गदर चळवळ : गदर (गधर) हा पंजाबी शब्द आहे. याचा अर्थ बंड. अमेरिकेतील भारतीयांनी ही चळवळ १९१३ मध्ये उभारली. ⇨खानखोजे  व पं. काशीराम ह्यांनी हरदयाळांच्या पूर्वी पाच वर्षे अमेरिकेत गदरचे कार्य सुरू केले होते. पुढे लाला हरदयाळ व भाई परमानंद यांनी १९१४ मध्ये गदर पक्ष स्थापला.

खानखोजे यांनी टिळकांना भेटून परदेशी प्रयाण केले होते. जपानमध्ये स्फोटक द्रव्यांच्या कृतीचे शिक्षण घेऊन ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मिलिटरी अकॅडमीत दाखल झाले आणि त्यांनी पदविका मिळविली, तेथे सुरेंद्र मोहन, खगेद्रचंद्र, तारकानाथ दास असे अनेक क्रांतिकारक त्यांना भेटले. क्रांतिकारकांचा ‘एल्‌ गदर’ हा पहिला अंक इंग्रजी, हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, गुरूमुखी अशा भाषांत प्रसिद्ध झाला. हिंदी फौजेत आणि लष्करात देशभक्ती निर्माण करण्यावर या चळवळीचा भर होता. चळवळीचे जाळे अमेरिका, सिंगापूर, ब्रह्मदेश, बलुचिस्तान, चीन, इराण, जपान, जर्मनी, जावा, मानिला, शांघाय, हाँगकाँग इ. ठिकाणी पसरले होते. प्रचारक आणि प्रहारक असे त्यांचे दोन विभाग होते. प्रहारक विभाग रेल्वे स्थानके, तारायंत्रे, पोलीस ठाणी, लष्करी केंद्रे यांवर गुप्त रीत्या छापे घालण्याची योजना करी. २१ फेब्रुवारी १९१५ ही बंडाची तारीख ठरली होती. गुप्तहेरांनी योजनेचा धुव्वा उडवला. फिरोजपूर खनिजा लुटीनंतर सातजण फाशी गेले. शेकडोंची धरपकड झाली. लाहोर कटात २४ जणांना फाशीची शिक्षा दिली. रौलट यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रांती चळवळीचा इतिहास तयार करण्याची समिती बसली (१९१८). तीत या चळवळीचा १९१७ पर्यंतचा इतिहास आहे.

केळकर, इंदुमति