जन्न : (तेरावे शतक, पूर्वार्ध). कर्नाटकातील एक प्रसिद्ध जैन कवी, त्याचा जन्म हळेबीडजवळील द्वारसमुद्र येथे एका पंडित कुळात झाला. मातापित्यांची नावे अनुक्रमे गंगा व शंकर (सुमनोबाण). होयसळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ (कार. १२२०–३४) याच्या दरबारात जन्न राजकवी व दंडाधिकारी असून त्याला ‘कविचक्रवर्ती’ असा किताब होता. काव्यावलोकन ग्रंथाचा कर्ता दुसरा नागवर्मन् (११४५) याचे शिष्यत्त्व पतकरून जन्न काव्यशास्त्रात पारंगत झाला. रामचंद्रदेव मुनींद्र हे जनाचे धर्मगुरू. जन्नाने अनेक जैन मंदिरे उभारली असावीत. तो कुशल प्रशासक म्हणूनही प्रसिद्ध होता. यशोधरचरिते (१२०९) व अनंतानाथ पुराण (१२३०) ही त्याची प्रसिद्ध काव्ये. यशोधरचरिते हे ३१० पद्यांचे लघुकाव्य असून ते चार अवतारांत (सर्गांत) विभागलेले आहे. गुणदृष्ट्या हे काव्य सरस उतरले आहे. कंद नावाच्या छंदात त्याची ही रचना असून कंदछंदप्रचुर असे कन्नडमधील ते पहिलेच काव्य मानले जाते. जैन परंपरे यशोधरचरितेची कथा विशेष प्रसिद्ध असून संस्कृत-प्राकृत ग्रंथांतही ती आलेली आहे. वादिराज सूरीच्या संस्कृत यशोधरकाव्य (१०२४) या ग्रंथावर जन्नाचे काव्य आधारित असले, तरी काव्यगुणांत ते मूळ काव्यापेक्षाही सरस आहे. मानसिक हिंसाही जीवास जन्मजन्मांतरी नडते, असे बिंबवून जन्नाने जीवदयेचे महत्त्व ह्या धार्मिक काव्यात प्रतिपादिले आहे. त्याच्या कल्पनाविलासाचा, सौंदर्यदृष्टीचा व मार्मिकतेचा त्यात प्रत्यय येतो.
अनंतनाथ पुराणात चौदाव्या तीर्थंकराचे चरित्र चौदा आश्वासांत व चंपू शैलीत जन्नाने वर्णिले आहे. ह्या चंपू काव्यात जैन तत्त्वांचे विवरण आहे. या काव्यातील चंडशासन ह्या खलपुरुषाने वसुषेण या आपल्या मित्राच्या पत्नीस फसवून तिच्यावर केलेल्या अत्याचाराची व परिणामतः उभयतांच्या मृत्यूची तसेच वसुषेणाच्या विरक्तीचा कथा उल्लेखनीय आहे. कन्नड साहित्यातील एक दर्जेदार शोकांतिका म्हणून ती ओळखली जाते. अभिजात महाकाव्याच्या सर्व लक्षणांनी युक्त अशा अनंतनाथ पुराणाला कन्नड साहित्यात आगळे स्थान आहे. अनुभव–मुकुर किंवा स्मरतंत्र ही कामशास्त्रावरील कृतीही जन्नाचीच असून ती अलीकडेच उपलब्ध झाली आहे.
सुर्वे, भा. ग.