जलप्रपातरेषा : एखाद्या प्रदेशातील पर्वत पायथ्याच्या पठारी भागातून वाहणाऱ्या नद्या पठारावरून एकदम समुद्रकिनाऱ्यावरील सखल प्रदेशात प्रवेश करून मग समुद्राला मिळत असतील, तर पठार व सखल प्रदेश यांच्या सीमेवर त्यांच्या मार्गात जलप्रपात तयार होतात व पठाराच्या कडेवर एक जलप्रपातमालिकाच तयार होते. ही प्रपातमालिका ज्या रेषेवर निर्माण होते, तिला जलप्रपातरेषा म्हणतात. अशा जलप्रपातरेषेचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर अमेरिकेतील ॲपालॅचिअन पर्वताच्या पूर्वेकडील जलप्रपातरेषा हे होय. उत्तर अमेरिकेत ॲपालॅचिअन पर्वतात उगम पावणाऱ्या बऱ्याच नद्या पूर्वेस पायथ्याशी पसरलेल्या, प्राचीन आणि अतिकठीण खडकांच्या पर्वतपदीय पठारावरून वाहत जातात व त्याच्या पूर्वेच्या अतितीव्र उतारावरून अटलांटिक महासागर किनाऱ्यालगत पसरलेल्या सखल प्रदेशात धबधब्यांच्या रूपाने उड्या घेतात. त्यामुळे या भागात सखल प्रदेश व पठारी भाग यांच्या सीमेवर सामान्यतः दक्षिण-उत्तर गेलेली जलप्रपातरेषा निर्माण झाली आहे. या धबधब्यांच्या शक्तीचा उपयोग करून घेऊन तेथे गावे वसली आणि आता या जलप्रपातरेषेला अनुसरून औद्योगिक शहरांची एक मालिकाच तेथे निर्माण झालेली दिसते.
दाते, संजीवनी