पीअर्स, जॉन रॉबिन्सन : (२७ मार्च १९१०– ). अमेरिकन संदेशवहन अभियंते. उच्च विद्युत् प्रवाह इलेक्ट्रॉन क्षेपक (बंदूक), प्रगामी तरंग विवर्धक [→ इलेक्ट्रॉनीय विवर्धक], निष्क्रिय (रेडिओ तरंग केवळ परावर्तित करणाऱ्या) उपग्रहाद्वारे संदेशवहन, उच्च घनतेच्या इलेक्ट्रॉन शलाकेचे उत्पादन, संदेशवहन सिध्दांताचा व्यावहारिक प्रश्नांसाठी वापर यांवरील संशोधनाबद्दल प्रसिध्द. त्यांचा जन्म डे मॉइन (आयोवा) येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (कॅलटेकमधून) १९३३ साली बी. एस्. १९३४ साली एम्. एस्. व १९३६ साली पीएच्. डी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या. १९३६ मध्येच त्यांनी बेल टेलिफोन लॅबोरेटरीत नोकरी पतकरली. १९६१ साली ते तेथील संदेशवहन तत्त्वे व प्रणाली या विषयावरील संशोधन विभागाचे प्रमुख कार्यकारी संचालक झाले. तेथून १९७१ साली निवृत्त झाल्यानंतर ते कॅलटेकमध्ये अभियांत्रिकीचे प्राध्यापक झाले.
बेल टेलिफोन लॅबोरेटरीत त्यांनी संशोधन करून त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या उच्च विद्युत् प्रवाह इलेक्ट्रॉन क्षेपकाचे अभिकल्पन केले (आराखडा तयार केला). स्थिर विद्युताने केंद्रीकरण होणारा इलेक्ट्रॉन गुणक त्यांनी तयार केला. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांनी जे. ओ.मॅकनॅली व डब्लू. जी. शेफर्ड यांच्या सहकार्याने कमी विद्युत् दाबावर चालणाऱ्या प्रतिक्षेपी क्लायस्ट्रॉन आंदोलकाचा विकास केला आणि पुढे या आंदोलकाचा अमेरिकेतील सूक्ष्मतरंग रडार [→ रडार] प्रणालीत सर्रास उपयोग होऊ लागला. १९५२ साली त्यांना त्याच कंपनीच्या न्यू जर्सी येथील संदेशवहन विभागाचे संचालक म्हणून नेमण्यात आले. तेथे असताना त्यांनी निष्क्रिय उपग्रहाद्वारे संदेशवहन करावे ही कल्पना मांडून तिचा पुरस्कार केला. या कार्याचा पहिला प्रयोग अवकाशात सोडलेल्या एको–१ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या ३० मी. व्यासाच्या प्लॅस्टिकच्या फुग्याच्या साहाय्याने केला गेला. त्यापासून रेडिओ तरंगांचे चांगले परावर्तन व्हावे याकरिता त्याच्या पृष्ठभागावर अँल्युमिनियम धातूचा पातळ थर दिला होता. हा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे या पुढील टेलस्टार या योजनेचे त्यांनी अभिकल्पन केले [→ उपग्रह संदेशवहन]. इलेक्ट्रॉनीय विवर्धकांसंबंधी संशोधन करून त्यांनी प्रगामी तरंग नलिकांसंबंधीचे आपले मौलिक कार्य ट्रॅव्हलिंग वेव्ह ट्यूब्ज (१९५०) या ग्रंथात संग्रहित केले.१९६१ साली त्यांनी सिंबॉल्स, सिग्नल्स अँड नॉइज हा संदेशवहन सिध्दांतावरील सामान्य लोकांना समजण्यास सुबोध असा अर्धतांत्रिक स्वरूपाचा ग्रंथ प्रसिध्द केला.
वरील विषयांखेरीज सूक्ष्मतरंग, मानसशास्त्र, मानसध्वनिकी, संगीताचे एक साधन म्हणून संगणकाचा (गणकयंत्राचा) उपयोग आदि विषयांवरही त्यांनी बरेच लेखन केले आहे. जे. जे. कपलिंग या टोपण नावाने त्यांच्या विज्ञान कथा प्रसिध्द झालेल्या आहेत. तांत्रिक विषयांवर त्यांनी अकरा पुस्तके व अनेक लेख लिहिले आहेत. त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर १९५५ साली निवड झाली. १९६३ साली अमेरिकन सरकारने त्यांना राष्ट्रीय विज्ञान पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
चिपळोणकर, व. त्रिं.