नेत्रवैद्यक: (ऑप्थॅल्‌मॉलॉजी). वैद्यकाच्या ज्या शाखेत डोळ्याची रचना, कार्य व रोग यांचा विशेष अभ्यास केला जातो, तिला नेत्रवैद्यक म्हणतात. ‘डोळा’ या स्वतंत्र नोंदीत त्याची रचना व कार्य यांचे वर्णन केले आहे. नेत्रवैद्यकाचा इतिहास आणि काही सामान्य नेत्ररोगांबद्दल व विकृतींबद्दल येथे माहिती दिली आहे. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रवैद्यक हा एक स्वतंत्र विषय असून अनेक विद्यापीठांतून हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्याचीही सोय आहे. त्यामुळे केवळ याच विषयावर लक्ष केंद्रित करून तयार झालेल्या नेत्रविशारदांची संख्या वाढत आहे.

इतिहास : प्राचीन भारतात नेत्रवैद्यकाचा पुष्कळ विकास झाला असावा. शालाक्यतंत्राची [→ शल्यतंत्र व शल्यशालाक्य] एक शाखा म्हणून नेत्रवैद्यक मान्यता पावले होते. त्यावर सुश्रुत, वाग्भट आणि माधव यांनी लिहिलेली तंत्रेच आज उपलब्ध आहेत. उत्तर भारतातील विदेहाधिपति निमी यांना नेत्रवैद्यकाचे जनक मानतात व त्यांचा उल्लेख हॅमिल्टन बाउअर यांनी संग्रहित केलेल्या हस्तलिखितांतही आढळतो. वाग्भट आणि माधव यांनी नेत्ररोगांचे वर्गीकरण, निदान व चिकित्सा यांवर लिहिले आहे. हल्ली उपलब्ध असलेल्या सुश्रुतसंहितेत नेत्रवैद्यकाचे संपूर्ण आणि उत्कृष्ट वर्णन आहे. त्यात नेत्रगोल ज्यात बसविलेले असतात त्या अक्षिकोटराचे (अस्थिमय खाचेचे) आणि नेत्रगोलातील पाच मंडले, सहा संधी आणि सहा पटले यांचे दिलेले सविस्तर वर्णन आजच्या वर्णनाशी पुष्कळसे जुळते आहे. सुश्रुतसंहितेतच वैद्यकाच्या इतिहासातील मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचे पहिलेच सखोल वर्णन आढळते. इसवी सनापूर्वी व त्यानंतर कित्येक शतके चरक, सुश्रुत व वाग्भट यांची शल्यविद्या भारतात प्रमाण मानली जात असे. बौद्ध काळातही चरक आणि सुश्रुत यांचे वैद्यकच मूलभूत मानीत.

बॅबिलोनियन काळात डोळ्यांची रचना, कार्य व रोग यांचे वर्णन केलेले आढळते. सेल्सस नावाच्या रोमन वैद्यांनी इ. स. २९ मध्ये केलेले मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचे वर्णन आढळते.

इ. स. नवव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत अरबस्तानात नेत्रवैद्यकाची बरीच प्रगती झाली. याच सुमारास बाहुलीची प्रतिक्रिया प्रथम वर्णिली गेली व पोकळ नळीने शोषून घेऊन मोतीबिंदू काढण्याची शस्त्रक्रिया प्रथम करण्यात आली. तेराव्या शतकात रॉजर बेकन या इंग्रज शास्त्रज्ञांनी वृद्धावस्थेतील दृष्टिमांद्य सुधारण्याकरिता भिंग प्रथम वापरले.

नेत्रवैद्यकावरील पहिले छापील पुस्तक १४७५ मध्ये इटलीतील फेरारा येथे छापण्यात आले. ते सालेर्नो येथील बेनव्हेन्युटो यांनी लिहिले होते.

प्रख्यात जोतिर्विद योहानेस केप्लर यांनी १६०४ मध्ये लिहिलेल्या Astronomiae pars optica या ग्रंथामध्ये डोळ्यातील जालपटलाची आवश्यकता आणि काचेचे कार्य यांविषयी माहिती दिलेली आहे. रने देकार्त यांनी १६३७ मध्ये डोळ्याची कॅमेऱ्याशी प्रथम तुलना करून नेत्र–अनुकूलनातील [→ डोळा] काचेच्या बहिर्गोलतेत होणारे बदल प्रथम वर्णिले.

नेत्रवैद्यक आणि नेत्र-शस्त्रक्रियाविज्ञानास शास्त्रीय बैठक प्राप्त करून देण्यात एच्‌. एल्‌. एफ्‌. फोन हेल्महोल्ट्‌झ (१८२१–८४), आलब्रेख्ट फोन ग्रेफी (१८२८–७०) व फ्रान्झ कॉर्नेलिअस डॉन्डर्स (१८१८–८९) या तीन शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. हेल्महोल्ट्‌झ यांनी १८५१ मध्ये नेत्रपरीक्षक (ऑप्थॅल्‌मॉस्कोप) नावाचे उपकरण शोधले. आजही प्रत्येक नेत्रविशारदाजवळचे ते एक आवश्यक उपकरण आहे. ग्रेफी हे आधुनिक नेत्र-शस्त्रक्रियाविज्ञानाचे जनक मानलेजातात. कनीनिका-मध्यपटलशोथ (याचे वर्णन पुढे आले आहे) व श्यामहरित रोग [→ काचबिंदु] या रोगांत कनीनिका-अंश-छेदन (इरिडेक्टॉमी) ही शस्त्रक्रिया त्यांनी प्रथम उपयोगात आणली. डॉन्डर्स या डच शास्त्रज्ञांनी नेत्ररोगांच्या ज्ञानात विशेष भर घातली. १८६२ मध्ये नेत्ररोगांकरिता त्यांनी खास रुग्णालय काढलेले होते. भारतीय लष्करी वैद्यकीय सेवेतील काही शास्त्रज्ञांनी भारतातच काही अभिनव नेत्र-शस्त्रक्रिया प्रथम केल्या. कर्नल हेन्री स्मिथ यांनी १९०९ मध्ये पंजाबात कोषासकट मोतीबिंदू काढण्याची शस्त्रक्रिया प्रथम केली. मेजर रॉबर्ट एच्‌. एलियट यांनी त्याच वर्षी श्यामहरित रोगावर कनीनिका-अंश-छेदनाची नवी पद्धत शोधली. मुंबईच्या कावसजी जहांगीर नेत्र रुग्णालयाचे प्रमुख व ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजातील नेत्रवैद्यकाचे प्राध्यापक एच्‌. हर्बर्ट यांनी श्वेतपटल छिद्रीकरणाची शस्त्रक्रिया प्रथम सुरू केली.

आल्व्हार गल्‌स्ट्रांड (१८६२–१९३०) या स्वीडिश नेत्रविशारदांना १९११ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक त्यांच्या नेत्रवैद्यकातील महत्त्वाच्या कार्याबद्दल मिळाले. त्यांनी ‘रेखा-छिद्रदीप’ व ‘परावर्तनरहित नेत्र-परीक्षक’ ही साधने शोधून काढली.

विसाव्या शतकात नेत्रवैद्यकातील संशोधनात बरीच प्रगती झाली आहे. उपरुग्णपद्धत (संशोधनाकरिता प्रत्यक्ष रुग्णांचे निरीक्षण आणि त्यांच्यावर उपचार करण्याची पद्धत) व प्रायोगिक पद्धत या दोन्ही तंत्रांचा उपयोग करून सर्व देशांतून हे संशोधन चालू आहे. त्यापासून निघणाऱ्या निष्कर्षाबद्दल चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा भरतात. या परिषदांचे अधिवेशन चार दर वर्षांनी निरनिराळ्या ठिकाणी भरते. निरनिराळ्या नेत्ररोगांवर संशोधन चालू असून वैद्यकाच्या अलीकडील प्रवृत्तीप्रमाणे या शास्त्रातही रोगनिवारणापेक्षा रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष पुरविले जात आहे.

लंडन येथे स्टुअर्ट ड्यूक एल्डर या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तेथील विद्यापीठास जोडलेले संशोधन केंद्र या विषयात विशेष भरीव कामगिरी करीत आहे. भारतातही हैदराबाद, चंडीगढ, दिल्ली आणि अहमदाबाद येथील संशोधन केंद्रांतून कार्य चालू आहे.

नेत्ररोग व विकृती (विकार)

डोळ्याच्या कोणत्याही भागात उत्पन्न होणाऱ्या रोगांचा तसेच अक्षिकोटराच्या हाडांना होणाऱ्या रोगांचा समावेश नेत्ररोगांत करतात.प्रस्तुत नोंदीत सामान्य नेत्ररोगांचा आणि विकृतींचाच (विकारांचाच) उल्लेख केला असून, सर्वसाधारण माणसास न समजू शकणाऱ्या रोगांचे उदा., अक्षिकोटराचे रोग, जालपटलाचे काही विशिष्ट रोग इ. रोगांचे वर्णन दिलेले नाही.

पापण्यांचे रोग: पापण्या बाह्याघात, बाह्यवस्तू व प्रखर प्रकाश यांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात. अश्रू पसरवून डोळा नेहमी ओलसर ठेवणे, तसेच आत शिरलेला कचरा हलविण्याचे कार्य पापण्यांच्या हालचालीमुळेच होते. पापण्या मिटल्या म्हणजे हवाबंद अवस्थेमुळे डोळ्यांचे हवेच्या दुष्परिणामापासून आपोआप संरक्षण होते.

रांजणवाडी : पापण्यांच्या केसांच्या मुळांशी सूक्ष्म स्रावक ग्रंथी असतात. या ग्रंथींना सूज येऊन पू झाल्यास रांजणवाडी झाली असे म्हणतात. कधीकधी पू तयार न होता सूज आपोआप ओसरते. अशी सूज बहुधा पुंजगोलाणूंच्या (स्टॅफिलोकॉकस वंशातील सूक्ष्मजंतूंच्या) संसर्गामुळे उद्‌भवते. पू झाल्यास फुगलेल्या जागी शस्त्रक्रिया करून निचरा करावा लागतो. बद्धकोष्ठता, मधुमेह, संधिवात इ. रोगांत, तसेच दीर्घदृष्टी (जवळचे दिसण्यास त्रास होणे) व विषमदृष्टी (डोळ्याच्या ज्या भागांतून प्रकाश आत शिरतो त्या भागांची वक्रता निरनिराळी असल्यामुळे जालपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण नीट न होणे दृष्टिवैषम्य) यांसारख्या दृष्टिदोषांतही रांजणवाडी होण्याची शक्यता असते.

उपचार : बोरिक धावन द्रवाने (लोशनने) डोळा शेकल्यास रांजणवाडी पिकून फुटते किंवा बसते. रेचक घेऊन कोठा साफ ठेवावा. काही वेळा रांजणवाडी वारंवार होऊ लागते व अशा वेळी मधुमेह नसल्याची खात्री करून घ्यावी.

खुपरी: पापण्यांच्या आतील श्लेष्मकलेला (बुळबुळीत अस्तर त्वचेला) विशिष्ट व्हायरसाच्या संसर्गामुळे येणाऱ्या चिरकारी (दीर्घकालीन) शोथाला (दाहयुक्त सुजेला) खुपरी म्हणतात [→ खुपरी].

पक्ष्मशोथ: पापण्यांच्या कडांना होणाऱ्या चिरकारी शोथास पक्ष्मशोथ म्हणतात. हा रोग बहुधा लहान मुलांत आढळतो. डोळ्यांना पाणी येणे, खाज सुटणे, उजेड सहन न होणे इ. लक्षणे उद्‌भवतात. या रोगासही पुंजगोलाणू कारणीभूत असतात. पापण्यांच्या कडा लाल व फुगीर बनून त्यांवर पांढरा किंवा पिवळा स्त्राव गोळा होतो. हा थर काढून टाकल्यास लहान लहान व्रण पडलेले दिसतात. पापण्यांच्या केसांच्या मुळाशी पसरल्यास केस झडून पुन्हा येत नाहीत किंवा आल्यास वाकडे तिकडे येतात. या अवस्थांना अनुक्रमे ‘पक्ष्मकेशलोप’ (मॅड्रोसिस) व ‘पडकेस’ (ट्रिकिॲसिस) म्हणतात. पापण्यांच्या कडा अतिपुष्टीने फुगीर बनतात.

गलिच्छ वस्ती, गोवर किंवा कांजिण्यांसारखे रोग, दूषित सौंदर्यप्रसाधने (उदा., काजळ), ऊवा यांमुळे हा रोग होतो. क्षय तसेच डोक्याच्या त्वचेतील ⇨ त्वक्‌-स्नेह ग्रंथींच्या अतिकार्यशीलतेमुळे डोक्यात कोंडा तयार होतो. त्यामुळेही हा रोग होतो. रक्तक्षयातही या रोगाची शक्यता असते.

उपचार : शारीरिक स्वच्छता ठेवावी. सोडा बायकार्ब घातलेल्यापाण्याने डोळे वरचेवर धुवावेत. झोपतेवेळी कडांना जंतुनाशक मलम लावावे. सार्वदेहिक रोगाकरिता योग्य तपासणी करून घ्यावी.

पापण्यांच्या विकृती : पापण्यांच्या काही विकृती जन्मजात असतात. कधीकधी संपूर्ण पापणी तयार न होता त्रिकोणी खाच असलेली पापणी बनते. या ठिकाणी ग्रंथी आणि केस दोन्हींचा अभाव असतो. स्वच्छमंडलाचा (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागाचा) काही भाग त्यामुळे अनाच्छादित राहून त्यास इजा होण्याची शक्यता असते. त्यावर शस्त्रक्रिया करून शक्य तेवढी नैसर्गिक पापणीसारखी पापणी तयार करतात.

अधू (नीट उघडझाप न होणाऱ्या) पापण्या जन्मजात किंवा उपार्जित असतात. जन्मजात विकृतीत हालचाल करणारे स्नायू संपूर्णवाढलेले नसतात किंवा अजिबात नसतात. वरची पापणी नेहमी बंद असल्यासारखी म्हणजे खाली पडल्यासारखी दिसण्याला ‘पक्ष्मपात’ (टोसिस) म्हणतात. त्यामुळे डोळे नेहमी अर्धवट मिटल्यासारखेदिसतात. कधीकधी नाकाच्या मुळापासून भुवयांकडे जाणारे त्वचाभाग वाढून डोळ्याच्या आतल्या कोनावर पडदा आल्यासारखे दिसते. अशी ठेवण मंगोलियन वंशाचे वांशिक चिन्हच असते. जेव्हा एका बाजूचीच वरची पापणी हालचाल करीत नाही तेव्हा त्या बाजूच्या आनन तंत्रिकेत (चेहेऱ्याशी संबंधित असलेल्या मज्जेत) बिघाड झाल्याची शक्यता असते. कोणत्याही कारणाने डोळा नीट बंद न झाल्यास स्वच्छमंडलास इजा होण्याचा धोका असतो.


नेत्रश्लेष्म विकार: पापण्यांची डोळ्याकडील बाजू व नेत्रगोलाचा पुढचा भाग यांवरील पातळ पारदर्शक आवरणाला नेत्रश्लेष्म म्हणतात. वर्णनाच्या सुलभतेकरिता त्याचे (१) पक्ष्म–नेत्रश्लेष्म (पापण्यांवरील), (२) नेत्रगोल नेत्रश्लेष्म आणि (३) नेत्रश्लेष्म चापिका [(१) आणि (२) ज्या ठिकाणी मिळतात तो भाग] असे विभाग पडतात.

पक्ष्मश्लेष्म पापणीला घट्ट चिकटलेला असतो. चापिकेचा भाग ढिला असून नेत्रगोलाच्या हालचालीस सुलभ अशा घड्या पडणारा असतो. नेत्रगोलावरील नेत्रश्लेष्म पातळ आणि पारदर्शक असतो. नेत्रश्लेष्मास भरपूर रक्तवाहिन्यांपासून रक्तपुरवठा होतो.

नेत्रश्लेष्मशोथ: सर्व नेत्ररोगांत हा सर्वांत अधिक प्रमाणात आढळणारा रोग असून त्याचा ‘डोळे येणे’ असा सर्वसाधारणपणे उल्लेख करतात. [→ नेत्रश्लेष्मशोथ].

आ. १. पक्षाभ अतिपुष्टी

पक्षाभ अतिपुष्टी: (टेरिजियम). नेत्रश्लेष्म व त्याखालील ऊतकाच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या–पेशींच्या–समूहाच्या) स्वच्छमंडलाकडे वा त्यावर वाढणाऱ्या अतिपुष्टीस ‘पक्षाभ अतिपुष्टी’ म्हणतात. ही त्रिकोणाकृती पंखासारखी दिसणारी वाढ बहुधा डोळ्याच्या नाकाकडील कोनापासून (वरची व खालची पापणी जिथे मिळते तो भाग) सुरू होते. सूर्यकिरणे, धूळ आणि वारा त्यास कारणीभूत असतात म्हणून उघड्यावर काम करणाऱ्या शेतकरी, हमाल किंवा खलाशांमध्ये ही विकृती अधिक आढळते. ही वाढ हळूहळू बुबुळावर आक्रमण करते व त्यामुळे दृष्टिमांद्य येते. प्रखर ऊन असलेल्या व कोरड्या हवामानाच्या प्रदेशात या रोगाचे प्रमाण अधिक आढळते. शस्त्रक्रियेने वेळीच काढून टाकल्यास दृष्टिमांद्य टळते. एकदा काढून टाकल्यानंतर पुन्हा अशी वाढ होत नाही.

नेत्रश्लेष्म शुष्कता: (झेरोसिस). डोळ्याच्या नेहमी उघड्या राहणाऱ्या भागास कधीकधी कोरडेपणा येऊन तो त्रिकोणाकृती व फिक्कट दिसू लागतो. याशिवाय बहुधा ⇨ रातांधळेपणाअसतो. हा रोग अशक्त व रोगट मुलांत आढळतो आणि अपपोषण, विशेषेकरून अ जीवनसत्त्वाची न्यूनता कारणीभूत असते. लहान मुलांत आढळणाऱ्या ⇨ क्वाशिओरकोर नावाच्या रोगात नेत्रश्लेष्म शुष्कता नेहमी आढळते. हा रोग सौम्य स्वरूपात असल्यास औषधरूपाने वा आहारातून भरपूर अ जीवनसत्त्व दिल्याने संपूर्ण बरा होतो. मात्र दुर्लक्ष झाल्यास या रोगाचे दुष्परिणाम स्वच्छमंडलावर तर होतातच, परंतु सबंध डोळाच निकामी बनून अंधत्व येण्याची शक्यता असते. जन्मानंतर अशक्त व रोगट मुलांना पहिल्या वर्षात हा रोग झाल्यास अकाल मृत्यूही येतो म्हणून नेत्रवैद्याकडून ताबडतोब इलाज सुरू करणे महत्त्वाचे असते.

स्वच्छमंडलाचे विकार: हे विकार महत्त्वाचे आहेत कारण त्यांमध्ये स्वच्छमंडलाचा लहानमोठा भाग अपारदर्शक बनण्याचा व त्यामुळे दृष्टिमांद्य वा अंधत्व येण्याचा संभव असतो. डोळ्यांच्या नेहमी आढळणाऱ्या रोगांमध्ये त्यांचा समावेश असून त्यांच्या दुष्परिणामामुळे कधीकधी संपूर्ण नेत्रगोलाचा नाश होण्याचा धोका असतो.

स्वच्छमंडलशोथ आणि व्रण : स्वच्छमंडलाचा बराचसा भाग नेहमी आच्छादित नसल्यामुळे बाह्यपदार्थ डोळ्यात जाऊन त्यांच्या घर्षणामुळे ओरखडा येऊन त्या जागी व्रण होण्याचा संभव असतो. नेत्रश्लेष्म कोटरात सूक्ष्मजंतू असल्यास त्यांचा संसर्ग या ओरखड्याच्या जागी होऊन शोथ उत्पन्न होतो. सामान्य भाषेत या रोगाला ‘फूल पडणे’ असे म्हणतात. जोपर्यंत स्वच्छमंडलाचा अधिस्तर (स्वच्छमंडलाच्या चार थरांपैकी सर्वांत पुढील थर) अखंड असतो तोपर्यंत सूक्ष्मजंतू निष्प्रभ असतात. मात्र हे अखंडत्व ओरखड्यामुळे नाहीसे होताच त्यांचा सहज शिरकाव होतो. घटसर्प व प्रमेह (परमा) या रोगांचे सूक्ष्मजंतू मात्र अपवाद असून ते अखंड अधिस्तरातूनही प्रवेश करू शकतात. स्वच्छमंडलाची शुष्कता, अपपोषण, तंत्रिकाघात (तंत्रिकांना होणारी इजा) व कोकेन या मादक पदार्थामुळे येणारी बधिरता यांमुळे शोथ आणि व्रण होण्याची शक्यता असते.

स्वच्छमंडलशोथाचे अनेक प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे (१)व्रणयुक्त आणि (२) व्रणरहित असे दोन मुख्य प्रकार ओळखले जातात. व्रणांच्या दोन अवस्था दिसतात. काही वेळा फक्त वरच्या थरातच व्रण होतो, तर काही वेळा थेट खालच्या थरापर्यंत व्रण पसरतो. काही व्रण प्रकारांचे वर्णन पुढे दिले आहे.

(१) पूय-व्रण : हा व्रण स्वच्छमंडलाच्या मध्यवर्ती भागात अधिक प्रमाणात आढळतो. वरच्या थरातील कोशिकांचा नाश प्रथम होतो. नंतर व्रण खोल जाऊन बोमन पटलाचा (अधिस्तराच्या सर्वांत खालच्या एककोशिकीय थराचा विल्यम बोमन या इंग्लिश शरीरक्रिया वैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या पटलाचा) नाश होतो. हे पटल नाश पावले म्हणजे अपारदर्शित्व अटळ असते. इतर वेळी पारदर्शकतेवरील परिणाम व्रणाच्या खोलीवर अवलंबून असतो. अगदी वरच्या थरातील व्रण बहुधा संपूर्ण बरा होतो. खोल व्रण बरा झाल्यावर त्या जागी पांढरा शुभ्र भाग तयार होतो व तो अपारदर्शी असतो, या पांढऱ्या भागाला ‘श्वेतजाल’ म्हणतात. हा पांढुरकेपणा कमी गडद आणि पातळ ढगासारखा असल्यास त्यास ‘अक्ष-अभ्रिका’ म्हणतात. सामान्य भाषेत यालाच ‘सारा’ म्हणतात.

स्वच्छमंडल व्रणाची प्रमुख लक्षणे म्हणजे प्रकाश असह्यता, लाली, ठणका आणि सतत अश्रुधार ही होत. ही सर्व लक्षणे कोणत्याही स्वच्छमंडलशोथात कमीजास्त प्रमाणात आढळतात. कोणताही घरगुती इलाज न करता नेत्रवैद्याचा सल्ला ताबडतोब घेणे हितावह असते. श्वेतजाल किंवा सारा पडल्यास काही वेळा कनीनिकेवर (मध्यभागी वर्तुळाकार छिद्र–बाहुली–असलेल्या वर्तुळाकार पडदेवजा भागावर) योग्य शस्त्रक्रिया करून दृष्टी सुधारते. आधुनिक उपायांमध्ये मृत माणसाच्या बुबुळाचा (स्वच्छमंडलाचा) योग्य तो तुकडा श्वेतजाल काढून टाकून कलम करतात. या शस्त्रक्रियेला ‘स्वच्छमंडल–कलम शस्त्रक्रिया’ (केरॅटोप्लॅस्टी) म्हणतात [→ नेत्रपेढी].

(२) विसर्पी व्रण : हळूहळू पसरणाऱ्या सापासारख्या वाकड्या कडा असलेल्या व्रणास विसर्पी व्रण म्हणतात. फुप्फुसगोलाणूंच्या (न्यूमोकॉकस या सूक्ष्मजंतूंच्या) संसर्गामुळे बहुधा हा रोग होतो. अश्रुकोश पूयता (अश्रुकोशात पू तयार होणे) आणि हा व्रण बहुतकरून एकाच वेळी आढळतात. अश्रुकोश पूयतेवरील इलाजाकरिता शस्त्रक्रियेने अश्रुकोश काढून टाकल्यास अशा व्रणाचा संभाव्य धोका टाळता येतो. हा व्रण गंभीर स्वरूपाचा असून डोळ्याच्या आतील भागावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पूर्वागारात (कनीनिका आणि स्वच्छमंडल यांमधील पोकळीत) पूसंचय होतो म्हणून या व्रणास ‘पूयसंची व्रण’ असेही म्हणतात. कधीकधी पूर्णनेत्रशोथही उत्पन्न होतो. व्रण बरा झाल्यास श्वेतजाल व वडस (स्वच्छमंडलशोथामुळे मऊ जागी डोळ्याच्या अंतर्दाबामुळे फुगवटी येणे स्टॅफिलोमा) बहुधा तयार होतात.

वरील प्रकाराशिवाय नेत्रश्लेष्मशोथातही स्वच्छमंडल व्रण तयार होतात. कॉख-वीक्स (रॉबर्ट कॉख व जे. ई. वीक्स यांच्या नावाने ओळखण्यात येणारा) सूक्ष्मजंतू, मोरॅक्स-आक्सेनफेल्ट (व्ही. मोरॅक्स व टी. आक्सेनफेल्ट या नेत्रवैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा) सूक्ष्मजंतू वगैरेंमुळे होणाऱ्या नेत्रश्लेष्मशोथात होणारे व्रण शोथ बरा होताच बरे होतात. देवी, काही व्हायरस, काही त्वचारोग, त्रिमूल तंत्रिका विकृती [→ तंत्रिका तंत्र] इ. रोगांत स्वच्छमंडल व्रण तयार होतात. देवीमध्ये संपूर्ण नेत्रगोलाचाच नाश होऊन अंधत्व आल्याची अनेक उदाहरणे आढळतात.


व्रणविरहित स्वच्छमंडलशोथाचे अनेक प्रकार असून जन्मजात उपदंश, क्षय, कुष्ठरोग, परिसर्प किंवा नागीण वगैरे रोगांत असा शोथ उत्पन्न होतो.

इतर काही स्वच्छमंडल विकृती : (१) वार्धक्य वलय : स्वच्छमंडलाच्या कडेवर वृद्धावस्थेत उमटणाऱ्या पांढऱ्या रेषेला वार्धक्य वलय म्हणतात. सुरुवातीस अपूर्ण असणाऱ्या रेषेपासून कालांतराने ती वाढत जाऊन वलय तयार होते. श्वेतपटल आणि स्वच्छमंडल ज्या ठिकाणी जवळ येतात त्या ठिकाणी असणारे हे वलय अपारदर्शी असते. या वर्तुळाकार जागी वसा (स्निग्ध पदार्थ) साचून पांढरेपणा येतो. या पांढऱ्या वलयाच्या बाहेर पारदर्शक भागाचे वलय स्पष्ट दिसते. वार्धक्य वलयामुळे दृष्टीवर दुष्परिणाम होत नाहीत.

आ.२. शंक्वाकार स्वच्छमंडल

(२) शंक्वाकार स्वच्छमंडल : या विकृतीत स्वच्छमंडलाचा मध्यभाग शंकूसारखा पुढे येतो. ही विकृती शोथरहित असून स्वच्छमंडल ऊतक हळूहळू पातळ बनत गेल्यामुळे उत्पन्न होते. बहुधा तरुण स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या या विकृतीमुळे लघुदृष्टी व विषमदृष्टी हे दृष्टिदोष उत्पन्न होतात. चष्मा वापरूनही हे दोष तसेच राहिल्यास स्पर्शभिंगे [स्वच्छ मंडलावर प्रत्यक्ष टेकवून बसविण्याची प्लॅस्टिकची भिंगे → चष्मा] उपयुक्त ठरतात.

श्वेतपटलाचे (बाह्यपटलाचे) विकार: श्वेतपटलशोथाचे वर्णनाच्या सुलभतेकरिता अधिश्वेतपटलशोथ व श्वेतपटलशोथ असे दोन प्रकार केले आहेत.

अधिश्वेतपटलशोथ :(एपिस्क्लेरायटिस)श्वेतपटलाच्या वरच्या थरापुरत्या मर्यादित शोथास अधिश्वेतपटलशोथ म्हणतात. हा शोथ सहसा स्वच्छमंडलापर्यंत पोहोचत नाही. तसेच त्यापासून व्रणही तयार होत नाही. हा रोग स्थानीय स्वरूपाचा असून प्रौढावस्थेत आढळतो. डोळ्यामध्ये काळपट लाल रंगाची सुजलेली जागा सीमावलयाच्या बाहेर दिसते. पापणी बंद करून या जागी बोटाने दाबल्यास वेदना होतात. हा रोग वारंवार उद्‌भवण्याची शक्यता असते. कॉर्टिसोन किंवा हायड्रोकॉर्टिसोनाचे थेंब डोळ्यात घातल्यास आराम पडतो.

श्वेतपटलशोथ: (स्क्लेरायटिस). या रोगात श्वेतपटलाच्या सर्वच थरांना सूज येते व ती पुष्कळशा भागावर पसरलेली असते. कधीकधी स्वच्छमंडल आणि वर्णपटलावरही दुष्परिणाम होतो. डोळा दुखणे व डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे असतात.

दोन्ही प्रकारच्या शोथांचे निश्चित कारण समजलेले नाही. ⇨ कोलॅजेन रोग (शरिरातील संयोजी ऊतकामध्ये विशिष्ट बदल घडवून आणणारे रोग उदा., संधिज्वर), अधिहर्षता (ॲलर्जी) किंवा इतर सार्वदैहिक कारणे शोधून इलाज करतात. या शोथाचे श्यामहरित रोग किंवा वर्णपटलशोथ यासारखे उपद्रव उद्‌भवण्याचा संभव असतो.

आ. ३. वडस

वडस: स्वच्छमंडलास वडस नावाची विकृती होते, त्याप्रमाणेच श्वेतपटलासही होण्याची शक्यता असते. या विकृतीत स्थानीय स्वरूपाची फुगवटी येते. रोगामुळे पातळ बनलेल्या जागी अंतर्दाबाच्या प्रभावामुळे ही विकृती होते. नेत्रगोलाच्या निरनिराळ्या भागी दिसणाऱ्या या वडसांना निरनिराळी नावे देतात. उदा., नेत्रगोलाच्या पश्च भागी येणाऱ्या फुगवटीस ‘पश्च वडस’ म्हणतात. सर्व वडसांवर शस्त्रक्रिया करून अंतर्दाब कमी करण्याचा इलाज करतात.

वर्णपटलाचे विकार: नेत्रगोलाच्या मधल्या रक्तवाहिन्यामय थराला वर्णपटल म्हणतात. यामध्ये मध्यपटल, कनीनिका आणि लोमशकाय यांचा समावेश असतो [→ डोळा]. मध्यपटलास रक्तपुरवठा खंडश: होत असल्यामुळे त्याचे रोगही खंडापुरते मर्यादित असतात. कनीनिका आणि लोमशकाय यांचा निकट संबंध असल्यामुळे त्यांचे रोगही बहुधा एकत्रित असतात. एकाच थराचे हे तीन भाग असल्यामुळे कोणत्याही एका भागाची विकृती इतर दोहोंवर थोडाबहुत परिणाम करतेच.

ज्या वेळी तिन्ही भागांना थोड्याबहुत प्रमाणात दाहयुक्त सूज येते त्या वेळी ‘वर्णपटलशोथ’ ही संज्ञा वापरतात. वर्णनाच्या सुलभतेकरिता वर्णपटलशोथाचे (अ) अग्र–वर्णपटलशोथ व (आ) पश्च–वर्णपटलशोथ असे दोन प्रकार केलेले आहेत.

अग्र-वर्णपटलशोथ : या रोगात वर्णपटलाच्या अग्र भागात म्हणजेच कनीनिका व लोमशकाय या ठिकाणी शोथ उत्पन्न होतो म्हणून या रोगास ‘कनीनिका–लोमशकायशोथ’ या नावानेही संबोधितात. वेदना, डोकेदुखी, दृष्टिमांद्य व प्रकाश असह्यता ही लक्षणे कमीजास्त प्रमाणात आढळतात. नेहमी स्वच्छ व पारदर्शक असणाऱ्या डोळ्याच्या पूर्वागाराचा गढूळपणा व अपारदर्शित्व हे सर्वांत प्रमुख व महत्त्वाचे लक्षण होय. या रोगापासून श्यामहरित रोग, स्वच्छमंडलाचे अपारदर्शित्व, मोतीबिंदू इ. उपद्रव उद्‌भवण्याचा संभव असतो. कारणपरत्वे कनीनिका–लोमशकायशोथाचे उपदंशजन्य, प्रमेहजन्य, क्षयरोगजन्य, कुष्ठरोगजन्य, मधुमेहजन्य वगैरे प्रकार ओळखले जातात. या रोगाची अनेक कारणे असल्यामुळे कारण शोधून योग्य इलाजाकरिता नेत्रवैद्याचा सल्ला घेणे जरूरीचे असते.

पश्च-वर्णपटलशोथ: वर्णपटलाचा मागचा भाग मध्यपटलाचा बनला असून त्याच्या दाहयुक्त सुजेस ‘मध्यपटलशोथ’ (कोरॉयडायटिस) या नावानेही ओळखतात. पुष्कळ वेळा जालपटलासही अशी सूज त्याच वेळी उद्‌भवते. दृष्टिमांद्य, वस्तु–विरूपण (निरनिराळ्या वस्तूंचा नेहमीचा आकार न दिसता, विकृत आकार दिसणे), चमकणारी प्रकाश वलये दिसणे वगैरे लक्षणे उद्‌भवतात. नेत्र परीक्षकाने तपासल्यास रोगनिदान स्पष्ट होते. या परीक्षेत मध्यपटलशोथामुळे उत्पन्न झालेले स्त्राव जालपटलावर जागजागी चिकटलेले दिसतात. मध्यपटलशोथाचे भागपरत्वे स्थानीय, विखुरलेला वगैरे प्रकार ओळखले जातात. इलाजाकरिता नेत्रवैद्याचा सल्ला घेणे जरूर असते.

संवादी नेत्रशोथ: ज्या वेळी काही कारणांमुळे वर्णपटलशोथ एका डोळ्यात प्रथम उत्पन्न होतो व कालांतराने दुसऱ्या डोळ्यातील वर्णपटलासही हा रोग उद्‌भवतो त्या वेळी या दुसऱ्या डोळ्यास ‘संवादी नेत्रशोथ’ झाला असे म्हणतात. हा प्रकार बहुधा भेदक प्रकारच्या आघातामुळे डोळा दुखावल्यास आढळतो. ज्या डोळ्यास प्रथम इजा होते त्यास ‘उत्तेजक नेत्र’ आणि दुसऱ्यास ‘संवादी नेत्र’ म्हणतात. दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाऊन अंधत्व येण्याची शक्यता असल्यामुळे उत्तेजक नेत्र निकामी झाल्याबरोबर शस्त्रक्रियेने वेळीच काढून टाकल्यास संवादी नेत्राची दृष्टी बचावण्याची शक्यता असते.


पूर्ण नेत्रशोथ: संपूर्ण नेत्रगोलाच्या, विशेषेकरून वर्णपटलाच्या सर्व भागांच्या तीव्र स्वरूपाच्या पूयोत्पादक दाहयुक्त सुजेला पूर्ण नेत्रशोथ म्हणतात. नेत्रगोलाची पोकळी पूमय बनून नेत्रगोलाचा नाश होतो. नेत्रगोलाच्या भेदक जखमेतून शिरलेले सूक्ष्मजंतू या रोगास कारणीभूत होतात. कधीकधी पूयरक्तता (पूमिश्रित रक्ताचे अभिसरण), प्रसूतीमधील जंतुरक्तता (सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्ताभिसरणाबरोबर शरीरात पसरणे) आणि मस्तिष्कावरणशोथ (मेंदू व मेरुरज्जू यांच्यावरील आवरणाचा शोथ) या रोगांत पूर्ण नेत्रशोथ होण्याची शक्यता असते. दृष्टिनाश टाळण्याच्या हेतूने प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा जोरदार उपचार करतात. दृष्टिनाश झालाच तर फक्त बाह्यपटल कायम ठेवून नेत्रगोलाचे सर्व भाग शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतात. या शस्त्रक्रियेला ‘नेत्रांग–निष्कासन’ (एव्हिसरेशन) म्हणतात.

जालपटलाचे विकार: जालपटलाच्या रोगामध्ये त्याचा काही भाग किंवा संपूर्ण जालपटलावर दुष्परिणाम होतात. कोणत्याही एकाथराचा रोग फैलावून इतर थरांवर परिणाम होण्याची शक्यता असते. मध्यपटल व जालपटल रचनात्मक दृष्ट्या जवळ असल्यामुळे एकाचा रोग दुसऱ्यावर परिणाम करण्याची नेहमीच शक्यता असते. जालपटलातील गंडकोशिका थरातील [→ डोळा] कोशिकांचा आणि दृक्‌ तंत्रिका तंतूंचा प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे त्या कोशिकांची अपपुष्टी ही परिणामी दृक्‌ तंत्रिकेच्या अपपुष्टीस कारणीभूत होते. जालपटलातील कोशिका प्रकाश संवेदनापासून तंत्रिका संवेदना उत्पन्न करण्याचे कार्य करतात. या संवेदना मेंदूतील विशिष्ट भागापर्यंत पोहोचल्यानंतरच आपणास निरनिराळ्या दृष्टिसंवेदना प्राप्त होतात. विकास दृष्ट्या जालपटल व मेंदू एकाच भागापासून बनलेले असल्यामुळे मेंदूतील ऊतकाप्रमाणेच आघातानंतर पुनर्रचना करण्याची जालपटलाची शक्ती अतिशय मर्यादित असते. म्हणूनच जालपटलातील शंकु-शलाका थराचा (शंकूच्या व दंडाच्या आकाराच्या कोशिकांच्या थराचा) नाश कायम स्वरूपाचा असतो व त्यापासून कायमचे दृष्टिमांद्य येते.

जालपटल-विकारांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे. (१) जन्मजात रंगांधत्व [→ डोळा], अपूर्ण जालपटल (२) आघातजन्य : रक्तस्राव, जालपटल विदारण, जालपटल वियुक्ती (३) जाल पटलशोथ (४) अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी) (५) रक्ताभिसरणजन्य : रक्ताधिक्य,  रक्तक्षय, रक्तस्राव, रक्तदाबाधिक्य, रक्तवाहिन्यांचे काठिण्य, मधुमेह यांसारखे सार्वदेहिक रोग (६) अपकर्षजन्य (७) विषजन्य आणि अपपोषणजन्य. यांपैकी काही विकारांचेच वर्णन प्रस्तुत नोंदीत दिले आहे.

जालपटलशोथ: हा रोग फक्त जालपटलापुरताच मर्यादित नसतो. बहुधा वर्णपटल किंवा दृक्‌ तंत्रिका यांचाही शोथ एकत्रित असतो. तीव्र किंवा चिरकारी प्रकारांपैकी दुसऱ्याचे प्रमाण अधिक आढळते. जेवढ्या भागावर शोथ असेल त्यावर लक्षणे अवलंबून असतात. पीतबिंदू (जालपटलाच्या मागील भागाच्या मध्यबिंदूपासून जवळच असलेला लंबवर्तुळाकार पिवळसर भाग) ग्रासल्यास वस्तु-विरूपण होते. वस्तू लहान किंवा मोठ्या दिसू लागतात व प्रकाश असह्य होतो. दृष्टीवर कमीजास्त प्रमाणात परिणाम होऊन दृष्टिमांद्य येते. हा शोथ निरनिराळ्या कारणांमुळे होत असल्यामुळे कारण शोधून इलाज करावा लागतो. डोळ्यांना संपूर्ण विश्रांती मिळणे फार जरूरीचे असते.

जालपटल वियुक्ती : जालपटलाचा प्रमुख भाग जेव्हा मध्यपटलापासून अलग होतो तेव्हा त्या विकृतीस जालपटल वियुक्ती म्हणतात. शंकु-शलाका थर आणि रंजक कोशिका थर (रंगद्रव्ययुक्त कोशिकांचा थर) एकमेकांपासून अलग होतात. आघात, अर्बुद वा मध्यपटलशोथ जालपटल वियुक्तीस कारणीभूत होतात. लघुदृष्टी असलेले डोळे सामान्य डोळ्यापेक्षा आकारमानाने मोठे असतात. अशा मोठ्या आकारमानाच्या नेत्रगोलांचे सर्वच थर पातळ व ताणलेले असतात आणि म्हणून अशा व्यक्तीमध्ये जालपटल वियुक्तीचे प्रमाण अधिक असते. अशा ताणलेल्या जालपटलास काही कारणामुळे छिद्र पडून सांद्रजल (जेलीसारखा दाट द्रव) त्या छिद्रातून वरील दोन थरांत शिरतो व ते एकमेकांपासून अलग होतात.

रोग्याला सुरुवातीस डोळ्यांसमोर अधून मधून प्रकाश चकाकताना दिसतो. वियुक्ती निश्चित होताच दृष्टीसमोर पडदा पडल्यासारखे भासते. हा पडदा ज्या बाजूस वियुक्ती असेल त्या बाजूच्या संबंधित दृष्टिक्षेत्रात पडतो. जोपर्यंत पीतबिंदू ढळलेला नसतो तोपर्यंत मध्यवर्ती दृष्टिक्षेत्रात बदल होत नाही. नेत्रपरीक्षक तपासणी व दृष्टिक्षेत्रमापन निदानास उपयुक्त असते.

सुरुवातीसच छिद्र बंद करणे हा उत्तम इलाज होय. जोपर्यंत जालपटलाच्या मध्यवर्ती भागाने जागा सोडलेली नाही तोपर्यंत इलाजानंतर दृष्टी पूर्ववत होण्याची शक्यता असते. इलाजामध्ये शस्त्रक्रिया, ⇨ ऊतकतापन चिकित्साइ. उपचार करतात. अलीकडे लेसर किरण चिकित्सा [→ लेसर] या विकृतीत फार उपयुक्त ठरली आहे.

जालपटलाचा अपकर्ष: जालपटलाच्या अपकर्षाची (कोशिकांची क्रियाशीलता कमी होण्याची) दोन प्रमुख कारणे (१) आनुवांशिकता व (२) वृद्धावस्था ही होत.

(१) वर्णकित जालपटलशोथ नावाचा रोग आनुवंशिक असून त्याचे निश्चित कारण समजलेले नाही. या विकृतीत सुरुवातीस फक्त शलाकांचा अपकर्ष होऊन रातांधळेपणा उद्‌भवतो. हळूहळू सबंध दृष्टिक्षेत्रावर परिणाम होऊन ते अतिशय संकुचित बनते. बहुधा दोन्ही डोळ्यांवर परिणाम होतो. क्रमश: वृद्धिंगत होणाऱ्या या विकृतीत रंजकद्रव्य सर्व थरांतून पसरते. या रोगावर कोणताही परिणामकारक इलाज सापडलेला नाही.

(२) वृद्धावस्थेतील जालपटल अपकर्षाची सुरुवात मध्यवर्ती दृष्टिक्षेत्रावरील परिणामापासून होते. वयोमानामुळे पीतबिंदूच्या रक्तपुरवठ्यातील झालेल्या कमतरतेमुळे हा अपकर्ष होतो. दृष्टीवर गंभीर परिणाम होऊन कधीकधी वाचणेसुद्धा कठीण होऊन बसते.

दृक्‌ मार्ग आणि त्याचे विकार: जालपटलापासून मेंदूच्या पश्चकपाल खंडापर्यंतच्या तंत्रिका मार्गाला दृक्‌ मार्ग म्हणतात. डोळ्याच्या प्रमुख तंत्रिकेला दृक्‌ तंत्रिका म्हणतात. एकूण १२ मस्तिष्क तंत्रिकांच्या जोड्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची जोडी दृक्‌ तंत्रिकांची असते [→ तंत्रिका तंत्र]. प्रत्येक दृक् तंत्रिका अभिवाही (मेंदूकडे जाणाऱ्या) तंत्रिका तंतूंची बनलेली असते. जालपटलाप्रमाणे विकास दृष्ट्या ती मेंदूचाच भाग असते. तिच्या तंतूंची सुरुवात जालपटलातील गंडकोशिकांपासून होते. असे जवळजवळ १० लाख तंतू मिळून जालपटलात जो थर बनतो त्याला ‘दृक् स्तर’ म्हणतात. हे सर्व तंतू नेत्रगोलाच्या पश्चभागाजवळ एकत्र येतात. श्वेतपटलातील सुषीर पत्रातील सूक्ष्म छिद्रांतून बाहेर पडून जवळ येतात व त्यांची दृक्‌ तंत्रिका बनते. हे तंतू ज्या ठिकाणी एकत्र येतात ती २·५ मिमी. वर्तुळाकार जागा म्हणजेच जालपटलाचा अंधबिंदू असतो. कारण या ठिकाणी प्रकाशग्राही कोशिका अजिबात नसतात. नेत्रगोलाच्या पश्च भागापासून निघून दृक्‌ तंत्रिका अस्थिमय अक्षिकोटराच्या मागे असलेल्या दृक् नालीतून कवटीत शिरतात. प्रत्येक दृक्‌ तंत्रिका मध्यरेषेकडे जाऊन एकमेकींजवळ येतात व दोन्ही मिळून जी फुलीसारखी (X) रचना होते तिला ‘दृक्‌-फुली’ म्हणतात. या ठिकाणी प्रत्येक जालपटलाच्या नाकाकडील अर्ध्या भागातून निघणाऱ्या दृक्‌ तंत्रिकेतील तंतू मध्यरेषा ओलांडून विरुद्ध बाजूच्या दृक्‌ मार्गात शिरतात. उदा., डाव्या डोळ्यातील जालपटलाच्या नाकाकडील अर्ध्या भागाकडून येणारे तंतू उजव्या दृक्‌ मार्गात शिरतात (पहा : चित्रपत्र ४८). कानशिलाकडील अर्ध्याभागातून येणारे तंतू मध्यरेषा न ओलांडता तसेच मागे जातात म्हणजे त्याच बाजूच्या दृक्‌ मार्गात शिरतात. यामुळे प्रत्येक दृक्‌ मार्गात दोन्ही डोळ्यांतील जालपटलांच्या विशिष्ट भागातून येणारे तंतू एकत्र आलेले असतात. प्रत्येक दृक्‌ मार्ग जवळजवळ दहा लक्ष तंतूंचा बनलेला असून त्यांपैकी ३/४ दृष्टीशी संबंधित असतात. प्रत्येक दृक्‌ मार्ग मेंदूतील ऊर्ध्वस्थ उन्नतांग आणि पार्श्व वक्रपिंड या विशिष्ट भागांपर्यंत तंतू पोहोचवितो. पार्श्व वक्रपिंडापासून नवे तंत्रिका तंतू निघून मोठ्यामेंदूच्या पार्श्वभागी असलेल्या पश्चकपाल खंडात जातात. या नव्या तंतुसमूहाला ‘दृक्‌ विसर्जन तंतुमार्ग’ म्हणतात. अशा प्रकारे उजव्या डोळ्याच्या जालपटलातील नाकाकडील अर्धा भाग आणि डाव्या डोळ्याच्या जालपटलातील कानशिलाकडील अर्धा भाग डाव्या पश्चकपाल खंडाशी आणि डाव्या डोळ्याच्या जालपटलातील नाकाकडील अर्धा भाग व उजव्या डोळ्याच्या जालपटलातील कानशिलाकडचा अर्धा भाग उजव्या पश्चकपाल खंडाशी तंत्रिका तंतूंद्वारे जोडलेले असतात.


दृक्‌ तंत्रिका विकार: या विकारांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे : (१) जन्मजात (२) आघातजन्य (३) शोथ (४) अर्बुदे (५) दृग्‌बिंब शोफ (दृक्‌ तंत्रिका ज्या ठिकाणी जालपटलास भेदून आत शिरते त्यास दृग्‌बिंब म्हणतात शोफ म्हणजे सूज) आणि (६) दृक्‌तंत्रिका अपपुष्टी.

जन्मजात : या विकृतीत कधीकधी दृक्‌ तंत्रिकेची अपूर्ण वाढ झालेली आढळते. ज्या बाजूस विकृती असेल त्या बाजूच्या दृष्टिक्षेत्रात काही प्रमाणात सतत अंधक्षेत्र (काळा डाग सारखा दिसत राहणे) तयार होते.

आघातजन्य : कवटीच्या हाडाचा विशेषकरून ज्यातून दृक्‌ तंत्रिका शिरते, त्या भागाचा अस्थिभंग झाल्यास दृक्‌ तंत्रिकेस इजा होण्याची शक्यता असते. ही इजा किरकोळ स्वरूपाची असल्यास ज्या बाजूच्या दृक्‌ तंत्रिकेस इजा झाली असेल त्या बाजूच्या डोळ्यामध्ये अल्पकालीन दृष्टिमांद्य येते. गंभीर स्वरूपाच्या इजेनंतर दृक्‌ तंत्रिकेची अपपुष्टी होऊन कायम स्वरूपाचे दृष्टिमांद्य येण्याचा संभव असतो.

शोथ : दृक्‌ तंत्रिका शोथाचे नेत्रगोलांतर्गत आणि नेत्रगोलपश्च असे दोन प्रकार ओळखले जातात. पहिल्यात दृग्‌बिंबावर नेहमीच परिणाम झालेला असतो, तर दुसऱ्यात फक्त काही वेळाच होतो. नेत्रगोलांतर्गत शोथामध्ये त्या बाजूची बाहुली कायमची आकुंचित झालेली असते. नेत्रपरीक्षकातून तपासणी केल्यास दृग्‌बिंबात अधिक रक्त गोळा झालेले व ते सुजलेले दिसते. दृष्टिक्षेत्रात बदल होतात, परंतु वेदना नसतात.

नेत्रगोलपश्च दृक्‌ तंत्रिकाशोथ तीव्र किंवा चिरकारी प्रकारचा असतो. बहुधा हा विकार एकाच डोळ्यास होतो. उपदंश, मधुमेह इ. सार्वदेहिक रोगांत हा विकार उद्‌भवतो. याशिवाय निकटवर्ती भागांतील शोथ (उदा., नासिकागुहाशोथ) दक्‌ तंत्रिकाशोथ उत्पन्न करू शकतात. दृक तंत्रिकाशोथ बरा झाल्यानंतर दृक्‌ तंत्रिकेचे कार्य बहुधा पूर्ववत होते. फार थोड्या तंतूंची अपपुष्टी कायम राहते.

अर्बुदे : दृक्‌ तंत्रिकेची अर्बुदे फार कमी प्रमाणात आढळतात.

दृग्‌बिंब शोफ : दृग्‌बिंबाला येणाऱ्या सुजेला दृग्‌बिंब शोफ म्हणतात. या सुजेची अनेक कारणे आहेत. मेंदूतील अर्बुद विकृती असलेल्या ८०% रोग्यांमध्ये दृग्‌बिंब शोफ आढळतो. उपदंशार्बुद, मेंदूतील विद्रधी (गळू), मस्तिष्कावरणशोथ इ. रोगांतही दृग्‌बिंब शोफ होतो. पुष्कळ वेळा नेत्रवैद्यास नेत्रपरीक्षकाद्वारे तपासणीच्या वेळी दृग्‌बिंब शोफ प्रथम आढळून येतो व नंतर त्यामुळे मेंदूतील विकृतीकडे लक्ष वेधले जाते. कारण शोधून इलाज करतात.

दृक्‌ तंत्रिका अपपुष्टी : जालपटलापासून पार्श्व वक्रपिंडापर्यंतच्या दृक्‌ तंत्रिका तंतूंच्या कार्यात आघातामुळे किंवा रोगामुळे खंड पडल्यास दृक्‌ तंत्रिका अपपुष्टी उद्‌भवते. जालपटलशोथ, आघात, पोष ग्रंथीतील (मेंदूच्या तळाशी असणाऱ्या एका महत्त्वाच्या ग्रंथीतील) अर्बुदे तसेच क्विनीन व मिथिल अल्कोहॉल यांसारखी रसायने दृक्‌ तंत्रिका अपपुष्टीस कारणीभूत होतात. गर्भपात करण्याच्या उद्दिष्टाने जादा क्विनीन सेवन केल्यास वा मिथिलेटेड स्पिरिट (मिथिल अल्कोहॉल मिसळून मद्य म्हणून पिण्यास अयोग्य केलेले एथिल अल्कोहॉल) पिण्यामुळे अपपुष्टी होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते. वरील कारणांशिवाय दृक्‌ तंत्रिकाशोथ, अपपोषण आणि ब गटातील जीवनसत्त्वांची न्यूनता, रक्तपुरवठा दोष, अर्बुदे इ. कारणांमुळेही अपपुष्टी होण्याचा संभव असतो. निदानाकरिता नेत्रपरीक्षकीय तपासणी व दृष्टिक्षेत्रमापन उपयुक्त असतात. कारण शोधून इलाज करतात.

डोळ्याचे इतर काही रोग व विकृती : अंधत्व : जन्मजात, अभिघातजन्य, संसर्गजन्य, स्थानिक संसर्गजन्य व अपकर्षजन्य, सार्वदेहिक रोगजन्य, विषजन्य आणि अर्बुदजन्य अशा विविध कारणांमुळे अंधत्व येऊ शकते [→ अंधत्व].

काचबिंदू अथवा श्यामहरित रोग: डोळ्यातील पुढच्या पोकळीतील द्रव पदार्थाचा (नेत्रजलाचा) दाब वाढल्यामुळे होणारा हा विकार असून या विकारात बाहुलीचा रंग पांढरट हिरवट दिसतो म्हणून त्याला हे नाव पडले आहे [→ काचबिंदु].

तिरळेपणा : नेहमी दोन्ही डोळ्यांचे केंद्रीकरण एकाच वस्तूवर व एकाच वेळी होत असते याकरिता प्रत्येक डोळ्याचा दृक्‌−अक्ष (दृश्य वस्तूपासून निघणारी आणि बाहुलीच्या मध्यबिंदूतून जाऊन जालपटलातील पीतबिंदूस मिळणारी सरळ रेषा) दुसऱ्या डोळ्याच्या दृक्‌-अक्षाशी नेहमी समांतरच असावा लागतो. जेव्हा दोन्ही डोळ्यांचे केंद्रीकरण होत नाही व दृक्‌−अक्षांची समांतरता बिघडते तेव्हा एकच डोळा केंद्रीकरण करतो व दुसरा एकीकडे वळतो, याला तिरळेपणा म्हणतात.

बाल्यावस्थेत पहिले तीन ते सहा महिने वयापर्यंत बालकांचे डोळे पुष्कळ वेळा समांतर अक्षाभोवती फिरत नाहीत. हा तिरळेपणा कालांतराने नाहीसा होतो. तिरळेपणा कधीकधी जन्मजात आणि आनुवंशिक असतो. तिरळेपणाचे कारण अशा वेळी मेंदूतील रक्तस्राव किंवा नेत्रगोलाच्या स्नायूंची विकृती असू शकते. जन्मजात किंवा इतर कारणांमुळे उद्‌भवणारा तिरळेपणा बहुधा मातेच्या लक्षात प्रथम येतो. वाचनाचे वय येताच मान व डोके एका बाजूस झुकविणाऱ्या, एक डोळा बंद करून वाचणाऱ्या किंवा एकच डोळा सतत चोळत राहणाऱ्या बालकांत तिरळेपणा असण्याचा संभव असतो.

आ. ४. डावा अभिसारी तिरळेपणा

आ. ५. डावा अपसारी तिरळेपणा


तिरळेपणाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात. (१) अपसारी : तिरळा डोळा कानशिलाकडे वळलेला आणि (२) अभिसारी : तिरळा डोळा नाकाकडील बाजूस वळलेला.

अनेक वेळा निरनिराळे दृष्टिदोष तिरळेपणाचे कारण असू शकतात. नेत्रवैद्याकडून डोळे तपासून योग्य तो चष्मा वापरण्याने असा तिरळेपणा नाहीसा होतो. वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनही बालकांना चष्मा देता येतो. लहान वयातच इलाज करणे हितावह असते. डोळ्याच्या विशिष्ट व्यायामांचा उपयोग होतो.

तिरळेपणामुळे मनावर दुष्परिणाम होण्याचा तसेच एका डोळ्यास कायमचे अंधत्व येण्याचा संभव असतो. योग्य चष्मा किंवा डोळ्याच्या व्यायामानंतरही तिरळेपणा कमी न झाल्यास नेत्रवैद्याकडून योग्य तीशस्त्रक्रिया करून घ्यावी. १८४५ मध्ये झ्यूल गेरॅं यांनी व १८५७ मध्ये आलब्रेख्ट फोन ग्रेफी यांनी तिरळेपणावर केलेल्या सुरुवातीच्या शस्त्रक्रियांच्या तंत्रामध्ये सतत प्रगतीच होत गेली आहे. या शस्त्रक्रिया नेत्रगोलांच्या बाहेर करण्यात येत असल्यामुळे धोकारहित असतात.

मोतीबिंदू: डोळ्यातील भिंगास (काचेस) अपारदर्शित्व येण्यास मोतीबिंदू म्हणतात [→ मोतीबिंदु].

रातांधळेपणा: दिवसा किंवा भरपूर प्रकाशात उत्तम दिसणे परंतु रात्री किंवा मंद प्रकाशात कमी दिसणे म्हणजे रातांधळेपणा होय [→रातांधळेपणा].

नेत्रदोल: (निस्टॅग्मस). वस्तूकडे बघताना दोन्ही डोळे नेहमी स्थिर असतात. हा स्थिरपणा जाऊन डोळ्यांची सूक्ष्म हालचाल वा आंदोलने होण्यास नेत्रदोल म्हणतात. हा स्थिरपणा नेत्रगोलांचे बाह्य स्नायू एकमेकांशी करीत असलेल्या सहकार्यावर अवलंबून असतो.नेत्रदोलामध्ये डोळ्यांची अनैच्छिक लयबद्ध दोलायमान हालचाल होते. जालपटल, कानातील श्रोतृ कुहर [→कान] आणि मानेचे स्नायू यांपासून निघणाऱ्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचून नंतर निघणारे प्रेरक संदेश नेत्रचालक तंत्रिकेद्वारे नेत्रगोलाच्या बाह्य स्नायूंची हालचाल नियंत्रित करतात. नेत्रदोल हे एक लक्षण असून त्याची पुढील अनेक कारणे आहेत : (१) दृष्टिदोषजन्य किंवा स्थिराभावजन्य, (२) श्रोतृ कुहरजन्य, (३) केंद्रीय तंत्रिका तंत्र विकृतिजन्य (उदा., अर्बुदे, क्षयरोगजन्य मस्तिष्कावरणशोथ), (४) जन्मजात आणि ज्याचे कारण माहीत नाही असा (इडिओपॅथिक) नेत्रदोल, (५) स्वनिर्मित आणि उन्मादजन्य (हिस्टेरियाजन्य).

नेत्राघात: डोळ्यांना होणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या इजांचा समावेश या संज्ञेत केला आहे. बोथट किंवा टोकदार वस्तू, डोळ्यात शिरणारे लोखंड किंवा इतर धातूंचे कण, रासायनिक पदार्थ आणि प्रारण आघात यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा संभव असतो. टोकदार पदार्थांच्या जखमा भेदक असल्यामुळे विशेष गंभीर असतात. (‘संवादी नेत्रशोथ’ या उपशीर्षकाखालील मजकूर पहावा).

डोळ्यात शिरणारे बाह्य पदार्थ सहसा खोल शिरत नाहीत. ते स्वच्छ मंडलास स्पर्श करतात तेव्हा सतत अश्रुधार वाहू लागून वेदना होतात. अश्रूमुळे बाह्य पदार्थ वाहून जाण्याचा संभव असतो परंतु तो तसाच राहिल्यास नेत्रवैद्याकडून काढून घ्यावा लागतो. नेत्रगोलात शिरलेली लोखंडी अथवा इतर चुंबकीय बाह्य वस्तू प्रथम क्ष–किरण चिकित्सेद्वारे निश्चित ठरवितात. अशी वस्तू डोळ्याच्या पृष्ठभागाकडे खेचून घेण्याकरिता शक्तिशाली विद्युत् चुंबक वापरतात.

कारखान्यातून काम करणाऱ्या कामगारांच्या डोळ्यात अतिवेगाने फिरणारी एखादी सूक्ष्म बाह्य वस्तू शिरण्याचा संभव असतो. अनेक वेळा ती शिरल्याचे ताबडतोब न जाणवता काही महिन्यानंतर डोळ्यास त्रास होऊ लागतो म्हणून शंका येताच नेत्रवैद्याकडून ताबडतोब तपासणी करून घ्यावी. तीव्र आम्ले व क्षार (अल्कली) डोळ्यात गेल्यास गंभीर परिणाम होतात. यावर स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुणे हा सर्वोत्तम प्रथमोपचार वेळ न दवडता सुरू करावा. जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांमुळे (उदा., गिर्यारोहणाच्या वेळी येणारे हिमांधत्व) डोळ्यातील स्वच्छमंडलावर परिणाम होतो. क्ष-किरणे, अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) यांमुळे काचेवर दुष्परिणाम होऊन मोतीबिंदू होण्याचा संभव असतो. लेसर किरणांसंबंधी संशोधन करणाऱ्यांमध्ये डोळ्यावर दुष्परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत.

पहा : अश्रु ग्रंथि चष्मा डोळा.

संदर्भ : 1. Garland, P. Ophthalmic Nursing, London, 1966.

            2. Lerman, S. Basic Ophthalmology, New York, 1966.

            3. Lyle, T.K. Cross, A. G., Eds. May and worth’s Manual of Diseases of the Eye, London, 1959.

           4. Newell, F.W. Ophthalmology : Principles and Concepts, Washington, 1965.

           5. Samuels, B. Fuchs, A. Clinical Pathology of the Eye, New York, 1952.

           6. Wybar, K. Ophthalmology, London, 1966.

          ७. पटवर्धन, द. गो. आपले डोळे (त्यांची रचना, कार्य वआरोग्य), पुणे, १९६४.

चिटणीस, व. के. भालेराव, य. त्र्यं.

रांजणवाडी जालपटल वियुक्ती
दृक् तंत्रिका शोथ पक्ष्मशोथ

पूय-व्रण

पूर्ण नेत्रशोथ
पूयसंची व्रण विसर्पी व्रण
दक् मार्ग : १. पीतबिंदू (उजवा), २. दृक् तंत्रिका (उजवी), ३. दृक्-फुली, ४. दृक्-मार्ग (उजवा), ५. पार्श्ववक्र पिंड (उजवा), ६. ऊर्ध्वस्थ उन्नतांग (उजवे), ७. दृक् विसर्जन तंतुमार्ग (उजवा), ८. पश्चकपाल खंड (उजवा).

अधिश्वेतपटलशोथ

नेत्रगोलाची पश्च बाजू–प्राकृतिक अवस्था (नेत्रपरीक्षकातून)
दृक् तंत्रिका अपपुष्टी आंतरकोशिकीय स्वच्छमंडलशोथ

अग्र-वर्णपटलशोथनेत्रश्लेश्मशोथातील अतिरक्तता-रक्तलाहिन्यांचे विस्फारण होऊन डोळा लाल दिसतो.अधोनेत्रश्लेश्म रक्तस्त्राव-सहज होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे रक्ताळलेल्या भागातील रक्त रंग न बदलता तांबडेच दिसते.अधिहृषताजन्य नेत्रशोथखुपरी-तीव्र प्रकारखुपरी-चिरकारी प्रकारअहिरातीव्र नेत्रश्लेष्मशोथ