नेपाळ : भारत व चीन (तिबेट) या दोन प्रबळ राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या द. उतारावर अत्यंत मोक्याच्या जागी वसलेला छोटासा, परंतु अत्यंत महत्त्वाचा स्वतंत्र सार्वभौम देश. क्षेत्रफळ १,४१,७२० चौ. किमी. लोकसंख्या १,१५,५५,९८३ (१९७१), १९७६ च्या अंदाजाप्रमाणे १,२८,५७,२४३. विस्तार २६°२२′ उ. ते ३०° २७′ उ. आणि ८०° ४′ पू. ते ८८° १२′ पू. यांदरम्यान, पूर्व-पश्चिम लांबीसु. ८०० किमी., दक्षिणोत्तर रुंदी सु. १४४ ते २५६ किमी. व उंची सु. २०० मी. ते ८,८४८ मी. असून याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. नेपाळ–तिबेट सीमा सु. ६४० किमी. व नेपाळ–भारत सीमा सु.९६० किमी. आहे. देशाची राजधानी काठमांडू ही असून लोकसंख्या ३,५३,७५६ (१९७१) आहे.
हिमालयाच्या उत्तरेकडील चीनच्या प्रभावक्षेत्राची दक्षिण मर्यादा म्हणजे नेपाळ होय. बलवान नेपाळ चीनला गंगेच्या खोऱ्यात उतरण्यास अटकाव करू शकतो. या दृष्टीने नेपाळचे भूराजकीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.
तिबेटी भाषेत ‘ने’ म्हणजे घर आणि ‘पाल’ म्हणजे लोकर. लोकरीच्या विपुलतेमुळे या देशाला नेपाळ हे नाव मिळाले असावे किंवा ने म्हणजे मध्य व ‘पा’ म्हणजे देश यावरून तिबेटी लोक याला नेपा म्हणत असावेत किंवा विष्णुमती व बाघमती या नद्यांच्या संगमावर तपश्चर्या करणाऱ्या ने नावाच्या मुनीच्या आशीर्वादाने व आज्ञेप्रमाणे येथील राज्य चालत असे, म्हणून ने मुनीने पालित–नेपाल–नेपाळ असे नाव पडले असावे.
भूवर्णन : पूर्वी नेपाळ देश बाघमतीच्या खोऱ्याइतकाच (काठमांडू खोऱ्याइतकाच) मर्यादित होता व प्राचीन काळी तेथे एक सरोवर होते. चीनमधून आलेल्या मंजुश्री बोधिसत्त्वाने डोंगराला खिंडार पाडून येथील नागर सरोवराचे पाणी प्रवाहबद्ध केले–तीच बाघमती नदी–होय व तेथील कोरड्या भूभागावर आपल्या अनुयायांची वस्ती करून, आपला शिष्य धर्माकार याला तेथील राजा केले, या आख्यायिकेने दुजोरा मिळतो. नेपाळचा सु. ७५% भूप्रदेश डोंगराळ आहे. नेपाळात दक्षिणेकडून उत्तरेकडे एकामागोमाग एक चढत गेलेल्या शिवालिक (शिव लेख), महाभारत लेख (पर्वतरांग) आणि हिमाद्री (ग्रेटर हिमालय) या पर्वतश्रेणी सामान्यत: पूर्व–पश्चिम गेलेल्या असल्यामुळे (१) भारताच्या सीमेवरील सु. २०० मी. उंचीचा सखल, सपाट व अरुंद तराई पट्टा, (२) त्याच्या उत्तरेकडील चुरिया डोंगर, शिवालिक पर्वतश्रेणी व अंतर्गत तराईचा महाभारत लेखपर्यंतचा सु. ६०० ते ९०० मी. उंचीचा प्रदेश, (३) त्याच्या उत्तरेचा महाभारत लेख व मुख्य हिमालय श्रेणी यांदरम्यानचा २,५०० ते ४,००० मी. उंचीचा मध्यवर्ती डोंगराळ प्रदेश आणि (४) त्याच्याही उत्तरेचा ७ ते ८ हजार मी. पर्यंत उंचावत गेलेला हिमाद्रीचा प्रदेश, असे नेपाळचे प्रमुख स्वाभाविक विभाग पडतात.
तराई हा वास्तविक गंगेच्या खोऱ्याचाच जलोढनिर्मित भाग आहे. तो सु. १६ ते ४८ किमी. रुंदीचा सखल आणि सपाट प्रदेश असून, पश्चिमेकडे नारायणी व राप्ती नद्यांजवळ बराच अरुंद झालेला आहे. नारायणीच्या पूर्वेस सु. ६५ किमी. तो खंडितच झाला असून तेथे भारताची सीमा शिवालिक टेकड्यांच्या माथ्यावरूनच जाते. हा प्रदेश पूर्वेस जास्त रुंद आहे. तराईचा दक्षिणेकडील सु. १६ किमी. रुंदीचा पट्टा हा नेपाळमधील अत्यंत समृद्ध शेतीचा व दाट लोकवस्तीचा प्रदेश असून, त्याच्या उत्तरेचा पर्वतपायथ्याचा प्रदेश दाट अरण्यांचा, दलदलींचा, वन्यपशूंनी गजबजलेला व हिवतापाच्या उपद्रवाचा आहे.
तराईच्या उत्तरेला शिवालिक पर्वतश्रेणी सरासरी १,५०० मी.पर्यंत उंचावत गेलेली आहे. पूर्व भागात तिलाच चुरिया डोंगर म्हणतात. काही ठिकाणी ही श्रेणी व उत्तरेकडील महाभारत पर्वतश्रेणी एकत्र आल्या आहेत. शिवालिक व महाभारत लेख यांदरम्यान सु. ६०० ते ९०० मी. उंचीच्या व सु. १६ किमी. रुंदीच्या पट्ट्यात सु. ३२ ते ६४ किमी. लांबीचे ‘दून’ नावाचे द्रोणी प्रदेश आहेत. राप्ती, चितवन व डांग हे मोठे दून आहेत.
दून प्रदेशाच्या उत्तरेला सु. ३,००० मी.पर्यंत उंचावणारी महाभारत लेख ही श्रेणी आहे. शिवालिक श्रेणीच्या वराहपृष्ठ (हॉग बॅक) दृश्यापेक्षा या श्रेणीचे क्षरणजन्य दृश्य वेगळे दिसते. या श्रेणीतून वाट काढलेल्या नद्यांनी समुद्रसपाटीपासून केवळ २०० ते ४०० मी. उंचीवर असलेल्या खोल घळ्या खोदलेल्या आहेत. उतार उभे व डोंगरकणे फार उंचसखल आणि तुटक आहेत. येथे स्लेट, गारगोटी, शिस्ट, संगमरवर इ. रूपांतरित खडक असून संकोचनकारक भूसांरचनिक हालचाली झालेल्या दिसतात. या श्रेणीतून पलीकडे जाण्यास अनेक खिंडींतून व पल्याणांतून मार्ग गेलेले आहेत. या भागात २,००० मी. उंचीपर्यंत विरळ लोकवस्ती आहे व व्यापारमार्गांच्या आधारे तानसेन व धनकुटा यांसारखी नगरेही उदयास आली आहेत.
महाभारत पर्वतश्रेणी व हिमाद्री श्रेणी यांदरम्यान ६०० ते २,००० मी. उंचीची, सु. ९०० किमी. लांबीची व ६० ते १०० किमी. रुंदीची नेपाळची मध्यभूमी आहे. येथेच काठमांडू, पोखरा, सल्यान, रुमनतर, तुमलिंगतर, सेराबसी, पाल्पा, मलमची, हेलमू, ओखलडुंगा, पायुंग इ. सुपीक खोरी आहेत. उत्कृष्ट हवा, उपोष्णकटिबंधीय व शीतकटिबंधीय हवामानात होणारी कोणतीही धान्ये, फळफळावळ, भाजीपाला, फुलझाडे पिकवू शकेल अशी सरोवरीय मृदेची उत्कृष्ट जमीन, दक्षिणोत्तर वाहणाऱ्या नद्या आणि पूर्व–पश्चिम श्रेण्यांचे ४,००० मी. पर्यंतही उंच गेलेले दक्षिणोत्तर फाटे यांमुळे विविध वैचित्र्याने व सृष्टिसौंदर्याने नटलेला भूप्रदेश, दोन्ही बाजूंच्या पर्वतश्रेणींनी संरक्षिलेला प्राचीन संस्कृतीचा वारसा आणि विभिन्न लोकसमुदायांनी दीर्घकाळ जपलेली आपापली वैशिष्ट्ये आणि शेकडो पूजास्थाने यांनी समृद्ध असलेला दाट लोकवस्तीचा हा भूभाग खरोखरच नेपाळचा हृदयप्रदेश या संज्ञेला पात्र आहे. हा प्रदेश स्तरित खडकांचा असून कित्येक ठिकाणी वाळूमिश्रित गाळाची माती व धोंडमाती आढळते. पोखरा खोऱ्यातील फेवातालसारखी काही सरोवरेही आहेत.
उत्तरेकडील हिमाद्रीचा उत्तुंग हिमाच्छादित पर्वतशिखरांचा आणि त्याच्या दोन्ही बाजूंचा पायथ्याचा प्रदेश हा जगातील सर्वांत उंच डोंगराळ प्रदेश होय. नेपाळच्या मध्यभूमीपासून हा २,००० ते ६,०००–७,००० मी. व त्याहीपेक्षा अधिक उंचीपर्यंत झेपावत चढत जातो. या प्रदेशात ८,००० मी.पेक्षा उंच असलेली मौंट एव्हरेस्ट (८,८४७.६ मी.), कांचनजंघा (८,५९८ मी.) मकालू (८,४८१ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), मानास्लू (८,१५६ मी.) व अन्नपूर्णा (८,०७५ मी.) ही सहा अत्युच्च शिखरे आणि सु. वीस शिखरे ७,५०० मी. पेक्षा उंच आहेत. अन्नपूर्णा व धौलागिरी यांमधील आडवे अंतर फक्त सु. ३५ किमी. असून त्यांमधून काली गंडक ही नदी अवघ्या १,२०० मी. उंचीवरून वाहते. हिमालयाच्या या रांगेमधून तिला छेदून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या व त्यांदरम्यानचे प्रचंड गिरिपिंड हे एक चित्तथरारक अद्भुत दृश्य आहे. दामन, धूलिखेल आणि नगरकोट येथून अत्युच्च हिमाच्छादित शिखरांचे अविस्मरणीय आणि विलोभनीय दृश्य दिसते. विशेष म्हणजे वर उल्लेखिलेल्या गंगेच्या खोऱ्याकडे वाहणाऱ्या नद्या व ब्रह्मपुत्रेच्या (त्सांगपोच्या) खोऱ्याकडे वाहणाऱ्या तिबेटी नद्या यांमधील जलविभाजक, ही अत्युच्च पर्वतश्रेणी नसून तिच्या उत्तरेकडील तिबेट पठाराची डोंगराळ दक्षिण कड ही आहे नेपाळातून भारतात व तिबेटमध्ये जाण्यास कांग ला, डंबक, तित्पाला, नारा, लार्के, व्यास, लिपूलेख, नामजा, पिंडू, ग्या इ. अनेक खिंडींतून मार्ग आहेत.
नेपाळमधील नद्या पर्वतश्रेणींदरम्यानच्या भागांत सामान्यत: पूर्व–पश्चिम आणि पुढे पर्वतश्रेणींना छेदून दक्षिणेकडे वाहत जातात व तराईतून जाऊन शेवटी गंगेला मिळतात. कर्नाली, गंडकी (गंडक) व कोसी या प्रमुख नद्या असून चमलिया (काली), सेती, कर्नाली, भेरी, काली गंडक, त्रिशूली, सुन कोसी, अरुण व तमुर या नद्यांनी मध्य नेपाळचे नऊ स्वाभाविक विभाग पाडले आहेत. यांशिवाय राप्ती, नारायणी, बाघमती आणि हुमला, रुद्रमती, मणिमती, हनुमती, भद्रमती, विष्णुमती, प्रभावती, कर्मनाशा इ. नद्या नेपाळचे जलवाहन करतात. काली, कर्नाली, राप्ती वगैरे मिळून घागरा सप्तगंडक, सेती, नारायणी वगैरे मिळून गंडकी आणि सप्त कोसी, अरुण, तमुर वगैरे मिळून कोसी या गंगेच्या भारतातील मोठ्या उपनद्या बनतात. डोंगराळ भागातील नद्या वेगाने वाहून आपली पात्रे खोल खणत जातात त्यांतूनच कित्येक दुर्गम मार्ग गेलेले आहेत. तराईच्या सपाट भागात या नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे मोठ्या दलदली निर्माण होऊन वाहतुकीच्या व लोकवस्तीच्या मोठ्या समस्या उभ्या ठाकतात. हिमालय पर्वतरांगेतून आलेल्या नद्यांना पावसाखेरीज वितळलेल्या बर्फाचेही पाणी मिळते. रारा, फोकसुंद, फेवा, रूपा, देपांग व मैदी ही नेपाळातील प्रमुख सरोवरे होत.
हवामान : नेपाळचे हवामान त्याच्या भूपृष्ठरचनेप्रमाणेच विविध स्वरूपी आहे. तराईत उपोष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे उष्ण आणि दमट १,२०० ते २,१०० मी. उंचीपर्यंत उबदार समशीतोष्ण २,१०० ते ३,३०० मी. पर्यंत थंड समशीतोष्ण ४,२०० ते ४,८०० मी. पर्यंत आल्प्स प्रकारचे व त्यापेक्षा जास्त उंचीवर तपमान नेहमी ०° से. पेक्षा कमी असल्यामुळे सदैव हिमाच्छादित प्रदेश, असे हवामानाचे स्थूलमानाने वर्गीकरण करता येईल. पाऊस पूर्व भागात मोरांग येथे सु. १८० सेंमी., तर पश्चिम भागात कांचनपूर येथे सु. ८० सेंमी. असतो. काठमांडू खोऱ्यात जानेवारीचे सरासरी तपमान १०° से., जुलैचे २६° से. व पर्जन्यमान जून ते सप्टेंबर १४५ सेंमी. असते. कमाल ३७° से. व किमान –३° से. अशी तपमानाची नोंद झालेली आहे. पोखरा खोऱ्यात जानेवारीत ४° से. तर जूनमध्ये ३८° से. तपमान असते. हिवाळ्यात दिवसा सु. २१° से. तपमान असल्यामुळे हवा प्रसन्न असते. उत्तरेच्या अन्नपूर्णा श्रेणीमुळे पाऊस सु. २५० सेंमी. पडतो. पर्वताच्या दक्षिण उतारावर सूर्यकिरण अधिक उभे पडल्यामुळे तपमान वाढते त्यामुळे स्थानिक ऊर्ध्वगामी वारे उत्पन्न होऊन मोसमी वाऱ्यांच्या आगमनापूर्वीच जोराची गडगडाटी वादळे होतात. ती बहुधा संध्याकाळीच होतात आणि त्यांबरोबर पडलेल्या गारांचा खच दुसऱ्या दिवसापर्यंतही टिकतो. कित्येकदा ही वादळे मोसमी वाऱ्यांत मिसळून जातात. पावसाळ्यात नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहतात. कधीकधी त्यांची पातळी नेहमीपेक्षा साठपटही वाढते. पुलांच्या अभावी वाहतूक बंद पडते. ओंडक्यांतून कोरलेल्या होड्या प्रवाह ओलांडण्यास निरुपयोगी ठरतात आणि झाडाझुडुपांतून जाताना पायांना चिकटलेल्या जळवा भयंकर रक्तशोषण करतात. हिवाळ्यास तपमान एकदम उतरते आणि उन्हाळ्यात उघडे पडलेले डोंगर पुन्हा हिमाच्छादित होतात. पूर्वेकडे २,८०० मी. उंचीपर्यंत व पश्चिमेकडे २,००० मी. उंचीपर्यंत हिमाच्छादन खाली येते. पश्चिमेकडे कर्नालीच्या खोऱ्यात कित्येकदा डोंगर तापून हवा ओढून घेतात वरून खाली येणाऱ्या हवेबरोबर आलेल्या ढगांमुळे डोंगरउतार वनस्पतियुक्त, तर दऱ्यांचे तळ मात्र मरुप्रदेशासारखे कोरडे, असे विपरीत दृश्य काही ठिकाणी दिसते पश्चिम नेपाळात उन्हाळ्यात कधीकधी उष्मा भयंकर होऊन‘लू’ हे गुदमरून टाकणारे उष्ण वारे वाहतात. मोसमी वाऱ्यांचा पाऊस ७,००० मी. पेक्षा अधिक उंचीवर सहसा परिणामकारक होत नाही. उलट वायव्येकडून वर्षभर वारे येत असतात. यामुळे मौंट एव्हरेस्टसारख्या उंच उंच शिखरांवर सर्वत्र हिमाच्छादन नसून काही भाग उघडेच राहतात. हिमालयाचे दक्षिण उतार एकदम खडे असल्यामुळे त्यांवर लांब हिमनद्या निर्माण होत नाहीत. उत्तर उतार सौम्य असल्यामुळे ३,५०० ते ५,००० मी. उंचीवरील खोऱ्यांत खुंबू, लांगटांग यांसारख्या २०–२५ किमी. लांबीच्या हिमनद्या निर्माण होतात.
वनस्पती : तराईच्या उत्तर भागात सु. ८०० किमी. लांबीचा, मोसमी पानझडी अरण्याचा सलग पट्टा आढळतो. त्यात साल, शिसू, खैर, बर्च (भूर्ज) इ. वृक्षही आढळतात. शिवालिक व महाभारत पर्वतश्रेणींच्या १,५०० ते ३,००० मी. उंचीच्या प्रदेशांत चीड, देवदार, ओक, उंच ऱ्होडोडेंड्रॉन, पॉप्लर, अक्रोड व लार्च इत्यादींची मिश्र अरण्ये आहेत. शिवालिक अरण्यातील जमीन खडकांची व कमी खतमातीची असल्यामुळे जमिनीलगत छोटी झुडुपे फारशी आढळत नाहीत. ती सु. २,००० मी. उंचीवर दिसू लागतात. दक्षिण तराईतील अरण्ये लागवडीसाठी तुटली आहेत व या अरण्यांचीही बेसुमार तोड होत आहे. त्यामुळे जमिनीची धूप, भूमिपात, पूर इ. संकटे उद्भवतात. मध्य नेपाळच्या डोंगराळ प्रदेशातील अरण्ये अशीच तुटली आहेत. मुख्य हिमालय श्रेणीवर सु. ३,९०० मी. उंचीवरील तरुरेषेखालच्या प्रदेशात उत्कृष्ट अरण्ये आहेत. त्यांत स्प्रूस, फर, सायप्रस, जूनिपर, बर्च इ. वृक्ष आढळतात. त्यापेक्षा अधिक उंचीवर आल्प्स प्रकारच्या वनस्पती, तऱ्हेतऱ्हेची रंगीत फुलझाडे आणि कमी उंचीची ऱ्होडोडेंड्रॉन झाडे इ. वनस्पती आहेत. जपा पुष्प हे नेपाळचे राष्ट्रीय फूल आहे. सुमारे चार-साडेचार हजार मी. उंचीवर, हिमरेषेखाली गवताळ कुरणे आहेत. उत्तरेकडील अरण्यात जमिनीलगत झुडुपांची इतकी दाटी असते की, साध्या पायवाटासुद्धा दरवर्षी झुडुपे तोडून साफ कराव्या लागतात. विशेषतः बांबू सर्वत्र वेगाने वाढतो.
प्राणी : तराईच्या अरण्यात वाघ, चित्ता, गौर (रानबैल), महिष, क्वचित हत्ती, चितळ, सांबर, बारशिंगा, माकडे व चितवन भागातील राप्ती खोऱ्यात भारतीय एकशिंगी गेंडा, अनेक जातींचे सर्प, मोठमोठे विंचू व इंगळ्या, नद्यांतून मासे व सुसरी आहेत. भारतातील पक्ष्यांप्रमाणेच येथील पक्षी आहेत. बेसुमार शिकारीने वैशिष्ट्यपूर्ण प्राणिजीवन नष्ट होऊ नये, म्हणून त्याला शासकीय संरक्षण दिले जात आहे. मध्य डोंगराळ भागात अरण्ये तुटल्यामुळे बरेच प्राणी नष्ट झाले आहेत. थोडे चित्ते, अस्वले, छोटे मांसभक्षक प्राणी, मंटजॅक (भुंकणारे हरिण) इ. प्राणी आहेत. हिमालयाच्या उंच भागात अल्पाइन प्रकारच्या प्रदेशांत कस्तुरी मृग, ताहर नावाचा बिनदाढीचा रानबोकड, गोराल हरिण, रानबकऱ्या, लांडगे, हिमचित्ते असून कृकण किंवा महोका पक्षी विपुल आहेत. चकोर (डांफे) हा नेपाळचा राष्ट्रीय पक्षी आहे. नद्यांतून महासीर हे मोठे खाद्य मासे आहेत. येथे ‘येती’ या विवाद्य हिममानवाच्या पावलांचे ठसे पुष्कळांनी पाहिले आहेत.
इतिहास : काश्मीरप्रमाणे नेपाळ खोरेही पूर्वी जलमय होते. कश्यप मुनींनी पाट फोडून काश्मीरमधील पाणी काढून टाकले. तेव्हा तेथे वस्तीसाठी जागा उपलब्ध झाली. अशीच नेपाळबाबत एक दंतकथा रूढ आहे. नेपाळचा ज्ञात इतिहास गौतम बुद्धापासून उपलब्ध होतो. गौतमाचे जन्मगाव लुम्बिनी नेपाळात आहे. सम्राट अशोक नेपाळात गेला, त्याने तेथे चार स्तूप बांधले व स्तंभ उभारले. अशोककन्या चारुमती हिचे विवाहोत्तर जीवन नेपाळात गेले. रामपत्नी (जनकराजकुमारी) सीता हिचाही जन्म नेपाळमधील जनकपूर येथे झाला, अशी समजूत आहे.
राजपूत घराणी नेपाळात कशी व केव्हा गेली, त्याविषयी निश्चित माहिती मिळत नाही. पण गुरखा या ठिकाणी गोरखनाथ आणि कालिकादेवी यांची दोन मंदिरे आहेत. किरातवंशी २९, सोमवंशी ५ व सूर्यवंशी ३१ राजे झाल्यावर ठाकूर राजवंशी अंशुवर्मन (इ. स. ५९५–६४०) हा प्रख्यात पराक्रमी राजा तेथे होऊन गेला. त्याने तिबेटी व चिनी राजकन्यांशी लग्ने केली होती. त्यांच्या प्रभावामुळे तो बौद्ध झाला, असे मानतात. यानंतर सत्ताधारी छोटे छोटे क्षत्रिय राजे (लिच्छवी) झाले. चोविसी, बाविसी राज्यांचे गट नेपाळी इतिहासात आढळतात. ते खरोखर २४ आणि २२ अशा राज्यांचे (त्यांच्या राजांचे) गट होते.
चौदाव्या शतकात नेवारी मल्ल राजांचा प्रभाव पडू लागला. जयस्थितिमल्ल आणि त्याचा नातू यक्षमल्ल ह्या दोघांची कर्तबगारी मोठी होती. आजचे महान राजप्रासाद, काही मंदिरे आणि जयस्तंभ हे मल्ल राजवटीचे अवशेष होत. त्यांनी देवळांची व्यवस्था चांगली लावली तसेच नवी वस्ती केली. रयतेला पद्धतशीर धारे घालून दिले. मल्ल घराण्याच्या आणखी कर्तबगारीचा इतिहास १९६३ च्या सुमारास इटालियन संशोधक जूझेप्पे तूची यास मिळाला. बरेच शिलालेख त्याने हुडकून काढले पण त्यांवरून संकलित इतिहास अद्याप कोणी लिहिला नाही.
चौदाव्या शतकात तर तीनशे–साडेतीनशे वर्षे पुन्हा छोट्याछोट्या स्थानिक राजांचा कारभार चालला. तमाम नेपाळचा असा कर्तबगार समर्थ राजा पृथ्वीनारायण १७४० च्या सुमारास चमकला. ह्याची हयात ५५ वर्षांची होती. गुरखा घराण्यात नेपाळी राजलक्ष्मी याने पुन्हा नेली. आधुनिक नेपाळचा तो जनक समजतात. सध्याचा राजवंश त्याच्याच वंशातील आहे.
पृथ्वीनारायणानंतरच्या चौथ्या-पाचव्या पिढीचे राजे दुर्बल आणि व्यसनी निघाले. राजेंद्र वीरविक्रम (१८१६–४७) आणि सुरेंद्र वीरविक्रम (१८४७–८१) या दोघांच्या कारकीर्दीत फार मोठ्या उलथापालथी झाल्या. सवतीमत्सराने कळस गाठला. भर राजवाड्यात रक्ताचे पाट वाहिले. राजसत्तेलाही संन्यास मिळाला. थापा पंतप्रधान जाऊन जंगबहादुर राणा पंतप्रधान झाला. (१८४६) आणि त्याने राष्ट्रहितासाठी राजसत्तेला ग्रहण लावले. सर्व सत्ता स्वतःकडे घेतली आणि राजे नाममात्र राहिले. पंतप्रधान, प्रमुख सेनानी आणि महाराज असे तीनही हुद्दे जंगबहादुरकडे आहे. राजघराणे महाराजाधिराज ठरले. पंतप्रधान (= तीन सरकार) आणि महाराजाधिराज (= पाच सरकार) असा पर्याय रूढ झाला. त्यानंतर राणांची राजवट आली.
राणा राजवट : (१८४६–१९५०). राजेंद्र वीरविक्रम याच्या वेळी (का. १८१६–४७) अंतर्गत कारस्थानास ऊत आला होता. पंतप्रधान प्रथम भीमसेन थापा (का. १८११–३९) आणि नंतर मातबरसिंह थापा (का. १८४३– ४५) असे होते. राजेंद्राचा एक मुलगा अल्पवयी वारला. त्याला पंतप्रधान भीमसेन थापाने मारले, असा राजेंद्राने आरोप केला. ही मानहानी सहन न होऊन भीमसेनाने आत्महत्या केली (१८३९). त्यानंतर अधिकार पतकरण्यास कोणी तयार होईना. भीमसेनचा मुलगा मातबरसिंह हिंदुस्थानात होता. त्याला आग्रहाने बोलावून घेतले पण राणीवशात त्याच्याविरुद्ध भयंकर कट शिजले. दोन-अडीच वर्षांच्या आतच मातबरला आपल्या पुतण्याच्या हातून मरण आले. हा पुतण्या म्हणजे जंग बहादूर राणा. तोच राणा-राजवटीचा संस्थापक होय. याच्या तोडीचा कारस्थानी, चतुर, मुत्सद्दी, हिंदुस्थानातही त्या वेळी नव्हता. नेपाळच्या इतिहासात ब्रिटिश राजकारणात आणि एकंदर कर्तबगारीत तो विख्यात ठरला.
जंग बहादुराच्या हातून चुलत्याचा खून करविणाऱ्या राजसत्तेला (राज्ञीसत्तेला) त्याच्याकडून तसेच आणखी खून करवावयाचे होते पण जंग बहादूर सावध होता. आपली सत्ताही त्याने सावरली होती. पंतप्रधान होताच त्याला राजपुत्राचा खून करण्याचे फर्मान मिळाले त्याने आज्ञाभंग पतकरला म्हणून त्यावर मारेकरी घातले पण त्यातून तो कसाबसा बचावला. महाराज (सुरेंद्र वीरविक्रम) याच्या जिवास धोका आहे, असे कळताच त्याने त्याचे संरक्षण प्राणपणाने केले. राजेसाहेबांना सुखासमाधानात ठेऊन त्याने सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. पेशवे–छत्रपती यांचे संबंध शेवटी जसे होते, तसाच प्रयोग नेपाळात जंग बहादूरने केला आणि हा राजसत्तासंन्यास सनदशीर मार्गाने घडवून आणला. जंग बहादुराच्या घराण्यास वंशपरंपरा लाभलेली सनद म्हणजे राजकीय शास्त्रातील एक अभ्यसनीय खर्डा आहे.
विलायतची वारी, इंग्रजांशी दोस्ती आणि १८५७ च्या उठावातील नानासाहेबांस आश्रय ह्या तीन घटनांत जंग बहादूरला यश आले. त्याचे चातुर्य, करारीपणा, दांडगा आत्मविश्वास आणि कमालीचा खंबीरपणा या गुणांचे प्रदर्शन वारंवार व्हावे, असे प्रसंग त्याच्यावर आले. ह्या सर्वांतून तो शीरसलामत पार पडला. नेपाळी इतिहासाला निराळे वळण लावणारा हा प्रभावी नेता ठरला. त्याने आपल्या वारसांचा क्रम ठरविला. वडील बंधूने अधिकारपद पतकरावे – नंतर धाकट्या भावांकडे क्रमाक्रमाने सत्ता जावी. मग वडील भावाच्या पुत्रांचा क्रम– अशी ही तरतूद होती. जंग बहादूरची सु. ३० वर्षांची कारकीर्द नेपाळच्या इतिहासात विशेष महत्त्वाची ठरली. तीमुळे नेपाळचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले. नेपाळी जवानांना परदेशांतून पाचारण करण्यात येऊ लागले व नेपाळचे राजकीय क्षेत्र वाढले. बराच प्रदेश पुन्हा नेपाळात सामील झाला. जंग बहादूर १८७७ मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर दीपसिंग, वीर समशेर, देव समशेर, चंद्र समशेर, भीम समशेर, युद्ध समशेर, पद्म समशेर आणि मोहन समशेर या क्रमाने राणा अधिकारपदावर आले. पाच सरकार त्रिभुवन वीरविक्रमांनी मोहन समशेरविरुद्ध बंड केले, ते भारतीय आश्रयाला गेले नंतर मोठ्या इतमामाने पुन्हा परत आले. मोहन समशेरने आपल्या पदाचा व अधिकाराचा रीतसर त्याग केला. यामुळे राजसत्तेला लागलेले ग्रहण सुटले आणि राणा महाराज मागे पडले. सुमारे शंभर वर्षे डौलात मिरवणारा हा डोलारा पुढे निष्प्रभ ठरला.
इंग्रजांशी संबंध : सरहद्दीपलीकडचा शेजारी म्हणून ईस्ट इंडिया कंपनी नेपाळकडे पहात होती. तराई, गढवाल, कुमाऊँ, डेहराडून इकडे ब्रिटिश सरहद्दीजवळ नेपाळी सत्ता पोहोचली होती. नेपाळबद्दल ब्रिटिशांना फारशी माहिती नसली, तरी त्यांचा शेजार फार सुखावह नाही हे त्यांना कळले. शिवाय राजवाड्यातील कारस्थाने आणि अकार्यक्षम प्रशासन यामुळे वाटणारी अस्थिरता ब्रिटिशांना नको होती. रणबहादूर (१७९९–१८१६) राजावर काही कारणांमुळे नेपाळ सोडण्याची पाळी आली. अशांना हाती धरून त्या त्या देशाच्या राज्यकारभारात लुडबुडण्याची ब्रिटिश राजनीती असल्याने रणबहादूरला ब्रिटिशांनी कर्ज दिले. त्याची बडदास्त चांगली ठेवली आणि मग वसुलीचा तगादा लावला. तराईच्या हद्दीसंबंधी वाद उत्पन्न केला. वाटाघाटीबद्दल विचार करण्यासही नेपाळी दरबारला फुरसत मिळाली नाही. नेपाळने जी दोनशे खेडी काबीज केली ती ताबडतोब परत मिळविण्यासाठी ब्रिटिशांनी मोहीम आखली. नेपाळचा सेनानी अमरसिंह थापा, ब्रिटिश सेनानी डेव्हिड ऑक्टर्लोनी अशांचा सामना जुंपला. नेपाळवर चारी बाजूंनी ब्रिटिशांनी चढाई केली. तीत पुष्कळ हानी सोसून त्यांना हार खावी लागली. कारण नेपाळचा डोंगराळ प्रदेश गनिमी काव्यास फार अनुकूल होता त्यामुळे ब्रिटिश सैन्य टेकीस आले. कित्येक सेनाधिकारी ठार झाले. ब्रिटिश लष्करी इभ्रतीस हा फार मोठा डाग लागला. ऑक्टर्लोनी मख्खपणे काठमांडूवर चाल करणार एवढ्यात सिगावलीचा तह निश्चित झाला (१८१५–१६). ह्या तहानुसार कुमाऊँ, डेहराडून, सिमला हे प्रदेश ब्रिटिशांकडे गेले. अमरसिंह थापाने आपल्या पुत्राकरवी राजेसाहेबांस काठमांडूस लिहविलेली पत्रे ब्रिटिशांच्या हाती पडल्यामुळे त्यांचे डोळे उघडले व त्यांनी घाईने ही मोहीम थांबविली. मुत्सद्देगिरी आणि राजनिष्ठा यांनी ओथंबलेली ही पत्रे अभ्यसनीय आहेत. या युद्धात ब्रिटिशांना नेपाळी ‘कुकरी’ च्या प्रभावाचा एक मोठा शोध लागला. गुरखा पलटणी ब्रिटिश सैन्यात अजूनही सामील आहेत, त्याचे मूळ या शोधात व मोहिमेत आहे.
नेपाळी राजकारणात जंग बहादूरचे वर्चस्व ब्रिटिश मुत्सद्यांना परवडणारे होते. अस्वस्थतेऐवजी खंबीरपणा कुणाला नको असतो ? म्हणून जंग बहादूरने जे जे केले त्यास ब्रिटिशांनी मान्यता दिली शिवाय वर इंग्लंडभेटीचे निमंत्रणही धाडले. जंग बहादूरच्या या विलायतच्या वारीमुळे (१८५०–५१) नेपाळचे राजकारण पार बदलले. ब्रिटिश अधिकारीही खूष राहिले. जंग बहादूरला ब्रिटिश सामर्थ्याची आणि मुत्सद्देगिरीची जाणीव झाली. परिणामी ब्रिटिशांना नेपाळात पाय पसरायला मिळाले नाहीत आणि ब्रिटिश दोस्तीमुळे जंग बहादूरचे आसन स्थिरावले.
नेपाळपासून खरा लाभ ब्रिटिशांना झाला तो १८५७ च्या उठावात. गोंधळ सुरू होताच जंग बहादूरने आपण होऊन ब्रिटिशांना मदत देऊ केली. लखनौच्या सुटकेसाठी गोरखपूर येथे गुरखा शिपायांनी शौर्याची शर्थ केली. ब्रिटिशांना मोठी कृतज्ञता वाटली. जंग बहादूरवर यावेळी सन्मानांचा वर्षाव झाला.
नानासाहेब (पेशवा) नेपाळात जंग बहादूरच्या आश्रयास राहिला (१८५८). त्याला आश्रय देण्यात ब्रिटिशांची नाखुषी जंग बहादूरने पतकरली, ही त्याची एक महत्त्वाची कामगिरी होय.
पहिल्या-दुसऱ्या जागतिक युद्धांतही गुरखे सैनिक जगभर चमकले. अडीच लाख गुरख्यांची भरती पहिल्या महायुद्धासाठी झाली.. वीस हजारांनी धारातीर्थी देह ठेवला. दुसऱ्या महायुद्धाखातर दीड लाखांहून अधिक गुरखे ब्रिटिश तैनातीत होते. अनेकांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळविले.
हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षे ब्रिटिशांना गुरखा भरतीसाठी भारतामध्ये कचेरी ठेवता आली मग मात्र ती नेपाळी हद्दीत नेली.
नेपाळ–ब्रिटिश तह (१९२३ चा) महत्त्वाचा आहे कारण त्यायोगे नेपाळचे स्वातंत्र्य मान्य झाले. १९३४ मध्ये नेपाळमधील ब्रिटिश वकिलातीचा दर्जा वाढविला आणि १९५० मध्ये नवा तह रद्द केला. ह्या तहानुसार मागील सर्व तह रद्द ठरले. ‘ओजस्वी राजन्य’ हा नेपाळी सन्मान राजे पंचम जॉर्ज (१९३४) यास, नंतर सहावे जॉर्ज यांच्या एलिझाबेथ राणीस (१९४६) मोठ्या थाटाने बहाल करण्यात आला. शिवाय सहावे जॉर्ज नेपाळी लष्कराचे सन्मान्य सेनानी ठरले. जंग बहादूरच्या मागून सत्ताधिकारी ठरणाऱ्यांस ब्रिटिश पदव्या-किताब आपोआप मिळत असत.
दुसऱ्या एलिझाबेथ राणीने १९६१ मध्ये नेपाळला भेट दिली. ड्यूक साहेबांनी तराईत शिकारीची मजा लुटली.
नेपाळची अधिष्ठात्री देवता पशुपतिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ यांचेही वर्चस्व तेथील धर्मकारणात फार मोठे आहे. गुरखे हे गोरखनाथ पूजक अशी भावना प्रचलित आहे. बद्रीकेदार यात्रेची पूर्ती पशुपतिनाथ दर्शनाने होते. म्हणून शिवरात्रीस नेपाळात यात्रेसाठी भारतीय भाविक मोठ्या संख्येने जातात.
गंगा–यमुना दुआबात यवनाक्रमण होऊ लागले म्हणून अनेक पंडित घराणी उत्तरेकडे नेपाळात गेली. बहुतेक नेपाळी जनांची इच्छा गंगास्नानाची, काशी–प्रयाग यात्रेची असल्याने, भारत–नेपाळ संबंध सदैव मित्रत्वाचे राहिलेले आहेत.
हिंदुस्थानचे नेपाळशी निकटचे संबंध होते. १८५७ च्या उठावात त्याची कसोटी लागली. नानासाहेब आपल्या कुटुंबियांसह नेपाळात गेले तसेच अनेकजणही गेले. सर्वांना जंग बहादूरने आश्रय दिला. ब्रिटिशांचा सक्त तगादा असता, जंग बहादूर आपल्या व्रतापासून ढळला नाही. पुढील काळातदेखील ब्रिटिश कचाटीतून सुटण्यासाठी अनेक राजकीय कार्यकर्ते नेपाळच्या आश्रयाने राहिले. १९२३ पासून नेपाळी स्वातंत्र्य मान्य झाल्यावर तर हे आश्रयस्थान अधिक सुरक्षित ठरले.
भारतीयांच्या स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम नेपाळी जनतेवर झाला. आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्याची मर्यादा त्यांना कळली. ‘तीन सरकारचे’ प्राबल्य– ‘पाच सरकारची’ दुर्बलता–त्यांना आवडत नव्हती. परदेशात लढून परत आलेल्यांनी स्वतंत्र राष्ट्रातले पाणी चाखले होते. नेपाळी प्रगतीच्या त्यांच्या कल्पना निराळ्या होत्या. भारतीय क्रांतिकारकांचे प्रयत्न पाहून आपणही नेपाळात क्रांती करावी, अशी इच्छा कित्येक गुरख्यांच्या मनात आली. डेहराडून, कुमाऊँ, दार्जिलिंग इ. ठिकाणी क्रांतिकारक नेपाळी राहत. भारतीय संस्थानी प्रजांचा लढा संघटित होता तसाच आपलाही असावा, म्हणून नेपाळी प्रजा परिषद (१९२३), नेपाळी नॅशनल काँग्रेस (१९३८) इ. राजकीय संस्था नेपाळी नागरिकांनी (हिंदुस्थानात) स्थापिल्या. हिंदुस्थानातील असहकाराच्या आणि छोडो भारतच्या चळवळीत नेपाळी लोकांनी भारतीयांबरोबर भाग घेतला आणि कारावास पतकरला. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे नेपाळी तुरुंगात सापडले असता मोठ्या शिताफीने त्यांची सुटका नेपाळी प्रजाजनांनी केली.
भारत स्वतंत्र झाल्यावर नेपाळी चळवळींना अधिक चालना मिळाली. तत्पूर्वी ब्रिटिशांचा छळ चुकविण्यासाठी अनेक कार्यकर्ते नेपाळात जात तसेच राणा सत्तेची कटकट टाळण्यासाठी नेपाळी कार्यकर्ते हिंदुस्थानात राहू लागले. पुढे नेपाळी अधिकारी, राणा आणि त्याचे पक्षपाती भारत सरकारकडे संशयी दृष्टीने पाहू लागले परंतु खुद्द त्रिभुवन विक्रमांना भारतीय आसरा लाभला आणि नंतर योग्य इतमामाने ते काठमांडूत स्वतंत्रपणे स्थापित झाले. ह्या घटनेचा अर्थ नेपाळी जनतेला विपरित वाटला. भारतातील शेकडो संस्थाने विलीन केली असता नेपाळचे राज्य मात्र थाटामाटाने कायम राहिले. हे प्रजा पक्षीय नेपाळी पुढाऱ्यांना रुचले नाही.
नेपाळचे साहचर्य लक्षात घेता भारत सरकारने नेपाळला अनेक प्रकारे साहाय्य देऊ केले, मदत दिली किंवा न दिली, तरी गैरसमज फैलावण्याची भीती असल्याने सर्व कारभार ‘आस्ते कदम’ ठेवावा लागला. शिवाय अमेरिका, ग्रेट ब्रिटन, रशिया, चीन इ. प्रबळ राष्ट्रांचेही नेपाळ मदतीचे प्रयत्न सढळ हाताने चालू होते. शिक्षणखाते, घटना परिषद, शासनव्यवस्था, न्यायखाते यांच्या रचना-फेररचना भारतीय सहकार्याने पार पडल्या. नवे थेट रस्ते (त्रिभुवन राजपथ १२१ किमी.), विमानतळ यांची बांधणी–उभारणी झाली. कोसी, गंडकी यांची प्रचंड धरणे त्रिशूली प्रकल्प यांसाठी उभय शेजाऱ्यांचे सहकार्य लाभले. सुमारे ८० कोट रु. यासाठी भारत सरकारने खर्च केले. नेपाळी जवानांच्या तांत्रिक शिक्षणाची सोय भारतामध्ये झाली. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी नेपाळला भेटी दिल्या. नेपाळी महाराजाधिराज, त्यांचे वेळोवेळीचे प्रधान यांची भारतभेटही थाटामाटाची तसेच हार्दिक प्रेमाची झाली.
राणा राजवटीत राज्यकारभाराची मर्यादा पैसे वसूल करण्याइतपत होती. राष्ट्रद्रोही व विध्वंसक लोकांची हद्दपारी हेही त्या वेळी मुख्य सरकारी कार्य होते. आरोग्य, शिक्षण, रस्तेबांधणी, पाणीपुरवठा इ. सोयींकडे लक्ष देण्यास शासनात फुरसत नव्हती. शिवरात्रीच्या किंवा इतर वेळच्या यात्रेकरूंची थोडीबहुत सोय होई पण ती कुणातरी राजपत्नीच्या अथवा राणापत्नीच्या धर्मादायांपैकी एक कार्य असे. काही पाठशाळा अशाच कुठल्या तरी धर्मादायातून चालत. त्या बंद करण्याचे धारिष्ट्य शासनात नव्हते, म्हणून त्या चालू राहिल्या.
नेपाळी समाजाला १९४८ मध्ये एकदम नव्याने पुष्कळ सोई मिळू लागल्या. कारण या वेळी भारत हे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले होते आणि साहजिकच इंग्रजांचे वर्चस्व कमी झाले होते. त्यामुळे १३ एप्रिल १९४८ रोजी पद्म समशेर जंग बहादूरने नेपाळात सनदशीर राज्यकारभार सुरू केला. त्यानुसार जिल्हा आणि ग्रामपंचायतींची स्थापना झाली. कायदेमंडळात निवडलेले, नेमलेले सभासद, मंत्रिमंडळाची योजना, हे हक्क प्रजेला मिळाले पण या घटना कायद्यांतील (१) राणा हे यावच्चंद्र दिवाकरौ पंतप्रधान राहतील व (२) सर्व बाबतींत अखेरचा निर्णय पंतप्रधानांचा राहिल, ह्या दोन अटी मात्र तीन वर्षांच्या आत नाममात्रच ठरल्या.
त्रिभुवन वीरविक्रम नव्याने गादीवर स्थापित होताच (१८ फेब्रुवारी १९५१) सनदशीर राजसत्ता नेपाळात नांदू लागली. दहा जणांचे संमिश्र (राणा-काँग्रेस) मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले पण नऊ महिन्यांत ते गडगडले. शुद्ध नेपाळी काँग्रेसचे १४ जणांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. त्यांनाही काढून टाकून सल्लागारांची कारकीर्द सुरू करावी लागली. पुन्हा दोन मंत्रिमंडळे–एक राष्ट्रीय प्रजापक्षाचे आणि दुसरे पाच पक्षांचे संमिश्र, अशी सत्ता रूढ झाली. असा अस्थिर प्रकार नेपाळी मंत्रिमंडळाबाबत चालू होता. १९५१ ते १९६६ पर्यंत १६ मंत्रिमंडळे बनली. कित्येक मंत्र्यांना तसेच मुख्यमंत्र्यांनाही कारावास भोगावा लागला. कित्येकांवर खटले भरले व त्यांना शिक्षाही झाल्या. त्रिभुवन वीरविक्रम कैलासवासी झाले (१९५५). त्यांच्या जागी त्यांचे पुत्र महेंद्र वीरविक्रम यांची रीतरसर स्थापना झाली. त्यांनी देश-विदेशभर दौरे केले. नेपाळचे महत्त्व जगाला पटत चालल्याने त्यांचे सर्वत्र थाटाचे स्वागत झाले. ब्रिटन भेटीत तर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला (ऑक्टोबर १९६०). १९४९ मध्ये नेपाळला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला नाही पण १९५६ मध्ये तो मिळाला आणि सर्व आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ नेपाळच्या दिशेने वाहू लागला. महेंद्र विक्रमांची ही मोठीच कर्तबगारी म्हटली पाहिजे परंतु मंत्रिमंडळातील गोंधळामुळे त्यांनाही संविधान रद्द ठरवून सर्वाधिकार हाती घ्यावे लागले.
नव्या संविधानाप्रमाने १९५९ मध्ये नव्याने निवडणुका पार पडल्या. नेपाळी काँग्रेसला बहुमत मिळाले व त्यांचे नवे मंत्रिमंडळ स्थापन झाले पण मंत्रिमंडळ व राजा महेंद्र यांचे संबंध कधीच समझोत्याचे नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळ अस्थिर राहिले. स्वराज्याचा प्रयोग नेपाळात म्हणावा तसा व तितका यशस्वी झाला नाही. अखेर १९६२ मध्ये हे संविधान रद्द होऊन नवीन राजेशाही संविधान मान्य झाले व राजा हा सत्ताधारी म्हणून मान्य झाला. राजा महेंद्र मरण पावला (१९७२) आणि विरेंद्र हा त्याचा मुलगा गादीवर आला. तथापि सरकारविरोधी चळवळी चालू राहिल्या. खम्पा या जमातीच्या लोकांनी १९७३ मध्ये काठमांडूचे जीवन विस्कळीत करून अशांतता माजविण्याचा प्रयत्न केला. याच सुमारास वीरेंद्र राजाने माओ-त्से-तुंगची भेट घेतली. चीनने खम्पांच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारावे म्हणून सांगितले. खम्पांचा पुढारी वांगडी आणि इतर ४,००० दंगेखोर यांना पकडले. १९७३–७४ मध्ये अनेक दहशतवादी लोकांना पकडण्यात आले. २४ फेब्रुवारी १९७५ रोजी वीरेंद्र राजास राज्याभिषेक झाला. तत्पूर्वी १० नोव्हेंबर १९७४ रोजी त्याने आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले व संविधानीय सुधारणांसाठी एक आयोग नेमला. अधिकृत रीत्या राजा झाल्यानंतर देशात सर्वत्र प्राथमिक शिक्षण मोफत झाले. नागेंद्र प्रसाद रिजाल (१९७३–७५) यांनी राजीनामा दिल्यानंतर वीरेंद्र राजाने डॉ. तुलसी गिरी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. (१ डिसेंबर १९७५) आणि त्या वेळी राष्ट्रीय पंचायत या सभेचे ते सदस्य झाले. यानंतर वीरेंद्र यांनी १२ डिसेंबर १९७५ रोजी संविधानात बदल केले. त्यांपैकी मतदारसंघाचा विस्तार, राष्ट्रीय पंचायतीच्या प्रसंगोपात्त वारंवार निवडणुका आणि सदस्यांच्या बाबतींत प्रत्यावाहन या महत्त्वाच्या असून हे बदल संविधान सुधार-समितीने सुचविले होते. डॉ. तुलसी गिरी यांचा पंचायत पद्धतीतील आमूलाग्र बदलास विरोध होता, म्हणून त्यांनी ९ सप्टेंबर १९७७ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला. राजे वीरेंद्र यांनी १२ सप्टेंबर १९७७ रोजी डॉ. कीर्तिनिधी बिस्त यांची नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. यापूर्वी तीन वेळा ते पंतप्रधान होते. त्यांचा एकूण कल पंचायत पद्धत अधिक प्रातिनिधिक व लोकशाहीवादी करण्याकडे असून सध्याच्या पक्षहीन पंचायत पद्धतीस त्यांचा विरोध आहे. नेपाळमध्ये राजे त्रिभुवन यांच्या कारकीर्दीत (१९५१–६२) संसदीय लोकशाहीचा प्रयोग झाला. नेपाळी काँग्रेसचे नेते बी. पी. कोईराला त्या वेळी पंतप्रधान होते व राजाचे स्थान केवळ संविधानात्मक प्रमुख एवढेच होते पण त्रिभुवन यांच्या मृत्यूनंतर गादीवर आलेले राजे महेंद्र यांनी ही पद्धत रद्द केली आणि राजकीय पक्षांवर बंदी घातली. राजे वीरेंद्र नेपाळच्या गादीवर आल्यापासून पूर्वीच्या धोरणात काही बदल होत आहेत तथापि सध्याच्या संविधानाप्रमाणे राष्ट्रीय पंचायत ही देशासाठी कायदे करणारी सर्वोच्च संस्था असून, तिचे सभासद विभागीय पंचायतींमार्फत निवडतात. ही पद्धत रद्द होऊन प्रत्यक्ष निवडणुकांवर अधिष्ठित अशी लोकशाही पद्धत नेपाळमध्ये सुरू करावी, ही नेपाळी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. भारत, चीन व अमेरिका नेपाळच्या विकासासाठी सढळ हाताने मदत करीत आहेत.
टिकेकर, श्री. रा.
न्याय : १९५१ पर्यंत कायद्याचे स्वरूप मध्ययुगीन होते. खून, गोहत्या, अत्याचार, बंड व युद्धाच्या वेळी पलायन यांकरिता फाशीची शिक्षा होती. १९५६ च्या कायद्यानुसार दिवाणी आणि फौजदारी न्यायालये अस्तित्वात आली. स्थानिक व विभागीय पातळीवर वरील न्यायालये असून काठमांडू येथे सर्वोच्च न्यायालय आहे. १९५९ च्या घटनेनुसार सर्वाधिकार असलेले प्रधान न्यायालय असून बंदीप्रत्यक्षीकरण (हेबिअस कॉर्पस) कायदा जारी करण्याचा अधिकार त्याला आहे.
संरक्षण : नेपाळचे सैन्यदल सु. २०,००० सैनिकांचे आहे. ब्रिटन व अमेरिका यांच्या साहाय्याने त्याला आधुनिक स्वरूप दिले जात आहे. सहा वाहतूक विमाने व तीन हेलिकॉप्टर आहेत.
आर्थिक स्थिती : देश डोंगराळ असला, तरी लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. काठमांडू, पोखरा यांसारखी उंचावरील खोरी, नदीखोऱ्यांचे रुंद भाग आणि तराईचा दक्षिण भाग हे प्रमुख शेतीप्रदेश असून सु. ९२% लोक शेतीवर अवलंबून आहेत. एकूण १,४१, ५७७ चौ. किमी. जमिनीपैकी ३१·७% जमीन अरण्याखाली, १४·९% कायम हिमाच्छादित, १४% लागवडीखाली, १३·१% लागवडयोग्य पड, १८·७% पड आणि ७·७% नद्या, रस्ते, गावे यांखाली आहे. भात, मका, बार्ली, ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, बटाटे, कडधान्ये–डाळी, मिरच्या, कांदे व तीळ, मोहरी इ. तेलबिया, ताग, अफू, चहा, तंबाखू, कापूस तसेच अक्रोड, सफरचंद, जरदाळू, पीच, डाळिंबे, आंबा, पेरू, संत्री, नासपती, पपई, फणस, चिंच, बोर इ. भारतीय फळे, ही पिके होतात. १९७५–७६ मध्ये २६·०५ लक्ष मेट्रिक टन भात, ७·४८ लक्ष मे. टन मका, १·६९ लक्ष मे. टन भरडधान्ये, ३·८५ लक्ष मे. टन गहू, ६९ हजार मे. टन तेलबिया, २·३४ लक्ष मे. टन ऊस, ३·१६ लक्ष में. टन बटाटे, ४१ हजार मे. टन ताग, ५ हजार मे. टन तंबाखू, असे उत्पादन झाले. नेपाळात धान्याचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक होत असल्यामुळे ते मुख्यतः भारताकडे निर्यात होते. तराईतील उत्पादन देशातल्या देशात कमी उत्पादनाच्या भागात पाठविणे वाहतुकीच्या अडचणीमुळे कठीण जाते ते निर्यात करणे अधिक सोयीचे असते. काही ठिकाणी सोपान-शेती होते तथापि तीव्र उतारावर ती करणे कठीत जाते. राप्ती खोऱ्यातील हिवतापाचे निर्मूलन झाल्यामुळे तेथे पुनर्वसन करून ते काठमांडू खोऱ्यास जोडणे, अल्पसंख्य श्रीमंतांच्या हाती असलेली करमुक्त जमीन कमी करून व ती सुटसुटीत आकाराची करून भूमिहीनांना देणे इ. सुधारणा मार्गस्थ आहेत. जलसिंचनाची प्रधान समस्या नव्या धरण योजना व जुन्या कालव्यांची दुरुस्ती यांनी सोडविली जात आहे. त्रिजुगा नदीवर चंद्रनहर हा सु. २४ किमी.चा कालवा आहे. फेवाताल, सिर्सिया, धुशॉरा, तिलाऊ इ. योजनांमुळे सु. ११,३४० हे. जमीन ओलिताखाली आली आहे. काठमांडू खोऱ्यातील गोदावरी, बोसन, राजकुलो हे कालवे दुरुस्त झाले असून राप्ती, दुन्द्वा, कमला ह्या कालव्यांचे काम पूर्ण होत आले आहे. भारत सरकारच्या वतीने कोसी नदीवर ९६ कोटी रु. खर्चाचे मोठे धरण होत आहे. सध्या अवघी ४% लागवडीखालील जमीन ओलिताखाली आहे. पशूपालन हा नेपाळी लोकांचा दुसरा प्रमुख व्यवसाय आहे. १९७५ मध्ये देशात ६६ लक्ष गाई–बैल, ३८·६ लक्ष म्हशी, २३·१ लक्ष मेंढ्या, २३·४ लक्ष शेळ्या, ३·१५ लक्ष डुकरे, २० कोटी कोंबड्या होत्या. त्यांपासून ६८३ टनदूध, ८·१ टन लोणी व तूप, ७३·५ टन चीज, ७१·४ टन मांस, १३ टन अंडी व ६·५ टन लोकर असे उत्पन्न झाले. नेपाळात गोवधास बंदी आहे. अरण्यातून १९७२ मध्ये मऊ व कठीण मिळून औद्योगिक उपयोगी लाकूड ५·६ लक्ष घ. मी. व इंधनोपयोगी लाकूड ८७ लक्ष घ.मी. प्राप्त झाले. अरण्यातून मध व अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती गोळा करून मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जातात. वाहतुकीच्या चांगल्या सोयींच्या अभावामुळे वनसंपत्तीचा पुरेसा उपयोग करता येत नाही. अविचारी जंगलतोड व कारभारशून्यता यांमुळे वनस्पतींचा ऱ्हास होत आहे. १९७३ मध्ये एकूण २·२ लक्ष घ.मी. कापीव लाकूड मिळाले. नद्या व सरोवरे यांतून १९७२ मध्ये २,२०० मे. टन मासे मिळाले.
खनिज संपत्ती : नेपाळातील महत्त्वाचे खनिज म्हणजे अभ्रक. त्याच्या खाणी काठमांडूच्या पूर्वेस कुसमा येथे आहेत. शिवालिक पर्वत भागात निकृष्ट जातीचा कोळसा सापडतो. तांबे, कोबाल्ट व लोहधातुक यांचे काही साठे आहेत. जस्त, शिसे, निकेल, ग्रॅफाइट यांचेही काही साठे आहेत. चुनखडक व जिप्सम बराच आहे. काही जागी सदाप्रज्वलित नैसर्गिक वायू आहे. त्यावरून वायू व खनिज तेल यांची शक्यता आहे. फूल चौकी येथे लोहधातुक, शिसे, जस्त आरखले येथे तांबे, शिसे मंजेरखोला येथे शिसे, जस्त भोरले, पागासिंग, खोकलिंग, तुंगधाम येथे निकेल तिपलिंग येथे जस्त दुगलुंग येथे शिसे बैसखानी, नपसा, ग्याजी, बुढरखोला येथे तांबे सांगलेखोजा, बरहाधरे येथे चांदी काही नद्यांच्या वाळूत सोन्याचे कण, डोंगराळ भागात गेरू व सुरमा ही खनिजे सापडतात.
शक्तिसाधने : नेपाळात जलविद्युत् हेच खरे शक्तिसाधन आहे. येथील नद्या म्हणजे सुप्तजलशक्तीचे मोठे साठे आहेत. तिसऱ्या योजनेप्रमाणे ६०,००० किवॉ. जलविद्युत्निर्मिती संकल्पित आहे. कोलंबो योजना व भारत यांच्या साहाय्याने त्रिशुली योजना पुरी झाली म्हणजे औद्योगिक वाढीला गती मिळेल. १९७५–८० ह्या पाचव्या योजनेचा अदमासे खर्च १,०११ कोटी नेपाळी रुपये आहे. १९८० नंतरच्या दशकात अमेरिकेच्या १०० कोटी डॉलर मदतीने पुऱ्या होणाऱ्या योजनांमुळे उत्तर भारताचीही विजेची गरज पुरी होईल. चार योजनांद्वारा वाहतूक व संदेशवहन, शक्तिउत्पादन, कृषी व जलसिंचन, तंत्रज्ञांचे प्रशिक्षण व शाळा उभारणी या बाबींवर विशेष खर्च करण्यात आला.
उद्योगधंदे : शक्तिसाधने व वाहतूकसाधने यांच्या विकासाअभावी नेपाळातील उद्योगधंदेही विकसित झालेले नाहीत. या तिन्हींचा विकास आता होऊ लागला आहे. तथापि अद्याप कापड विणणे, लाकूडकाम, धातुकाम, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे इ. गृहोद्योग व लघुउद्योग शेतीवर व जंगल उत्पादनावरच अवलंबून आहेत. खनिजांचे साठे मर्यादित असल्यामुळे भारी उद्योग विकसित झालेले नाहीत. विराटनगर येथील ताग उद्योगाने पुष्कळ विदेशी चलन मिळते. १९७६ मध्ये ताग गिरण्यांना लागलेल्या आगीमुळे निर्यातीवर परिणाम झाला. तसेच दरवर्षी शेकडा ८ या प्रमाणात होणाऱ्या जंगलनाशाचाही दुष्परिणाम उद्योगांवर होत आहे. नवीन उद्योग-विकास धोरणामुळे १९७५–८० च्या पाचव्या पंचवार्षिक योजनेत कापड, वनस्पती तेल, कागद लगदा इ. उद्योग निघत आहेत. इमारती लाकूड व पर्यटन हे उद्योगही विदेशी चलन मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विराटनगर, वीरगंज, भैरव व नेपाळगंज येथील साखरकारखाने, जनकपूरचा सिगारेट कारखाना, हिटौडातील लाकूड गिरण्या, तराईतील तांदूळ सडण्याच्या, पोहे कांडण्याच्या आणि तेलाच्या गिरण्या तसेच आगपेट्या, कातडी सामान, पादत्राणे, रासायनिक पदार्थ इ. नवीन उद्योग सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रातच अधिक निघाले आहेत. १९७४–७५ मध्ये १२,२६५ मे. टन ताग ११,९२६ मे. टन साखर ६,००० हेलि. बिअर ३०० कोटींवर सिगारेटी ६,४९,१४२ ग्रोस आगपेट्या ७०,००० जोड्या पादत्राणे १५६ मे. टन अगंज पोलाद भांडी असे प्रमुख औद्योगिक उत्पादन झाले.
अर्थकारण : नेपाळी रुपया हे चलन असून त्याचे वजन १७१ ग्रेन असते (भारतीय रुपया १८० ग्रेनचा असतो). त्याचे १०० नेपाळी पैसे होतात. १,२,५,१०,२५ व ५० पैसे आणि १ रुपया यांची नाणी, तर १,५,१०,१००,५०० व १,००० ने. रुपयांच्या चलनी नोटा असतात. एका भारतीय रुपयाला १.३५ नेपाळी रुपये मिळतात. डिसेंबर १९७६ मध्ये १ पौंड स्टर्लिंग = २०·७१ ने. रु. १ अमेरिकी डॉलर = १२·५० ने. रु. १०० ने. रु. = ४·८३ पौंड = ८ डॉलर असा विनिमय दर होता. इतर चलनांप्रमाणे नेपाळी रुपयाची किंमतही पुष्कळदा कमीजास्त झालेली आहे. नेपाळ राष्ट्र बॅंक ही मध्यवर्ती बॅंक नाणी व नोटा काढते. १९७४–७५ च्या अर्थसंकल्पात आय ९५·९७ कोटी ने रु. व व्यय १७४·०८ कोटी ने. रु. संकल्पिला होता. भारत, अमेरिका, चीन, ब्रिटन व प. जर्मनी यांच्या साहाय्याने तूट भरून काढावयाची होती. १५ जुलै १९७६ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी हे आकडे अनुक्रमे ११८·२६ कोटी ने. रु व १९८·१३ कोटी ने. रु. असे होते. यांपैकी विकास खर्च १२४·८७ कोटी ने. रु. होता व परदेशांकडून साहाय्य आणि देशात व बाहेर उभारलेली कर्जे यांनी तूट भरावयाची होती. काठमांडू येथील १९६२–६३ चा उपभोग्य वस्तूंच्या किंमतींचा दर्शकांक १०० धरून १९७५–७६ चा दर्शकांक २६१·१ होता. पाचव्या (१९७५–८०) पंचवार्षिक योजनेत शेती, भूसुधार, सिंचन, वनविभाग, पुनर्वसन इत्यादींवर किमान ३१६·७ कोटी ने रु. व कमाल ३९७·०८ कोटी ने. रु. उद्योग, व्यापार, वीज व खाणी यांवर अनुक्रमे १७९·९९ कोटी ने रु. व २०४·०४ कोटी ने. रु. वाहतूक व संदेशवहन यांवर अनुक्रमे २५२·७१ कोटी ने. रु. व ३३८·५४ कोटी ने. रु. आणि शिक्षण, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि इतर सामाजिक सोयींसाठी १७०·३ कोटी ने. रु. व २००·७४ कोटी ने. रु. अशी तरतूद आहे.
व्यापार : नेपाळचा बहुतेक आयात-निर्यात व्यापार भारताशी होतो. भारताबाहेरून नेपाळला जाणाऱ्या बहुतेक आयात वस्तू कलकत्ता बंदरातून जातात. १९७४ मध्ये भारताने आधी उपदान मिळणाऱ्या वस्तूंच्या किंमतींत वाढ केली. १९७६ मध्ये नेपाळ-भारत व्यापार व अधिक्रमण करार संपला तो पुन्हा झाला नाही. १९७५ मध्ये नेपाळने चीन व उत्तर कोरिया यांच्याशी व्यापारी करार केले आणि १९७६ मध्ये रशियाने नेपाळची बहुतेक तेलगरज भागविली. १९७५ मध्ये कुवेतने कुलेखानी येथील जलविद्युत् प्रकल्पाला अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले व इराणचे पर्यटनसुविधा विकासकार्यास मदत देण्याचे ठरविले. १९६९ मध्ये नेपाळची एकूण आयात ६९·९ कोटी ने. रु. व निर्यात ४०·०६ कोटी ने. रु. होती. १९७४–७५ मध्ये ८८·५ कोटी ने. रु. आयातीपैकी ७५% भारताकडून व १०% जपानकडून झाली होती. ४८·९२ कोटी ने. रु. निर्यातीपैकी६०% भारताकडे, १०% बेल्जियम, लक्सेंबर्गकडे व ५% जपानकडे झाली. तीत तांदूळ ३६%, ताग ९%, तागाच्या वस्तू ६% आणि लोणी ५% असे प्रमाण होते. १९७५–७६ मध्ये आयात व निर्यात अनुक्रमे १९३·३ कोटी ने.रु. व ११४·७९ कोटी ने. रु. झाली. प्रमुख आयात कापड, सिगारेट, मीठ, पेट्रोल, रॉकेल, साखर, यंत्रे, औषधे, पादत्राणे, कागद, सिमेंट, लोखंड व पोलाद आणि चहा यांची होते व प्रमुख निर्यात अन्नधान्ये, ताग, इमारती, लाकूड, बसबई गवत, तेलबिया, तूप, बटाटे, औषधी वनस्पती, कातडी, गुरे इत्यादींची होते. नेपाळ बॅंक लि. व नेपाळ राष्ट्र बॅंक या बँका व्यापारासाठी आवश्यक ते साहाय्य देतात.
बॅंका : काठमांडू येथे नेपाळ बॅंक लि. (१९३७), नेपाळ राष्ट्र बॅंक (१९५६), राष्ट्रीय वाणिज्य बॅंक (१९६५) व शेतीविकास बॅंक (१९६८) या बॅंका आहेत. व्यक्ती, सहकारी संस्था, मंडळे इत्यादींस त्यांचा उपयोग होतो. नेपाळमध्ये राष्ट्रीय विमा संस्थान विम्यांसंबंधी कामकाज करते. याशिवाय राष्ट्रीय योजना आयोग, व्यापार व उद्योग महामंडळ, शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, अवजारे इ. मिळवून त्यांचे वितरण करणारे महामंडळ, अन्नपदार्थांचे वितरण करणारे महामंडळ, राष्ट्रीय व्यापारमंडळ, नेपाळ औद्योगिक विकास महामंडळ, दाट लोकवस्तीच्या भागांतून विरळ लोकवस्तीच्या भागात पुनर्वसन करणारे महामंडळ, मीठ व्यापार महामंडळ इ. संस्था आर्थिक बाबतीत विकास घडवून आणीत आहेत.
वाहतूक व संदेशवहन : नेपाळ यातायात संस्थान या महामंडळाकडे नेपाळातील लोहमार्ग, सडका, दोरमार्ग इत्यादींची व्यवस्था आहे. नेपाळच्या डोंगराळ भूरचनेमुळे वाहतूक ही एक मोठी समस्याच आहे. लोहमार्ग फार थोडे असून मुख्य मदार सडका व वायुमार्ग यांवरच आहे. नेपाळात ३,००० किमी.पेक्षा अधिक लांबीचे रस्ते असून त्यांपैकी सु. १,७०० किमी. पक्के रस्ते आहेत. काठमांडूपासून अनेक दिशांना जाणारे छोट्या छोट्या लांबीचे मोटार रस्ते आहेत. काठमांडू व भारतातील लोहमार्ग प्रस्थानक रक्षौल यांना जोडणारा त्रिभुवन राजपथ हा मोटाररस्ता भारताच्या मदतीने १९५६ मध्ये सुरू झाला. सिद्धार्थ महामार्ग हा पोखरा खोरे व भारतीय सीमेवरील सोनौली यांस जोडतो. बुतवाल बारघाट हा ४० किमी. रस्ता ब्रिटिशांच्या साहाय्याने बांधला गेला. महेंद्र महामार्ग एकूण ९९२ किमी. चा असून त्यापैकी ६५५ किमी. पुरा झालेला आहे. (१९७६). काठमांडू–ल्हासा मार्गावरील नेपाळ–तिबेट सीमेवरील कोदारीपर्यंतच्या सु. १०४ किमी. रस्त्याला चीनने मदत केलेली आहे. पोखरा-सुरखेत ४०० किमी. रस्त्याचे काम १९७४ मध्ये सुरू झाले असून तो पुढे होणाऱ्या धनगढी–दादेलधुरा या बारमाही महामार्गाला जोडला जाईल. उत्तर प्रदेशातून टनकपूरमंडी, चंदन चौकी, कर्नाली घाट, नेपाळगंज येथे आणि बिहारमधून वीरगंज, जलेश्वर, जयनगर, विराटनगर, भद्रपूर येथे जाता येते. तराईतून शेकडो पायवाटांनी नेपाळात प्रवेश करता येतो. भारतातून नेपाळला जाण्यास पारपत्र लागत नाही. मात्र नेपाळमधून भारतात विदेशी वस्तू नेण्यास बंदी आहे.
नेपाळातील जनकपूर व बिजलपूर यांस भारतातील जयनगरहून ५३ किमी.च्या अरुंदमापी लोहमार्गाने जाता येते. तसेच भारतातील रक्षौल ते नेपाळातील अमलेखगंजपर्यंत ४८ किमी. अरुंदमापी लोहमार्ग आहे. हिटौडा ते काठमांडू ४२ किमी.च्या दोरमार्गाने अन्नधान्ये, बांधकामाविषयक व इतर अवजड मालाची वाहतूक बारमहा ताशी २५ टन याप्रमाणे होऊ शकते. तथापि अद्यापही नेपाळमधील खिंडीतून व पायवाटांनी माणूस, शेळ्या-मेंढ्या, तट्टे व खेचरे आणि याक यांच्या पाठींवरून होणारी मालवाहतूक व व्यापार महत्त्वाचा आहे. अवघड वाटांनी बकऱ्यांच्या पाठींवरून एकदोन किलो एवढे वजनही नेतात.
शाही नेपाळ नौवहन महामंडळ (१९७२) आणि नौवहन मार्ग (१९७१) सुरू झाला आहे. देशातल्या देशात डोंगराळ रचनेमुळे मोटारप्रवासही कित्येकदा कंटाळवाणा होतो. काठमांडू ते वीरगंज हे सु. २०९ किमी. अंतर मोटारीने जाण्यास सु. १० तास लागतात परंतु विमानाने तेच अंतर अर्ध्या तासाच्या आत काटता येते. भाडेही दुपटीपेक्षा थोडे कमीच पडते. शाही नेपाळ हवाई मार्ग महामंडळ १९५८ मध्ये स्थापन झाले असून, त्याची विमाने काठमांडूच्या गौचोर विमानतळावरून देशातील ११ जिल्ह्यांत आणि कलकत्ता, पाटणा, नवी दिल्ली, बॅंकॉक, रंगून व डाक्का येथे नियमित जा-ये करतात त्यांशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची विमाने नेपाळात ये-जा करतात. भारत व पाकिस्तान यांच्याशी नेपाळचे तारायंत्राने दळणवळण चालते. काठमांडू येथे १९५१ मध्ये स्थापन झालेल्या रेडिओ प्रक्षेपण केंद्रातून नेपाळी, हिंदी, नेवारी व इंग्रजी या भाषांतून प्रक्षेपण होते. १९७५ मध्ये देशात १,५६,००० रेडिओसंच होते. नेपाळमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याची हमी संविधानाने मिळालेली आहे. मुख्यतः काठमांडू येथूनच नेपाळी, नेवारी, हिंदी व इंग्रजी या भाषांतून दैनिके, साप्ताहिके व मासिके प्रकाशित होतात. कॉमनर, गुरखा पत्र, द मदरलॅंड, नया समाज, नेपाळ भाषा पत्रिका, नेपाळ समाचार, दैनिक नेपाळ, द राइझिंग नेपाळ, समय व समाज ही येथील प्रमुख दैनिके आहेत. पर्स्पेक्टिव्ह हे इंग्रजी साप्ताहिक व रॉयल नेपाळ इकॉनॉमिस्ट हे इंग्रजी व नेपाळी मासिकही प्रकाशित होते.
लोक व समाजीवन : १९७६ च्या लोकसंख्येच्या अंदाजाप्रमाणे नेपाळात ६४,७०,९४३ पुरुष व ६३,८६,३०० स्त्रिया होत्या. १९६१ ते १९७१ या दशकात लोकसंख्येची वाढ शेकडा १८·४५ होती. १९७१ ते ७६ या काळात दरवर्षी वाढ शे. २·१६ होती. १९७१ मध्ये ४५,७९,५५२ म्हणजे सु. ४०% लोक शेती, शिकार, वनव्यवसाय व मच्छीमारी यांत होते. १,३७,७५९ लोक सामाजिक, वैयक्तिक वगैरे सेवांत ६३,५६० लोक बांधकामात ५१,९०२ लोक निर्मिति-उद्योगांत ९,६३७ लोक वाहतूक, साठा व दळणवळण यांत आणि बाकीचे अर्थोत्पादक लोक खाणी, वीज, वायू व पाणी, व्यापार, उपाहारगृहे व विश्रामगृहे, अर्थव्यापारसेवा, विमा इ. व्यवसायांत होते.
१९७१ मध्ये जननप्रमाण हजारी ४५ तर मृत्युप्रमाण हजारी २३ होते. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळाल्यास मृत्युप्रमाण आणखी कमी होईल. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला १९७१ मध्ये सु. ८१·६ होती परंतु पर्वतप्रदेश, वनप्रदेश व इतर निरुपयोगी क्षेत्र वगळता ती दर चौ. किमी.ला सु. २०० आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६५% लोक डोंगराळ भागात, ३०% लोक तराई भागात व ५% लोक काठमांडू खोऱ्यात राहतात.
नेपाळात मोठी शहरे फारशी नाहीत. राजधानी काठमांडू, लोकसंख्या १,५३,००० (१९७१) त्याच्याजवळची ललितपूर (पाटण) १,३५,२३० भक्तपूर (भडगाव) ८४,२४० तराईतील विराटनगर– ४५,००० नेपाळगंज–३६,००० वीरगंज–२०,००० आणि हिटौडा, बुटकल, धरान बाजार, थीमी, कीर्तिपुर, राजपुरतवा ही त्यांहून छोटी शहरे आहेत. नेपाळमध्ये भारताच्या बाजूने आलेले आर्य आणि तिबेटच्या बाजूने आलेले मंगोलियन वंशाचे लोक यांचे मिश्रण असलेल्या अनेक जाति-जमाती आहेत. द्रविड वंशाचेही थोडे लोक येथे आहेत. आधुनिक नेपाळचा निर्माता राजा पृथ्वीनारायणशाह म्हणत असे की ‘मेरा देश चार वर्णों और छत्तीस जोतियोंकी फुलवारी (उद्यान) है।’ मध्यवर्ती डोगरदऱ्यांमधील लोकांत ब्राह्मण, छत्री, नेवार, किरांती, लिंबू, राई, तामांग, मगर, सुनवार, गुरूंग, चेपाग इ. जातींचे लोक आहेत. तराईत ब्राह्मण, रजपूत, थारू, दनवार, राजबन्सी, धनगर, मुसलमान इ. असून दलदलीच्या भागांत अवलियांच्या टोळ्या आहेत. हिमालय प्रदेशात शेरपा, ल्होमी, थुदाम, ओलांगचंग, दोल्फो लार्के (तिबेटात अंगठ्याप्रमाणे घुसलेल्या लामा धर्मगुरूंनी गजबजलेल्या मुस्तांग भागातील लोपा) इ. लोक आहेत. तसेच सामान्यतः किरात व लेपचा लोक पूर्वेकडे, गुरूंग आणि मगर पश्चिमेकडे, मध्य भागात नेवार, उत्तर भागात भोतिया, दक्षिण भागात थारू हे लोक आहेत. किरात ही येथील अगदी जुनी जात होय, तिचा उल्लेख वेदांत व महाभारतातही आढळतो. किरातवेषधारी शंकराशी अर्जुनाचे झालेले युद्ध पुराणात प्रसिद्धच आहे. जसजसे दळणवळण वाढत जाईल, तसतसे यांचे प्रादेशिक वेगळेपण कमीकमी होत जाईल. आर्य व मंगोल वंशांच्या मिश्रणाने झालेली नेपाळातील गोरख किंवा गुरखा जमात त्यांच्या चिवट व निकराच्या युद्धगुणांमुळे जगद्विख्यात झाली आहे. ब्रिटिश सैन्यदलात त्यांची यासाठी मुद्दाम भरती केली जाते. काठमांडूपासून पश्चिमेस सु. १०० किमी. दूर असलेल्या गोरखानगर व तेथील गोरखा प्रदेश येथून हे लोक सर्वत्र पसरले आहेत. पुष्कळदा सर्व नेपाळी लोकांनाच गुरखा म्हणतात. तथापि त्यांच्या खस, ठकुरी, मगर व गुरूंग या प्रमुख जाती आहेत. गुरखे लोकांनी सबंध नेपाळात आपले प्रभुत्व स्थापन केले आहे. ते शिवभक्त आहेत. अनेक जाती आणि त्यांचे विशिष्ट रीतिरिवाज यांमुळे नेपाळी लोकांचे जीवन बहुरंगी झाले आहे. सुमारे ९०% लोक हिंदू आहेत. त्यांपैकी काही विष्णुपूजक, तर काही शिवपूजक आहेत. काही दोन्ही देवांचे पूजक आहेत. विवाह, विधवाविवाह, घटस्फोट इ. गोष्टी काही जातींत अगदी सुलभ आहेत. काही लोक मृताचे दहन करतात, काही त्याला पुरतात, तर काही प्रेताला नदीत सोडून देतात. काठमांडू खोऱ्यातील नेवारी लोक शिवभक्त असून शेती, व्यापार, विद्या, कला, साहित्य इत्यादींत पुढारलेले आहेत. ते मधुरभाषी व सौम्य स्वभावाचे आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न प्रथम बालपणीच नारायणाशी किंवा बिल्वफळाशी होते. हे फळ पाण्यात सुरक्षित राहते म्हणून मुलगी नेहमी सौभाग्यवती राहील अशी भावना असते. मोठी झाल्यावर मुलीचे लग्न अनुरूप वराशी होते. खस जातीपैकी थापा लोक दीर्घकाल नेपाळचे प्रधानमंत्री होते. पांडे यांशी त्यांचे वैर असे. ठकुरी लोक शूर व बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध आहेत. तराईतील थारू लोक अशिक्षित व गरीब आहेत. शेरपा लोक गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहेत. चेपांग व किसुंडो लोक भटके आहेत.
नेपाळात धर्मस्वातंत्र्य आहे. तथापि हिंदूंचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे. राजधर्मही हिंदूच आहे. १९७१ च्या खानेसुमारीनुसार देशात ८९·४% हिंदू, ७·५% बौद्ध व ३% मुस्लिम होते. मिशनऱ्यांना देशात परवानगी आहे, परंतु धर्मांतरास बंदी आहे. नेपाळात धार्मिक भावना बरीच प्रबळ आहे. तथापि शैव, वैष्णव, बौद्ध व वज्रयानी तांत्रिक हे संप्रदाय एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत, की एकाच मंदिरात पुष्कळदा शिव, विष्णू, बुद्ध व भैरव यांच्या मूर्ती आढळतात. गौतम बुद्धाचा जन्म नेपाळात कपिलवस्तूजवळील लुंबिनी वनात झाला, यामुळे बौद्धांना नेपाळचे विशेष आकर्षण आहे.
नेपाळी लोक कष्टाळू, उदार, धार्मिक वृत्तीचे आणि आतिथ्यशील आहेत. बहुसंख्य लोक लहानलहान गावांतून राहतात. त्यांची घरे दगड, माती, विटांची व दुमजली असतात. तळमजल्यावर गुरेढोरे बांधतात व सामानसुमान ठेवतात. वरचा मजला राहण्यासाठी असतो. बहुतेक घरे कावेने रंगविलेली असतात. भोवतालच्या हिरव्या वनश्रीत ही तांबूस रंगाची घरे खुलून दिसतात. घरांची छपरे बांबू व गवत यांनी शाकारलेली असतात. सर्वसामान्य नेपाळी माणसाचा वेष म्हणजे अंगात एक सदरा, त्यावर कोट, कमरेला कापडी कमरबंद, खाली अंगाबरोबर पायजमा, डोकीवर नेपाळी टोपी असा असतो. पायात पादत्राण असेलच असे नाही. शहरांतही हाच वेष आढळतो. मात्र कपडे अधिक सफाईदार असून कमरबंद तेवढा नसतो, पादत्राण मात्र असते. नेपाळी टोपी हे वैशिष्ट्य सर्वत्र आढळते. खेड्यांतील स्त्रिया घागरा पेहेरतात, तर शहरांतून बहुधा साडी वापरली जाते. राजाच्या वेषाचे अनुकरण बहुतेक लोक करतात. अलीकडे काही लोक यूरोपीय वेषातही दिसतात. नेपाळी लोकांच्या अन्नात तांदूळ, ज्वारी, बाजरी किंवा गहू, डाळी, कडधान्ये, भाजीपाला, फळे व मांस यांचा उपलब्धतेनुसार समावेश केलेला असतो. चहा, चिरूट, सिगारेट, बिडीकाडी, मदिरा यांचे सेवन सर्रास होते. देशी मद्य जव व गूळ यांपासून तयार होते. विदेशी मद्य बरेच स्वस्त मिळते. शहरांत विदेशी वस्त्रे बरीच स्वस्त मिळत असल्यामुळे बेताच्या प्राप्तीचे लोकही ती वापरू शकतात. विशेष म्हणजे विदेशी लोकांच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे आणि ते चटकन भारी किंमत मोजीत असल्यामुळे येथे फळे, दूध, तूप, भोजन इ. स्वस्त नाहीत. परंतु विदेशी वस्त्रे, ट्रँझिस्टर, कॅमेरे, फिल्म, घड्याळे इ. तुलनेने स्वस्त मिळतात. गरिबी बरीच असून अंगभर वस्त्र, पायात पादत्राण व पोटभर अन्न न मिळालेले लोक सार्वजनिक ठिकाणी अनेक दिसतात. श्रीमंत आणि गरीब यांतील मोठा फरक शहरांतून चांगलाच जाणवतो. नेपाळात शेतीचे काम, दुकाने, भोजनगृहे, उपहारगृहे चालविणे, देण्याघेण्यांचे व्यवहार यांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात.
आरोग्य : स्वच्छतेच्या बाबतीत मात्र नेपाळात सुधारणेला खूपच वाव आहे. काठमांडू शहरातही मोठ्या रस्त्यांवरील भव्य इमारतींमागच्या गल्ली-बोळांतून कमालीची घाण असते. काठमांडू, पोखरा यांसारख्या सपाट खोऱ्यांतून व तराईत नद्यांमध्ये माणसांनी टाकलेल्या घाणीमुळे पाणी कमालीचे दूषित झालेले आहे. मलनिःसारण व्यवस्थेशिवायच शहरे आणि गावे वाढत आहेत उद्योगधंदे वाढत आहेत. भारताप्रमाणेच नेपाळातही प्रदूषणाची समस्या लोकांच्या आरोग्याला भेडसावीत आहे. ही परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नेपाळात ५० रुग्णालये व ९३ आरोग्य केंद्रे आहेत. तिबेटी निर्वासितांसाठी आंतरराष्ट्रीय साहाय्य मिळते.
शिक्षण : साक्षरतेचा प्रश्नही नेपाळात बिकट आहे. साक्षरतेचे प्रमाण १९७१ मध्ये १२·५% इतकेच होते. त्यांत पुरुषांचे २०·४% व स्त्रियांचे २·६% होते. १९७५ मध्ये हे प्रमाण १६% होते. हल्लीचे नेपाळ नरेश राजा वीरेंद्र वीरविक्रमशाह देव यांच्या १९७५ मधील राज्यारोहणप्रसंगी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सार्वत्रिक करण्याची घोषणा झाली. १९७४-७५ मध्ये ७,५८५ प्राथमिक शाळांतून ४,५८,५१६ विद्यार्थी व १८,०७४ शिक्षक १,७६१ माध्यमिक व व्यावसायिक शाळांतून २,१६,३०९ विद्यार्थी व ७,७४९ शिक्षक ८० उच्च शिक्षण संस्थांत २३,४०४ विद्यार्थी आणि १,४९९ शिक्षक होते. १९७१ मध्ये ४९ महाविद्यालये होती. काठमांडू येथे त्रिभुवन विद्यापीठ १९५८ मध्ये स्थापन झाले. त्यात १९७४-७५ मध्ये १७,४५१ विद्यार्थी व १,२८७ शिक्षक होते. तेथे कला, शास्त्र, शिक्षण, वाणिज्य या शाखा आहेत. खेड्यापाड्यांतील मुलांना शाळेत जाण्याच्या वयातच मोलमजुरी करावी लागते किंवा गुरांमागे जावे लागते.
भाषा : नेपाळची अधिकृत भाषा गुरख्यांची गोरखाली म्हणजेच सध्याची नेपाळी असून लिपी देवनागरी आहे. शिक्षणाचे माध्यमही नेपाळीच आहे. शाळांच्या वरच्या वर्गांत इंग्रजी शिकविले जाते. इंडो-यूरोपियन, तिबेटो-ब्रह्मी, ऑस्ट्रो-आशियाई समूहांच्या भाषा येथे प्रचलित आहेत. उत्तर भागात शेरपा, हायू व लापचे पूर्वेला किराती, राई, लिंबू पश्चिमेस गुरूंग, मगर आणि तराई भागात नेपाळी, थारू आणि अवधी, मागधी, भोजपुरी, कुमाऊँनी, मैथिली इ. हिंदीच्या बोली भाषा चालतात. काठमांडू खोऱ्यात नेवारी भाषा चालते. काठमांडू येथे बौद्ध व इतर ऐतिहासिक वाङ्मयाचा संग्रह आहे. भानुभक्त हा एक मोठा कवी नेपाळात होऊन गेला. बाळकृष्ण समशेर यास नेपाळचा शेक्सपिअर मानतात. खुद्द राजा महेंद्र वीरविक्रम हा कवी होता. त्याच्या कित्येक गीतांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे.
सण व उत्सव : नेपाळी जीवनात सण व उत्सव यांना मोठे महत्त्व आहे. हिंदू व बौद्ध दोन्ही धर्म प्रचलित असल्यामुळे काही सण व उत्सव दोन्ही धर्मांचे लोक पाळतात. महाशिवरात्र हा सर्वांत महत्त्वाचा दिवस असतो. यावेळी पशुपतिनाथाची फार मोठी यात्रा असते. त्यासाठी देशाबाहेरूनही पुष्कळ लोक येतात. ‘दशहरा’ म्हणजेच नवरात्र व दसरा यास राष्ट्रीय महत्त्व आहे. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांची पूजा होते आणि दशमीच्या दिवशी मोठे उल्हासपूर्ण वातावरण असते. दिवाळीला येथे ‘नीहर’ म्हणतात. या दिवशी कावळा, कुत्रा (यमराजाचे दूत व द्वारपाल), गाय यांना खाऊ घालतात. भाऊबीजही असते. होळी, श्रीपंचमी (वसंत पंचमी), रामनवमी, कृष्णाष्टमी, गंगादशहरा, मकरसंक्रांत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन इ. सण व उत्सव मोठ्या श्रद्धेने व धामधुमीने साजरे होतात. भाद्रपदात इंद्रयात्रा व गाययात्रा हे विशेष उत्सव असतात. चैत्रात घोडा यात्रा, माघात बाघमतीत माघस्नान, पौषात मच्छिंद्रनाथ उत्सव, वैशाखी पौर्णिमेस बुद्धजयंती, भाद्रपदात बौद्धांचा पंचदान उत्सव, आषाढात घंटाकर्ण उत्सव यांप्रमाणे वर्षभर काही ना काही सण व उत्सव चालूच असतात. राजा पृथ्वीनारायण शाह व नेपाळ नरेश त्रिभुवन वीरविक्रम यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. या सर्व समारंभात आबालवृद्ध सर्वजण मनःपूर्वक भाग घेतात व नाच–गाणी, मेजवान्या, खेळ यांत रममाण होतात. त्यांच्या सामाजिक जीवनात या मनोरंजन प्रकारांना विशेष महत्त्व आहे.
कला व क्रीडा : नेपाळच्या सांस्कृतिक परंपरांवर हिंदू व बौद्ध या धर्मांची छाप आहे. कलेची प्रमुख प्रेरणा धर्म हीच आहे. बुद्ध व शिव ही पूजादैवते आहेत. नेपाळी मूर्तिकला व वास्तुशिल्प यांवर मात्र तिबेटी-चिनी पद्धतीचा स्पष्ट ठसा आहे. धातूच्या, दगडाच्या हस्तिदंताच्या व लाकडाच्या मूर्ती हे येथील कलेचे वैशिष्ट्य आहे. विष्णू, गणेश, भैरव, पशुपतिनाथ या देवता, अनेक प्रकारचे प्राणी हे मूर्तीचे विषय आहेत. पशुपतिनाथ हे सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे. त्याची व भक्तपूरचा न्यतपोला, काष्ठमंडप, तुळजाभवानीचे मंदिर इत्यादींची शैली पॅगोडा पद्धतीची आहे. चैत्यशैलीची बोधनाथाची स्तूपबांधणी हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. नेपाळातील संगीतामध्ये हिमालयीन रम्य पर्वतमय परिसराचे प्रतिबिंब आहे. ग्रामीण भागात लोकगीते व भजने आवडीने म्हणतात. सारंगीवाले व शाहीर गावोगाव फिरतात. देवीनृत्य व भैरवनृत्य हे खास नेपाळी नृत्यप्रकार आहेत.
नेपाळी चित्रकला भित्तिचित्रांत आणि स्वतंत्र चित्रांत दिसून येते. सफाईदार रेषा व उत्कृष्ट रंगसंगती यांनी युक्त असलेली चित्रे मंदिरांच्या भिंतींवर व काठमांडू आणि भक्तपूर येथील संग्रहालयांत आहेत. काठमांडूच्या संग्रहालयात किरात, लिच्छवी, मल्ल इ. विभिन्न काळांतील कलाकृती आहेत. वास्तविक काठमांडू खोऱ्यातील प्रत्येक मंदिर, महाल किंवा घर हे नेपाळी कलेचे नमुनेच आहेत. लाकूड, हस्तिदंत, चांदी, पितळ, तांबे इत्यादींवरील कोरीवकाम तसेच नेपाळी लोकरीच्या शाली व गालिचे यांतही नेपाळी कलेची वैशिष्ट्ये दिसून येतात.
पर्यटन : नेपाळमधील धार्मिक स्थळांसाठी हिंदू व बौद्ध यात्रेकरू भारत, चीन, जपान इ. देशांतून फार मोठ्या संख्येने दरवर्षी येतात. त्यांची राहण्या-जेवण्याची सोय करणे हा बऱ्याच नेपाळी लोकांचा व्यवसाय आहे. तथापि आधुनिक दृष्ट्या नैसर्गिक वनश्री पाहण्यासाठी, मंदिरे वगैरेंचे शिल्प अभ्यासण्यासाठी, गिर्यारोहणासाठी इ. अनेक कारणांनी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. १९७१ मध्ये ४९,४१४ १९७३ मध्ये ६८,०४७ व १९७५ मध्ये ९२,४४० पर्यटक नेपाळात आले होते. काठमांडू येथे आता आधुनिक धर्तीची विश्रामगृहे झालेली आहेत. मोटाररस्त्यांची वाढ होत आहे. पर्यटक मुख्यतः काठमांडू खोऱ्यातच हिंडतात परंतु अलीकडे पोखरा व इतर भागांकडेही त्यांचे लक्ष जात आहे. मंदिरांपैकी काठमांडूजवळचे बाघमतीच्या काठावरील पशुपतिनाथ मंदिर नेपाळात फार प्रसिद्ध आहे. भारतातूनही येथे यात्रेकरूंची रीघ लागलेली असते. भक्तपूरचे पॅगोडा धर्तीचे देवालयही प्रसिद्ध आहे. काठमांडू येथील स्वयंभूनाथाचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात गौतम बुद्धाची प्रचंड मूर्ती असून स्तूपावरील चबुतऱ्यांच्या चारी बाजूंस विशाल नेत्रांच्या जोड्या आहेत. जणू सर्वदर्शी बुद्ध सर्व काही पहात आहे. पशुपतिनाथ मंदिराच्या उत्तरेस सु. १·६ किमी. वर बोधनाथ मंदिर आहे. त्याच्यावरही चारी बाजूंस पाहणारे प्रचंड डोळे आहेत. चोहोबाजूंस ‘ओम् मणिपद्मे हुम्’ हा मंत्र हजारोवेळा लिहिलेली शेकडो प्रार्थनाचक्रे आहेत. ही चक्रे फिरविली की तितके वेळा हा जप केल्याचे पुण्य मिळते असे समजतात. या मंदिराचे अध्यक्ष दलाई लामाचे प्रतिनिधी असतात. पशुपतिनाथासमोरच गोरखनाथ व गुप्तेशरी मंदिरे आहेत. यांशिवाय तुळजादेवी मंदिर, कुमारी मंदिर, गोरखनाथाचे काष्ठमंडप मंदिर, ललितपूर येथील ८०० वर्षांपूर्वीचा क्वा बहल किंवा हिरण्यवर्ण महाविहार, बाघमती नदी व ती जेथे पर्वतभागातून बाहेर पडते तेथील गोकर्ण मंदिर, शिखानारायण येथील वामनाची मूर्ती, कीर्तिपूर येथील बाघभैरव मंदिर, नेपाळ खोऱ्यातील सर्वांत उंच नयातपोला मंदिर, पोखरा खोऱ्यापासून सु. १०० किमी. दूरवरचे ३,९६५ मी. उंचीवरील मुक्तिनाथ मंदिर इ. अनेक मंदिरे आहेत. बहुतेकांची बांधणी लाकडी व कित्येक ठिकाणी मूर्तीही लाकडी आहेत. त्यांवरील शिल्प कलापूर्ण आहे. इलाममध्ये निसर्गसौंदर्य व चहाचे मळे आहेत. पाल्पा खोरे निसर्गसौंदर्य, सुंदर स्त्रिया, मधुर संगीत, मनोहारी नृत्ये, प्राचीन मंदिरे, सुंदर सरोवरे यांसाठी प्रसिद्ध आहे. काठमांडू, पोखरा, नेपाळगंज, कपिलवस्तू (बुद्धाचे जन्मग्राम), वीरगंज, जयनगर, जनकपूर, विराटनगर इ. नेपाळातील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. नामचे बाजार येथे गिर्यारोहकांस आवश्यक ते सामान आणि शेरपा साहाय्यक मिळतात. नेपाळातील उंच पर्वत आणि खोल दऱ्या, घनदाट अरण्ये व त्यांतील गौर एकशिंगी गेंडा इ. विस्मयकारक प्राणीजीवन व शिकारीची सुविधा, खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि त्यांवरील सीमा गौन, जार्था, यंगलात खोला (लामजुंगमध्ये) इ. प्रपात, काठमांडूपासून सु. १० किमी. वरील सुंदरीजल येथील जलधारा व प्रपात यांचे रमणीय दृश्य, बालाज येथील जलोद्यान, सुंदर सरोवरे व तेथील नौकाचलन, मच्छीमारी इ. सोयी काठमांडूपासून सु. २७ किमी. वरील आंखूखोला येथील उष्ण पाण्याचे झरे, नगरकोट, धूलिखेल, ककनी, ओखलडुंगा इ. ठिकाणांपासून दिसणारी उत्तरसीमेवरील उत्तुंग हिमाच्छादित शिखरे, खुद्द काठमांडूमधील सिंह दरबार, हनुमान ढोका दरबार, नारायण हिट्टी दरबार इ. इमारती, यांसारख्या अनेक गोष्टी पर्यटकांचे चित्त वेधून घेतात.
भागवत, अ. वि. कुमठेकर, ज. ब.
संदर्भ : 1. Agrawal, H. N. The Administrative System of Nepal, Delhi, 1976.
2. Anderson, Mary M. The Festivals of Nepal, Calcutta, 1975.
3. Bista, D. B. People of Nepal, Katmandu, 1967.
4. Forbes, Duncan, The Heart of Nepal, London, 1962.
5. Hitchock, John, The Magars of Banyan Hill, New York, 1965.
6. London, Perceval, Nepal, 2Vols., London, 1928.
7. Regmi, D. R. Modern Nepal, Calcutta, 1961.
8. Rose, L. E. Nepal : Strategy for Survival, New York, 1971.
9. Shreshtha, B. P. The Economy of Nepal, Bombay, 1967.
10. Thapa, N. B. A Short History of Nepal, Katmandu, 1973.
“