हेरस्कोव्हिट्स, मेलव्हिल जीन : (१० सप्टेंबर १८९५–२५ फेब्रुवारी १९६३). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एकख्यातकीर्त मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म स्थलांतरित मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात बेलफौन्टन (ओहायओ) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्याने शिकागो विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पीएच्.बी. संपादन केली (१९२०). त्यानंतर त्याने कोलंबिया विद्यापीठातून एम्.ए. ची पदवी मिळविली (१९२१). त्याने प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ फ्रँट्स बोॲस याच्या मार्गदर्शनाखाली ‘आफ्रिकेतील आदिम समाज आणि अमेरिकन संस्कृतीतील त्यांचे स्थान’ या विषयावर संशोधन करून कोलंबिया विद्यापीठास प्रबंध सादर केला आणि पीएच्.डी. मिळविली (१९२३). त्यानंतर त्याने कोलंबिया आणि हार्व्हर्ड विद्यापीठांमध्ये मानवशास्त्राचे अध्यापन केले. पुढे तो इव्हनस्टन (इलिनॉय) येथील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाला (१९२७). तिथे मानवशास्त्र विभाग स्थापन करून त्याचा तो प्रमुख झाला. याच विद्यापीठात त्याने आफ्रिकेतील आदिमांच्या अभ्यासाचे अध्यासन निर्माण केले (१९५१). अखेरपर्यंत तो या विद्यापीठात अध्यापन व संशोधनात व्यस्त होता. याच काळात अमेरिकन काउन्सिल ऑफ लर्नेड सोसायटीच्या निग्रोंच्या अभ्यास-विषयक मंडळाचे अध्यक्षपद (१९३९–५०) भूषविण्याचा मान त्यास मिळाला. शिवाय त्याने पश्चिम आफ्रिका, उपसहारा वाळवंटी प्रदेश, हैती, त्रिनिदाद, ब्राझील आणि सुरिनाम या प्रदेशांचा क्षेत्राभ्यास केला. तेथील आदिवासींच्या समस्या आणि त्यांच्या संवर्धनातील गतीकेचा बदल नोंदविला. तसेच दुसऱ्या देशातील संस्कृतीचे मूल्यमापन करण्याचे असे कोणतेही निश्चित निकष नाहीत, हेही मत त्याने नोंदविले. सांस्कृतिक सापेक्षतावाद या संकल्पनेचा तो ज्ञाता होता.
अमेरिका व आफ्रिका यांमधील निग्रो लोक, त्यांची लोकविद्या, त्यांचे आदिम अर्थशास्त्र, संगीत, लोककला आदींचा अभ्यास करण्यासाठी हेरस्कोव्हिट्सने पहिला अमेरिकन अभ्यास उपक्रम आयोजित केला. त्यामुळे त्याची ख्याती न्यू वर्ल्ड निग्रो या संकल्पनेला संशोधनाच्या कक्षेत आणण्यात झाली आहे. याशिवाय संस्कृती या विषयावर त्याने सापेक्षीय व मानवतावादी दृष्टिकोनातून लेखन केले. निग्रोंची मुळे आफ्रिकेत शोधली आणि काही गृहीत मिथ्यकांवर द मिथ ऑफ द निग्रो पास्ट (१९४१) या ग्रंथातून टीका केली. निग्रोंनी पाश्चात्त्यांचा आदर्श घ्यावा, ही कल्पना त्याने नाकारली. याशिवाय त्याने द इकॉनॉमिक लाइफ ऑफ प्रिमिटिव्ह पीपल्स (१९४० पुनर्शीर्षक इकॉनॉमिक ॲन्थ्रोपॉलॉजी, १९५२), मॅन अँड हिज वर्क्स (१९४८ संक्षिप्त पुनर्मुद्रण, कल्चरल ॲन्थ्रोपॉलॉजी, १९५४), फ्रँट्स बोॲस : द सायन्स ऑफ मॅन इन द मेकिंग (१९५३), द ह्यूमन फॅक्टर इन चेन्जिंग आफ्रिका (१९६२) वगैरे ग्रंथ लिहिले.
अल्पशा आजाराने त्याचे इव्हनस्टन येथे निधन झाले.
कुलकर्णी, शौनक
“