पॉट्सडॅम : पूर्व जर्मनीतील याच नावाच्या जिल्ह्याचे (लांडर) मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,१९,४८२ (१९७५). हे बर्लिनच्या प. नैर्ऋत्येस २७ किमी. अंतरावर हाफेल नदीने तयार केलेल्या सरोवराकाठी वसले आहे. दहाव्या शतकापूर्वी वेंडिश लोकांचे एक मासेमारी केंद्र म्हणून या गावाची स्थापना होऊन, चौदाव्या शतकात याला शहराचा दर्जा मिळाला. पूर्वी प्रशियन राजांचे वास्तव्य येथे असे. फ्रीड्रिख द ग्रेटच्या कारकीर्दीत (१७४०-८६) पॉट्सडॅमला बरेच महत्त्व येऊन ते प्रशियन लष्करशाहीचे प्रतीक बनले. दुसऱ्या महायुद्धात शहराची बरीच हानी झाली. याल्टा कराराची अंमलबजावणी आणि जर्मनीचे भवितव्य यांच्या विचारार्थ अमेरिका, रशिया व ग्रेट ब्रिटन यांच्या नेत्यांची परिषद (१७ जुलै – २ ऑगस्ट १९४५) येथेच भरली होती. १९५२ पूर्वी हे ब्रांडनबुर्क प्रांताच्या राजधानीचे ठिकाण होते.
अभियांत्रिकी, रेव्ले एंजिने, बोटी बांधणे, साखर तयार करणे, दारू गाळणे, सुती वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, सूक्ष्म उपकरणे, विद्युत्साहित्य निर्मिती. इ. उद्योगधंदे शहरात चालतात. पॉट्सडॅमचे उपनगर बाबल्सबेर्क हे पूर्व जर्मनीतील चित्रपट व्यवसायाचे प्रसिद्ध केंद्र आहे. महत्त्वाच्या शहरांशी पॉट्सडॅम, ट्राममार्ग, जलमार्ग व लोहमार्ग यांनी जोडलेले आहे. सुंदर इमारती, रुंद रस्ते व दुतर्फा झाडे, उद्याने व विविध सुखसोयी यांनी पॉट्सडॅम युक्त आहे. येथील पाच प्रॉटेस्टंट व एक कॅथलिक चर्च, टाउन पॅलेस, जर्मन रोकोको कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला सँ-सूसी राजवाडा व उद्यान, ब्रांडनबुर्क गेट, राज्यशास्त्र व कायदा अकादमी, पूर्व जर्मन फिल्म आर्ट अकादमी बाबल्सबेर्क किल्ला, पहिल्या व तिसऱ्या फ्रीड्रिख विल्यमचे पुतळे, बर्लिन विद्यापीठाची एक व खगोल भौतिकीय (आइन्स्टाइन टॉवर) ही दुसरी अशा दोन वेधशाळा इ. प्रेक्षणीय आहेत. फ्रीड्रिख विल्यमच्या कारकीर्दीत (१७१३-४०) पॉट्सडॅम हे प्रशियन लष्करशाहीचे प्रतीक होते. तेथील लष्करी कवायतीची अनेक मैदाने व भव्य राजप्रासाद हे याचे निदर्शक होत. तथापि रमणीय व आकर्षक सॅं-सूसी राजवाडा व उद्याने ही दोन्ही मात्र याला अपवाद आहेत. या राजवाड्यात फ्रीड्रिखचे चाळीस वर्षे तसेच व्हॉल्तेअरचेही पुष्कळ काळ वास्तव्य होते. राजवाड्याची लांबी ४१ मीटरांहून अधिक असून तो क्नोबेल्सडॉर्फने फ्रीड्रिखच्या आराखड्यानुसार बांधल्याचे मानले जाते. या राजवाड्यामधील ग्रंथालय, उत्कृष्ट चित्राकृतींनी सुसज्ज असे प्रेक्षागार, फ्रीड्रिखचा पुतळा, नारिंगांची बाग, रमणीय उद्यान, कारंजे ही येथील आकर्षण केंद्रे होत. वैज्ञानिक संस्था, वित्त महाविद्यालय, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, कृषी व वैद्यकीय संस्था इ. विविध शैक्षणिक संस्थाही शहरात आहेत.
चौधरी, वसंत.