होवाळ, वामन : (१ एप्रिल १९३९). प्रसिद्ध मराठी लेखक. सुरुवातीच्या दलित साहित्यातील अग्रणी नाव. होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर, ता. खानापूर (आता कडेगाव) येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तडसर येथे व त्यापुढील शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई आणि बेडेकर महाविद्यालय, ठाणे येथे पूर्ण केले. शालेय जीवनात त्यांनी कथालेखनास सुरुवात केली. त्यांची पहिली कथा ‘माणूस’ कथालक्ष्मी या पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात छापून आली (मार्च १९६३). त्यानंतर सत्यकथा, वसुधा, धनुर्धारी यांसारख्या मान्यताप्राप्त मासिकांतून त्यांच्या सु. ४०० कथा प्रसिद्ध झाल्या. 

वामन होवाळ

१९५७ मध्ये मुंबईत आल्यानंतर होवाळ यांच्या लेखनात मोठे बदल घडून आले. त्यांनी स्वायत्त, स्वधर्मी आणि स्वतंत्र अशा कथा लिहिल्या. त्यांच्या कथांना स्वतःची अशी अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. त्या प्रचलित ग्रामीण व दलित कथांसारख्या नव्हत्या. होवाळ रूढार्थाने ग्रामीण वा दलित लेखक नाहीत. या दोन्ही प्रेरणांची सर्जनशील एकात्मता घेऊन त्यांची साहित्यदृष्टी विकसित झाली आहे. त्यांच्या कथा एकाच वेळी समूहनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ अशा आहेत. अर्थवाही बोलीभाषा, मुद्देसूद आटोपशीरपणा आणि वाचनाभिमुखता हे त्यांच्या लेखनाचे मुख्य गुणविशेष आहेत. शोषित वंचितांची बांधीलकी स्वीकारून संपूर्ण समाजाच्या परिवर्तनासाठी अखंड संघर्ष करत असतानाही त्यांचे लेखन प्रचारकी होत नाही. गावकुसाबाहेर जशी माणसे असतात, तशीच ती गावकुसाच्या आतही असतात, या विश्वासाधारे कुठलाही प्रकारचा द्वेष, कटुता वा कडवटपणा न येऊ देता परिस्थितिजन्य परिप्रेक्ष्यात ते दलित-उच्च वर्गाकडे बघतात. साहित्यरंजन व जीवनानुभूती असा विविधांगी संगम त्यांच्या लेखनात आढळतो. प्रख्यात विचारवंत गंगाधर पानतावणे त्यांच्याविषयी एक निरीक्षण नोंदवितात, ते असे : ‘दलित-वंचित-शोषितांचे विदारक जग विनोदी शैलीतून गांभीर्याने मांडणारे ते एकमेव लेखक असावेत.’ होवाळ यांची कथाकथन शैली अतिशय लोकप्रिय होती. प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वींना ती शैली एकपात्री प्रयोगासारखीच वाटते. होवाळ यांच्या कथा त्यांतील बहुआयामी आशयसूत्र, कलात्मक रचनाबंध, भाषेतले प्रवाही चैतन्य आणि कथनाच्या संपूर्ण अनुभवामुळे लक्षणीय ठरतात. फुले-आंबेडकरी आणि एकूणच दलित साहित्याला त्यांनी एका विशिष्ट टप्प्यावर आणून ठेवले आहे.

होवाळ यांच्या कथा हिंदी, उर्दू, इंग्रजी, कन्नड व फ्रेंच या भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. शालेय स्तरावर तसेच मुंबई विद्यापीठ, मुंबई; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आदी विद्यापीठांत होवाळ यांच्या कथांचे अध्यापन केले जाते. यांव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश व कर्नाटक येथील विद्यापीठांत त्यांच्या कथा अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.

होवाळ यांचे बेनवाड (१९७३), येळकोट (१९८२), वारसदार (१९८६), वाटा आडवाटा (१९८८) व ऑडिट (२००५) हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. येळकोट, वारसदारऑडिट या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा, तर वाटा आडवाटा यास अस्मितादर्श (१९९६) पुरस्कार प्राप्त झाला आहे. ऑडिट संग्रहास कोकण मराठी साहित्य परिषदेचा विनोदी वाङ्मय पुरस्कार तसेच मानाचा बंडोबागोपाळा मुकादम, कुसूर हा पुरस्कार मिळाला आहे. आमची कविता (२००३) हा कवितासंग्रह त्यांनी संपादित केला आहे. नाम्या म्हणे मी उपाशी, अधेलीचं भांडणजपून पेरा बेणं या लोकनाट्याचे प्रयोग झाले आहेत. जन्मठेपपैंजण या मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिकादेखील केल्या आहेत.

संदर्भ : केळुसकर, महेश कार्व्हालो सिसिलिया (संपा.) आरसपानी, वामन होवाळ व्यक्तित्व आणि साहित्य, मुंबई, २०१३.

वाघ, नितिन भरत