नावे : खरी किंवा काल्पनिक व्यक्ती, खरे वा काल्पनिक पदार्थ, परिस्थिती, स्थळे वा संकल्पना यांची निदर्शक संज्ञा. नावाने व्यक्ती किंवा वस्तू सूचित होते परंतु कोणतेही सामान्य वा विशिष्ट गुण नावातून सूचित होतातच, असे नाही.
नावे ही सामाजिक व्यवहारांची प्राथमिक गरज असल्यामुळे मानवी जीवनाच्या दृष्टीने त्यास विशेष महत्त्व आहे. समाजाच्या प्राथमिक अवस्थेपासूनच नावाच्या उत्पत्तीस सुरुवात झाली असली पाहिजे. मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याचे अनेक व्यक्तींशी संबंध येत राहिले व एक व्यक्ती वा वस्तू दुसरीपासून वेगळी आहे, हे ओळखण्याच्या दृष्टीने किंवा इतरांपासून निराळी करण्याच्या दृष्टीने तिला कोणत्या तरी संज्ञेने संबोधण्याची आवश्यकता वाटणे साहजिकच होते. माणसाच्या सभोवती असणाऱ्या नानाविध वस्तू, प्राणी, झाडे, वनस्पती इत्यादींनाही नावाने संबोधणे त्या दृष्टीने आवश्यक होते. अगदी आरंभीचा व्यक्तीचा वा वस्तूचा निर्देश हा तिच्या गुणवर्णनात्मक स्वरूपाचा असावा. नंतर स्वराच्या जुळणीने व्यक्ती, प्राणी, वस्तू व इतरांना संबोधण्यास सुरुवात झाली असली पाहिजे. पुढे मात्र भाषेच्या उत्पत्तीबरोबर सुटसुटीत नावाचा पुरस्कार करण्यात आला असावा असे दिसते.
नावांच्या निवडीत व पद्धतीत एकच एक तत्त्व आढळत नसून, त्यामागे नानाविध स्वरूपाच्या सांस्कृतिक भूमिका व संदर्भ असल्याचे दिसते. समाजाची मान्यता हे व्यक्तीच्या वा वस्तूच्या नावामागील निर्विवाद तत्त्व होय.
अगदी प्रारंभी तरी मानवाने विशिष्ट पदार्थाला विशिष्टच नाव का दिले, याचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे. विचार व भावना व्यक्त करण्याकरिता त्याने खाणाखुणा, विशिष्ट आवाज किंवा स्वर यांचा उपयोग केला असला पाहिजे. त्याचप्रमाणे विशिष्ट आवाज करणाऱ्या प्राण्यांना त्या आवाजावरून संबोधण्यास सुरुवात झाली असावी, असे दिसते. उदा., काव काव करणारा कावळा चिव चिव करणारी चिमणी इत्यादी. ही नावे पुढे समाजात रूढ झाली असावीत. काहींच्या मते ईश्वरानेच अमुक शब्दाचा अर्थ अमुक असे संकेत ठरवून दिले व भाषा निर्माण केली पण हे मत शास्त्रीय दृष्ट्या मान्य होण्यासारखे नाही. वस्तुतः मानवानेच हे संकेत निर्माण केले असले पाहिजेत. संकेतांची प्रक्रिया कशी घडून आली, याबद्दलही मतभेद आहेत. पण पदार्थ व त्याचा निदर्शक शब्द यांत कार्यकारणसंबंध असतोच असे नाही, याबद्दल मात्र एकमत आहे. प्राथमिक स्वरांतून व आवाजांतून निर्माण झालेला शब्द किंवा संबोधन वा नाव विशिष्ट पदार्थाला देण्याचा संकेत समाजात रूळला व ते ते पदार्थ त्या त्या नावाने ओळखले जाऊ लागले. हे संकेत मानवाच्या पुढच्या पिढीला मिळत गेले व साधारणतः थोड्याफार फरकाने ते मान्य होत गेले. अशा तऱ्हेने नावाच्या निर्मितिप्रक्रियेचे विवरण करता येणे शक्य आहे. भाषाशास्त्रात भाषेच्या निर्मितीचा अनेकांगांनी अभ्यास केला जातो.
भाषेच्या विकासाबरोबर शब्दाच्या स्वरूपाचा व कार्याचा विकास होत गेला. एका विशिष्ट जलप्रवाहाला छोटा असल्यास ओढा व मोठा असल्यास नदी असे प्रारंभी संबोधण्याचे संकेत मान्य झाले असतील. पुढे सर्व छोट्या प्रवाहांना ओढा व सर्व मोठ्या प्रवाहांना नदी असे संबोधण्यात आले. या व अशाच प्रकारच्या इतर संज्ञांचा वापर जातिवाचक म्हणून होऊ लागला परंतु अशा गटांतून विशिष्ट ओढ्याचा किंवा नदीचा उल्लेख करावयाचा झाल्यास विशिष्ट नाव देणे क्रमप्राप्त झाले. अशा तऱ्हेने ‘भिंगार ओढा’, ‘कृष्णा नदी’, ‘कावेरी’, ‘गोदावरी’अशी विशिष्ट नावे पडली. अशा संज्ञांना विशेषनामे म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
व्यक्तीचे नाव हे एका अर्थाने तिची विशिष्टता व्यक्त करते, म्हणून एका व्यक्तीला एकच नाव असावे, असा सर्वसाधारण संकेत दिसून येतो. कायदेशीर व सामाजिक दृष्ट्या व्यक्तीच्या नावाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती, समूह यांच्या आवडीनिवडी नावांतून सूचित होत असतात. व्यक्तीचे नाव केव्हा ठेवावे यासंबंधी विविध समाजांत विविध प्रथा व विधी आढळतात. नामकरणविधी हा हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक मानण्यात येतो. इतर धर्मांतही हा विधी आढळतो.
अनेक व्यक्तींचे एकच विशेषनाव असू शकते त्या व्यक्तींची भिन्नता दाखविण्यासाठी व्यक्तिनावाबरोबर वडिलांचे नावही लावणे पुढे प्रचारात आले. याच दृष्टीने कुटुंबनावाचा किंवा आडनावाचा उपयोग हळूहळू रूढ झाला असावा. तसेच पूर्वजांचे किंवा आपल्या घराण्याचे महत्त्व आणि अभिमान व्यक्तीला वाटत असल्यामुळे तो आपल्या नावाबरोबर आडनावे लावू लागला. सोळाव्या शतकात कुटुंबनावाच्या प्रक्रियेचा विकास पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारची कुटुंबनावे किंवा आडनावे चार प्रकारांत विभागली जाऊ शकतात : (१) स्थानिक नावे, (२) वंशपरंपरागत नावे, (३) अधिकार किंवा धंद्यापासून पडलेली नावे, (४) टोपण नावे. आपले राहण्याचे ठिकाण स्पष्ट व्हावे, त्याचप्रमाणे इतरांच्या वास्तव्याचे ठिकाण माहीत असावे किंवा स्थळांशी व्यवहार करता यावा म्हणून स्थळांना अगदी सुरुवातीपासून नावे देण्याची प्रथा रूढ झालेली दिसते.
स्थलनामे किंवा व्यक्तिनामे देताना समाजाची धार्मिक भावना त्याचप्रमाणे कार्य, उपयुक्तता, काळ, वेळ, परिसर, घटना, रंग-रूप, गुण इ. बाबी विचारात घेण्यात येतात. भिन्न वेळी आणि भिन्न जागी नावांच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी साधारणतः वरील गोष्ट लक्षात घेऊनच व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, स्थलांना व परिसरातील इतर बाबींना नावे देण्यात येतात.
नावाचा सर्व दृष्टींनी अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेला ‘नामविद्या’ म्हणतात. या विद्येचा विषय अत्यंत व्यापक आहे कारण बहुतेक प्रत्येक खऱ्या व काल्पनिक व्यक्तीला व वस्तूला काहीतरी नाव असते. नामविद्येत तत्त्वतः सर्व भाषा, सर्व भौगोलिक प्रदेश, सर्व संस्कृती आणि सर्व ऐतिहासिक काळ या सर्वांचा अभ्यास अंतर्भूत होतो परंतु सुलभतेच्या दृष्टीने या अभ्यासाची वर्गवारी करणे सोयीचे ठरते. उदा., भाषिक, भौगोलिक किंवा ऐतिहासिक अभ्यास. दुसरा प्रकार म्हणजे नावातील अंगभूत गुणवैशिष्ट्याचा (बव्हंशी वर सांगितलेल्या बाबींना धरून) अभ्यास हा होय. स्थूल वर्गीकरणात व्यक्तिनामे व स्थलनामे असे नावाचे दोन मोठे गट केले जातात व त्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. अगदी काटेकोर परिभाषेत सांगावयाचे झाले, तर व्यक्तिनामाच्या गटाला मानवनाम (ॲंथ्राॅपोनिमी) व त्याच्या अभ्यासास मानवनामविद्या (अँथ्रॉपोनॉमिस्टिक्स) असे म्हणतात. स्थलनामाच्या गटास स्थलनाम (टोपॉनिमी) म्हणतात आणि त्याच्या अभ्यासास स्थलनामविद्या (टोपॉनिमिस्टिक्स) असे म्हणतात. तथापि नामविद्या (ओनोमॉस्टिक्स) या संज्ञेचा वापर सैलपणे व्यक्तिनामे आणि त्यांचा अभ्यास या अर्थाने करण्यात येतो आणि स्थलनाम या संज्ञेचा वापर स्थलनामे व त्यांचा अभ्यास यांच्याकरिता करण्यात येतो.
स्थलनाम या संज्ञेचा काटेकोर परिभाषेतही दोन प्रकारे अर्थ केला जातो. स्थूल दृष्टीने त्यात वस्तीची ठिकाणे, इमारती, रस्ते, देश, पर्वत, नद्या, तळी, समुद्र, ग्रह-तारे व त्याच प्रकारची दुसरी नावे येतात वा ही संज्ञा फक्त राहत्या ठिकाणापुरतीच मर्यादित करण्यात येते उदा., शहरे, गावे, खेडी, वस्त्या इत्यादी. जर स्थलनाम संज्ञेचा दुसरा अर्थ घेतला, तर बिनवस्तीच्या ठिकाणांना (उदा., शेते, छोटे वनविभाग) सूक्ष्म स्थलनामे (मायक्रोटोपॉनिमी) असे म्हणता येईल. नामविद्येत मार्गनाम (होडॉनिमी), जलाशयनाम (हायड्रॉनिमी) आणि गिरिनाम (ओरॉनिमी) या संज्ञा रूढ असून त्या त्या वर्गातील नावांचा अभ्यास त्या त्या संज्ञांच्या रूपाने केला जातो. यापेक्षा अधिक संज्ञा वापरात नाहीत. वस्तुनाम (क्रेमेटोनिमी) अशी संज्ञा जरी केव्हा केव्हा कानावर पडत असली, तरी सामान्यतः ती वापरण्यात येत नाही.
वरील विवेचनावरून असे दिसून येते की, नावाच्या अभ्यासाच्या दृष्टीने व्यक्तिनामे व स्थलनामे असे दोन प्रमुख गट करता येतील. हे दोन्ही गट मानवी भाषेचे अविभाज्य अंग असून त्यांतून मानवी इतिहास आणि संस्कृती यांबद्दल माहिती मिळण्यास मदत होते. इतर प्रकारची नावे साधारणतः दोन्हीपैकी कोणत्या तरी गटात येतात.
नावासंबंधी संपूर्ण माहिती मिळविण्याच्या दृष्टीने भिन्नभिन्न प्रकारच्या नावांचा अभ्यास एकत्र करणे आवश्यक असते कारण नावामध्ये अनेक परिवर्तने होत असतात. उदा., पुष्कळशी स्थलनामे व्यक्तिनामापासून आलेली असतात (उदा., वॉशिंग्टन, औरंगाबाद, अहमदनगर, हरिहर, रामेश्वर, जयसिंगपूर इ.). पुष्कळशा ग्रहांची व ताऱ्यांची नावे पुराणकथाविषयक व्यक्तींवरून पडली आहेत (उदा., शुक्र, शनी, गुरू इ.). पुष्कळशी व्यक्तिनामे स्थलनामावरूनही देण्यात आलेली आहेत (उदा., काशी, मथुरा, द्वारका इ.). नावाच्या परिवर्तनक्रियेत त्याचा अर्थ व तिचे इतर वस्तूंशी असलेले साहचर्य या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
पहा : आडनावे परिभाषा व्यक्तिनामे स्थलनामे.
खोडवे, अच्युत
“