द्यू पाँ घराणे : मूळचे फ्रान्समधील परंतु नंतर अमेरिकेत स्थायिक होऊन अमेरिकन उद्योगाशी सु.१६० वर्षांपासून निगडित झालेले उद्योगपतींचे सुविख्यात घराणे. या घराण्याचे संपूर्ण नाव द्यू पाँ द नमूर. या घराण्यातील पुरुषांनी आपल्या नावाने अमेरिकेतील डेलावेअर राज्यात एका कारखान्याची स्थापना केली आणि ते तिचे व्यवस्थापन करू लागले. ही कंपनी प्रथम बंदुकीच्या दारूचे उत्पादन करीत असे. त्यानंतर तिचे उत्पादनक्षेत्र विस्तारले जाऊन संश्लिष्ट धागे, प्लॅस्टिके, इतर रसायनिक पदार्थ ह्यांचे उत्पादन होऊ लागले. कालांतराने ही कंपनी म्हणजे अमेरिकेच्या संयुक्त, संस्थानांतील एक अग्रगण्य व महत्त्वाची उद्योगसंस्था म्हणून गणली जाऊ लागली. कंपनीचे संपूर्ण नाव ‘ई, आय्. द्यू पाँ द नमूर अँड कंपनी’ असे असले, तरी सध्या द्यू पाँ एवढ्या संक्षिप्त नावानेच ती ओळखली जाते. १९४० मध्ये द्यू पाँ घराण्याबाहेरील व्यक्ती प्रथमच या कंपनीची अध्यक्ष झाली. द्यू पाँ घराण्यातील अनेक व्यक्तींनी भूसेना व नौसेना, राज्य व राष्ट्र या दोन्ही स्तरांवरील राजकारण, विविध सार्वजनिक सेवाक्षेत्रे आणि परोपकारबुद्धी व लोककल्याण या बहुविध क्षेत्रांत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे.

प्येअर साम्यूएल द्यू पाँ : (१४ सप्टेंबर १७३९–७ ऑगस्ट १८१७). द्यू पाँ घराण्यातील पहिला पुरुष व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ. त्याचा पॅरिस येथे जन्म झाला. त्याचे वडील साम्युएल हे एक कुशल घड्याळाचे होते. प्रथम काही काळ त्याने वडिलांच्या हाताखाली घड्याळाचे शिक्षण घेतले व काही काळ तो वैद्यकही शिकला. १७६३ मध्ये त्याचा फ्रांस्वा केने या प्रकृतिवादी अर्थशास्त्रज्ञाशी परिचय झाला आणि प्रकृतिवादी संप्रदायाचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. प्येअर साम्युएलने ऑफ द एक्स्पोर्टेंशन अँड इंपोर्टेंशन ऑफ ग्रेन्स (१७६३), फिजिओक्रसी (१७६७) व ऑफ द ओरिजिन अँड द प्रोग्रेस ऑफ ए न्यू सायन्स (१७६७) ह्या प्रारंभीच्या ग्रंथांमधून आपल्या प्रमुख संकल्पना विशद केल्या आहेत. मनुष्याचे हक्क व कर्तव्ये जिच्यामध्ये जीवनाच्या गरजांवर आधारित असतात, अशा समाजपूर्व नैसर्गिक व्यवस्थेवर त्याचा विश्वास होता. त्याच्या मते जमीन हाच संपत्ती मिळविण्याचा नैसर्गिक स्त्रोत असून कृषीशीच श्रम व वाणिज्य हे संबद्ध आहेत. उद्योगाचे इतर सर्व प्रकार हे दुय्यम असून ते चैनीशी निगडित समजले पाहिजेत. समाजाने अनुत्पादक उद्योगांना वाव देऊ नये व जमीन या उत्पादक घटकाला सर्व अनैसर्गिक निर्बंधापासून मुक्त करावे. चांगल्या शासनाने, म्हणूनच, जकात निर्बंध आणि बेसुमार व अनुत्पादक कर यांचे निरसन करावे ह्यामुळे कृषी व व्यापार यांची वाढ होईल. प्येअरचे असेही मत होते, की केवळ आनुवंशिक राजेशाहीच नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग करू शकेल.

प्येअर साम्युएलची १७७४ मध्ये त्याचा घनिष्ठ स्नेही त्यूर्गो ह्याच्या अधिकाराखाली वाणिज्य महानिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यूर्गोचा खाजगी सचिव म्हणूनही त्याने काम केले. १७७५ मध्ये त्यूर्गोची पदच्युती झाल्यावर प्येअरही निवृत्त झाला आणि नेमूर्स या गावी राहू लागला. तेथे असतानाच त्याने त्यर्गोचा मेम्बार ऑन म्युनिसिपॅलिटिज (१७७६) हा बखरवजा ग्रंथ तयार केला. हा ग्रंथ म्हणजे पुढील मंत्र्यांनी केलेल्या विविध सुधारणांचे अधिष्ठानच ठरला.

‘ॲसेंब्ली ऑफ द नोटेबल्स’ च्या कारकीर्दीत (१७८७) प्येअर निरनिराळ्या बैठकांचा आणि सभांचा द्वितीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आला नोटेबल्सच्या अस्तानंतर प्येअर क्रांतिकार्यामध्ये विशेष भाग घेऊ लागला व १७८९ मध्ये नेमूर्स या थर्ड इस्टेटचा प्रतिनिधी म्हणून तो निवडून आला. संविधान सभेचा सदस्य असताना तो एका वेळी ११ वित्तसमित्यांवर काम करीत होता. प्येअर हा मवाळ क्रांतिवादी असल्याने आवश्यक तेवढीच सुधारणा घडून आली पाहिजे आणि तसे होताना प्रकृतिवादी तत्त्वांचे पालन झाले पाहिजे, अशी त्याची श्रद्धा होती. म्हणूनच त्याने शासनाच्या अधिकारांचे विभक्तीकरण, द्विसदनीय विधान मंडळ आणि समर्थ राजेशाही ह्यांचे समर्थन केले होते.

प्येअर साम्युएलच्या उपर्युक्त मतांमुळे क्रांतिनेत्यांच्या मनात त्याच्याविषयी अप्रीती निर्माण झाली. परिणामी तो १७९१ मध्ये सार्वजनिक कार्यातून निवृत्त झाला. १७९५ साली ‘कौन्सिल ऑफ एल्डर्स’ मध्ये निवडून आल्यावर त्याचे डायरेक्टरीशी सतत खटके उडू लागले आणि राजनिष्ठ असल्याच्या संशयावरून १७९७ मध्ये त्याच्यावर बंदीहुकूम बजावण्यात आला. यामुळे त्याने कौन्सिलच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व त्याचे लक्ष अमेरिकेकडे वळले. १७९९ मध्ये तो अमेरिकेला गेला व तेथे त्याने प्रकृतिवादाच्या संकल्पनांच्या प्रसारकार्यास प्रारंभ केला. १८०२ मध्ये फ्रान्सला परतल्यावर प्येअर साम्युएलने अमेरिका-फ्रान्स यांच्या ‘लुइझिॲना प्रदेश खरेदी व्यवहारा’ मध्ये (लुइझिॲना परचेस) मध्यस्थाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर त्याची ‘पॅरिस चेंबर ऑफ कॉमर्स’ वर निवड झाली. नेपोलियनचे व त्याचे मात्र कधीच जमले नाही. नेपोलियन फ्रान्सला पुन्हा परतल्यानंतर (१८१५) प्येअर अमेरिकेस गेला व डेलावेअर राज्यातील विल्मिंग्टन येथे आपल्या कारखानदार मुलाकडे राहू लागला. अल्पकालीन आजारानंतर तो वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी मरण पावला.


प्येअर साम्युएलचा ज्येष्ठ मुलगा व्हीक्तोप मारी द्यू पाँ (१७६७–१८२७) याने द्यू पाँ घराण्याच्या निर्यात आयात व्यवसायात व अन्य प्रकल्पांत स्वतःस वाहून घेतले. तो आपला भाऊ एल्यतेअर एरेने याच्या विल्मिंग्टन येथील लोकर गिरणीत व्यवस्थापकीय काम पाहू लागला (१८०९). डेलावेअर राज्याच्या विधानमंडळाचा तो सदस्यही होता.

एल्यतेअर एरेन द्यू पाँ: (२४ जून १७७१–३१ ऑक्टोबर १८३४). प्येअर साम्युएलचा धाकटा मुलगा आणि द्यू पाँ उद्योगाचा शिल्पकार. पॅरिसमध्ये जन्म. वयाच्या सतराव्या वर्षी फ्रान्समधील शाही दारूगोळ्याच्या कारखान्यात नोकरी धरली. तेथेच आंत्वान लाव्हाझ्ये (१७४३–९४) या सुविख्यात फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने एरेनेला दारूनिर्मितीचे तंत्र आणि मंत्र शिकविले. ही नोकरी सोडून देऊन एरेने आपल्या वडिलांचा छापखाना चालवू लागला (१७९१). या छापखान्यातून प्रतिक्रांतिकारी पत्रिका छापण्यात येत. जॅकोबिन्सनी छापखाना बंद पाडल्यावर, एरेने आपल्या कुटुंबियांसह अमेरिकेस गेला (१८००). अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल लूइ द तुसार्द याच्याबरोबर शिकारीस गेला असताना, एरेनेला अमेरिकेत बनविली जाणारी बंदुकीची दारू केवळ निकृष्ट प्रतीचीच नव्हे, तर भावातही महाग असल्याचे आढळून आले. या दोघांनी अमेरिकेतील दारूनिर्मितिउद्योगाचा अभ्यास केला आणि अमेरिकेत बंदुकीच्या दारूउत्पादनाचा एक कारखाना उभारावयाचे ठरविले. डेलावेअर राज्यातील विल्मिंग्टन गावापासून ६ किमी. वरील ब्रँडीवाइन क्रीक या नदीशेजारी दारूनिर्मितिकारखाना उभारण्यात आला (जुलै १८०२). १८०३ पासून कारखाना शासनासाठी सॉल्टपीटरचे उत्पादन करू लगला व लवकरच व्हीक्तोर मारीच्या न्यूयॉर्कमधील कार्यालयातून द्यू पाँ उद्योगाने उत्पादिलेली पहिली दारू विकण्यात आली. ‘ई. आय्. द्यू पाँ द नमूर अँड कंपनी’ असे उद्योगाचे नामकरण झाले. नंतरच्या काही वर्षांत एल्यतेअर एरेनेने कंपनीला आपल्या कुशल मार्गदर्शनाने विकासपथावर आणून सोडले. कंपनीचा व्याप उत्पादन व विक्री या दोन्ही दृष्टींनी खूप वाढला, परंतु समस्याही अनेकदा उद्‌भवल्या. १८१५ व १८१८ या दोन वर्षी कारखान्यात स्फोट होऊन ४९ मृत्यू आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी घडून आली. १८१२ च्या युद्धामध्ये अमेरिकन शासनाने मोठ्या प्रमाणावर दारूगोळ्याची नोंदणी या कंपनीकडे केल्याने, अमेरिकेतील दारूगोळा व अन्य सामग्रीचे उत्पादन करणार अग्रेसर उद्योग म्हणून द्यू पाँ कंपनीची ख्याती झाली. याशिवाय एरेनेचे इतरही अनेक उद्योग होते. १८११ मध्ये आपला भाऊ व्हीक्तोर व पीटर बाॅँडी यांसमवेत त्याने ब्रँडीवाइनशेजारीच एक लोकर–कापडगिरणी उभारली तसेच एक सुती कापडगिरणी व चर्मसंस्करणी हे उद्योगही उभारले. फिलाडेल्फियातील बँक ऑफ द युनायटेड स्टेट्सचा तो एक संचालक होता, राजकारणात त्याने फारसा भाग घेतला नाही. तो वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी फिलाडेल्फिया येथे मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर कंपनीचे व्यवस्थापन आंत्वान बिदरमान ह्या त्याच्या जावयाकडे गेले.

एल्यतेअर एरेनेचा ज्येष्ठ मुलगा आल्फ्रेद व्हीक्तोर (१७९८–१८५६) याने १८३७ मध्ये आपला मेव्हणा आंत्वान बिदरमान याच्याकडून कंपनीचे व्यवस्थापन स्वतःकडे घेतले व १८५० पर्यंत द्यू पाँ कंपनीची धुरा यशस्वीपणे वाहिली. तो रसायनशास्त्राचा पदवीधर व बंदुकीच्या दारूनिर्मितितंत्रात प्रवीण तसेच कुशल प्रशासकही होता. एल्युतेअर एरेनेचा दुसरा मुलगा आंरी (हेन्री) (१८१२–८९) याने द्यू पाँ कंपनीची जबाबदारी १८५०–८९ पर्यंत सांभाळली. त्याच्या कारकीर्दीत कंपनीचा अनेक बाजूंनी विकास घडत गेला. त्याचा पुतण्या लॅमॉत (१८३१–८४) यानेही कंपनीच्या विकासकार्यात मोठा भाग घेतला. स्फोटक दारू निर्मिण्यात त्याने मोठे यश मिळविले. त्याने डायनामाईट उत्पादन विभाग निर्माण केला.

एल्यतेअर एरेनेचा नातू यूझेन (१८४०–१९०२) याने १८८९–९९ एवढा काळ कंपनीची धुरा सांभाळली व तिला समृद्धीच्या मार्गावर आणून सोडले. त्याने उत्पादन, संघटन व कार्यक्षमता अशा त्रयीतून कंपनीचा विकास केला. कंपनीच्या असंख्य विक्रीकेंद्रांचे दहा शाखीय कार्यालयांत रूपांतर करून त्यांद्वारा घाऊक व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष मालाचे वितरण करण्याची योजना कार्यवाहीत आणली विल्मिंग्टन येथे कंपनीचे प्रधान कार्यालय उघडले आणि न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया शहारांतून चालू असलेल्या कंपनीच्या व्यवहारांचे केंद्रीकरण करून कंपनीच्या प्रमुख कार्यालयामार्फत चालू राहतील अशी व्यवस्था केली. आल्फ्रेद व्हीक्तोरचा नातू आल्फ्रेद एरेने द्यू पाँ (१८९४–१९३५) हा कौटुंबिक व्यवसायात १८८७ मध्ये शिरला. त्याने धूम्ररहित दारूनिर्मितीच्या तंत्राचा यूरोपमध्ये अभ्यास केला. त्याने केलेल्या अनेक संशोधनांमुळे द्यू पाँ कंपनी १८९४ पासून धूम्रविरहित दारूचे उत्पादन करू लागली. त्याने सुचविलेल्या अनेक तांत्रिक सुधारणांच्या योगे बंदुकीच्या दारूनिर्मितीमध्ये दर्जा, एकजिनसीपणा व सुरक्षितता या तिन्ही गोष्टी एकवटल्या. द्यू पाँ कंपनीचा उपाध्यक्ष व निर्मितिविभागाचा महाव्यवस्थापक म्हणून आल्फ्रेदने कंपनीचा कारभार पाहिला. आल्फ्रेद व्हीक्तोरचा आणखी एक नातू टॉमस कोलमॅन द्यू पाँ (१८६३–१९३०) ह्याने १९०२–१५ या काळात कंपनीचे उपाध्यक्षपद सांभाळले. त्याच्या कारकीर्दीत द्यू पाँ कंपनीत पुढील महत्त्वाचे बदल घडून आले: (१) लॅफलिन अँड रँड कंपनीची खरेदी. (२) कार्यकारी समिती व वित्तीय समिती या जिच्या अग्रभागी आहेत, अशा व्यवस्थापनाची समितीय पद्धती  (कमिटी सिस्टिम ऑफ मॅनेजमेंट) सुरू करण्यात आली. (३) न्यू जर्सी राज्यातील रेपॉनो येथील ‘ईस्टर्न लॅबोरेटरीशी’ संधान बांधून संशोधनक्षेत्र विस्तारण्यात आले. डायनामाईट उत्पादनावर अधिक भर. (४) काळी पावडर व धूम्रविरहित पावडर यांच्या निर्मितीबाबत अधिक संशोधन. टॉमस कोलमॅन हा विविध व्यवसायांत कार्यशील होता. त्याने विल्मिंग्टनपासून मेरिलँड राज्याच्या सरहद्दीपर्यंत स्वखर्चाने मोठा रस्ता बांधला व नंतर तो मेरिलँड राज्याच्या स्वाधीन केला (१९२४) तो सेनेटवरही निवडून गेला (१९२४).


एल्यतेअर एरेने द्यू पाँ

 प्येअर साम्युएल द्यू पाँ : (१५ जानेवारी १८७०–५ एप्रिल १९५४). आल्फ्रेद व्हीक्तोरचा आणखी एक नातू. विल्मिंग्टन येथे जन्म. एम्. आय्. टी मधून शिक्षण घेतले (१८९०). आपल्या कौटुंबिक व्यवसायात तो रसायनशास्त्रज्ञ म्हणून कामाला लागला. १९०२ पर्यंत त्याने अनेक व्यवसाय केले. त्याच वर्षी त्याने आपल्या दोन चुलत भावांसह द्यू पाँ कंपनी विकत घेतली व तिची पुनर्रचना केली. त्याने आपल्या कारकीर्दीत कंपनीच्या प्रशासकीय, संघटनात्मक व उत्पादनविषयक धोरणांमध्ये फार मोठ्या सुधारणा केल्या. त्यांचाच परिणाम आज आघाडीवर असलेल्या व विस्तार झालेल्या द्यू पाँ निगमाच्या कार्यवाहीमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. पहिल्या महायुद्धासाठी द्यू पाँ निगमाने १३० कोटी पौंड धूररहित पावडरचे उत्पादन केले. विनियोजित केलेले स्थूल भांडवल ८३५ लक्ष डॉलरवरून ३,०९० लक्ष डॉलरपर्यंत गेले त्याचप्रमाणे कामगारसंख्या ५,३०० वरून ८५,००० पर्यंत वाढली. प्येअर साम्युएलने पहिल्या महायुद्धकाळात द्यू पाँ कंपनीचा अवाढव्य विस्तार व नंतरच्या काळातील स्फोटक द्रव्य उद्योगाव्यतिरिक्त विविध वस्तू–उत्पादनाचा कार्यक्रम ह्या दोहोंमध्ये कंपनीला सुयोग्य मार्गदर्शन केले. १९१९ च्या सुमारास कंपनीने आपले उत्पादनक्षेत्र रसायने, रंग व व्हार्निशे, सेल्यूलॉइड व कृत्रिम रबर अशा विविध पदार्थांच्या उत्पादनाने विस्तारले. प्येअरने कौटुंबिक सदस्यत्वापेक्षा कार्यक्षमतेवर अधिक भर दिला. म्हणूनच त्याने द्यू पाँ कंपनीचे एक कुटुंबचालित उद्योगातून व्यावसायिक व्यवस्थापकांद्वारा चालविल्या जाणाऱ्या निगमामध्ये परिवर्तन केले. त्याने कंपनीची नावीन्यपूर्ण संरचना केली व तिची नवीन विपणन डावपेचांशी सांगड घातली. या प्रयत्नांत त्याचे औद्योगिक, प्रशासकीय व नवप्रवर्तकीय कौशल्य दिसून आले. १९६० मध्ये ‘जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ हा मोटरनिर्मिती उद्योग आर्थिक अरिष्टात सापडला, तेव्हा त्याला अर्थसाहाय्य देऊन द्यू पाँ उद्योगाने त्यावरील अरिष्ट निवारले. १९२०–२३ या काळात प्येअरने या उद्योगाचे अध्यक्षपदही सांभाळले.

प्येअर साम्युएल द्यू पाँ

प्येअर साम्युएल हा सार्वजनिक व्यवहारांतही क्रियाशील होता. डेलावेअर राज्यशासनाच्या अनेक समित्यांवर त्याने कार्य केले व्यवसाय व उद्योगधंदे यांच्या कारभारात शासनाने हस्तक्षेप करू नये असे प्येअरचे मत असल्याने फ्रँकलिन डीलॅनो रूझवेल्टच्या पुनर्निवडणुकीस (१९३६) त्याने विरोध केला. ‘अमेरिकन लिबर्टी लीग’ या संस्थेचा तो संस्थापक होता. विसाव्या शतकातील द्यू पाँ कंपनीच्या विकासाचे व भरभराटीचे श्रेय प्येअर साम्युएलला दिले पाहिजे.

एरेने द्यू पाँ : (१८७६–१९६३). प्येअर साम्युएलचा भाऊ. एम्. आय्. टी. मधून १८९७ मध्ये पदवी प्राप्त पुढच्याच वर्षी एम्. एस्. ही पदवी मिळविली. १९०२ मध्ये द्यू पाँ कंपनीत पदार्पण, १९०४ मध्ये संचालक, नंतर विकास विभागाचा व्यवस्थापक (१९०८), १९१४ साली उपाध्यक्ष. कंपनीचा महाव्यवस्थापक म्हणून काम करीत असताना, एरेने द्यू पाँने विक्री व निर्मितिविभागांचा मोठ्या प्रमाणावर विकास केला.१९१९–२६ या त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात, कंपनीच्या विकेंद्रीकृत बहुविभागीय संरचनेमध्ये अधिक प्रमाणात पूर्णत्व आणण्यात आले. याच काळात कंपनीने नवनवीन क्षेत्रांमध्ये जलद प्रगती केली. स्वतःच्या संशोधन विभागांद्वारा आणि फ्रेंच उत्पादकांसमवेत पेटंटे आणि प्रक्रियांबाबतच्या हक्कांसंबंधी करार करून, द्यू पाँ कंपनीने रेयॉन व सेलोफेन यांच्या उत्पादनक्षेत्रात प्रवेश केला. कंपनीने निर्मिलेला ‘ड्यूको एनॅमल’ मोटरउद्योगात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. १९२५ मध्ये सिंथेटिक रबरावरील संशोधनास प्रारंभ झाला. या व इतर क्षेत्रांतही कंपनीने उच्च दर्जाच्या विविधांगी पदार्यांची प्रचंड निर्मिती केली.


लॅमॉत द्यू पाँ : (१८८०–१९५२). प्येअर साम्युएल आणि एरेने यांचा भाऊ. १९०१ साली एम्. आय्. टी. मधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी मिळविली. १९०२ मध्ये द्यू पाँ उद्योगसमूहात पदार्पण. १९१३ मध्ये काळी पावडर निर्मितिविभागप्रमुख. पहिल्या महायुद्धकाळात कंपनीचे एक विभागपद सांभाळले. या विभागाने महायुद्धोत्तरकाळात रंजके, रंग व प्लॅस्टिके यांच्या संशोधनकार्यांत भाग घेतला. १९२९ मध्ये लॅमॉस धोरण ठरविणाऱ्या कार्यकारी समितीचा अध्यक्ष, द्यू पाँ उद्योगसमूहाचा अध्यक्ष (१९२६–४०) आणि कंपनीच्या संचालक मंडळाचा अध्यक्ष (१९४०–४८) होता.

जनरल मोटर्स कॉर्पोरेशनचा तो संचालक (१९१८–४६) आणि संचालक मंडळाचा अध्यक्षही (१९२९–३७) होता. लॅमॉतच्या अध्यक्षपदाच्या काळात द्यू पाँ कंपनीने संशोधनाधारित विविध पदार्थांचे व वस्तूंचे व्यापारी दृष्ट्या उत्पादन चालूच ठेवले आणि त्याबरोबर विशुद्ध संशोधनास प्रारंभ केला. १९३० च्या पुढील काळात कंपनीने ‘निओप्रीन’ नावाचे एक प्रकारचे संश्लिष्ट रबर, ‘ल्युसाइट’ नावाचा एक प्लॅस्टिकप्रकार, ‘नायलॉन’ नावाचा संश्लिष्ट कापडप्रकार, असे नवनवे पदार्थ वा वस्तू बाजारपेठेत आणल्या. १९४१ मध्ये ‘डेक्रॉन’ नावाचा आणखी एक संश्लिष्ट वस्त्रधागाप्रकार कंपनीने बाजारात आणला. दुसऱ्या महायुद्धकाळात अणुशक्तिविकास कार्यक्रमाला हातभार लावण्याच्या कामी द्यू पाँ कंपनीने सहकार्य द्यावे, या अमेरिकन शासनाच्या निमंत्रणाला लॅमॉतने मान्यता दिली. वॉशिंग्टनजवळील पॅस्को येथील हॅन्फोर्ड एंजिनियर वर्क्स ह्या कारखान्यात प्लुटोनियम उत्पादन (अणुबाँब निर्मितीमधील एक प्रमुख घटक) योजना लॅमॉतने कार्यवाहीत आणल्या.

द्यू पाँ उद्योगसमूहाचे १९६० मध्ये ८७,००० च्यावर कर्मचारी होते आणि द्यू पाँ उद्योगसमूह १०० हून अधिक कारखाने–त्यांपैकी ८२ परदेशांत– चालवीत होता. १९७० साली अमेरिकेतील सर्वांत मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये द्यू पाँ कंपनीचा (विक्री आकड्यांवरून काढलेला) अठरावा क्रमांक होता. त्या वर्षाची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे कोटी डॉ.) : विक्री ३६१·८४ मत्ता : ३५६·६६ निव्वळ प्राप्ती : ३२·८७ कामगारसंख्या : १, १०, ६८५.

गद्रे, वि. रा.