पेतफी, शांडोर : (१ जानेवारी १८२३-३१ जुलै १८४९). श्रेष्ठ हंगेरियन कवी आणि देशभक्त. मध्य हंगेरीतील किश्करस ह्या शहरी जन्मला. लहानपणापासून पेतफी काव्यरचना करू लागला. Versek 1842-44 (१८४४) ह्या त्याच्या पहिल्याच काव्यसंग्रहामुळे हंगेरीचा श्रेष्ठ भावकवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. त्यानंतरच्या त्याच्या काव्यनिर्मितीत A helyseg Kalapacsa (१८४४, इं. शी. द हॅमर ऑफ द व्हिलेज) आणि यानोस व्हीट्झ (१८४५) ह्या महाकाव्यांचा अंतर्भाव होतो तथापि पेतफीची महाकाव्यरचना ही त्याच्या भावकवितेइतकी महत्त्वाची मानली जात नाही. त्याच्या काही भावकविता जागतिक साहित्यातील श्रेष्ठ भावकवितांच्या तोडीच्या आहेत. हंगेरीत १८४८ मध्ये झालेल्या क्रांतीने त्याच्या अनेक कवितांना प्रेरणा दिली. ज्वलंत देशभक्ती आणि उत्कट स्वांतत्र्याकांक्षा ह्यांचा प्रत्यय त्यांतून येतो. त्यांपैकी राइज हंगेरियन (इं. अर्थ) ही त्याची कविता विशेष प्रसिद्ध आहे. हंगेरियन कवितेला सांकेतिकतेच्या कोंडीतून पेतफीने मुक्त केले आणि साध्या, अनलंकृत भाषेतूनही सूक्ष्म भावभावनांची अभिव्यक्ती साधता येते, ह्याची प्रचीती दिली. हंगेरियन लोकगीतांच्या परंपरेचे सत्त्व त्याच्या भावकवितेत आळून आलेले आहे.

पेतफी १८४८ च्या क्रांतीत क्रांतिकारकांच्या बाजूने लढला आणि ३१ जुलै १८४९ रोजी शेगेश्व्हार (आता सीगीश्वारा ह्या नावाने रूमानियात) येथे झालेल्या लढाईत तो बेपत्ता झाला. तोच त्याचा मृत्युदिन समजला जातो.

कुलकर्णी. अ. र.