नेरुदा, पाब्लो : (१२ जुलै १९०४–२३ सप्टेंबर १९७३). श्रेष्ठ चिलीयन कवि. स्पॅनिशमधून लेखन. मूळ नाव नेफताली रिकार्दो रेयास तथापि १९२० पासून ‘पाब्लो नेरूदा’ ह्या नावाने लेखन केले आणि १९४६ मध्ये ह्याच नावाचा वैधपणे स्वीकार केला. पाब्लोचे शिक्षण टेम्यूकोसॅंटिआगो येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच तो काव्यलेखन करू लागला. त्याच्यातील कवी घडत असतानाच्या काळात विख्यात चिलीयन कवयित्री⇨ गाब्रिएला मिसत्राल हिचा सहवास त्याला लाभला. अनेक अभिजात ग्रंथांचा परिचय मिसत्रालने त्याला करून दिला. अशा ग्रंथांच्या वाचनातूनच रशियातील अराज्यवादी चळवळीचा पुरस्कर्ता प्यॉटर क्रपॉटक्यिन ह्याच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडला. यथावकाश तो साम्यवादाकडे वळला.

फ्रेंच भाषेच्या उच्च अध्ययनासाठी पाब्लोचे सॅंटिआगो येथे वास्तव्य असताना तेथील चिलीयन विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत झालेल्या काव्यस्पर्धेत त्याने पारितोषिक मिळविले. ह्या संघटनेच्या मासिकात त्याच्या कविताही प्रसिद्ध होऊ लागल्या. १९२३ मध्ये Crepuscularioहा आपला पहिला काव्यसंग्रह त्याने प्रसिद्ध केला. पुढल्याच वर्षी प्रकाशित झालेल्या Veinte poemas de amor y una cancion desesperada (इं. शी. ट्‌वेंटी लव्ह पोएम्स अँड अ साँग ऑफ डिस्पेअर) ह्या काव्यसंग्रहाने श्रेष्ठ कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित केली. निराशेची छाया पसरलेल्या त्यातील कवितांतून एका उत्कट परिवेदनेचा प्रत्यय येतो. तथापि प्रेम ही एक शक्ती असून तीच जगाचा सांभाळ करू शकेल, असा विश्वासही त्यांत व्यक्तविलेला आहे. ‘ ट्‌वेंटी लव्ह पोएम्स….’ च्या प्रसिद्धीनंतर शिक्षण सोडून तो सर्वस्वी काव्यलेखनाकडे वळला. Tentativa del hombre infinito (१९२६, इं. शी. अटेंप्ट ऑफ द इन्‌फिनिट मॅन), El hondero entusiasta (१९३३, इं. शी. द. इंथ्यूझिॲस्टिक, स्लिंगशूटर व Residencia en la tierra (१९३३, इं. शी. रेसिडंझ ऑन द अर्थ) हे त्यानंतरचे त्याचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह. ‘रेसिडंझ ऑन द अर्थ’ विशेष प्रसिद्ध आहे. मृत्यूची आणि अस्तित्वाच्या सतत होत असलेल्या विघटनाची जाणीव त्यातील कवितांतून तीव्रतेने प्रकट झालेली आहे.

पाब्लो नेरुदा

१९२७ मध्ये त्याची रंगून येथे वाणिज्यदूत म्हणून नेमणूक झाली आणि त्यानंतर राजनैतिक सेवेच्या निमित्ताने यूरोपात, द. अमेरिकेत आणि अतिपूर्वेकडील काही देशांत त्याचे वास्तव्य झाले. त्याच्या काव्यलेखनात मात्र खंड पडला नाही. ब्वेनस एअरीझ येथे असताना प्रसिद्ध स्पॅनिश कवी आणि नाटककार फ्रेदेरीको गारसीआ लॉर्का ह्याच्याशी त्याचा स्नेह जुळून आला. १९३५ मध्ये वाणिज्यदूत म्हणून तो माद्रिदला आला आणि स्पॅनिश विचारवंतांनी त्याचे हार्दिक स्वागत केले. १९३६ मध्ये स्पेनमध्ये यादवी युद्धाचा भडका उडाला. त्याचे भीषण स्वरूप पाब्लोने अनुभवले. लॉर्काचाही त्यात बळी गेला. या युद्धामुळे निर्माण झालेल्या वेदनेचा खोल संस्कार पाब्लोच्या मनावर उमटला. Espana en el corazon (इं. शी. स्पेन इन द हार्ट) ह्या त्याच्या काव्यात त्याचे प्रतिबिंब पडलेले आहे. ही कविता युद्धकाळात गाजली. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वातावरणातून स्फुरलेल्या अनेक कविता त्याने लिहिल्या. रशियनांनी स्टालिनग्राडमध्ये जर्मनांना केलेला प्रतिकार त्याला विशेष स्फूर्तिप्रद वाटला.

चिलीयन सेनेटचा सदस्य म्हणून १९४५ मध्ये तो निवडून आला आणि देशाच्या विविध प्रश्नांत त्याने आस्थेने लक्ष घातले. १९४८ मध्ये चिलीयन सरकारमध्ये उजव्या प्रवृत्तींचा प्रकर्ष होऊन साम्यवादी पक्षावर बंदी आल्यामुळे त्याला देश सोडवा लागला. १९५२ मध्ये पुन्हा देशांत येणे शक्य झाले. दरम्यानच्या काळात पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेस तो उपस्थित राहिला. सोव्हिएट यूनियनलाही त्याने भेट दिली (१९४९). ह्याच काळात Canto general (१९५०, इं. शी. जनरल साँग) हे अमेरिकेवरील महाकाव्य त्याने लिहीले. यूरोपच्या प्रभावातून मुक्त झालेल्या स्पॅनिश-अमेरिकन कवितेचा साक्षात्कार ह्या महाकाव्याने घडविला.

चिलीत १९७० मध्ये सत्तेवर आलेल्या साल्वादोर आयंदे ह्या मार्क्सवादी अध्यक्षाने पाब्लोची फ्रान्समध्ये राजदूत म्हणून नेमणूक केली. १९७३ च्या सप्टेंबरात चिलीत लष्करी उठाव होऊन आयंदेला ठार करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच सॅंटिआगो येथे पाब्लोचे जीवनही संपुष्टात आले.

एक महान शांततावादी आणि मानवतावादी कवी म्हणून पाब्लोची ख्याती आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्याची कविताही विकसित, परिपक्व होत गेली. माझे जीवन हीच एक दीर्घ कविता असून मृत्यू समयीच्या अखेरच्या शब्दांबरोबरच ती संपेल, अशा आशयाचे उद्‌गार त्याने काढले होते. एक उत्कट भावकवी म्हणून स्वतःच्या अंतःविश्वात खोलवर तो वावरलाच तथापि बाह्य जगातील कठोर आणि व्यापक वास्तवतेला सामोरे जाण्याचेही सामर्थ्य त्याच्यात होते. भावकवितेपासून महाकाव्यापर्यंत विविध प्रकारची कविता त्याने समर्थपणे लिहीली. भावकवी म्हणून वॉल्ट व्हिटमनशी त्याचे निकटचे नाते होते. अतिवास्तववादी प्रतिमाही त्याच्या कवितांतून आढळतात. १९७१ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

जागतिक शांतता संघटनेचा (वर्ल्ड पीस कौन्सिल) १९५० पासून तो सदस्य होता. १९५३ मध्ये त्याला स्टालिन शांतता पारितोषिक देण्यात आले. १९५० मध्ये त्याने भारताला भेट दिली होती आणि काही नामांकित भारतीय साहित्यिकांशी स्नेह जोडला होता.

कुलकर्णी, अ. र.