पिरोजा : (टर‌्कॉइज). खनिज. स्फटिक त्रिनताक्ष, बारीक व क्वचित आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे हे संपुंजित, अस्फटिकी किंवा गूढस्फटिकी तर कधीकधी वृक्काकार (मूत्रपिंडाकृती), झुंबराकार वा विखुरलेल्या कणांच्या रूपात आढळते. भंजन काहीसे शंखाभ [→ खनिजविज्ञान]. किंचित ठिसूळ. कठिनता ५–६. वि. गु. २·६–२·८ (सच्छिद्र असल्याने वि. गु. बदलते). चमक निस्तेज, मेणासारखी, अपारदर्शक ते किंचित पारदर्शक. रंग आकाशी निळा, निळसर हिरवा, हिरवट ते पिवळसर करडा. शुष्क वातावरणात याचा रंग जातो, तर उष्णतेने वा प्रकाशाने रंग खराब होतो. कस किंचित हिरवा वा रंगहीन. रा. सं. स्थूलमानाने CuO.3Al2O3.2P2O5.9H2O. यामध्ये अँल्युमिनियमाच्या जागी फेरिक लोह, तर तांब्याच्या जागी फेरस लोह येते. हे कॅल्कोसिडेराइटाशी समाकृतिक (सारखा स्फटिक-आकार असलेले) आहे. याला तांब्यामुळे निळा तर लोहामुळे हिरवा रंग आलेला आसतो.

पिरोजा सामान्यत: रुक्ष परिसरात खडकातून वाहणाऱ्या पाण्याच्या क्रियेने तयार होते. अपघटित (भौतिक व रासायनिक झीज झालेल्या) ज्वालामुखी वा गाळाच्या खडकांमध्ये याच्या बारीक मेणचट शिरा वा कण विखुरलेले आढळतात. हे सामान्यत: भूपृष्ठानजिक आढळते. क्वचितच ते सु. ३५ मी.पेक्षा अधिक खोलावर आढळते व यामुळे त्याचे खाणकाम साधे असते. इराणच्या खोरासान प्रांतातील नीशापूरजवळील ट्रॅकाइटामध्ये याचे प्रख्यात निक्षेप (साठे) असून तेथे पिरोजा ८०० वर्षांपासून काढले जात आहे. हे इराणचे राष्ट्रीय रत्न आहे. सायबीरिया, तुर्कस्तान, आशिया मायनर, सिनाई व्दीपकल्प, सॅक्सनी, फ्रान्स, तिबेट, चीन, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, इथिओपिया इ. भागांत याचे निक्षेप आहेत.

रत्न वा मौल्यवान खडा म्हणून हे ८,००० वर्षांपासून वापरात आहे. ईजिप्तमध्ये हे इ. स. पू. ४००० वर्षांपासून वापरात असून सिनाई व्दीपकल्पातील खाणकाम सलग २,५०० वर्षे चालू आहे. अमेरिकेत इंडियन अँझटेक लोक पिरोजा वापरीत, तसेच तिबेटातही हे हजारो वर्षे वापरात आहे. यात अद‌्भूत शक्ती असल्याचे व हे शुभ रत्न असल्याचे प्राचीन संस्कृतीत मानले जाई. काश्मीर व दार्जिंलिंग भागांत विकले जाणारे पिरोजा रत्न (निळे व अपारदर्शक) इराण व तिबेटातून येते. रत्न म्हणून अजूनही हे वापरतात व सामान्यत: त्याचे वरचे पृष्ठ किंचित बहिर्गोल करून त्याला झिलाई देतात. कधीकधी त्यावर कोरीव नक्षीकामही करतात. याचे मणीही तयार करतात. शिवाय इराणात हत्यारे शोभिवंत करण्यासाठी हे रत्न वापरीत. जॅस्पर, ज्वालाकाच किंवा मुक्ताद्रव्य (शिंपल्याच्या आतील मोत्यासारखे दिसणारे कठीण द्रव्य) याच्याबरोबर याचे वेडेवाकडे तुकडे कुट्टिमचित्रात (मोझाइकमध्ये) जडवतात. याचा आकाशी निळा प्रकार (रॉबिन्स एग) सर्वांत मूल्यवान आहे. कारण त्याचा मौल्यवान धातूच्या रंगांशी चांगला विरोधाभास होऊ शकतो. पिरोजा, लिमोनाइट वा इतर द्रव्य यांचे नैसर्गिकपणे एकत्रीकरण होऊन बनलेल्या पुंजक्याला ‘पिरोजा आधारक’ म्हणतात व त्याचाही रत्नासारखा उपयोग होतो. मात्र पिरोजा सच्छिद्र असल्याने धूळ, साबण, घाम वगैरेंचा त्यावर विपरीत परिणाम होतो. पिरोजा इराणातून तुर्कस्तानमार्गे प्रथम युरोपात गेले व त्यामुळे तुर्कीश या अर्थाच्या फ्रेंच शब्दावरून त्याचे टरकॉइज हे इंग्रजी नाव पडले असावे.

ओडोंटोलाइट किंवा बोन टर‌्कॉइज हे पिरोजासारखेच असते व हेच पूर्वी पिरोजा म्हणून वापरले जात असे. ते जीवाश्मरूप (शिळारूप झालेल्या) हाडांत व दातांत तयार होते. त्यामुळे दात अर्थाच्या ग्रीक शब्दावरून त्याचे ओडोंटोलाइट हे नाव प़डले आहे. मात्र हे खऱ्या पिरोजापेक्षा मऊ व जड (वि. गु. ३ – ३·५) असून ते हाड्रोक्लोरिक अम्लात विरघळते. शिवाय सूक्ष‌्मदर्शकाने याची जैव संरचनाही उघड होते. पिरोजाचा व्हेरिसाइट एक प्रकार आहे.

ठाकूर, अ. ना.