नाथमाधव : (३ एप्रिल १८८२–२१ जून १९२८). लोकप्रिय मराठी कादंबरीकार. खरे नाव द्वारकानाथ माधव पितळे. त्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईस झाले. शालेय जीवनात एक क्रीडानिपुण विद्यार्थी म्हणून ते चमकले तथापि पुस्तकी शिक्षणाकडे त्यांचा फारसा ओढा नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुलाबा येथील ‘गन कॅरिज फॅक्टरी’ मध्ये नोकरी धरली. त्या निमित्ताने पुष्कळ प्रवास केला. ह्याच काळात त्यांना शिकारीचा छंद जडला. अशाच एका शिकारीच्या प्रसंगी एका उंच कड्यावरून ते खाली कोसळले आणि त्यांच्या कमरेखालील भाग लुळा झाला (१९०५). उपचारार्थ इस्पितळात असताना त्यांना वाचनाची आवड उत्पन्न झाली आणि अनेक इंग्रजी-मराठी ग्रंथांचे त्यांनी वाचन केले. त्यातूनच लेखन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीला त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले आणि पुण्याच्या डेक्कन हेरल्ड ह्या वृत्तपत्रातून ते प्रसिद्धही झाले. पुढे धूतपापेश्वर आरोग्य मंदिराकडून देशी औषधोपचार करून घेण्यासाठी ते पनवेल येथे गेले असता तेथे प्रबोधनकारठाकरे आणि केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये ह्यांचा सहवास त्यांना लाभला. पनवेल येथेच त्यांनी कथा-कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली. प्रेमवेडा ही त्यांची पहिली कादंबरी १९०८ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून तिसांहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. नाथमाधवांनी आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून काही प्रश्नांची चर्चा बोधवादाच्या अंगाने करण्याचा प्रयत्न केला. अशा कादंबऱ्यांपैकी डॉक्टर (३ भाग, १९१८–२०) ही त्यांची विशेष लोकप्रिय अशी कादंबरी. स्वतःची बायको कमलिनी ही सुशिक्षित असल्यामुळे तिच्याबद्दल गैरसमज करून घेणारा आणि तिचा त्याग करणारा अशिक्षित नवरा त्यांनी ह्या कादंबरीत दाखविला आहे. कमलिनी मात्र एम्.डी. झाल्यानंतरही आपल्या पतीशी सौजन्याने वागून त्याच्या मनात परिवर्तन घडवून आणते. ह्या कादंबरीवर एक मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. ह्या कादंबरीखेरीज हेमचंद्र रोहिणी (१९०९), रायक्लब अथवा सोनेरी टोळी (२ खंड, पूर्वार्ध आवृ. दुसरी १९१५ उत्तरार्थ, १९२४), देशमुखवाडी (१९१६), विमलेची ग्रहदशा (१९१७) अशा अन्य काही सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्यांतून स्त्रियांच्या व्यथा, घरातून मिळणारे शिक्षण आणि सुसंस्कार ह्यांचे महत्त्व, समाजातील कृष्णकृत्ये असे काही विषय त्यांनी तळमळीने हाताळलेले आहेत. तथापि त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी–विशेषतः हिंदवी स्वराज्यविषयक कादंबऱ्यांनी–कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक विशेष वाढविला. सावळ्या तांडेल (१९०९) ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवाजी महाराजांचे सामर्थ्यशाली आरमार आणि ते राकणारे शूर तांडेल हा विषय मराठी ऐतिहासिक कादंबरीला नवा होता. त्यामुळे शिवकालीन इतिहासातील एका वेगळ्याच विषयावर कादंबरी लिहिण्याचे श्रेय त्यांना मिळाले. स्वराज्याचा श्रीगणेशा (१९२१), स्वराज्याची स्थापना (१९२२), स्वराज्याची घटना (आवृ. दुसरी, १९२५), स्वराज्याचा कारभार (१९२३), स्वराज्यावरील संकट (१९२३), स्वराज्याचे परिवर्तन (१९२५) आणि स्वराज्यातील दुफळी (१९२८) ह्या कादंबरीमालेतून त्यांनी मराठेशाहीच्या उदयापासूनचा कालखंड चित्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यामागील प्रेरणा देशप्रेमाची तशीच मराठेशाहीविषयीच्या गाढ अभिमानाची होती. ठिकठिकाणी प्रवास करून ते ऐतिहासिक सामग्री मिळवीत तसेच इतिहासग्रंथांचे वाचन करीत. असे असले, तरी त्यांच्या कादंबऱ्यांतून ऐतिहासिक कालखंडांची अस्सल चित्रे ते उभी करू शकले नाहीत. शैली, व्यक्तिरेखन आदी बाबींकडेही त्यांनी फारसे लक्ष पुरविल्याचे दिसत नाही, अशी टीका त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांवर झालेली आहे.
नाथमाधवांना अद्भुताचे मोठे आकर्षण होते. वीरधवल (१९१३) ह्या कादंबरीत त्याचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांप्रमाणे ह्या कादंबरीसही मोठी लोकप्रियता लाभलेली होती. त्यांनी लिहिलेली हेमचंद्र रोहिणी ही राजकीय विषयांवरील आरंभीच्या मराठी कादंबऱ्यांपैकी एक होय. त्यांनी काही नाटके व कविताही लिहिल्या आहेत. मुंबई येथे ते निधन पावले.
संदर्भ : गुप्ते, चारुशीला, नाथमाधव व्यक्ति आणि वाङ्मय, मुंबई, १९७३.
गुप्ते, चारूशीला