छिद्रण यंत्र : धातू, लाकूड, प्लॅस्टिक, दगड, बांधकाम वगैरेंत भोके पाडण्याचे यंत्र. प्रस्तुत नोंदीत धातुकामाच्या यंत्राचाच विचार केलेला आहे. यंत्रातील प्रत्यक्ष भोक पाडणाऱ्या (कर्तक) भागाला छिद्रक म्हणतात.

 छिद्रण क्रिया : वस्तूला भोक पाडताना भोकाच्या मध्यबिंदूवर पंच (टोकदार जाड खिळ्यासारखे साधन) ठोकून छिद्रकाच्या टोकाला मार्गण करावे लागते.(योग्य ठिकाणी न्यावे लागते) . मात्र छिद्रपाट (जिग) वापरल्यास ही क्रिया करावी लागत नाही. नंतर छिद्रकाचा मध्यबिंदू या खळग्यावर आणून तेथे तो दाबून धरतात व मग छिद्रकाला गती देतात. छिद्रकाच्या तोंडाला असलेल्या धारांमुळे मध्यबिंदूभोवतालचा भाग क्रमाक्रमाने तासला जाऊन तेथे भोक पडते. भोक पाडताना उष्णता उत्पन्न होते. तिचे प्रमाण जास्त असले, तर छिद्रकाची धार बिघडते म्हणून बहुतेक ठिकाणी भोक पाडतांना वंगण वापरतात. यंत्रात वापरावयाचे छिद्रक धरून ठेवण्यासाठी यंत्रात विशिष्ठ प्रकारचे छिद्रक धारक योजलेले असतात.

आ. १. चपटा छिद्रक : (१) चौरस सळई, (२) चपटा भाग, (३) कापणाऱ्या धारा.

छिद्रक : प्रत्येक छिद्रक फक्त स्वतःच्या व्यासाएवढेच भोक पाडू शकतो. त्यामुळे निरनिराळ्या व्यासांच्या भोकांसाठी निरनिराळे छिद्रक वापरावे लागतात. छिद्रक एकाच सामान्य दिशेने फिरू देण्याची सर्वत्र प्रथा आहे व त्यामुळे सर्व छिद्रण यंत्रेही त्याच दिशेने फिरतील अशी केलेली असतात. कोणत्याही पदार्थामध्ये भोक पाडावयासाठी छिद्रक त्या पदार्थापेक्षा अधिक कठीण असलाच पाहिजे, उदा., कठीण दगडात भोक पाडण्यासाठी औद्योगिक हिरे (अल्प अशुद्धी असलेले लहान हिरे) बसविलेला छिद्रक वापरावा लागतो. छिद्रकांची जंघा (छिद्रकाला जोडलेला दंड) दंडगोलाकार वा किंचित निमुळती करतात.

आ. २. मळसूत्री छिद्रक व त्यावरील कोन : (अ) जंघांचे प्रकार : (१) जंघा, (२) मान, (३) धड, (४) मळसूत्राचा कोन (आ) टोकाचा कोन (इ) ओठाचा अवकाश कोन (ई) टोकाच्या धारेचा कोन .

छिद्रकांचे दोन मुख्य प्रकार आहेत : चपटे व मळसूत्री. या दोनही प्रकारांत छिद्रकांच्या तोंडाला दोन धारा असतात आणि त्यांनी पदार्थ तपासण्याचे कार्य होते.चपटा छिद्रक उच्च कार्बनी पोलादाच्या चौरस सळईपासून करतात व त्याच्या टोकाचा भाग उष्णता उपचाराने कठीण केलेला असतो. त्याचा आकार आ. १ मध्ये दाखविला आहे. त्याचे तोंड चपटे असल्यामुळे त्याला चपटा छिद्रक म्हणतात. तोंडाचा आकार त्रिकोणी असून तेथे फिरताना एकाच वेळी कापणाऱ्या दोन धारा असतात. चपट्या भागाची रुंदी सळईच्या व्यासापेक्षा बरीच जास्त असते. या भागाच्या रुंदीएवढ्या भोकाचा व्यास असतो. भोक आरपार नसल्यास भोकाचा तळ शंक्वाकार असतो. सुरुवातीचे छिद्रक याच जातीचे असत व खेडेगावातून अजूनही सुतार हेच छिद्रक वापरतात.

मळसूत्री छिद्रक उच्चवेगी पोलादाचा (उच्च वेगामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा ज्याच्या कठीणपणावर परिणाम होत नाही अशा पोलादाचा) करतात. मळसूत्राचा खोलगट भाग चक्रीकर्तन (मिलिंग) यंत्रावर कर्तकाने कापून बनवलेला असतो. छिद्रक बनवून तयार झाल्यावर त्याच्यावरही उष्णता उपचार करावे लागतात. मळसूत्री छिद्रक आ. २ मध्ये दाखविला आहे. याचे तोंड शंक्वाकार असते व त्यालाही तेथे दोन धारा असतात. तासून भोक पाडण्याचे कार्य चपट्या छिद्रकाप्रमाणे होते, पण हा त्याच्यापेक्षा अधिक कार्यक्षम असतो. आ. २ (अ) मध्ये निमुळती व सरळ असे जंघांचे दोन प्रकार दाखविले आहेत (आ), (इ) व (ई) या पोट आकृतीत अनुक्रमे टोकाचा कोन, ओठाचा अवकाश कोन व धारेचा कोन दाखविले आहेत. आ. २ (अ) मध्ये मळसूत्राचा कोनही दाखविला आहे.

 यंत्राचे प्रकार :निरनिराळ्या वस्तूंच्या आकारांप्रमाणे व भोकांच्या व्यासाप्रमाणे सोईस्कर व्हावे म्हणून छिद्रण यंत्राचे अनेक प्रकार केलेले आहेत. त्यांमध्ये (१) स्तंभाचे, (२) अरीय पद्धतीचे, (३) गट पद्धतीचे, (४) बहुछिद्रक, (५) सूक्ष्मग्राही आणि (६) सुवाह्य (सहज हलविता येणारे) असे मुख्य प्रकार आहेत. यांपैकी पहिल्या पाच प्रकारची यंत्रे कर्मशालेमध्ये बसविलेली असतात. भोक पाडावयाची वस्तू यंत्राच्या खालच्या भागात एका यंत्रावर धरून ठेवतात व भोक पाडावयाच्या जागेवर फिरणारा छिद्रक दाबून धरतात.


आ. ३. गोल स्तंभाचे छिद्रण यंत्र : (१) वस्तू ठेवण्याचा मंच, (२) छिद्रक धारक, (३) छिद्रक दाबण्याचा हस्तक, (४) विद्युत् चलित्र.

(१) स्तंभ यंत्र : यात गोल स्तंभाचे आणि चौकोनी स्तंभाचे असे दोन उपप्रकार असतात. गोल स्तंभाचे यंत्र आ. ३ मध्ये दाखविले आहे. त्यात दाखविलेला मंच जरूरीप्रमाणे वर खाली करता येतो. अशा यंत्रामध्ये छिद्रक फिरविण्यासाठी निरनिराळे वेग देता येतात. यंत्र फिरविण्यासाठी स्वतंत्र विद्युत् चलित्र (विद्युत् मोटर) बसवलेले असते. या यंत्रात यंत्राचा मुख्य गोल स्तंभ आणि छिद्रक यांच्यामधील अंतर कायम असते. अशा प्रकारच्या यंत्रावर १ मिमी.पासून १५ मिमी. पर्यंत व्यासाची भोके पाडता येतात.

 (२) अरीय पद्धतीचे यंत्र : या प्रकारच्या यंत्रात एका उभ्या खांबाला वरच्या बाजूला एक आडवा बाहू जोडलेला असतो. तो खांबाभोवती थोडा फिरविता येतो. त्या बाहूवरून छिद्रक धारक काही अंतरात अरीय दिशेने सरकवता येतो. मोठ्या आकाराच्या वस्तूला भोके पाडण्यासाठी हे यंत्र फार सोईचे होते. या यंत्रावर ५० मिमी. पर्यंत व्यासाची भोके पाडता येतात.

(३) गट पद्धतीचे यंत्र : यात एका मोठ्या मंचावर अनेक स्तंभ यंत्रे बसविलेली असतात. त्या यंत्रावर निरनिराळ्या व्यासांचे छिद्रक लावता येतात.

 (४) बहुछिद्रक यंत्र : या यंत्रात एकाच मोठ्या वस्तूवर एकाच वेळी अनेक ठिकाणी भोके पाडता येतात. प्रत्येक भोकासाठी स्वतंत्र छिद्रक बसवलेला असतो. मोटारगाडीच्या इंजिनाच्या ठोकळ्यावरची अनेक भोके अशा यंत्रावर एकदम पाडता येतात. ही पद्धत महोत्पादनात (मोठ्या प्रमाणावरील उत्पादनात) विशेष उपयोगी पडते.

(५) सूक्ष्मग्राही यंत्र : हे फार अचूक काम करणारे असते. ते विशेषतः लहान नाजूक वस्तूला भोके पाडण्यासाठी वापरतात.

 (६) सुवाह्य यंत्र : हे स्वतंत्र विद्युत् चलित्र जोडलेले, वाटेल तेथे सहज उचलून नेता येईल अशा आटोपशीर आकाराचे बनविलेले असते. अशा यंत्राने ०·२ मिमी.पासून ६ मिमी.पर्यंत व्यासाची भोके पाडता येतात.

 वर वर्णन केलेली सर्व यंत्रे एकाच ठराविक दिशेने फिरणारी असून त्यांस लावावयाच्या मळसूत्री छिद्रकांचे गाळे त्या दिशेनुसारच खोदलेले असतात. काही विशेष कामांसाठी छिद्रक उलट दिशेनेही फिरवावा लागतो. त्यासाठी उलट्या दिशेच्या गाळ्याचे छिद्रक वापरावे लागतात. लहान काम करण्यासाठी हाताने फिरविण्याची छिद्रक यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांवर १० मिमी.पर्यंत व्यासांची भोके पाडता येतात. 

 संदर्भ : 1. Rider, H. G. Workshop Engineering Practice, Bombay, 1959.

            2. Wilson, F. W. Harvey, P.D., Eds. Tool Engineer′s Handbook, New York, 1959.

 भिडे, शं. गो.