धोंडेमाती : (बोल्डर क्ले). वाहत्या हिमबर्फाच्या मोठमोठ्या थरांनी वा हिमनद्यांनी सखल प्रदेशात आणून टाकलेल्या गाळाला ही संज्ञा वापरतात. ही बहुधा बारीक मातीची बनलेली असते व तिच्यात खडकांचे व खनिजांचे काहीसे अणकुचिदार लहानमोठे धोंडे, गोटे व खडे विखुरलेले असतात. बारीक माती स्थानिक खडकांपासून हिमबर्फाच्या घर्षणाद्वारे निर्माण झालेली असते धोंडे–गोटे हिमबर्फाबरोबर वाहून आलेले असून ते सर्व प्रकारच्या खडकांचे असले, तरी अग्निज व रूपांतरित खडकांचे अधिक प्रमाणात असतात. धोंडे–गोटे विशिष्ट दिशेत मांडलेले असतात, तसेच हिमबर्फाने वाहून नेले जाताना अपघर्षण झाल्याने (घासटले गेल्याने) कित्येक धोंड्या–गोट्यांची पृष्ठे तासलेली, घासलेली आणि चरे पडलेली असतात. या दोन्ही गोष्टींमुळे हिमबर्फाच्या हालचालीची दिशा ठरविता येते. धोंडेमातीचे घटक एकत्र चिकटविले जाऊन तयार होणाऱ्या खडकाला गोलाश्म संस्तर वा टीलाइट म्हणतात. कधीकधी धोंडेमातीमधील बारीक माती नंतरच्या क्रियांनी निघून जाते व वाळूसारख्या भरडकणी आधारकात धोंडे–गोटे विखुरलेले आढळतात, अशा खडकाला हिम-अपोढ म्हणतात. अनुकूल हवामानात धोंडेमातीपासून सुपीक शेतजमिनी तयार होतात उदा., ब्रिटीश बेटांचा उत्तर भाग, हॉलंड, जर्मनी व कॅनडाचा काही भाग.

धोंडेमातीचे एकसारखे थर, वेडेवाकडे ढीग वा टेकड्या आढळतात. धोंडेमाती पुष्कळदा हिमनदीने तयार झालेल्या सूक्ष्म थरयुक्त अशा ⇨ ऋतुस्तर असणाऱ्या गाळाबरोबर आढळते. प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या), पर्मो–कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या), कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) इ. हिमकालांतील धोंडेमाती जगातील विविध भागांत आढळते. स्कँडिनेव्हियात कँब्रियन भारतात पर्मो–कार्‌बॉनिफेरस तर भारत, यूरोप व उ. अमेरिकेत प्लाइस्टोसीन काळातील धोंडेमाती आढळते. भारतात राजस्थान, हजारा, कारेवा, तालचेर इ. भागांत धोंडेमाती आढळते.

पहा : हिमकाल.

ठाकूर, अ. ना.