पंचनामा :जे घडले त्याची तात्काळ पंचांसमोर केलेली नोंद किंवा केलेल्या तपासाचे नोंदपत्रक म्हणजे पंचनामा. पंच हा शब्द लवाद या अर्थी वापरला जातो. पंचनामा म्हणजे पंचांची नेमणूक करणारा लेख, असा अर्थ होतो. निःपक्षपाती गणल्या जाणाऱ्या पंचानी जे केले अगर पाहिले, ते नमूद करणाऱ्या लेखाला पंचनामा म्हणण्याची प्रथा आहे. पंचांसमक्ष जप्ती अगर विक्री करतात आणि कबजाही देतात. त्या वेळी जे घडले असेल, ते पंचनाम्यात पंच नमूद करतात. संपत्तीच्या स्थितीबद्दल किंवा किंमतीबद्दल पंच पंचनामा करतात. या गोष्टी कोणीही तिर्हाईत व्यक्ती हजर नसताना संबंधितांनी केल्या, तर विश्वसनीय स्वतंत्र पुराव्याच्या अभावी त्या सिद्ध करणे अवघड जाते. पंचांनी त्या केल्या व त्यांची नोंद पंचनाम्यात केली, तर ही अडचण दूर होते.
फौजदारी गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना अनेक प्रसंगी संभावित व स्वतंत्र साक्षीदार हजर ठेवावे लागतात आणि त्या वेळी जे घडते, त्याबद्दल पंचनामे करावे लागतात. त्याच्याखाली पंच सह्या करतात. खुनाच्या तपासात प्रेताच्या अवस्थेबद्दल मरणान्वेषण पंचनामा, गुन्ह्याच्या जागेच्या स्थितीबद्दल स्थलपंचनामा, आरोपीला अटक करताना केलेला अटक पंचनामा, त्यावेळच्या त्याच्या अंगावरील वस्त्रे व वस्तू यांचा पंचनामा, ओळखपरीक्षेचा पंचनामा हे व असे अनेक प्रकारचे पंचनामे करण्यात येतात.
सामान्यतः पंचनाम्याच्या वेळी आरोपींनी अगर इतरांनी गुन्ह्यांबाबत केलेली कथने पोलिसांसमक्ष केलेली असल्यामुळे कायद्याप्रमाणे पुराव्यात ग्राह्य होत नाहीत. परंतु आरोपीने केलेल्या कथनाचा परिणाम म्हणून वस्तू सापडल्या, तर पंचनाम्यातील संबंधित कथन पुराव्यात ग्राह्य होते.
न्यायालयात पंचनामे मुख्य पुरावा ठरत नाहीत. प्रत्यक्ष पाहिलेले किंवा स्वतः जे केले, ते सांगणाऱ्या पंचांची साक्ष हा मुख्य पुरावा ठरतो. पंचनाम्याचा उपयोग फक्त पंचाच्या साक्षीला पुष्टी देण्याकरिता किंवा तीतील विसंगती दाखविण्यासाठी करता येतो.
श्रीखंडे, ना. स.