हेल्म होल्ट्स, हेर्मान लूटव्हिख फेर्डिनांटफोन : (३१ ऑगस्ट १८२१–८ सप्टेंबर १८९४). जर्मन भौतिकीविज्ञ आणि शरीरक्रियाशास्त्रज्ञ. त्यांनी प्रथमच ऊर्जेच्या अक्षय्यता तत्त्वाचे गणितीय विश्लेषण केले. त्यांनी नेत्रपरीक्षक (ऑप्थॅल्- मॉस्कोपाचा) साधनाचा शोध लावला, तसेच ध्वनी संवेदन व रंगसंवेदन यांचे भौतिकीच्या दृष्टीन संशोधन केले.
हेल्महोल्ट्स यांचा जन्म बर्लिनजवळील पॉट्सडॅम येथे झाला. १८३८ मध्ये त्यांनी फ्रीड्रिख व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकाचे विद्याव्यासंगी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांनी भौतिकीच्या दृष्टीने वैद्यक आणि शरीरक्रियाविज्ञान प्रशिक्षणाचा अभ्यास केला. १८४२ मध्ये त्यांनी पीएच्.डी. पदवीच्या प्रबंधामध्ये तंत्रिका तंतू आणि तंत्रिका कोशिका(पेशी) यांच्यामधील संबंधाचे वर्णन व विश्लेषण केले. याकरिता त्यांनी सूक्ष्मदर्शकाचा कुशलतेने वापर केला. यामुळे तंत्रिका तंत्रामधील शरीर-क्रियाविज्ञान आणि विकृतिविज्ञान यांचा सूक्ष्मशारीरिक पाया तयार झाला.
हेल्महोल्ट्स हे पॉट्सडॅम येथे लष्करी वैद्य (१८४३–४८) होते. १८४९ मध्ये ते केनिग्झबर्ग विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक आणि १८५५ मध्ये बॉन विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञान आणि शरीर-रचनाशास्त्र विषयांचे प्राध्यापक झाले. ते हायडल्बर्ग विद्यापीठात (१८५८–७१) आणि बर्लिन विद्यापीठात (१८७१–८८) भौतिकीचे प्राध्यापक होते.
स |
हेल्महोल्ट्स यांनी १८४७ मध्ये भौतिकीय प्रेरणा (ऊर्जा) विविध रूपांत अक्षय्य राहतात ही संकल्पना स्पष्ट शब्दांत मांडली. त्यामुळे गणितीय रूपात दिलेल्या सर्वसामान्य तत्त्वामुळे गतिज व स्थितिज ऊर्जा, ऊष्मागतिकी (उष्णता व यांत्रिक आणि इतर स्वरूपांतील ऊर्जा यांतील संबंधाचे गणितीय विवरण करणारे शास्त्र), विद्युत् व चुंबकत्व यांचे स्पष्टीकरण ताबडतोब मिळू लागले. १८५० मध्ये त्यांनी संवेदनांचे तंत्रिकांमधून होणाऱ्या वहनाची त्वरा निश्चित करण्याकरिता संशोधन केले. त्याचे मूल्य ३० मी. प्रति सेकंद असल्याचे त्यांना आढळले. १८५१ मध्ये त्यांनी डोळ्यासंबंधी संशोधन करण्याकरिता उत्कृष्ट नेत्रपरीक्षक साधनाचा शोध लावला.
हेल्महोल्ट्स यांचे प्रकाशकी व ध्वनिकी यांसंबंधीचे कार्य जास्त महत्त्वपूर्ण व मूलभूत आहे. हेल्महोल्ट्स इंद्रियगोचर ज्ञानाशी असलेला संबंध त्यांच्या पुढील दोन ग्रंथांतून प्रतीत होतो : ऑन द सेन्सेशन्स ऑफ टोन ॲज अ फिजिऑलॉजिकल बेसिस फॉर द थिअरी ऑफ म्यूझिक( भाषांतरित १८७५) आणि हॅण्डबुक ऑफ फिजिऑलॉजिकल ऑप्टिक्स (भाषांतरित तीन खंड १८५६, १८६२ व १८६७). हेल्महोल्ट्स यांनी रंगांचे संवेदन, ज्ञानेंद्रियांच्या तंत्रिकांचे कार्य आणि स्वरयंत्र याच्याशी संबंधित तंत्रिका तंत्राचे कार्य या गोष्टींचे आणि आवश्यक ती प्रायोगिक तंत्रे विकसित करण्यात ⇨ योहानेस पेटर म्यूलर यांना सहकार्य केले, तसेच ⇨ टॉमस यंग यांच्या वर्णदृष्टी सिद्धांताचा विचार केला. हेल्महोल्ट्सयांनी स्वरनादग्रहण आणि कानाची अंतर्रचना यांसंबंधीच्या ज्ञानात महत्त्वाची भर टाकली. तसेच ऊष्मागतिकीचा पहिला नियम प्रस्थापित करण्यात हेल्महोल्ट्स यांच्यासमवेत ⇨ बॅरन विल्यम टॉमसन केल्व्हिन यांनीही पुढाकार घेतला.
हेल्महोल्ट्स यांनी द इम्पिरिकल फिजिक-टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. १८८८ मध्ये ते या संस्थेचे पहिले संचालक झाले. ते रॉयल सोसायटीचे फेलो आणि अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांना कॉप्ली (१८७३) आणि आल्बेर्ट (१८८८) ही पदके मिळाली.
हेल्महोल्ट्स यांचे शार्लोटनबुर्ग (बर्लिन) येथे निधन झाले.
भदे, व. ग. गायकवाड, पल्लवी
“