द्रव स्फटिक : प्रवाहीपणा व समदिक्ता (भौतिक गुणधर्म सर्व दिशांनी सारखे असणे) ही द्रवाची खास वैशिष्ट्ये आहेत, तर याउलट दूर अंतरापर्यंत व्यवस्थित रचना हा स्फटिकांचा खास गुण आहे. काही द्रवांची अवस्था या दोहोंच्या दरम्यानची अशी असते. त्यांना प्रवाहीपणा असतो म्हणून द्रव म्हणावयाचे परंतु त्यांच्या रेणूंची बऱ्याच अंतरापर्यंत सुव्यवस्थित रचना झालेली असते व त्यामुळे ते असमदिक् असतात. हा प्रकार स्फटिकासारखा आहे म्हणून अशा द्रवांना द्रव स्फटिक हे नाव देण्यात आले आहे.
गुणधर्म व उपयोग : द्रव स्फटिकांच्या शोधाचे श्रेय एफ्. राइनित्सर यांना आहे, असे मानले जाते. ज्या द्रवाच्या रेणूंची लांबी रुंदीपेक्षा बरीच जास्त असून ते लांबीच्या दिशेने दृढ असतात, असे द्रव सामान्यतः द्रव स्फटिक असू शकतात. अशा द्रवांची श्यानता (दाटपणा) सामान्य द्रवापेक्षा जास्त असते. त्याच्यातील रेणूंच्या सुव्यवस्थित रचनेमुळे ते सामान्यतः द्विप्रणमनी होतात (म्हणजे त्यावर पडणाऱ्या प्रकाशाचे दोन निरनिराळ्या वेगाच्या घटकांत रूपांतर होऊन दोन निरनिराळ्या प्रतिमा दिसतात). काहींमध्ये प्रकाशाच्या कंपनप्रतलाचे घूर्णनही (वळण्याची क्रिया) होते. यामुळे या पदार्थातून पलीकडे जाणाऱ्या किंवा त्यांच्यापासून प्रकीर्णित (विखुरलेल्या) किंवा परावर्तित होणाऱ्या प्रकाशाला विविध रंग प्राप्त होऊ शकतात. काही पदार्थांच्या बाबतीत विशिष्ट तापमानाला विशिष्ट रंगच प्रकटतात. या गोष्टीचा उपयोग तापमान मापनासाठी करता येतो.
पेट्रोलियम ईथर, ॲसिटोन यांसारख्या द्रवांच्या बाष्पाच्या सान्निध्यात काही द्रव स्फटिकांचे रंग बदलतात व ते बाष्प अत्यल्प असले, तरी हा रंगबदल होतो. हे बाष्प श्वासावाटे आत घेतले जाणे अपायकारक असते. तेव्हा या प्रकारच्या द्रवांचे उत्पादन किंवा वापर करणाऱ्या कारखान्यांच्या वातावरणात त्यांच्या बाष्पाची पातळी फार वाढत नाही. हे पाहण्यासाठी द्रव स्फटिकांचा उत्तम उपयोग होतो.
द्रव स्फटिकाला विद्युत् क्षेत्र किंवा चुंबकीय क्षेत्र लावून अथवा त्यातून विद्युत् प्रवाह सोडून दिसणारे रंग नाहीसे होतात किंवा याच्या उलट प्रकारही होऊ शकतो. संगणक (गणन यंत्रे), अंकीय घड्याळे (काट्यांच्या ऐवजी नुसत्या अंकांच्याद्वारे वेळ दर्शविणारी घड्याळे), नियंत्रण फलकावरील मापक उपकरणांच्या तबकड्या इत्यादीवर अंकीय दर्शक करण्यासाठी त्याचप्रमाणे दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रे दिसण्यासाठीही या गोष्टीचा उपयोग होतो. द्रव स्फटिकांच्या नवनवीन उपयोगबद्दल अनेक ठिकाणी प्रयोग चालू आहेत.
संरचना : संरचनेच्या अनुषंगाने द्रव स्फटिकांचे तीन प्रकार होतात. पहिल्या प्रकारातील रेणू समांतर स्तरामध्ये स्थिर होतात व प्रत्येक स्तरातील रेणूंची लांबी त्या स्तराच्या प्रतलाला लंब असते. याना तेलकट द्रव स्फटिक म्हणतात. दुसऱ्या प्रकारात रेणूंची लांबी स्तरांना समांतर असते परंतु येथे स्पष्ट असे स्तर बनत नाहीत. म्हणजेच रचनेचा सुव्यवस्थितपणा कमी दर्जाचा असतो. यांना तंतुसदृश द्रव स्फटिक असे म्हणतात. कोलेस्टेरॉल या रसायनापासून मिळणाऱ्या कित्येक संयुगांचा तिसरा वर्ग होतो. त्याला कोलेस्टेरॉल सदृश द्रव स्फटिक असे म्हणतात. या प्रकारात रेणू परस्परांना समांतर होऊन त्यांचे स्तर बनतात पण हे स्तर पातळ असतात आणि रेणूची लांबी स्तराच्या प्रतलाला समांतर असते.
पुरोहित, वा. ल.
“