जकात संघ : जकातीसंबंधी विशिष्ट करारनामा करणाऱ्या स्वतंत्र राष्ट्रांचा संघ. करारनाम्यानुसार संघातील सदस्य (१) एकमेकांच्या मालावर जकात घेत नाहीत, (२) बाहेरून येणाऱ्या मालावर समान जकात बसवितात व (३) जकातीपासूनचे उत्पन्न पूर्वनिश्चित सूत्रांनुसार आपसांत वाटून घेतात. १८३४ मधील जर्मन त्सॉलफराइन (Zollverein) व १९४८ मध्ये स्थापन झालेले बेनेलक्स (Benelux) ही यशस्वी जकात संघांची उदाहरणे होत. जकात संघामुळे मोठ्या सदस्य-राष्ट्रांना उपलब्ध असलेले आर्थिक फायदे लहान राष्ट्रांसह मिळतात. बाजारपेठ वाढल्यामुळे संघक्षेत्रात नवे उद्योग काढता येऊन उत्पादनही मोठ्या प्रमाणावर करता येते आणि सदस्य राष्ट्रांच्या उद्योगसंस्थांमधील स्पर्धेचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. अलीकडे जकात संघ फारसे आढळत नाहीत. त्यांच्याऐवजी ‘खुला व्यापार’ क्षेत्रे किंवा ‘सामुदायिक बाजारपेठा’ या व्यवस्था राष्ट्रांना अधिक सोयीच्या वाटतात.

पहा : आर्थिक संघ.

धोंगडे, ए. रा.