णायकुमारचरिउ : एक अपभ्रंश खंडकाव्य. ‘नागकुमारचरित’ हे त्याच्या नावाचे संस्कृत रूप. कवी ⇨ पुष्पदंत (दहावे शतक) हा ह्या खंडकाव्याचा कर्ता. नऊ संधींच्या (अध्यायांच्या) ह्या खंडकाव्याचे कथानक थोडक्यात असे : मगध देशातील कनकपूर येथे राज्य करणाऱ्या राजा जयंधराला विशालनेत्रा आणि पृथ्वीदेवी अशा दोन राण्या असतात. त्याला पृथ्वीदेवीपासून झालेला पुत्र नागकुमार हा ह्या काव्याचा नायक. विशालनेत्रा राजाच्या मनात पृथ्वीदेवीसंबंधी किल्मिष निर्माण करते. त्यातून राजा आणि पृथ्वीदेवी ह्यांचे संबंध ताणले जातात. राजा तिच्या अंगावरचे सर्व अलंकार काढून घेतो परंतु नागकुमार द्यूतात अनेक सुवर्णालंकार आणि रत्ने जिंकून आईला भूषित करतो. प्रत्यक्ष जयंधरालाही तो द्यूतात पराभूत करून त्याची संपत्ती मिळवतो तथापि ती उदारपणे सर्व आपल्या पित्याला परत करतो. अनेक विद्या–कलांत निपुण असलेला नागकुमार खूप पराक्रमीही असतो. उन्मत्त घोड्यांना, हत्तींना तो वश करू शकतो. त्याचा पराक्रम पाहून राणी विशालनेत्रा हिचा पुत्र श्रीधर मत्सरग्रस्त होतो. तो नागकुमाराला ठार मारण्याचे निष्फळ प्रयत्न करतो. पुढे नागकुमाराच्या अनेक वीरकृत्यांची वर्णने आहेत. देशोदेशींच्या राजांचा तो पराभव करतो. अनेक राजकन्यांशी तो विवाहबद्ध होतो. त्यांपैकी लक्ष्मीमतीवर त्याचे खूप प्रेम असते. पिहिताश्रव नावाचा एक जैन मुनी नागकुमाराला ह्या प्रेमाचे रहस्य सांगतो : लक्ष्मीमती ही नागकुमाराची पूर्वजन्मीची पत्नी. नागकुमाराने श्रुतपंचमीचे (श्री पंचमी) पूर्वजन्मी केलेले व्रत फळाला येऊन ह्या जन्मीचे वैभव त्याला प्राप्त झाले.
त्यांनतर राजा जयंधर नागकुमारास निमंत्रण पाठवून बोलावून घेतो. त्याला राज्याभिषेक करतो. अनेक वर्षे राज्योपभोग घेऊन अखेरीस नागकुमार तपस्वी होतो आणि मोक्षास जातो.
ह्या खंडकाव्यात वीर आणि शृंगार रसांचा चांगला परिपोष करण्यात आला आहे. धर्मप्रचार हे ह्या काव्याचे मुख्य उद्दिष्ट असून त्यात अलौकिक घटनांचा आणि चमत्कारांचा समावेश आढळतो. त्यात आलेले अनेक धार्मिक आणि दार्शनिक विचार, तसेच हिंदू आणि बौद्ध धर्म सिद्धांतांवरील भाष्य इत्यादींवरून पुष्पदंताच्या बहुश्रुततेची कल्पना येते. हिरालाल जैन ह्यांनी हे खंडकाव्य संपादित केले आहे (१९३३).
तगारे, ग. वा.
“