पूरुवंश : ऋग्वेदकाली पूरू हे एका आर्यवंशाचे नाव होते (शतपथ ब्राह्मण व वायुपुराण यांनी ‘पूरू’च्या ऐवजी ‘पुरु’ असे म्हटले आहे.) ऋग्वेदात यदू, तुर्वश, द्रुह्यू, अनू ह्यांच्या बरोबर पूरू या वंशाचा निर्देश येतो. ही सर्व नावे बहुवचनी असतात (ऋग्वेद १.१०८.८). म्हणून ती व्यक्तिनामे नसून वंशनामे ठरतात. पंजाबमधील पंचजनांत त्यांची गणना केली आहे. त्यांचे निवासस्थान सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवर होते. अर्थातच ते तृत्सू व भरतांचे शेजारी होते आणि त्यांची तृत्सूंशी व भरतांशी केव्हा मैत्री तर केव्हा युद्धे होत. ऋग्वेदात अनेक पूरुवंशीय राजांचा उल्लेख येतो. त्यांपैकी सर्वांत प्राचीन दुर्गह आणि गिरिक्षित् हे होत. गिरिक्षिताचा पुत्र पुरुकुत्स याला ⇨दाशराज्ञ युद्धात सुदास राजाने पराजित केले वा मारले. पुरुकुत्साचा पुत्र त्रसदस्यू याने आपल्या नावाप्रमाणे दस्यूंचा नाश केला. त्याच्या नावावरून (त्रसदस्यू या शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ दस्यूंना त्रस्त करणारा) त्या काळी पुरू आणि भरत यांचे मीलन होऊन त्यांना कुरु हे नाव प्राप्त झाले होते, असे दिसते. पुढे या वंशात कुरुश्रवण झाला.नंतरच्या वाङ्मयात हे आर्यवंश जाऊन त्यांच्या ठिकाणी निराळेच राजवंश आढळतात. महाभारत आणि पुराणे यांत म्हटले आहे की, सोमवंशात नहुषाचा पुत्र ययाती हा मोठा सम्राट होऊन गेला. त्याचे राज्य मध्य देशात दूरवर पसरले होते. त्याला शुक्रकन्या देवयानी हिच्यापासून यदू व तुर्वसू आणि असुरराजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा हिच्यापासून अनू, द्रुह्यू आणि पूरू असे पाच पुत्र झाले. पूरूने पित्याचे वार्धक्य काही काळ घेऊन आपले यौवन त्याला दिल्यामुळे त्याने त्याला आपल्या राज्याचा मुख्य भाग मध्य प्रदेश हा दिला. त्याची राजधानी प्रयागजवळ प्रतिष्ठान येथे होती.पुढे या वंशात दुष्यंत आणि नंतर त्याचा पुत्र सर्वदमन भरत हे झाले. भरताने गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या तीरी अनेक यज्ञ केले. त्याच्या काळी या वंशाची राजधानी प्रतिष्ठानहून हस्तिनापुरास हलविण्यात आली. भरतावरून या देशाला भारतवर्ष हे नाव पडले (महाभारत, आदिपर्व, भांडारकर प्रत २.९६). वायुपुराणात (४५) मनु-राजाला प्रजापालक म्हणून ‘भरत’ असे नाव पडले व त्यावरून त्याच्या राज्यातील प्रजेला भारत असे नाव पडले, असे म्हटले आहे. श्रीमद्भागवतात (५.४.९) म्हटले आहे की, ऋषभदेवपुत्र भरत (जड) याच्या नावावरून ‘भारत’ हे नाव ह्या देशास पडले.पुढे या वंशात कुरुनामक विख्यात राजा झाला. त्याने कुरुक्षेत्र व कुरुजांगल हे प्रदेश वसविले. पुढे त्याचे नाव या वंशाला मिळाले. काही पिढ्यांनंतर या वंशातील राजा प्रतीप याला देवापी, बाल्हीक आणि शंतनू असे तीन पुत्र झाले. देवापी कुष्ठरोगाने पीडित होता आणि बाल्हीकाने आपला हक्क सोडला, म्हणून शंतनू गादीवर आला. त्याला गंगेपासून देवव्रत ऊर्फ भीष्म आणि सत्यवतीपासून चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे पुत्र झाले. चित्रांगद लढाईत मारला गेल्यामुळे विचित्रवीर्याला राज्य मिळाले. तोही तरुणपणी निधन पावल्यामुळे त्याच्या राण्यांना पाराशर व्यासापासून नियोगाने धृतराष्ट्र आणि पांडू असे पुत्र झाले. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांस कौरव आणि पांडूच्या पुत्रांस पांडव अशी नावे पडली.
मिराशी, वा. वि.