पाणबगळा : आर्डीइडी या कुलातील हा पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव इग्रेटा गार्झेटा हे आहे. भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेशात हा आढळतो. हे संघचारी असून नद्या, लहानमोठे तलाव यांच्या काठी व पाणथळ जागी असतात.
हा एक पांढराशुभ्र पक्षी असून कोंबडीएवढा असतो पण मान व पाय पुष्कळ लांब असतात. डोळे पिवळे पाय काळे व बोटे पिवळी असतात. चोच लांब, अणकुचीदार आणि काळी असते. प्रजोत्पादनाच्या काळात छाती आणि पाठ यांवर शोभिवंत पिसे उत्पन्न होतात छातीवरची पिसे लांब व त्यांची टोके भाल्यासारली असतात पाठीवरची पिसे पुष्कळ लांब व लोंबती असून त्यांची टोके वर वळलेली असतात. डोक्यावर दोन लांब, बारीक आणि मागे वळलेल्या पिसांचा तुरा उगवतो. ही पिसे विणीच्या हंगामानंतर गळून पडतात.
हे पक्षी मुख्यतः मासे आणि बेडूक यांवर उपजीविका करतात परंतु ते कृमी, टोळ, पाण्यातील किडे, गोगलगाई, सरडे वगैरेही खातात. पाण्याच्या काठच्या गवताळ जमिनीवर, उथळ पाण्यात, भातखाचरात किंवा पाणथळ जागी हे भक्ष्य शोधीत हिंडत असलेले दिसतात. पाणबगळा उडताना आपली मान खांद्याकडे आखडून घेतो व पाय मागे ताठ पसरतो.
यांचा विणीचा हंगाम उत्तर भारतात जुलै-ऑगस्टच्या सुमारास आणि दक्षिणेकडे नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत असतो. इतर बगळे आणि बक ज्या झांडांवर घरटी बांधतात त्याच झाडांवर पाणबगळे आपली घरटी बांधतात. घरटे काटक्याकुटक्यांचे बनविलेले व कावळ्याच्या घरट्यासारखेच ओबडधोबड असते. मादी फिक्कट निळसर हिरव्या रंगाची चार अंडी घालते.
विणीच्या काळात उगवणारी पिसे शोभिवंत असल्यामुळे पाश्चात्त्य देशांतील स्त्रियांच्या ‘फॅशन’ करिता यांना एके काळी फार मागणी असे आणि ती पुरवून पैसा मिळविण्याच्या हावेने या पक्ष्यांचा फार मोठ्या प्रमाणावर संहार केला जात असे. यामुळे पक्षी तर नाहीसे होतच पण त्यांची पिल्लेही उपासमारीने मरत. ईजिप्तमध्ये हा पक्षी नामशेष होण्याची भीती उत्पन्न झाली होती. भारतात कायद्याने या पक्ष्याला संरक्षण दिल्यामुळे ही भीती उरलेली नाही.
कर्वे, ज. नी.
“