नीरांजन: दिवा ओवाळणे तसेच ओवाळण्यासाठी किंवा आरतीसाठी वापरले जाणारे दीपपात्र. पूजेमध्ये किंवा व्यक्तीचे अभीष्टचिंतन करताना मंगलकारक दिवा ओवाळण्याची पद्धती रूढ आहे. सुशोभित करणे आणि शोभेचे प्रदर्शन या अर्थाच्या ‘नीराजन’ या संस्कृत शब्दापासून हा शब्द आला. राजाने करावयाच्या अनेक विधींमध्ये ‘नीराजन’ वा ‘नीराजना’ नावाचा एक विधी कालिकापुराण, अग्निपुराण (२६·८·३१), कौटिलीय अर्थशास्त्र (२·३० – ३२) इ. ग्रंथांत सांगितला आहे. राजे लोक स्वारीला निघण्यापूर्वी किंवा आश्विन महिन्यात हत्ती, घोडे, ध्वज, सेना इत्यादींची पूजा करून त्यांना ओवाळीत. वरील विधींत दिवा ओवाळणे किंवा आरती ओवाळणे या गोष्टीस प्राधान्य असल्याने त्या अर्थी नीराजन हा शब्द पुराणवाङ्मयात रूढ झाला. या दिव्यात एक ते सात वाती लावतात कापूर घालूनही देवाला नीरांजन ओवाळतात. मंत्र न म्हणता वा कोणतेही कर्म न करता शिवास केवळ नीराजन केले म्हणजे दिव्याने ओवाळले, तरी त्याची पूजा परिपूर्ण होते, असे स्कंदपुराणात म्हटले आहे.
भिडे, वि. वि.