिक रोवन, एन्डीन, मॅक्लीन, वेट, मॅग्ल्यू, ट्रेव्हर गोडार्ड, पॉलक, बार्लो, बॅरी रिचर्ड्स इ. फलंदाज फॉक्नर, व्हिन्सेंट, ॲडकॉक, गोडार्ड, टेफिल्ड, पीटर पॉलक, माइक प्रॉक्टर इ. अष्टपैलू खेळाडू होत. न्यूझीलंडमधील प्रख्यात खेळाडूंमध्ये सी. एस्. डेंप्स्टर, डब्ल्यू. ए. हॅडली, एम्. पी. डॉनेली, बर्ट सटक्लिफ, डाऊलिंग, काँग्डन, टर्नर, बर्जेस इ. फलंदाज मॅक्गीबन, मॉट्झ, ब्रूस टेलर, बॉब क्यूनीस इ. गोलंदाज आणि जॉन रीड, बेव्हन काँग्डन इ. अष्टपैलू खेळाडू ह्यांचा अंतर्भाव होतो. पाकिस्तानमधील अब्दुल हाफिज करदार, नाझर महमद, हनिफ महमद, इम्तियाझ अहमद, अलिमुद्दीन, जावेद बर्की, मकसूद अहमद, वझीर महमद, वकार हसन, मुश्ताक महमद, असिफ इक्बाल, सईद अहमद, सादिक महमद, झहीर अब्बास इ, फलंदाज खान महमद, महमद हुसेन, फाजल महमद, नसीमुल घनी, परवेझ सज्जद, इंतिखाब आलम, असिफ मसूद इ. गोलंदाज व सईद अहमद, मुश्ताक महमद, असिफ इक्बाल इ. अष्टपैलू खेळाडू नावाजलेले आहेत.
भारतीय खेळाडू : भारतात कसोटी सामने न खेळलेले तथापि श्रेष्ठ दर्जाचे काही खेळाडू होऊन गेले आहेत. त्यांत प्रा. देवधर, पी. विठ्ठल, डॉ. कांगा, डॉ. पावरी इ. फलंदाज आणि पी. बाळू, एस्. एम्. जोशी, गोडांबे, वझिफ्दार, चंदाराणा इ. गोलंदाज उल्लेखनीय आहेत. कसोटीवीरांमध्ये रणजितसिंहजी, दुलीपसिंहजी, इफ्तीखार अली पतौडी (हे इंग्लंडतर्फे खेळले), सी. के. नायडू, नवले, नवमल, वझीर अली, अमरनाथ, मुश्ताक अली, विजय मर्चंट, विजय हजारे, रूसी मोदी, हेमू अधिकारी, पॉली उम्रीगर, मांजरेकर, रॉय, चंदू बोर्डे, नरी कॉन्ट्रॅक्टर, जयसिंह, सरदेसाई, अजित वाडेकर, मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावसकर, विश्वनाथ इ. फलंदाज महमद निस्सार, अमरसिंग, सी. एस्. नायडू, शुटे बानर्जी, सदू शिंदे, फडकर, विनू मन्कड, जेसू पटेल, गुलाम अहमद, सुभाष गुप्ते, बापू नाडकर्णी, रमाकांत देसाई, दुराणी, चंद्रशेखर, प्रसन्ना, वेंकटराघवन, बेदी इ. गोलंदाज व हजारे, अमरनाथ, मन्कड, फडकर, उम्रीगर, रामचंद, नाडकर्णी, बोर्डे, सलीम दुराणी, सुरती, सोळकर, अबीद अली इ. अष्टपैलू खेळाडू प्रख्यात आहेत. फरूक इंजिनियर हा जागतिक दर्जाचा यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून मान्यता पावला आहे. भारतामध्ये उत्तमोत्तम खेळाडूंचा गुणगौरव करण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण ह्यांसारखे किताब व अर्जुन पुरस्कारांसारखी पारितोषिके दिली जातात. आजपावेतो सी. के. नायडू, विजयनगरम्चे महाराज व विनू मन्कड ह्यांना पद्मभूषण आणि विजय हजारे, जेसू पटेल, पॉली उम्रीगर, नरी कॉन्ट्रॅक्टर, मुश्ताक अली, एम्. जे. गोपालन्, प्रा. दि. ब. देवधर, मन्सूर अली खान पतौडी, चंदू बोर्डे, बिशनसिंग बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, विश्वनाथ, फरुक इंजिनियर आणि वाडेकर ह्या खेळाडूंना पद्मश्री हे किताब देण्यात आले आहेत. अर्जुन पारितोषिकांच्या मानकऱ्यांत सलीम दुराणी, मन्सूर अली खान पतौडी, विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, वाडेकर, प्रसन्ना, बिशनसिंग बेदी व सरदेसाई ह्यांचा समावेश होतो.
शालेय क्रिकेट : शालेय पातळीवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे आयोजित केले जातात. तथापि त्यांना अजून तितकेसे पद्धतशीर स्वरूप प्राप्त झालेले नाही. आजवर फक्त इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका ह्या देशांनीच असे दौरे आखले आहेत. क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी शालेय पातळीपासूनच प्रयत्न करावेत, तसेच भावी काळात उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत, ह्या दृष्टींनी शालेय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय दौरे योजले जातात. भारताने शालेय पातळीवरील दौऱ्यांचे महत्त्व पुरेपुर जाणून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका या देशांच्या शालेय संघांचे दौरे आयोजित करण्याच्या कामी आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांत आपले शालेय संघ पाठविण्याच्या कामी पुढाकार घेतला आहे. त्यातून आतापर्यंत भारतास उत्तमोत्तम खेळाडूंचा लाभही झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेमधील शाळांचा एक संयुक्त संघ १९६३ साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. अधिकृत कसोटी सामन्यांचा दर्जा लाभलेल्या दोन देशांचा शालेय पातळीवरील हा पहिलाच दौरा. बॅरी रीचर्ड्स व माईक प्रॉक्टर हे द. आफ्रिकेचे प्रख्यात कसोटी खेळाडू ह्या दौऱ्यातूनच पुढे आले. तदनंतर एम्. सी. सी. शालेय संघाचा दौरा १९६५-६६ च्या हंगामात द. आफ्रिकेत गेला होता. भारतात १९६५ साली लंडनमधील शाळांचा एक संयुक्त संघ दौऱ्यावर आला होता. ह्याच दौऱ्यात भारताकडून सुनील गावसकर आणि एकनाथ सोळकर हे प्रख्यात कसोटी खेळाडू प्रथम चमकले. ह्याच लंडन शालेय संघाने पुढे श्रीलंकेचाही दौरा केला. भारतीय शाळांचा संयुक्त संघ १९६७ मध्ये अजित नाईकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. भारतीय शालेय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा. इंग्लंडच्या संयुक्त शालेय संघाने १९७०-७१ च्या हंगामात भारताला भेट दिली. इंग्लंडमधील सर्व शाळांचा भारतात येत असलेला हा पहिलाच प्रातिनिधिक संघ. त्यानंतर १९७३ च्या जुलै महिन्यात भारतीय शालेय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा गेला. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानही दौऱ्यांची देवाणघेवाण झाली आहे. ऑस्ट्रेलियन शाळांचा संयुक्त संघ १९६६-६७ मध्ये जे. एस्. आर. ह्यूमन ह्याच्या नेतृत्वाखाली भारतात आला. ह्या संघातील के. जे. ओकीफ हा अष्टपैलू खेळाडू पुढे ऑस्ट्रेलियाचा कसोटी खेळाडू झाला. नंतर १९६७-६८ च्या हंगामात, अखिल भारतीय शालेय संघाने ऑस्ट्रेलियाला परत भेट दिली. पुढे श्रीलंकेच्या शाळांचा एक संयुक्त संघही भारताच्या दौऱ्यावर येऊन गेला. शालेय संघांच्या ह्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळेही भारतातील क्रिकेटच्या विकासास व लोकप्रियतेस हातभार लागला आहे.
महिला क्रिकेट : इंग्लंडमधील स्त्रिया १७४५ सालापासून क्रिकेट खेळत असल्याचे दाखले सापडतात. १९०० च्या सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियातही महिला क्रिकेट खेळू लागल्या. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया महिला संघांतील पहिला कसोटी सामना १९३४-३५ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. त्या मालिकेत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने इंग्लंडने जिंकले व एक अनिर्णित राहिला. १९५८ साली महिलांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अस्तित्वात आली. १९७३ साली इंग्लंडमध्ये विविध देशांतील महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले.
भारतामध्ये १९७२-७३ सालापासून महिला क्रिकेट खेळू लागल्या. भारतीय स्तरावर एक नियामक मंडळ स्थापण्यात येऊन पहिली आंतरराज्य स्पर्धा पुण्याला झाली. त्यानंतर १९७५ च्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघ भारताच्या दौऱ्यावर आला. भारतीय महिलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कसोटी सामने ह्याच दौऱ्यात प्रथम झाले. पुणे, दिल्ली व कलकत्ता या ठिकाणी तीन कसोटी सामने झाले व ते अनिर्णित राहिले.
खेळाची लोकप्रियता व महत्त्व : क्रिकेटचा खेळ हा बराचसा बेभरवशाच्या स्वरूपाचा आहे. त्यात जयापजयाचे पारडे एकसारखे खालीवर होत असते. कित्येकदा भरवशाचे फलंदाज एकामागून एक पटापट बाद होतात, तर अनपेक्षितपणे काही फलंदाज धावसंख्या वाढवत नेतात. गोलंदाजाच्या बाबतीतही ह्याच अनिश्चिततेचा अनुभव येतो. ह्या अद्भुतरम्य अनिश्चिततेमुळे या खेळास विलक्षण लोकप्रियता लाभली आहे. क्रिकेट सामन्यातील धावांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र धावानोंदणीकार असतो. तसेच प्रत्यक्ष खेळ चालू असताना त्याचे नभोवाणीवरून धावते समालोचन केले जाते. त्यामुळे अनेक क्रिकेट शौकीन घरबसल्या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकतात. क्रिकेच्या समालोचकांत इंग्लंडचे जॉन ऑर्लाट, रेक्स आल्स्टन, ब्रायन जॉन्स्टन, जिम स्वाँटन, अँलन गिब्सन, ट्रेव्हर बेली हे नभोवाणी समालोचक व सर नेव्हिल कार्डस हे वृत्तपत्र समीक्षक ऑस्ट्रेलियातील ॲलन मिगलब्री, मायकेल चार्लटन हे नभोवाणीचे व जॅक फिंगल्टन, रे रॉबिन्सन हे वृत्तपत्र समालोचक, दक्षिण आफ्रिकेचे चार्ल्स फॉर्च्यून हे नभोवाणी समालोचक तसेच भारतातील बॉबी तल्यारखान, पिअर्सन सुरीता, बेरी सर्वाधिकारी, विजय मर्चंट, देवराजपुरी हे नभोवाणी समालोचक व के. एन्. प्रभू हे वृत्तपत्र समालोचक जागतिक दर्जाचे होत. हिंदीप्रमाणेच मराठीतूनही क्रिकेट सामन्यांचे धावते समालोचन १९५९ पासून दिले जाते. दूरचित्रवाणीवरही क्रिकेटचे सामने दाखविले जातात. क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यास ह्या गोष्टींचाही हातभार लागला आहे. क्रिकेटच्या खेळात वैयक्तिक कर्तृत्व व सांघिक कर्तृत्व ह्या दोहोंनाही पुरेपूर वाव असतो. तसेच तंत्रकौशल्य व कलात्मकता ह्यांचाही एकसंध आविष्कार ह्या खेळात पाहावयास मिळतो. क्रिकेटमुळे खेळाडूंमध्ये धैर्य, चिकाटी, साहस, लढाऊ वृत्ती, संघभावना आणि क्रीडावृत्ती ह्या गुणांची जोपासना होऊ शकते.
संदर्भ : 1. Bowen, Rowland, Cricket: A History of its Growth and Development Through World, London, 1970.
2. Bradman, D. G. The Art of Cricket, London, 1958.
3. Deodhar, D. B. March of Indian Cricket, Calcutta, 1948.
4. Golesworthy, Maurice, Ed. The Encyclopaedia of Cricket, London, 1962.
5. Marybone Cricket Club, How to play Cricket, London, 1957.
6. Read, W. W. Annals of Cricket, London, 1896.
7. Ross, Gordon, A History of Cricket, London, 1972.
८. देवधर, दि. ब. उत्तम क्रिकेट कसे खेळाल?, किर्लोस्करवाडी, १९५५.
पंडित, बाळ ज.
“