जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या जत संस्थानची राजधानी. लोकसंख्या १४,८७७ (१९७१). हे साताऱ्याच्या आग्नेयीस सु. १४८ किमी. व बेळगावच्या ईशान्येस सु. १५३ किमी.वर आहे. तसेच येथून सु. १६ किमी. वरील जत रोड हे रेल्वे स्थानक असून चिपळूण–गुहागर–विजापूर हा रस्ता जत जवळूनच जातो. याच्या पूर्वेला सु. ५ किमी.वर रामपूर किल्ला व रामराव आबासाहेब डफळे यांची छत्री व अनेक मंदिरे असून संस्थानी काळातील अनेक अवशेष येथे आढळतात.
भुईमूग, ज्वारी, बाजरी, कापूस, गहू, हरबरा इत्यादींची ही बाजारपेठ असून येथे कांबळी व हातमागावरील कापड विणणे, पितळी भांडी बनविणे इ. अनेक घरगुती उद्योग चालतात. शासनातर्फे येथे खिलार जातीच्या गुरांच्या पैदाशीचे केंद्र उघडण्यात आले असून येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, दूरध्वनी, पुतळाराजे रुग्णालय व इतर दवाखाने आदी सोयी आहेत.
कापडी, सुलभा