नेगापटम् : (नागापट्टणम). तमिळनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण आणि तमिळनाडू राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या ६८,०२६ (१९७१). हे मद्रासच्या दक्षिणेस सु. २५८ किमी., कोरोमंडल किनाऱ्यावर कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात वसले आहे. एकेकाळी नागा लोकांची राजधानी असलेले हे शहर, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीज लोकांचे पूर्व किनाऱ्यावरील व्यापारी ठाणे बनले. १६६० मध्ये हे डचांनी जिंकले आणि १७८१ पर्यंत ते त्यांच्याच ताब्यात होते. १७८१ मध्ये ब्रिटिशांनी हे जिंकले. सुती कापडावरील रंगकाम,छपाई,लोखंडी पेट्यांची निर्मिती या उद्योगांचे हे केंद्र असून, या उद्योगांस मेत्तूर व पैकारा येथील विद्युत्शक्ती वापरली जाते. हे चांगले बंदर असून येथे एक दीपगृह आहे. येथून श्रीलंका, ब्रह्मदेश, इंग्लंड, स्पेन यांच्याशी सागरी व्यापार चालत असून, गोणपाटाची पोती, कापूर, कापड यांची आयाततर तंबाखू,सिगारेटी,कातडी,तांदूळ यांची निर्यात होते.
सांवत, प्र. रा.