जठर : ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) व ग्रहणी (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) यांच्यामधील पचननलिकेच्या विभागाला जठर असे म्हणतात. जठर ही एक फुगीर पिशवी असून चर्वण होऊन मऊ झालेले अन्न तिच्यामध्ये काही काळ साठविले जाते. या पिशवीत अन्नावर जठररसांची पाचकक्रिया सुरू होते.
पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) कनिष्ठ प्राण्यांमध्ये जठर पचननलिकेच्याच आकाराचे असते. काही पक्षांमध्ये जठराचे दोन विभाग असून त्यांपैकी एका विभागातील ग्रंथींच्या स्रावामुळे पचनक्रिया सुरू होते दुसऱ्या विभागात बळकट स्नायू असल्यामुळे तेथे अन्न मऊ केले जाते. काही पक्षी या क्रियेसाठी लहान खडे गिळतात [ → जठरपेषणी ].
सस्तन प्राण्यांमध्ये जठराचे अनेक प्रकार दिसून येतात. त्यांच्या जठराचे एकापासून चार कप्पे असतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये हा प्रकार विशेषत्वाने दिसतो.
मानवी शरीरात मध्यपटलाच्या (छाती व उदर यांना अलग करणाऱ्या आडव्या पटलाच्या) डाव्या कमानीखाली उदरात जठर असते. मध्यपटलाचा भेद करून ग्रसनी जेथे उदरात प्रवेश करते त्या ठिकाणी जठराची सुरुवात होऊन खाली उदराच्या उजव्या बाजूस ग्रहणीपाशी ते संपते. त्याचा आकार आकड्यासारखा किंवा इंग्रजी J या अक्षरासारखा असून वरच्या आखूड कडेला लघुवक्र कडा व खालच्या लांब कडेला दीर्घवक्र कडा म्हणतात. प्रौढ वयात लघुवक्र कडेची लांबी सु. ७⋅५ सेंमी. आणि दीर्घवक्र कडेची लांबी २२⋅५ सेंमी. असते. नवजात बालकामध्ये त्याची धारणाक्षमता ३० घ.सेंमी. असून प्रौढ वयात ती १,५०० घ. सेंमी.पर्यंत वाढते. व्यक्तीचा आहार आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर ही क्षमता पुष्कळ अंशी अवलंबून असते.
जठराच्या पुढच्या व मागच्या पृष्ठभागांना अनुक्रमे अग्र पृष्ठ आणि पश्च पृष्ठ अशी नावे आहेत. ग्रसिका जेथे जठराला मिळते त्या द्वाराला जठरागमी द्वार आणि जेथे जठर आणि ग्रहणी यांचा संयोग होतो त्या द्वाराला जठरनिर्गमी द्वार असे म्हणतात.
विभाग : वर्णनाच्या सोईसाठी जठराचे पाच विभाग कल्पिले आहेत : (१) बुध्न, (२) काय, (३) जठरनिर्गम-कोठर, (४) जठरनिर्गम-नाल आणि (५) जठरद्वार-कपाट.
(१) जठरबुध्न : जठरागमी द्वारापासून डावीकडे वर मध्यपटलाच्या कमानीला भिडलेल्या भागाला ‘जठरबुध्न’ असे नाव असून त्या भागात नेहमी वायू असतो. या भागाचा ग्रसनीशी अणीदार असा लघुकोन झालेला असतो. हा बुध्न भाग घुमटाकार असून त्याच्या आतल्या श्लेष्मकलेतील (अस्तरासारख्या थरातील) सुरुवातीच्या ग्रंथीपासून श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) तयार होतो बाकीच्या भागात एंझाइमजनक (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणणारे प्रथिनयुक्त पदार्थ तयार करणाऱ्या) आणि अम्लजनक ग्रंथी असतात.
(२) जठरकाय : हा बुध्नाच्या खाली सुरू होऊन मध्यरेषा ओलांडून उजव्या बाजूकडे तिरकस असा असतो. त्याच्या श्लेष्मकलेला लांब अशा चुण्या पडलेल्या असतात. अन्न जाऊन जठर ताणले गेले म्हणजे या चुण्या उलगडतात. श्लेष्मकलेच्या पृष्ठभागावर ग्रंथींची तोंडे दिसतात. या ग्रंथी एंझाइमजनक व अम्लजनक असतात त्यामुळे अन्नाचे रासायनिक विघटन सुरू होते.
(३) जठरनिर्गम-कोठर : हा विभाग नरसाळ्यासारखा निमुळता असून तो उजवीकडे अरुंद होत जातो. जठरकायाच्या लघुवक्र कडेवर लहानशी खाच दिसते त्या ठिकाणी याची सुरुवात होते आणि दीर्घवक्र कडेवर दिसणाऱ्या खाचेपाशी कोटाराचा निर्गम-नालाशी संयोग होतो. या विभागातील श्लेष्मकलेत श्लेश्मजनक ग्रंथींचे प्रमाण अधिक असून त्यामानाने अम्लजनक ग्रंथी कमी असतात.
(४) जठरनिर्गम-नाल : हा मार्ग नलिकाकार असून त्याच्या शेवटी संकोचित असे जठरद्वार-कपाट असते. या विभागाच्या भित्तीतील स्नायू जाड असतात. या विभागातील श्लेष्मकलेतील ग्रंथीपासून श्लेष्माच तयार होतो.
(५) जठरद्वार-कपाट : या ठिकाणी भित्तीतील स्नायू अतिशय जाड व बळकट असल्यामुळे हे जठरद्वार नेहमी बंद असते. अन्नपचनक्रिया जठरात चालू असताना हे स्नायू मधूनमधून प्रसरण पावतात व त्यामुळे जठरद्वार उघडले जाऊन अर्धवट पचलेले अन्न ग्रहणीमध्ये फेकले जाते.
जठरावर पर्युदराच्या (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या आवरणाच्या) दोन थरांचे आवरण असून लघुवक्र कडेपासून वर यकृताकडे हे थर जातात. त्यामुळे जठर यकृताशी बांधल्यासारखे असते. या थरांना लघुवपा असे म्हणतात. दीर्घवक्र कडेपासून खाली पडद्यासारखे चार थर पसरलेले असतात. त्याना बृहद्वपा असे म्हणतात [ → पर्युदर].
पर्युदर थरांच्या खाली जठर भित्तीमध्ये स्नायुस्तर असतो. या स्नायुंचे एकावर एक असे तीन थर असतात. एक थर गोलाकार असून तो जठराभोवती असल्यामुळे त्यातील स्नायुंच्या आकुंचनामुळे जठरातील अन्न पुढे ढकलले जाते. दुसरा थर लांब स्नायूंचा असून तो बुध्नापासून द्वार-कपाटापर्यंत सरळ गेलेला असतो. तिसरा थर तिरक्या दिशेने जाणाऱ्या स्नायुतंतूंचा बनलेला असतो.
जठराचा श्लेष्मस्तर हा दोन विभागांचा बनलेला असून वरचा थर श्लेष्मकलेचा आणि खालचा थर अधिश्लेश्मकलेचा बनलेला असतो. श्लेष्मकलेत स्रावी ग्रंथी असून अधिश्लेश्मकला अवकाशी ऊतकाची (सैलसर रचना असलेल्या व आधार देणाऱ्या ऊतकाची म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाची) बनलेली असते. या थरांतूनच श्लेष्मकलेला रक्त पुरविणाऱ्या वाहिन्या आणि तंत्रिका (मज्जा) त्या ग्रंथीपर्यंत जातात.
जठराला रक्त पुरविणाऱ्या रोहिण्या या उदरगुहेतील (उदराच्या गुहेतील) रोहिणीच्या शाखा असून जठराच्या तंत्रिका अनुकंपी (स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या) आणि परानुकंपी तंत्रिकापुंजांच्या शाखा असतात. परानुकंपी तंत्रिका या प्राणेशा (मेंदूपासून निघणाऱ्या दहाव्या) तंत्रिकेच्या पुंजापासून निघून स्नायू व ग्रंथी यांचे उद्दीपन करतात. अनुकंपी तंत्रिका उदरगुहेताल पुंजापासून निघून त्यांच्यामुळे स्नायू व ग्रंथी यांमधील रोहिण्यांच्या आकुंचनाचे नियंत्रण होते. जठरामध्ये उत्पन्न होणाऱ्या संवेदना याच मार्गाने मेंदूकडे जातात.
जठराच्या विकारांसंबंधीची माहिती ‘जठरांत्र मार्ग’ या नोंदीत दिलेली आहे.
पहा : पचन तंत्र.
ढमढेरे, वा. रा.
“