नंद वंश : प्रचीन मगधातील एक प्रसिद्ध राजवंश. शैशुनागांनंतर नंद वंशाचे राज्य स्थापन झाले. ह्याचा सत्ताकाल अद्यापि अनिश्चित आहे कारण पुराणात तद्‌विषयक भिन्नभिन्न मते आहेत. तथापि सामान्यतः तो चाळीस वर्षांचा (इ. स. पू. ३६४—३२४) मानण्यात येतो.

या वंशाचा मूळ पुरुष म्हणून महापद्माचे नाव पुराणात येते. पुराणातील वर्णनानुसार तो शेवटचा शैशुनाग नृपती महानंद याचा दासीपुत्र होता. या काळापर्यंत क्षत्रिय राजे झाले आणि याच्या पुढे शुद्र राजांचा अंमल सुरू झाला, असे मानण्यात येते (नन्दान्त क्षत्रिय कुलम्). ग्रीक इतिहासकारांच्या विधानाप्रमाणे हा नंदराजा एका न्हाव्याचा मुलगा होता. जैन साहित्यातही त्याला एका वेश्येला न्हाव्यापासून झालेला पुत्र, असे म्हटले आहे. पण हा पुरावा फार नंतरचा आहे. त्यामानाने पुराणातील विधान विश्वसनीय वाटते.

महापद्माने स्वकालीन इक्ष्वाकू राजांचा व पांचाल, काशी, कलिंग, अश्मक, मिथिला, कुरु वगैरे देशांच्या अधिपतींचा उच्छेद करून आपली सत्ता उत्तर भारतभर पसरविली. नंदराजाने कलिंग देशात पाटबंधारे बांधल्याचा आणि त्यावर स्वारी करून तेथील एक जिनमूर्ती पाटलिपुत्राला नेल्याचा उल्लेख खारवेलच्या हाथीगुंफा लेखात आहे. तेव्हा कलिंग देशही त्याच्या साम्राज्यात मोडत होता, यात संशय नाही. नंदांनी दक्षिणेच्या काही प्रदेशांवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले असल्याचा उल्लेख तमिळ वाङ्‌मयात येतो पण तो फार नंतरच्या काळातील असल्यामुळे विश्वसनीय नाही. तसेच कुंतलासारख्या दूरच्या प्रदेशावर त्यांचे आधिपत्य असावे, असे कर्नाटकमधील काही शिलालेखांवरूनही दिसते परंतु तेही निर्णायक म्हणता येणार नाही. गोदावरीकाठच्या नांदेड ह्या ग्रामनामावरून नंदसत्ता त्या भागात प्रस्थापित झाली असावी, असेही काही विद्वान मानतात.

महापद्माने २८ वर्षे राज्य केले. त्याला आठ मुलगे होते. त्यांपैकी सुकल्प या एकाचे नाव पुराणे देतात. त्या सर्वांनी मिळून बारा वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. श्रीलंकेच्या महावंसामध्ये शेवटच्या नंदाचे नाव धननंद असे आले आहे. मुद्राराक्षसात ते सर्वार्धसिद्धि असे दिले आहे, पण ते संस्कृत नाटक नंतरचे आहे. नंदराजांनी आपल्या राज्यात नवीन वजन-मापे सुरू केली असे पाणिनीच्या सूत्रांवरील (२, ४, २१) काशिकेत म्हटले आहे.

महापद्माला पुराणात सर्वक्षत्रान्तक (सर्व क्षत्रियांचा संहारक) असे म्हटले आहे. त्याचे साम्राज्य विशाल होते आणि त्याचा खजिना भरलेला होता. त्याने फार मोठी सेना जय्यत तयारीत ठेवली होती. ग्रीक इतिवृत्तकार सांगतात, की महापद्माच्या सैन्यात २०,००० घोडेस्वार २,००,००० सैनिक २,००० रथ आणि ३,००० (काहींच्या मते ६,०००) हत्ती होते.

अलेक्झांडरने भारताच्या वायव्य भागावर स्वारी करून बिआस नदीपर्यंत मजल मारली. येथे नंदराजाच्या लष्करी सामर्थ्याची वार्ता कळताच त्याच्या सैनिकांनी पुढे चाल करण्याचे नाकारल्यामुळे त्यास परत फिरावे लागले.

इ. स. पू. ३२४ च्या सुमारास चाणक्याच्या साह्याने ⇨ चंद्रगुप्त मौर्याने नंदराजाला पदच्युत करून मगधाची गादी बळकावली.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.

मिराशी, वा. वि.