धनपाल :(दहावे शतक). अपभ्रंश भाषेतील ⇨ भविसयत्तकहा ह्या कथाकाव्याचा कर्ता. ह्याच्या पित्याचे नाव माएसर (मायेश्वर) आईची घणसिरी (धनश्री). धनपाल वर्णाने वैश्य तथापी सरस्वतीची आपल्यावर मोठी कृपा आहे, हे तो आत्मगौरवपर शब्दातून सागतो. (‘सरसइ बहुलद्ध-महावरेण’ भविसयत्तकहा,१·४) आणि विद्वत्तेत आपण कमी नाही हे दाखवून देतो. धनपालाने आपल्या गुरुचा किवा संप्रदायाचा कोठे उल्लेख केला नसला, तरी त्याने ‘अच्युत’हा स्वर्ग श्वैतांबरमताप्रमाणे बारावा न मानता दिगंबराप्रमाणे सोळवा मानला आहे. त्यावरुन हेर्मान याकोबी ह्यांनी तो दिगंबरपंथाचा असावा असे मानले आहे. धनपालाच्या उपर्युक्त ग्रंथातील अपभ्रंश भाषेचे रुप आणि शैली लक्षात घेऊन हेर्मान याकोबीनी त्याचा काळ दहाव्या शतकाच्या आधी जाऊ शकणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
तगारे, ग. वा.