नवा: (लॅ. स्टर्क्युलिया बॅलन्घास कुल-स्टर्क्युलिएसी). भारतातील उष्ण भागात (दक्षिणेत व महाराष्ट्रात) आणि श्रीलंका व मलेशिया येथे आढळणारा हा एक मध्यम आकारमानाचा वृक्ष आहे. याचे कोवळे भाग लालसर तपकिरी व केसाळ असून पाने साधी, उपपर्णयुक्त, एकाआड एक, अखंड आणि लंबगोल असतात. फुले लांब देठाची व बिनपाकळ्यांची फळे कठीण, गोलसर, सु. ६ सेंमी. व्यासाची असून बाहेरून गर्द लालसर पिवळी व आत शेंदरी असतात. बी काळेकरंद, चकचकीत व फळ उकलल्यावर शकलांच्या कडेने चिकटून राहाते. इतर शारीरिक लक्षणे ⇨ स्टर्क्युलिएसी कुलात (मुचकुंद कुलात) वर्णिल्याप्रमाणे. फिलिपीन्समध्ये फळ सारक व शीतक (थंडावा देणारे) समजतात. अंतर्सालीपासून बळकट धागे काढतात आणि त्यांचे दोर व तत्सम धाग्यांच्या वस्तू बनवितात.

पहा : कौशी गोलदार गोलदारू सारडा.

पराडकर, सिंधु अ.