हेन्री, जोझेफ : (१७ डिसेंबर १७९७ – १३ मे १८७८). अमेरिकन भौतिकीविज्ञ. बेंजामिन फँ्रक्लिन यांच्यानंतरचे पहिले सर्वोत्कृष्ट अमेरिकन शास्त्रज्ञ. त्यांनी विद्युत् संबंधी अनेक महत्त्वाच्या तत्त्वांचे शोध लावले (उदा., स्वप्रवर्तन हा इलेक्ट्रॉनीय मंडलामधील मूलभूत आविष्कार). त्यांनी तारायंत्र उपकरणाचा विकास करण्याकरिता ⇨ सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मॉर्स यांना तांत्रिक साहाय्य केले.
हेन्री यांचा जन्म ऑल्बनी (न्यूयॉर्क, अ.सं.सं.) येथे झाला. त्यांनी ऑल्बनी ॲकॅडेमीत वैद्यकाचा अभ्यास केला, परंतु पुढे त्यांना प्रायोगिक भौतिकीची आवड निर्माण झाली. १८२६ मध्ये त्यांची ऑल्बनी ॲकॅडेमीत गणित व भौतिकी विषयांचे अध्यापक म्हणून नेमणूक झाली. १८३२ मध्ये ते न्यू जर्सी येथील महाविद्यालयात (सध्याचे प्रिन्स्टन विद्यापीठ) नैसर्गिक तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक झाले.
हेन्री यांनी १८२९ मध्ये ऑल्बनी ॲकॅडेमीत विद्युत् चुंबकासंबंधी कार्य करीत असताना विद्युत् चुंबकाच्या अभिकल्पामध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या. त्यांनी लोखंडाच्या गाभ्याऐवजी तारा विसंवाही करून तारांची अनेक वेटोळी लोखंडाच्या गाभ्याभोवती गुंडाळली आणि विद्युत् चुंबकाची शक्ती अनेक पटींनी वाढविली. त्यांनी येल महाविद्यालयाच्या वापराकरिता विद्युत् चुंबक बनविला. २,०८६ पौंड वजन पेलू शकणारा हा विद्युत् चुंबक त्यावेळच्या जागतिक क्रमवारीत नोंदला गेला. त्याच अभ्यासाच्या दरम्यान प्रथमत: स्वप्रवर्तनाचे तत्त्व त्यांच्या लक्षात आले (१८३२). त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी पहिल्या विद्युत् चलित्राची निर्मिती केली. विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाचा आविष्कार १८३० मध्येच हेन्री यांच्या निरीक्षणात आला होता, परंतु मायकेल फॅराडे यांनी पहिल्यांदाया आविष्काराच्या निष्कर्षांचे प्रकाशन १८३१ मध्ये केले. त्यामुळेया शोधाचे श्रेय फॅराडे यांना देण्यात आले (विद्युत् चुंबकीय प्रवर्तनम्हणजे चुंबकत्वाचे रूपांतरण विद्युत्मध्ये करणारी प्रक्रिया) .
हेन्री यांनी सतत केलेल्या संशो-धनातून रोहित्र तयार करता येणाऱ्या तत्त्वांचा शोध लावला. तसेच प्रवर्तनाचा दूर अंतरावरील प्रभाव व लेडन पात्रातून होणाऱ्या विद्युत् विसर्जनाचे आंदोलक स्वरूप या आविष्कारांचे त्यांनी विवेचन केले. त्यांच्या या शोधांचा रेडिओ तारायंत्र व रेडिओ दूरध्वनी या उपकरणांच्या विकासावर महत्त्वाचा परिणाम झाला. ऊष्मीय विद्युत् प्रवाहमापकाच्या साहाय्याने त्यांनी सूर्यावरील डाग हे सर्वसाधारण सौरपृष्ठभागापेक्षा कमी प्रमाणात उष्णता उत्सर्जित करतात असे दाखविले.
हेन्री १८४६ मध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन (वॉशिंग्टन, डी. सी.) या संस्थेचे पहिले सचिव झाले. तेथेच त्यांनी आवड असलेल्या हवामान निरीक्षकांना एकत्र करून मदत केली. स्मिथसोनियनचे वातावरण-विज्ञानीय कार्य यशस्वी झाल्यामुळे यू. एस्. वेदर ब्यूरोची निर्मिती झाली. हेन्री अमेरिकेच्या यादवी युद्धात राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्याप्रमुख तांत्रिक सल्लागारांपैकी एक होते. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे आद्य संयोजक आणि दुसरे अध्यक्ष होते. १८९३ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ प्रवर्तनी अवरोधनाच्या प्रमाणभूत विद्युत् एककाला ‘हेन्री’ हेनाव देण्यात आले.
हेन्री यांचे वॉशिंग्टन, डी. सी. येथे निधन झाले.
खोब्रागडे, स्नेहा दिलीप
“