चोरी: कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यातून जंगम मालमत्ता त्याच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे नेण्याकरिता हलविली, तर त्या कृत्यास कायद्याच्या परिभाषेत चोरी म्हणतात. खासगी मालकीची कल्पना ही चोरीला अपराध मानण्यासाठी आधारभूत झालेली आहे. नीती व धर्म यांनी चोरीचा नेहमीच निषेध केला आहे. समाजाच्या स्थैर्याच्या दृष्टीने असले कृत्य निषेधार्ह समजून कायद्याने गुन्हा ठरविणे आवश्यकच आहे.
चोरी ही कल्पना प्राचीन काळापासूनची आहे. ऋग्वेदामध्ये तस्कर, स्तेन हे शब्द वारंवार आले आहेत. गुरे पळविणे हा चोरीचा मुख्य प्रकार होता. अथर्ववेदात लांडगे, वाघ आणि चोर यांचा उपसर्ग चुकविण्यासाठी ऋचा आहेत. हिंसा किंवा बळाचा वापर करून केलेल्या चोरीला साहस म्हणत. माणसे पळविणेसुद्धा चोरी समजत.
काही प्राचीन कायद्यात मात्र हे कृत्य गुन्ह्यात मोडत नसे. उदा., प्राचीन रोमन किंवा इंग्रजी कायद्यानुसार चोरीस गेलेला माल परत मिळे किंवा त्याऐवजी दुप्पटचौपट मोबदला मिळविता येई.
भारतीय दंड संहितेत केलेल्या चोरीच्या व्याख्येनुसार स्थावर मालमत्ता तसेच जमिनीत उगवलेली अगर जमिनीस चिकटून असलेली वस्तू चोरीचा विषय होऊ शकत नाही पण ती वस्तू जमिनीपासून अलग झाली की, ती चोरीचा विषय होऊ शकते. वस्तू हलू नये म्हणून ठेवलेला अडथळा हलवला, तर त्याचा अर्थ वस्तू हलविल्याप्रमाणेच आहे. कोणत्याही इसमाने पशू हलविला, तर अशा हलविण्यामुळे ज्या ज्या गोष्टी हलविल्या गेल्या असतील त्याही त्याने हलविल्यासारखे होते. कबजेदाराने प्रत्यक्षपणे किंवा उपलक्षणेने संमती दिली, तर चोरी होत नाही. कोणाच्या ताब्यात नसलेली व जमिनीवर पडलेली वस्तू घेणे ही चोरी होत नाही. चोरीमध्ये मालकी कोणाची यापेक्षा ताबा कोणाचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे स्वतःच्या वस्तूचीसुद्धा मालक चोरी करू शकतो. उदा., मालकाने आपली वस्तू दुसऱ्याकडे गहाण ठेवली व काही दिवसांनी धनकोच्या परवानगीशिवाय ती परत आणली, तर कायद्याने ती चोरीच होय. वस्तू आपल्या मालकीची होती हा बचाव निरुपयोगी आहे कारण ताबा धनकोचा होता.
सद्भावाने व आपला वस्तूवर हक्क आहे या समजूतीने ती वस्तू जर एखाद्याने हलविली आणि शेवटी हक्क नाशाबित झाला, तर ती चोरी होणार नाही कारण वस्तू हलविताना हेतू अप्रामाणिक नव्हता. कर्त्यास अयोग्य फायदा मिळाला की काय याला महत्त्व नाही, उदा.,‘अ’ ने ‘ब’ च्या वस्तू घेऊन त्या ‘ब’ च्या सावकारांना दिल्या यापासून ‘अ’ला काहीच फायदा होत नाही. तरी असले कृत्य चोरीच्याच गुन्ह्यात मोडते.
सारांश,चोरीचा गुन्हा सिद्ध होण्यास (१) जंगम मालमत्ता, (२) अप्रामाणिक हेतू व (३) कबजेदाराच्या संमतीशिवाय वस्तूचे स्थलांतर या तीन गोष्टींची आवश्यकता असते.
चोरी करणे ह्या गुन्ह्याबरोबरच माल चोरीचा आहे हे माहीत असून तो घेणे,ताब्यात ठेवणे,विकणे किंवा त्याची विल्हेवाट लावण्यास बुद्धिपुरःसर मदत करणे,ही कृत्येही कायद्याने दंडनीय ठरविली आहेत. एखाद्या व्यक्तीने त्याच्या ताब्यातील माल चोरीचा आहे,अशा संशयाचे निराकरण समाधानकारकपणे केले नाही,तर अशी व्यक्ती शिक्षेस पात्र होते. चोरी झाल्यावर थोड्याच कालावधीत चोरीचा माल ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल,ती व्यक्ती चोर किंवा चोरीचा माल घेणारी असल्याचे समजण्यात येते. जेथे स्त्रिया संपत्ती स्वतः धारण करू शकतात,तेथे बायकोच्या वस्तूंची नवऱ्याने चोरी केल्यास तिचे नवऱ्याशी असलेले नाते हा बचाव होऊ शकत नाही.
प्राचीन काळी चोरीच्या गुन्ह्यास मृत्युदंडासारखी फार कडक शिक्षा देण्यात येत असे. शपथ किंवा दिव्य करणे याही गोष्टी प्रचलित होत्या. स्मृतिग्रंथात वर्णभेदांप्रमाणे दंडाची भिन्नता दिसून येते. चोरीला मृत्युदंड वा अवयवच्छेद शिक्षा असे. चोरीचा माल सापडल्यास मालकास देण्यात येत असे. मराठी रियासतीत शिक्षेची पद्धत अशीच दिसून येते. या काळी चोरांच्या आप्तांनाही अटक होई. गावातील लोकांनी चोराचा तपास न लावल्यास लुटीची भरपाई लोकांना करून द्यावी लागे. जपानी,इस्लामी,इराणी,आयरिश कायद्यांतही चोरीबद्दल मृत्युदंड व शरीरावयवच्छेदनाची शिक्षा असे. रोमन कायद्यात चोराला पकडण्याचे काम फिर्यादीचे असे. केल्टिक कायद्यानुसार चोराला गुलामाप्रमाणे विकले जाई. ट्यूटन स्लाव्ह लोकांत घोडे चोरणाऱ्यांना दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा असे.
प्रचलित भारतीय दंडसंहितेत चोरीच्या निरनिराळ्या प्रकारच्या गुन्ह्यांस त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन निरनिराळ्या मुदतीची शिक्षा सांगितली आहे. साध्या चोरीच्या गुन्ह्यांस ३ वर्षापर्यंत शिक्षा सांगितली असून कोणत्याही प्रकारच्या निवासस्थानामधील नोकराने वा कारकुनाने केलेल्या चोरीच्या गुन्ह्यास ७ वर्षेपर्यंत शिक्षा सांगितली आहे.
चोरीचे कृत्य करीत असता,चोरीचा माल नेत असता अगर तसा प्रयत्त्न करत असता चोराने एखाद्या व्यक्तीस ठार केले,जखमी केले,त्याला अटकाव केला किंवा तसे करण्याची दहशत दाखविली,तर त्या चोरीस जबरी चोरी अशी संज्ञा असून अशा गुन्हेगारास जन्मठेपेची किंवा १० वर्षेपर्यंतची शिक्षा सांगितली आहे.
कवळेकर,सुशील
“