जपानी साहित्य : प्राचीन जपानी साहित्यावर चिनी साहित्याचा फार मोठा ठसा आढळतो, तर आधुनिक जपानी साहित्य पाश्चिमात्य साहित्याने प्रभावित झालेले आहे. जपानी वाङ्‌मयाचे रहस्य समजावून घ्यायचे असेल, तर त्याची लेखनवैशिष्ट्ये व त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. उदा., मान्योशू  या आठव्या शतकातील काव्यसंग्रहामध्ये नव्यानेच उदयास येऊ लागलेल्या खानदानी घराण्यांतील लोकांचा आयुष्याबद्दलचा निर्मळ व खळखळणारा आनंद दिसून येतो परंतु अकराव्या शतकातील ⇨गेंजी मोनोगातारी  या कादंबरीत त्याच खानदानी समाजातील गांभीर्य आणि प्रौढत्व प्रतिबिंबित झालेले आढळते. त्यानंतरच्या काळात जपानमध्ये झालेल्या यादवी युद्धामुळे व राजसत्तेचा ऱ्हास झाल्यामुळे खानदानी लोकांत जे नैराश्य निर्माण झाले, त्याचे पडसाद हेके मोनोगातारीसारख्या कादंबऱ्यांत आणि ‘नो’ या नाट्यप्रकारात उमटल्याचे दिसते. तसेच त्या काळच्या जपानी साहित्यावर यादवी युद्धाचा दुसरा एक परिणाम झालेला आढळतो. तो म्हणजे युद्धवीरांना व सैनिकांना लाभलेले महत्त्व. १६०० ते १८६८ या तोकुगावा सत्तेच्या काळामध्ये व्यापारीवर्गाचा प्रभाव समाजात वाढला. परिणामतः जपानी साहित्यात विलासी आयुष्याची वर्णने मोठ्या प्रमाणावर दिसू लागली. त्यानंतर मेजी राजवटीच्या (१८६८–१९१२) संक्रमण काळात जपानी साहित्यात पाश्चिमात्य साहित्यप्रकारांचा व वाङ्‌मयीन मूल्यकल्पनांचा प्रभाव वाढला. हा प्रभाव उत्तरोत्तर वाढतच गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर काव्य आणि नाटक सोडल्यास जपानमध्ये पारंपरिक साहित्य फार अल्प प्रमाणात निर्माण होत राहिले.

कोकु-बुन्गाकु-शी  या हागा या-इची याने लिहिलेल्या जपानी वाङ्‌मयाच्या इतिहासानुसार जपानी साहित्याचे पाच कालखंड पडतात, ते पुढीलप्रमाणे :

(१) प्राचीन कालखंड : इ. स. सु. ४०० ते ७९४.

(२) अभिजात साहित्याचा कालखंड : इ. स. ७९४ ते ११८६.

(३) मध्ययुगीन कालखंड : ११८६ ते १६००.

(४) आधुनिक कालखंड : पहिले पर्व–१६०० ते १८६८.

(५) आधुनिक कालखंड : उत्तर पर्व–१८६८ च्या नंतर.

 

प्राचीन कालखंड : (सु. ४०० ते ७९४). जपानी वाङ्‌मयाच्या इतिहासाची सुरुवात साधारणपणे पाचव्या शतकाच्या सुमारास झाली, असे मानण्यास हरकत नाही. प्राचीन काळचे जपानी वाङ्‌मय स्वतंत्र लिपीच्या अभावामुळे अलिखित स्वरूपातच होते. पाचव्या शतकाच्या सुमारासच चिनी लिपीचा स्वीकार केल्यानंतर साहित्य लिखित स्वरूपात निर्माण होऊ लागले. त्यापैकी ७१२ साली संकलित केलेल्या पौराणिक कथांचा ⇨ कोजिकी  हा एकच संग्रह आज उपलब्ध आहे. त्यात जपानी शब्दांचे उच्चार चिनी चित्रलिपीत दर्शविले असल्यामुळे आजकालच्या जपानी वाचकाला तो भाषांतरित स्वरूपातच वाचावा लागतो.

जपानी उच्चार चिनी चित्रलिपीत लिहिणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे त्या काळचे बरेचसे जपानी वाङ्‌मय चिनी भाषेतच लिहिले गेले. अशा तऱ्हेने लिहिलेले काईफूसो  (७५१) व निहोनशोकी  (जपानची बखर) हे दोन ग्रंथ होते परंतु परदेशी भाषेत काव्यरचना करणे अवघड असल्यामुळे जपानी काव्य चिनी चित्रलिपीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न चालूच राहिला. काही जपानी कविता, ‘नोरीतो’ या धार्मिक प्रार्थना, राजाची निवेदने इ. जपानी भाषेत परंतु चिनी लिपीत असत. अशा प्रकारचा मान्योशू  हा संग्रह. हा प्रयत्नही अयशस्वीच ठरला. जपानी लिपी निर्माण केल्याशिवाय जपानी काव्य लिहिणे हे जवळजवळ अशक्य असल्यामुळे जपानी लिपिनिर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. त्यांतून चिनी लिपीवर आधारलेल्या ‘हिरागाना’ आणि ‘काथाकाना’ अशा दोन लिपी निघाल्या. त्या आजही कायम आहेत.

गद्य लिखाणात भाषेची अडचण कमी असल्यामुळे राजकीय, तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक लिखाण जपानमध्ये चिनी भाषेतच काही शतके निर्माण होत राहिले. त्याचबरोबर काही रचनाही चिनी भाषेत करण्यात आल्या. तथापि काव्यासाठी व विशेषतः खानदानी घराण्यातील स्त्रियांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, गोष्टी इत्यादींसाठी जपानी भाषेचा व जपानी लिपीचा अधिकाधिक वापर होऊ लागला. कालानुसार या दोन्हींचे मिश्रण होऊन ‘वाकान् कोन्कोबुन’ ही एक वेगळीच भाषा निर्माण झाली. तीत जपानी भाषेत चिनी शब्दांचा वापर केला जाई. ही भाषा अगदी अलीकडच्या काळापर्यंत वापरात होती. यावरून प्राचीन जपानी भाषा-साहित्यावर चिनी भाषा-साहित्याचा किती मोठा पगडा आहे हे लक्षात येईल. फक्त काव्य आणि नाटक या साहित्यप्रकारांवर तुलनेने तो प्रभाव कमी आहे. इतर लिखाणामध्ये शुद्ध जपानी साहित्य असे नाहीच.

अभिजात साहित्याचा कालखंड : (७९४ ते ११८६). जपानी लिपी प्रचारात आल्यानंतर जपानी साहित्यनिर्मितीस एकदम उधाण आले. या कालखंडात खानदानी स्त्रियांनी ‘मोनोगातारी’ (कथा), ‘निक्की’ (रोजनिशी) आणि काव्य या तीनही प्रकारचे लिखाण प्रसिद्ध केले. मुराशिकी शिकिबू हिने लिहिलेली गेंजी मोनोगातारी  (राजपुत्र गेंजी याची कथा) ही आजही प्रसिद्ध आहे.

मोनोगातारी या सदरात बऱ्याच अद्‌भुतकथाही मोडतात. रोजनिशीच्या सदरात सेई शोनागुन हिने लिहिलेली माकुरानो-सोशि  प्रसिद्ध आहे. या काळातील सर्वांत प्रसिद्ध कवितांचा संग्रह म्हणजे कोकिन्शु. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व साहित्य राजदरबारातील लोकांनी आपल्या खानदानी आयुष्याबद्दल लिहिले आहे.


मध्ययुगीन कालखंड : (११८६ ते १६००). या कालखंडात जपानमधील राजसत्ता सेनापतींच्या हातात गेली. याच काळात बौद्ध धर्माचे वर्चस्वही वाढले. या दोन्हींचे पडसाद साहित्यात उमटले. यापूर्वीचे साहित्य सामान्यतः स्त्रियांनीच लिहिलेले होते. तथापि या कालखंडात पुरुषलेखन पुढे आले. यादवी युद्धामुळे निर्माण झालेले नैराश्य व त्याचबरोबर युद्धवीरांबद्दलचा आदर या दोन्हींचे प्रतिबिंब तत्कालीन वाङ्‌मयात उमटलेले दिसते. यापैकी नैराश्यपूर्ण लेखन राजकारणाचा संन्यास घेऊन धर्मकार्यासाठी वाहून घेतलेल्या लेखकांनी प्रामुख्याने केले. त्यात पारमार्थिक विषयावरील चर्चेचाही समावेश होतो. हे लेखक सामान्यतः चिनी वाङ्‌मयाचे पंडित असल्यामुळे त्यांच्या लेखनावर चिनी वाङ्‌मयाचा मोठाच ठसा उमटलेला दिसतो.

कामाकुरा राजवटीमध्ये युद्धवीरांच्या कथा (गुंकी मोनोगातारी) फारच लोकप्रिय झाल्या. त्यांपैकी हेके मोनागातारी  (हेकेची कथा) ही सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर ‘हेगिन मोनोगातारी’, ‘हेजी मोनोगातारी’, ‘ताई हेकी’ याही कथा लिहिल्या गेल्या. युद्धवीरांच्या काही कथांमध्ये बौद्धधर्मीय नीतीची शिकवण आहे. उजी शूई मोनोगातारी  आणि जिक्किन्शो  यांसारखे कथासंग्रह या सदरात मोडतात. याशिवाय इतर प्रकारचे धार्मिक लिखाणही या कालखंडात झाले. त्यात त्सुरे-झुरे-गुसा  हा ⇨ केन्को  या कवीने निरनिराळ्या विषयांवर लिहिलेल्या निबंधांचा संकीर्ण संग्रह सर्वांत प्रसिद्ध आहे.

या कालखंडातील काव्यही नैराश्यपूर्ण आहे. फुजिवारा-नो शुन्झेई आणि फुजिवारा-नो-तेका या प्रसिद्ध कवींच्या कविता शिन-कोकिन्शू  यात संगृहीत केल्या आहेत. त्याच सुमाराचा आणखी एक प्रसिद्ध कवी म्हणजे बौद्ध भिक्षू साइग्यो हा होय. त्याच्या कवितांचा संग्रह सान्काशू  या नावाने प्रसिद्ध आहे. या काळच्या जवळजवळ सर्व कविता ‘तांका’ नावाच्या छंदोरचनेत आहेत. या कालखंडाच्या शेवटी मात्र ‘रेंगा’ नावाची काव्यरचना लोकप्रिय झाली.

मध्ययुगातील शेवटच्या मुरोमाची राजवटीमध्ये ‘नो’ ही नाटकशैली निर्माण झाली. ⇨ नो नाट्यातील मुख्य पात्रे ही भुतेखेते किंवा पृथ्वीतलावर अवतरलेल्या निसर्गशक्ती असतात. त्यासाठी मुखवट्याचा वापर केला जातो. अत्यंत झगमगीत पोषाख, विशिष्ट प्रकारची नृत्ये, संगीत आणि अद्‌भुत कथानक यांनी भरलेला हा नाट्यप्रकार अजूनही लोकप्रिय आहे. कान्आमी कियोत्सुगू आणि झेआमी मोतोकियो हे या काळातील दोन नाटककार प्रसिद्ध आहेत.

आधुनिक कालखंड–पहिले पर्व : (१६०० ते १८६८). जपानमधील यादवी युद्धे १६०० च्या आसपास थांबली आणि तोकुगावा या घराण्याकडे राजसत्ता आली. यानंतर २०० वर्षे जपानमध्ये शांतता होती. त्यामुळे शहरांची वाढ झाली. शिक्षणाचा प्रसार झाला आणि व्यापारातही भरभराट झाली. या वाढत्या नागर संस्कृतीमुळे वेगळेच साहित्य निर्माण झाले. ‘हाइकू’ काव्य (१७ अक्षरांचा छंद), मोठ्या बाहुल्यांच्या साहाय्याने केलेले ‘बुनराकु’ नाट्य, ‘काबुकी’ नाट्य व ‘सोशी’ कथा या सर्वांचा समावेश नागरी साहित्यात होतो.

मात्सुओ बाशो याच्या ‘हाइकू’ कविता सर्वांत प्रसिद्ध आहेत. हा कवी बौद्ध भिक्षू असल्यामुळे याच्या बऱ्याचशा कविता धार्मिक आणि गूढगुंजनात्मक आहेत. वस्तूंना जुनेपणा आणि मनुष्याला वार्धक्य आल्याने जी जीर्णावस्था येते, तिला जपानीमध्ये ‘साबी’ म्हणतात. बाशोच्या हाइकूमध्ये या साबीचे वारंवार दर्शन घडते. तानिगुचि बुसान आणि कोबायाशी इस्सा यांच्या हाइकू कविताही प्रख्यात आहेत. हाइकू काव्य जपानमध्ये अजूनही लोकप्रिय आहे.

‘बुनराकू’ हा कळसूत्री बाहुल्यांचा नाट्यप्रकार ⇨ चिकामात्सू  या नाटककाराने प्रसिद्धीस आणला. ताकेमोतो गिदायू आणि तात्सुमात्सू हाचिरोबे या जोडीने त्याला गायनाने व बाहुल्यांनी साथ दिली. बुनराकूमध्ये वापरल्या जाणाऱ्या बाहुल्या सर्वसाधारण मनुष्याच्या निम्म्या आकाराच्या असतात. प्रत्येक बाहुलीच्या हालचाली काळा पोषाख घातलेली दोन माणसे करतात. गोष्टीचे कथानक ‘जोरूरी’ नावाचा सूत्रधार गातो. बुनराकू नाट्य जपानमध्ये अजूनही रूढ आहे.

‘काबुकी’ हा मूळचा स्त्रियांनी केलेला कामुक नाच. तथापि सतराव्या शतकामध्ये त्याचे हळूहळू ⇨ काबुकी  नाटकांत रूपांतर झाले. तोकुगावा काळामध्ये स्त्रियांना रंगभूमीवर काम करण्याची बंदी झाल्यावर स्त्री पात्रांची कामे पुरुष करू लागले. चिकामात्सूने बुनराकूशिवाय काबुकी नाटकेही लिहिली परंतु इचिकावा या एका कुटुंबामध्ये काबुकीचे कथानक व संवाद लिहिणारे अनेक नाटककार निर्माण झाले. त्यांनी हे नाट्य जवळजवळ २०० वर्षे गाजवले. काबुकीचे अनेक प्रकार आहेत. काही ग्राम्य प्रकार तमाशासारखे आहेत, तर इतर ऐतिहासिक किंवा नृत्ये असलेले आहेत.

सोशी हा कथाप्रकार मोनोगातारीसारखाच आहे. फक्त मोनागातारीमध्ये खानदानी आयुष्याचे चित्र असे, तर सोशीमध्ये सामान्य माणसांच्या जीवनाचे चित्रण असते. या कथांचेही अनेक प्रकार निर्माण झाले आणि त्यांतून आधुनिक कादंबरी जन्मास आली. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे ‘उकियोझोशि’(वाहत्या जीवनाच्या कथा). इबारा साईकाकू हा अशा कथांचा सर्वांत प्रभावी लेखक. या कथा तत्कालीन नवोदित अशा व्यापारी वर्गाच्या जीवनावर आधारलेल्या आहेत. श्रीमंत व्यापाऱ्यांचे कौटुंबिक आयुष्य, त्यांची अंगवस्त्रे व त्यांचे नागरी जीवन यांचे चित्रण या कथांमध्ये आढळते. याशिवाय काही विनोदी कथाही याच प्रकारात मोडतात. त्यांतील जिप्पेन्शा इक्कू याने लिहिलेली ‘दोचुहिचाकुरिगे’ ही कथा प्रसिद्ध आहे. एजिमा किसेकी आणि ताकिझावा बाकिन हेही या काळातील दोन विख्यात कथालेखक होते.

हे नागरी वाङ्‍‌मय जरी लोकप्रिय झाले, तरी समाजाच्या वरच्या थरांमध्ये ते थिल्लर मानले गेले. तोकुगावा घराणे आणि त्यांचे मांडलिक यांच्या आश्रयाला राहणाऱ्या बुद्धिजीवी वर्गामध्ये जुने चिनी प्रभावाचे साहित्यप्रकार आवडीने जोपासण्यात आले. कन्फ्यूशसचे तत्त्वज्ञान, ऐतिहासिक लिखाण, जुन्या प्रकारच्या कविता इ. या वर्गाने जतन करून ठेवल्या.


आधुनिक कालखंड–उत्तर पर्व : (१८६८ नंतर). तोकुगावा घराण्याचा १८६८ साली बीमोड झाल्यावर व्यापारीवर्गाने राजकारणात मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला. त्यामुळे त्या वर्गाच्या नागरी साहित्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला.

या कालखंडात पाश्चात्त्य संस्कृतीशी व वाङ्‌मयाशी संबंध आल्यावर सर्व लिखाण बोलभाषेत आणि जपानी लिपीमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून वर्तमानपत्रे व इतर नियतकालिके मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यातून ‘गेम्बुन इचि’ या प्रकारचे बोलभाषेतील वाङ्‌मय निर्माण झाले. त्यात विशेषेकरून कादंबऱ्या, नाटके आणि कविता यांचा समावेश होतो. या साहित्यात पाश्चात्त्य भाषांतील काही शब्द आणि वाक्यरचना यांचाही उपयोग हळूहळू होऊ लागला. त्यामुळे जपानी कवितांचे मूळचे ५–७–५–७ शब्दसंख्येचे छंदस्वरूप बदलून निरनिराळ्या शब्दसंख्या असलेले छंद प्रचारात आले.

उकीगुमो  (उडते ढग) ही फुताबाते शिमे याने लिहिलेली पहिली आधुनिक कादंबरी. यानंतर फुतोन  (रजई) आणि हाकाई  (पाप) या दोन कादंबऱ्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. प्रारंभीच्या जपानी कादंबरीने पाश्चिमात्य कादंबऱ्यांची बरीचशी नक्कलच केली. तथापि हळूहळू तिला एक खास जपानी वळण लागले. विशेषतः तानिझाकी जुन-इचिरो व ⇨कावाबाटा  यांच्या कादंबऱ्यांमध्ये हे जपानी वळण प्रामुख्याने दिसते. कावाबाटा यांना कादंबरीबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. युकिगुनी   ही त्यांची सर्वांत प्रसिद्ध कादंबरी.

पाश्चिमात्य वाङ्‌मयाचा ठसा जपानी कथा-कादंबऱ्यांवर टिकून राहिला, तसा नाटक आणि काव्य यांवर मात्र टिकला नाही. नवकाव्य आणि नवनाट्य ह्या दोन्ही प्रकारांचा काही काळ जपानमध्ये प्रयोग झाला. तथापि जपानी कविता ही शेवटी खास जपानीच राहिली आणि जपानी रंगभूमीवरही पाश्चिमात्य धर्तीच्या नाट्यप्रयोगांचे बीज रुजू शकले नाही.

पूर्वी चिनी साहित्याची व आधुनिक काळात पाश्चिमात्य साहित्याची जपानी वाङ्‌मयावर इतकी जरी छाप पडली असली, तरी त्यात खास ‘जपानीपणा’ जाणवतोच. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे जपानी लोकांची सौंदर्यदृष्टी. कित्येक जपानी कथांमध्ये कथानक जवळजवळ नसते आणि कालैक्यही नसते. फक्त मानव व निसर्ग यांची एकरूपता या एकाच सूत्राचा प्रभाव आढळतो. याचा संबंध शिंतो धर्मातील आणि ताओ पंथातील निसर्गपूजेशी असावा, असे वाटते.

जपानी वाङ्‌मयाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे काही शब्दांचा व गोष्टींचा प्रतीकात्मक वापर. उदा., ‘उगुइसू’ (एक पक्षी) आणि ‘उमे’(एक फूल) हे वसंत ऋतूचे आगमन दर्शवितात. तसेच ‘होतोतोगिसु’(कोकिळा) ही अधुऱ्या प्रेमाचे प्रतीक असते. ‘त्सुयु’(दव), ‘आवा’ (पाण्यावरील फेस) आणि ‘साकुरा’ (चेरी फुलांचा मोहर) ही सर्व आयुष्यातील क्षणभंगुरपणा दर्शवितात. या सर्व कल्पनांचा उपयोग तात्त्विक दृष्टीने केला जात नसून फक्त एका विशिष्ट क्षणी कवीच्या किंवा लेखकाच्या मनात काय भावना आहेत, हे दर्शविण्यासाठी केला जातो.

देशिंगकर, गि. द.