जनाबाई : (? – १३५०). मराठी संतकवयित्री, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे जन्म. माता-पिता करुंड-दमा. आई लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवले आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली, अशीही एक आख्यायिका आहे. पुढे नामदेवास आपले सर्वस्व मानून ‘नामयाची दासी जनी ’ या नावाने ती वावरली, ती शेवटपर्यंत अविवाहीत होती.

जनाबाईने सु.साडेतीनशे अभंग लिहीले. तिच्या नावावर हरिश्चंद्राख्यान, प्रल्हादचरित्र, कृष्णजन्म, बाळक्रीडा, थालीपाक, द्रौपदीस्वयंवर  वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. विठ्ठलाची ती अतिशय उत्कटतेने व तन्मयतेने भक्ती करीत असल्याचे तिच्या अभंगात दिसून येते. तिची काव्यरचना साधी, रसाळ आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे.

सुर्वे, भा. ग.