निर्देशिका :(डिरेक्टरी). ‘निर्देशिका’ या शब्दाचा वाच्यार्थ निर्देश वा मार्गदर्शन करणारी कोणतीही वस्तू असा होत असला, तरी मराठी भाषेत ‘डिरेक्टरी’ या विशिष्टार्थसूचक इंग्रजी शब्दाचा पर्याय अशा अर्थानेच हा शब्द रूढ झाला आहे. निर्देशिका तयार करण्याची कल्पना ही मूलतः पाश्चात्त्यांचीच असून तिच्यामध्ये जिज्ञासूंना हव्या असलेल्या व्यक्तींची माहिती, त्यांचे व्यवसाय आणि त्यांचे पत्ते यांसह देण्यात येते. अर्थात पाहणाऱ्याला ती माहिती चटकन कळावी म्हणून तिची नोंद आद्याक्षरानुक्रमाने करण्यात येते.
प्रस्तुत शब्द इंग्रजी भाषेमध्ये मुळात ‘सामुदायिक उपासनेसंबंधी मार्गदर्शन करणारे पुस्तक’ या अर्थाने आला असला, तरी आज मात्र तो अर्थ नामशेष झाला आहे. शहरातील व प्रांतातील सर्व नागरिकांची नावे, त्यांचे पत्ते, व्यवसाय इत्यादींबद्दलची माहिती देणारे पुस्तक, दूरध्वनी वापरणाऱ्या व्यक्तींची नामावली-पुस्तिका अथवा एखाद्या विशिष्ट व्यवसायात किंवा उपक्रमात सहभागी असलेल्या सदस्यांची सूची अशा अर्थांनी निर्देशिका हा शब्द हल्ली प्रयुक्त होतो. इंग्लंडमध्ये निरनिराळ्या प्रांतांसाठी वर्णक्रमानुसार तयार केलेली ‘टपालकार्यालय निर्देशिका’ ही अन्य सर्व निर्देशिकांत सर्वाधिक उपयुक्त आहे. ‘लंडन’ संबंधीची निर्देशिका सर्वांत मोठी असून तीत (१) न्यायालये, (२) कार्यालये, (३) रस्ते, (४) कायदे, (५) संसद, (६) टपाल, (७) नगरपालिका, (८) व्यापार-व्यवसाय, (९) बँका, (१०) उपनगरे आणि (११) टेलिफोन इ. शीर्षकांखाली आद्याक्षरानुक्रमाने माहिती नमूद केलेली असते.
मराठीमध्ये मात्र निर्देशिका अथवा डिरेक्टरी हा शब्द अन्य नामावली-पुस्तिकांना न लावता केवळ ‘दूरध्वनी निर्देशिका’ (टेलिफोन डिरेक्टरी) साठीच तो रूढ केला गेला आहे. क्वचित् हिंदीच्या प्रभावामुळे आकाशवाणी केंद्राच्या स्त्री-प्रमुखाच्या संबंधीही ‘निर्देशिका’ हा शब्द मराठीत वापरला जातो. जसे : श्रीमती ХХХ, केंद्र-निर्देशिका, आकाशवाणी केंद्र……. परंतु सर्वसामान्य व्यवहारात ‘निर्देशिका’ म्हणजे दूरध्वनी वापरणाऱ्यांची नामावली-पुस्तिका असेच मानले जाते.
वऱ्हाडपांडे, वसंत कृष्ण