चौरंग भारतीय पद्धतीचे लाकडी आसन. भारतातील पारंपरिक लाकडी फर्निचरप्रकारांत चौरंगाला विशेष महत्त्व आहे. चतुः + अंग &gt चउरंग &gt चौरंग अशी याची व्युत्पत्ती दिली जाते. चौरंगाला चार बाजू व चार पाय असतात, त्या दृष्टीनेही हा शब्द रूढ झाला असावा. शिसवी, सागवान, फणस, मॉहॉगनी इ. लाकडांपासून चौरंग तयार करतात. त्याचे पाय आखूड व कातीव असतात. बहुधा त्याचा पृष्ठभाग व चारही बाजू वेलबुटीदार नक्षीने आणि इतर प्रकारच्या रंगीत चित्रणाने सुशोभित केलेल्या असतात. पूर्वी कधी कधी चौरंगाच्या पृष्ठभागावर चांदी-पितळेच्या फुल्या मारण्यात येत, तर कधी त्यावर तांब्या-रूप्याची नाणीही ठोकण्यात येत. चांदी–सोन्याचा मुलामा दिलेल्या कलात्मक चौरंगाचा उल्लेख प्राचीन वाङ्‌मयात आढळतो. राजसूय यज्ञाच्या वेळी वापरण्यात येणारे चौरंगसदृश आसन सुवर्णाच्या फुल्या मारलेले असावे, तर अश्वमेधाच्या वेळी अध्वर्यूने स्वर्णरत्‍नखचित चौरंगसदृश आसनावर बसावे, असे उल्लेख वेदादी वाङ्‌मयात आढळतात.

कातीवकाम केलेल्या चौरंगाचा नमुना

धार्मिक समारंभ, पूजाअर्चादी विधी, मंगल कार्ये, भोजनादी कार्यक्रम इत्यादींशी चौरंगाचा वापर परंपरेने निगडित झालेला आहे. एक पवित्र, मांगल्यदर्शक अथवा ऐश्वर्यनिदर्शक आसन म्हणून चौरंगाकडे सामान्यपणे पाहिले जाते. म्हणूनच सर्वसामान्यतः उपयुक्त असलेल्या फर्निचर प्रकारांहून चौरंगाचे महत्त्व वेगळे आणि अधिक सांस्कृतिक स्वरूपाचे आहे.

पहा : लाकडी कलाकाम.

जोशी, चंद्रहास