कोरवा : बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळणारी एक अनुसूचित जमात. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या ६६,१०९ होती. त्यांचे अगरिया कोरवा, दांड कोरवा, दिह कोरवा व पहाडी कोरवा असे चार पोटभेद आहेत. रसेल हा मानवंशशास्त्रज्ञ मात्र दिहारिया व पहाडी कोरवा असे दोनच पोटविभाग मानतो. त्यांचे परस्पर विवाहसंबंध होत नाहीत. हे लोक द्रविड वंशाचे असावेत काळा वर्ण, राठ केस, बारीक डोळे, बुटकेपणा ही त्यांची शारीर वैशिष्ट्ये. त्यांच्या स्त्रिया खुजट आणि कुरूप असून कमरेभोवती चिंध्या गुंडाळतात. त्या शेतात काम करतात व जंगलातून कंदमुळे गोळा करतात. अलीकडे ते शेती करू लागले आहेत. पुरुष तीरकमठा बाळगतात. बेताचेच कपडे वापरणारे व बव्हंशी कंदमुळांवर राहणारे कोरवा अल्प प्रमाणात शेती करतात. परंतु गिरिजनात दिसणारी स्वच्छंदी वृत्ती यांच्यात आढळत नाही. कारण शेती करूनही जमिनीची मालकी नाही व वनवासी असूनही निसर्गसंपत्ती उपभोगण्यास जंगलखात्याकडून मनाई अशी त्यांची स्थिती आहे. यांचा भगतल चेरो जमातीचा असल्यामुळे त्याने राजा चांडाल या कोरवांच्या मुख्य देवाचे महत्त्व कमी करून चेरो जमातीच्या देवदेवतांचेच स्तोम वाढविले आहे. एकंदरीत कोरवांचे सांस्कृतिक वैशिष्ट्य हळूहळू लुप्त होत आहे.

कोरवांमध्ये कुरी नावाचे अनेक गट असून ते बहिर्विवाही आहेत परंतु अगदी जवळच्या नात्यात लग्न होऊ शकते. कोरवा लोकांत वंध्यत्व व शारीरिक व्यंग यांचे प्रमाण बरेच आढळते. अतिनिकट नात्यातील लग्नसंबंधाचा परिणाम हेही त्याचे कारण असण्याची शक्यता आहे. देजसाठी लागणारा पैसा जमेपर्यंत पुरुषांचे लग्नाचे वय वाढते. विधवा व प्रौढ बायका शेतमजुरी करून पैसे मिळवितात. अशा बायकांशी लग्न करण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.

कोरवांची बोली मुंडारी भाषेशी साधर्म्य दर्शविते. या लोकांत शासनव्यवस्थेची रीतसर पद्धत नाही. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करूनच सर्व गोष्टी शिकतात. फक्त कर्म नावाचे नृत्य तरुण पिढीला शिकवितात.

संदर्भ : Majumdar, D.N. The Fortunes of Primitive Tribes, Lucknow, 1944.

कीर्तने, सुमति